ढाकोबा

जुन्नर परिसरातील घाटाच्या अगदी कडेवर मीना मावळ आंणि कुकड मावळातील अणे-माळशेज डोंगररांगेतील हा सर्वोच्च जुळा किल्ला. दुर्ग आणि ढाकोबा या जुळ्या किल्ल्यांच्या उभारणीमागे घाटवाटांवर लक्ष ठेवणे हा उद्देश होता.

पुण्याहून इथे पोचण्यासाठी पुणे-जुन्नर-आपटाळे-अंबोली हा मार्ग योग्य आहे. मुंबईहून येण्यासाठी मुंबई-कल्याण-मुरबाड-माळशेज घाट-जुन्नर-आपटाळे-अंबोली हा मार्ग उपलब्ध आहे.
जुन्नरहून अंबोलीला जाण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध आहे. ढाकोबाच्या कड्यावरुन खाली कोकणाचे विहंगम दृष्य दिसते. किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे कोकणात उतरणारा रौद्र कडा आणि ढाकोबाचे मंदिर. ढाकोबाजवळच दुर्ग हा अजून एक जुळा किल्ला आहे. शेजारीच दाऱ्या घाट नावाची कोकणात उतरणारी घाटवाट आहे. या घाटवाटेच्या खाली पूर्वी कोकणात असलेल्या ‘म्हसे’ या गावी होणाऱ्या जनावरांच्या बाजारात जाण्यासाठी हा एक प्राचीन मार्ग वापरला जाई. आजही स्थानिक लोक कोकणात जाण्यासाठी हीच वाट वापरतात.

जुन्नर आपटाळे रस्त्यावर एक उच्छल नावाचे लहानसे खेडे आहे. १९३४ ते १९४४ या स्वातंत्र्यपूर्व काळात या गावात कोंडाजी नवले नावाचा भारतीय रॉबिनहूड राहत असे. तो आणि त्याचे साथीदार अन्यायी श्रीमंत जमीनदारांना लुटून त्यांची संपती गरीब जनतेत वितरित करत असत. त्याची तक्रार जमीनदारांनी ब्रिटिश राजवटीकडे केली होती. पण सामान्य जनतेच्या पाठिंब्यामुळे तो पकडला गेला नाही. आजही स्थानिक जनतेत त्याची स्तुतिपर कवने गायली जातात. ढाकोबाच्या वाटेवर या गावातील त्याच्या घरीदेखील भेट देता येते.

Leave a Comment