खेड तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड-सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. या मध्ये उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने सुद्धा प्रचंड आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे.हे तीन किल्ले एकमेकांच्या जवळजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड-सुमारगड-रसाळगड असा ट्रेक देखील करतात. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : महिपतगड हा नावाप्रमाणेच महिपत आहे. किल्ला तसा आकाराने फार मोठा आहे. चहुबाजूंचे कडे तुटलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. काही ठिकाणी जिथे कडा चढण्यास सोपा आहे तिथे तटबंदी उभारली आहे. सध्या मात्र ही तटबंदी पडून गेलेली आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्रेयेस यशवंत दरवाजा. सःस्थितीला हे दरवाजे नाममात्र उरलेले आहेत.
हे सर्व दरवाजे होते याच्या खुणा फक्त उरलेल्या आहेत. शिवगंगा दरवाजा जवळ एक शिवाची पिंड आहे. पुसाटी दरवाजा जवळ एक शिडी आहे. कोतवाल दरवाजा जवळ मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पारेश्र्वराचे एक मोठे मंदिर किल्ल्यावर आहे. या मंदिरात राहण्याची सोय होते. मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास होणे फार आवश्यक आहे. या किल्ल्यावर एक आगळावेगळा प्रकार दिसतो. तो म्हणजे न वापरलेल्या चुन्याचे अवशेष येथे पडलेले दिसतात.गड फिरण्यास दोन ते तीन तास पुरतात.