Pargad Fort
सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रगड तालूका आहे. चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला मोडतो. चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस.टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्यांपर्यंत जाते. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते.
चंदगडाहून निसर्गरम्य परिसरातून प्रवास करीत आपण तासाभरात पारगडाच्या पायर्यांशी पोहोचतो. तिनशे पायर्या चढून जाव्या लागतात. यात नव्याने केलेल्या पायर्यांबरोबर शिवकालीन पायर्याही आपल्याला आढळतात. गडाचा दरवाजा नष्ट झालेला आहे. गडप्रवेश करताच समोर तुटक्या तोफांचे काही तुकडे मांडलेले दिसतात. बाजूलाच हनुमानाच्या मंदिराचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. मंदिरासमोर अनामिक असे स्मारक आहे. हे घडीव दगडामध्ये बांधलेले स्मारक कोणातरी महत्वाच्या व्यक्तीचे असावे. येथून थोडे वर चढल्यावर पारगडावरील वस्ती लागते.
दुतर्फा असलेल्या वस्तीमधून रस्ता गेला आहे. या वस्तीमध्येच रस्त्याच्या डाव्या बाजूला शाळा आहे. शाळेच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पण पुर्णाकृती पुतळा चौथर्यावर बसविलेला आहे. या पुतळ्याच्या परिसरातच पुर्वी गडावरची सदर होती.
Bhavani Mandir – Pargad