असामान्य पराक्रमातून सातत्याने स्फूर्ती देणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई
ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात चमकले. त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणार्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ! त्यांच्या अल्प चरित्राचे हे अवलोकन !
जन्म व बालपण
दुसर्या बाजीराव पेशव्यांचे बंधु चिमाजी अप्पा यांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व भागिरथीबाई या दाम्पत्याच्या पोटी कार्तिक वद्य १४, शके १७५७ म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार १९ नोव्हेंबर १८३५ ला लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. मोरोपंतांनी तिचे नाव 'मनुताई' ठेवले. मनुताई रूपाने देखणी व हुशार होती. मनुताई ३-४ वर्षांची असतांनाच तिच्यावर मातृवियोगाचे दु:ख कोसळले. ती पुढे ब्रह्मावर्त येथे दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या आश्रयास गेली.
युद्धकलेचे शिक्षण
ब्रह्मावर्ता येथील वाड्यात नानासाहेब पेशवे आपले बंधु रावसाहेब यांच्यासह तलवार, दांडपट्टा व बंदुक चालवणे त्याचप्रमाणे घोडदौडीचे शिक्षण घेत असत. त्यांच्यासोबत राहून मनुताईनेही हे युद्धकलेचे शिक्षण घेऊन त्यातील पेच आत्मसात् केले. मोडी अक्षर ओळख आणि लेखन-वाचन मनुताईने त्यांच्यासमवेत शिकून घेतले.
विवाह
वयाच्या ७ व्या वर्षी शके १७६४ च्या वैशाखात म्हणजेच १८४२ साली मनुताई यांचा विवाह झाशी संस्थानचे अधिपति गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी थाटामाटात पार पडला. मोरोपंत तांबे यांच्या मनुताई विवाहित होऊन झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या. विवाहानंतर त्यांचे नाव 'लक्ष्मीबाई' असे ठेवण्यात आले.
पुत्रवियोगाचे दु:ख
इ.स. १८५१ मध्ये मार्गशीर्ष शु. एकादशीला राणी लक्ष्मीबाई यांच्या पोटी एक पुत्ररत्न जन्मले. गादीला वारस मिळाला म्हणून गंगाधररावांना अत्यानंद झाला. तो तीन महिन्यांचा असतांनाच काळाने त्याच्यावर झडप घातली. त्यामुळे राणी लक्ष्मीबाई व गंगाधरराव यांना पुत्रवियोगाचे दु:ख सोसावे लागले.
पतिवियोगाचा धक्का आणि दत्तकविधान
पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्याने प्रकृति खंगलेले गंगाधरराव काही महिन्यांतच संग्रहणीच्या विकारास बळी पडले. गंगाधररावांच्या इच्छेनुसार गादीला वारस म्हणून नेवाळकर घराण्याच्या वंशातील वासुदेव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव दत्तक घेऊन त्याचे नाव 'दामोदरराव' ठेवले. दत्तक विधि झाल्यानंतर २१ नोव्हेंबर १८५३ रोजी दुपारी गंगाधररावांना मृत्यूने गाठले. पतिवियोगाच्या माध्यमातून वयाच्या १८ व्या वर्षी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर वैधव्याची कुर्हाड कोसळली.
'मेरी झाशी नही दूँगी'
७ मार्च १८५४ रोजी इंग्रजांनी एक राजघोषणा प्रसिद्ध करून झाशीचे संस्थान खालसा केले. राणी लक्ष्मीबाई या अन्यायामुळे जळफळत असतांनाच इंग्रज अधिकारी मेजर एलिस लक्ष्मीबाई यांना भेटण्यासाठी आला. त्याने झाशी संस्थान संपुष्टात आणले गेल्याची राजघोषणा वाचून दाखवली. संतापलेल्या राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे एलिसने परत जाण्याची अनुज्ञा मागताच चवताळलेल्या वाघिणीप्रमाणे त्या म्हणाल्या,''मेरी झाशी नही दूँगी!'', हे ऐकून एलिस निघून गेला.
१८५७ चा संग्राम
१८५७ मधील जानेवारीत सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाने १० मे रोजी मीरत येथेही पेट घेतला. मीरतबरोबरच दिल्ली, बरेली पाठोपाठ झाशीही इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाली. झाशीतील इंग्रजांची सत्ता संपुष्टात आल्यावर राणी लक्ष्मीबाई यांनी ३ वर्षांनंतर तेथील सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी इंग्रजांच्या संभाव्य हल्ल्यातून झाशीचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सिद्धता केली. इंग्रजांनी लक्ष्मीबाई यांना जिवंत पकडून आणण्यासाठी सर ह्यू रोज यांची नेमणूक केली. २० मार्च १८५८ रोजी सर ह्यू रोज यांच्या सैन्याने झाशीपासून ३ मैलांवर आपल्या सैन्याचा तळ ठोकला व लक्ष्मीबाई यांना शरणागति पत्करावी, असा निरोप पाठवला; मात्र शरणागति न पत्करता त्यांनी स्वत: झाशीच्या तटावर उभ्या राहून सैनाला लढण्यास स्फूर्ति देण्यास सुरुवात केली. लढाई सुरू झाली, झाशीच्या तोफा इंग्रजांची दाणादाण उडवू लागल्या. ३ दिवस सतत लढाई करूनही झाशीच्या किल्ल्यावर तोफा डागता येत नसल्याने सर ह्यू रोजने फितुरीचा मार्ग अवलंबला. अखेर ३ एप्रिल रोजी सर ह्यू रोजच्या सैन्याने झाशीत प्रवेश केला. सैन्याने झाशीतील लोकांची लुटालूट करण्यास सुरुवात केली. बालेकिल्ल्यातून राणी लक्ष्मीबाई यांनी शत्रूची फळी तोडून पेशव्यांस जाऊन मिळण्याचे ठरवले. रात्री निवडक २०० स्वारांनिशी आपल्या १२ वर्षांच्या दामोदरास पाठीशी बांधून 'जय शंकर' असा जयघोष करून लक्ष्मीबाई या किल्ल्याबाहेर पडल्या. इंग्रजांचा पहारा तोडून काल्पीच्या दिशेने त्यांनी मजल मारली. या दरम्यान वडील मोरोपंत त्यांच्या समवेत होते. फळी तोडून बाहेर जातांना इंग्रजांच्या फौजांबरोबर झालेल्या हातघाईच्या लढाईत ते घायाळ झाले. इंग्रजांनी त्यांना पकडले आणि फाशी दिले.
काल्पीची झुंज
सतत २४ तास घोड्यावरची रपेट करून १०२ मैल अंतर कापून राणी काल्पीस जाऊन पोहोचल्या. पेशव्यांनी सर्व परिस्थिति ओळखून राणी लक्ष्मीबाई यांना सर्व मदत करण्याचे ठरवले. लढाईसाठी मागितली तेवढी पथके तिच्या स्वाधीन केली. २२ मे रोजी सर ह्यू रोजने काल्पीवर हल्ला चढवला. युद्ध सुरू झालेले पाहून लक्ष्मीबाई यांनी हातात तलवार परजीत विजेच्या चपळाईने आघाडीकडे धाव घेतली. त्यांच्या या हल्ल्याने इंग्रजी सैन्याची पिछेहाट झाली. या पराभवाने दिड्मूढ झालेल्या सर ह्यू रोजने राखीव उंटांचे दल रणभूमीवर आणले. नव्या दमाचे सैन्य येताच क्रांतिकारकांचा आवेश कमी झाला. २४ मे रोजी काल्पी इंग्रजांनी ताब्यात घेतली.
काल्पी येथे पराभूत झालेले रावसाहेब पेशवे, बांद्याचे नबाब, तात्या टोपे, झाशीची राणी आणि प्रमुख सरदार गोपाळपूर येथे एकत्र जमले. लक्ष्मीबाई यांनी ग्वाल्हेर हस्तगत करण्याची सूचना केली. ग्वाल्हेरचे शिंदे अजूनही ब्रिटिशधार्जिणे होते. राणी लक्ष्मीबाई यांनी पुढे होऊन ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या हातात दिले.
स्वातंत्र्य वेदीवर प्राणांचे बलिदान
ग्वाल्हेरवरील विजयाचे वृत्त सर ह्यू रोजला कळले होते. वेळेचा अपव्यय केल्यास आपली परिस्थिति अवघड होईल, हे त्याच्या लक्षात आले. त्याने आपल्या सैन्याचा मोर्चा ग्वाल्हेरकडे वळवला. १६ जून रोजी सर ह्यू रोज हा ग्वाल्हेरला भिडला. सर ह्यू रोज यांचा लक्ष्मीबाई व पेशवे यांनी मुकाबला करण्याचे ठरवले. ग्वाल्हेरच्या पूर्व बाजूचे रक्षण करण्याचे काम लक्ष्मीबाई यांनी स्वत:च्या अंगावर घेतले. लढाईत लक्ष्मीबाई यांचे अभूतपूर्व धैर्य पाहून सैनिकांना स्फूर्ति आली. त्यांच्या मंदार आणि काशी या दासीसुद्धा पुरुषी वेषात लढाईसाठी आल्या. राणीच्या शौर्यामुळे इंग्रजांना त्या दिवशी माघार घ्यावी लागली.
१८ जूनला राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे हताश झालेल्या इंग्रजांनी ग्वाल्हेरवर सर्व बाजूंनी एकदम हल्ला केला. या वेळी त्यांनी शरणागति न पत्करता शत्रूची फळी फोडून बाहेर जाण्याचे ठरवले. फळी फोडून जात असतांना फुलबागेचा एक ओढा आडवा आला. राणी लक्ष्मीबाई यांच्याकडे नेहमीचा 'राजरत्न' घोडा नसल्याने दुसरा घोडा ओढ्यापाशीच गरगर फिरू लागला. राणी लक्ष्मीबाई यांनी आपले भवितव्य ओळखून चालून आलेल्या गोर्यांवर हल्ला केला. यात त्या रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. पुरुषी वेशात असल्यामुळे राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज स्वार ओळखू शकले नाहीत. त्या पडताच ते स्वार परत निघून गेले. राणी लक्ष्मीबाई यांच्या एकनिष्ठ सेवकांनी जवळच असलेल्या गंगादास यांच्या मठात नेऊन त्यांच्या मुखात गंगोदक घातले. आपल्या देहास म्लेंच्छांचा हात लागू नये, अशी इच्छा प्रदर्शित करून त्यांनी वीर मरण स्वीकारले.
जगभर पसरलेल्या क्रांतिकारकांना, सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि सरतेशेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेला याच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याने स्फूर्ति दिली. हिंदुस्थानच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ति देत झाशीच्या राणी अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात अमर झाल्या. अशा वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या चरणी शतश: प्रणाम.
रे हिंद बांधवा । थांब या स्थळी । अश्रू दोन ढाळी ।
|
झांशीवाली
झाशीची राणी – मूळ छायाचित्र
अवघ्या तेविसाव्या वर्षी रणांगणात हौतात्म्य पत्करणार्या झाशीच्या राणीचे चरित्र स्फूर्तीदायी आहे. १८५७ च्या संग्रामात आधी झाशी, नंतर काल्पी आणि शेवटी ग्वाल्हेर येथील लढायांमध्ये आपल्या असामान्य क्षात्रवृत्तीची चुणूक दाखवून तिने ब्रिटिशांना चकित केले. झाशीचा किल्ला घेण्यासाठी ब्रिटीश सेनापती सर ह्यू रोज याला शेवटी फितुरीचा आश्रय घ्यावा लागला. आपल्या पुत्राला पाठीशी बांधून लढाई करणारी अशी असामान्य स्त्री जगाच्या इतिहासात झाली नाही ! पहिल्या महायुद्धातील `गदर' पक्षाच्या देशभक्तांना, सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि स्वा. सावरकरांपासून सुभाषचंद्रांपर्यंत सर्व क्रांतीकारकांना स्फूर्ती देणार्या या रणचंडिकेचा पराक्रम व वीरमरण दैदिप्यमान आहे !!
ज्येष्ठ शुक्ल सप्तमी रोजी राणी लक्ष्मीबाई यांचा बलीदानदिन असतो. कवी भा.रा. तांबे यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर केलेली कविता येथे देत आहोत.
हिंदबांधवा ! थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी ।
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशीवाली ।।
तांबेकुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ति
हिंदुभूध्वजा जणु जळती ।
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ।
रे हिंदबांधवा ।।१।।
घोड्यावर खंद्या स्वार
हातात नंगि तलवारखणखणा करित ती वार
गोर्यांची कोंडी फोडित पाडित वीर इथे आली
रे हिंद बांधवा ।।२।।
कडकडा कडाडे बिजली
इंग्रजी लष्करे थिजली
मग कीर्तिरूप ती उरली
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली
रे हिंद बांधवा ।।३।।
मिळतील इथे शाहीर
लववितील माना वीर
तरू, झरे ढाळतील नीर
ह्या दगडा फुटतील जिभा
कथाया कथा सकळ काळी
रे हिंद बांधवा ।।४।।
-कवी – भा.रा. तांबे (१९३९)