पालीगावाच्या पूर्वेस हा किल्ला आहे. पायथ्याच्या पाली गावातून इथं येउन किल्ला पाहणे ३-४ तासांत होते. या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैल्या, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंड असणारे उन्हेरे असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो. पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायक क्षेत्र बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर या सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे.
इतिहास
इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले. नंतर हे किल्ले आदिलशाहीत जमा झाले. शिवशाहीत येताना नारो मुकुंदाना सुधागड, सरसगडाची सबनिशी मिळाली. सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले गेले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्याची व्यवस्था होती.
गडावरील ठिकाणे
बालेकिल्ल्याच्या माथ्यावर महादेवाचे मंदिर आणि शाह्पीराचे ठिकाण आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
गडावर जाण्यासाठी पाली गावा मधुन दोन वाटा आहेत.पहिली आहे उत्तरेकडून राम आळीतून व दुसरी आहे देउळवाड्य़ातून. दक्षिणेच्या बाजूकडील कातळमाथ्याला एक मोठी नाळ आहे. नाळेतून ९६ भक्क्म पायर्या चढल्यावर मुख्य दरवाजा येतो. मध्यभागी असण्यार्या वाटोळ्या सुळक्याभोवती चक्कर मारता येते. या ५० मीटर उंचीच्या बालेकिल्ल्याच्या तळाशी टाकी, तळी, कोठ्या, गुहा, तालीमखाने आहेत. याच गुहांमधे पांडवानीही वस्ती केली होती असे म्हणतात.