मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. बदलापूरच्या नैऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा व उरण नैऋत्येस आणि बोरघाट,भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
इतिहास
ऍबिंग्डन ह्या इंग्रजी अधिकार्याने १७८० मध्ये मंलगगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात. हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैऋत्य व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यास ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही. १२५ जण सोने माचीकडे धावले. तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. ऍबिंग्डनने गडावर पोहचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंत वाट शोधून काढली. नाना फडणविसाने वेढा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. ऍबिंग्डनने पीर माचीच्या पठारावर तीन तोफा चढवल्या व सोने माचीवर गोळीबार चालू केला. पण प्रवेशद्वार मोठा खुबीने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहचेनात. मराठांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता.
किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी प्रत्यक्ष न येता ७०० शिपाई पाठवले जे तेथवर पोहचू शकले नाहीत. कॅप्टन ऍबिंग्डनने शिडा लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली. पण मराठानी गडावरून दगडधोंडांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. ऍबिग्डनने पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावानने संधी साधून दाणापाणी व दारूगोळा भरून धेतला
. नाना फडणीसांनी बाळाजी विश्र्वनाथ पाठक व राधोविश्र्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहचल्या. मराठ्यांची फौज तीन हजारावर होती. त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले. पण ते अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला गारांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या. मेजर वेस्टफॉलने ऍबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन येणार्या मराठ्यांच्या तुकडीला उध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिना संपत आला.मराठ्यांनी इंग्रजांचेही दळणवळण तोडून टाकले होते. तेंव्हा कर्नल हार्टलेने बेलापूर,पनवेल,तळोजे मार्ग सुरक्षित केला.
शिरवळच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून त्यांना हुसकावून लावले. आता ब्रिटिशांनी कॅप्टन कारपेंटरच्या हुकमतीत मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा गोळीबार सुरू केला. तटाला भगदाड पडले की आत घुसायला ३५० सैनिक तयार ठेवले होते पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवेला.इंग्रजांचे बरेच सैनिक कामी आले. तेंव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले. पण वेढा मात्र उठवला नाही.पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार केली.
त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबर नंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. बाहेरून गंगाधर कार्लेकर काही मदत पाठवू शकले नाहीत. शेवटी नाना फडणविसाने काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसई वर धाडली. स्वतः नाना व हरीपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. ताबडतोब हार्टलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेसच मराठांनी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली अशाप्रकारे मराठ्यांनी अखेरपर्यंत मलंगगड शर्थीने लढवला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
माचीवरून सरळ पुढे जात पलीकडचे टोक गाठायच. तेथून एका चोर वाटेने खाली उतरले की गडाच्या निम्म्या उंचीवर एक आश्रम लागतो. तिथून गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाच्या दिशेने वळसा घेत जाणा-या वाटा निघतात. पहिली वाट खाली वावंजे गावात जाते. तेथून पनवेलला जायला एस टी मिळते. उत्तर दिशेच्या वाटेने गेले की दोन वाटा फुटतात. सरळ जाणारी वाट गडाला वळसा घालून पालखीसारख्या आकाराच्या खडकाखालून किल्ल्यावर जाते. उजवीकडे खाली उतरणारी वाट मलंगगड व गणेश कार्तिक सुळक्यांचा डोंगर यांच्यामधील खिंडीत पोहचते. माचीवरून बालेकिल्याकडे जाण्यासाठी कडाला उजवीकडे ठेवत वळसा घालून गेले की खोदीव पाय-या दिसतात. पाय-यापुढे एक गुहा व पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणे कठीण आहे. पन्नास साठ पाय-यां नंतरच्या पाय-या तुटलेल्या आहेत. तो भाग चढण्यासाठी दहा बारा फूटांचा एक पाइप आडवा टाकलेला आहे आणि हातांच्या आधारासाठी दोर लावला आहे. हा अवघड टप्पा पार करून दहा मिनिटांत गड माथ्यावर पोहचता येते.
शिरोभाग तसा लहान आहे. छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक वाडा दिसतो. त्याच्या मागे खोदलेली सात टाकी आहेत. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराच झाड आहे. आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे. बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते असे म्हणतात. पूर्वेकडून नैऋत्येकडे गोरखगड,राजमाची,माथेरान,पेब,इर्शाळ,प्रबळ वगैरे हा परिसर दिसतात.
गडावर जाण्याच्या वाटा
कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिध्द हाजीमलंग दर्गा आहे. तिथपर्यंत पाय-या आहेत.वाटेत दुकाने आहेत. एक देवीचं मोठे मंदिर आणि शंकराच लहान देऊळ आहे. वरच्या या दर्ग्यापर्यंत भविकांची भरपूर वर्दळ असते.दर्ग्याच्या अलीकडे दुकानांच्या रांगेतून एक बोळ उजवीकडे जातो. तेथे घरे आहेत आणि विहीरही आहे. वाट समोरच्या डोंगराला लागून उजवीकडून वर चढायला लागते. पधंरा वीस मिनिटांत पहिला चढ पार करून वरच्या उभ्या कडयापाशी पोहचता येते.
राहण्याची सोय : नाही
जेवणाची सोय : नाही
पाण्याची सोय : गडावर अनेक टिकाणी पाण्याची टाकी आहेत. यातील पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापासून २ तास.