लोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाची किल्ल्यावर वर्षभर दुर्गप्रेमी येत असतात. मात्र याच राजमाचीजवळ निबीड अरण्यात असलेल्या बुलंद आणि बेलाग अशा ढाकच्या किल्ल्याची फारशी कोणाला ओळख नाही. या किल्ल्याची आपल्या सारख्या रानावनात हिंडणा-या मंडळीना ओळख करून दिली ती म्हणजे ‘गो. नी. दांडेकर’ यांनी. ढाकचा बहिरी म्हणजे ‘ढाकचा किल्ला’ आणि ‘गडदचा बहिरी’.
ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणा-या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असेही म्हणतात. विशेषतः ढाकच्या किल्ल्यावर पोहचायचे असल्यास ‘वदप’ गाव गाठावे. किल्ल्याच्या माथ्यावर पाण्याची दोन, तीन टाकी आणि एक मंदिर आहे. मंदिरात ४ जणांना झोपता येते. या किल्ल्याच्याच नैसर्गिक तटबंदीच्या कातळात ‘गडदचा बहिरी’ लपून बसला आहे. याच्या पश्चिमेला पळसदरी तलाव, पूर्वेला उल्हास नदीचे खोरे आहे.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
बहिरीची गुहा
या बहिरीच्या गुहेतच पाण्याचे एक मोठे टाके आहे. या टाक्यांमध्येच गावक-यांनी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवावी. गुहेच्या वरच दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा
गडदचा बहिरीवर अर्थात ढाकच्या गुहेपर्यंत जाणा-या सर्व वाटा ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधूनच जातात.
राहण्याची सोय : येथील राहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बहिरीची गुहा हेच होय.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वतःच करावी.
पाण्याची सोय : गुहेतच पिण्याच्या पाण्याचे एक मोठे टाके आहे. वाटेत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा भरपूर साठा असणे आवश्यक.
जाण्यासाठी लागणारा वेळ : ४ तास सांडशी मार्गे.