अंदाजे इ.स. पूर्व २००० कालखंडातील भारतीय वैद्यकशास्त्राची कीर्ती पसरवणारे शल्यचिकित्सक सुश्रुताचार्य हे प्लास्टिक सर्जरीचे जनक होत. पाश्चिमात्य शल्यविशारदांना जेव्हा प्लास्टिक सर्जरीचा विचार करावासा वाटला, तेव्हा त्यांनी भारतीय शल्यकर्मज्ञ सुश्रुताचार्य यांनी केलेल्या संशोधन कार्याचा प्रथम आढावा घेतला. ‘सुश्रुतसंहिता’ या सुश्रुताचार्य यांच्या ग्रंथात १२० अध्याय आणि उत्तरतंत्राचे एक स्वतंत्र परिशिष्ट आहे. बनारस हिंदु विद्यापिठातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या बालशस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. जी.डी. सिंघाल यांनी सुश्रुतसंहितेचे १८६ भाग भाषांतरित केले आहेत. त्यात ते सांगतात, ‘आयुर्वेद उपचारपद्धती जगाला १६ व्या शतकापर्यंत ज्ञात नव्हती. १६ व्या शतकात जर्मन डॉक्टरांनी भारताला भेट दिली. तेव्हा ‘सुश्रुताचार्य ‘रेनोप्लास्टिक सर्जरी’ त्यांच्या व्यवसायात वापरत होते’, असे त्यांना याविषयीचा अभ्यास करतांना आढळले.