हा किल्ला चिखलदर्या जवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ल्याच्या भवती घनदाट जंगल आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य़ गोंडानी घेतला.
हवामान
* पाउस : १५५ से.मी.
* तापमान : हिवाळा – ५ से. , उन्हाळा : ३९ से.
इतिहास
महाभारतात भीमाने किचक राक्षसा बरोबर लढाई करून त्याचा इथे वध केला व बाजूच्या दरीत फेकून दिले अशी नोंद आहे. किचकाची दरी म्हणजे किचकदरा. चिखलदरा हा किचकदरा या शब्दाचा अपभ्रंश आहे.इ.स. १८०३ मध्ये दुसर्या मराठे-इंग्रज युद्धात या किल्यावर महत्त्वपूर्ण लढाई झाली होती. आर्थर वेलस्लीच्या इंग्रज सैन्याने मराठ्यांचा निर्णायक पराभव केला.
गडावरील ठिकाणे
किल्ल्यावर निजामकालीन कोरीव मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. गडावर २ तलाव आहेत. साधारणत: १० तोफा नाजुक स्थितीमधे अजूनही शाबुत आहेत. घोडे, हत्ती इत्यादींचे कोरीव काम व हिंदुस्तानी, उर्दू, अरबी या भाषांमधील मजकूर तोफांवर आढळतो.मात्र, किल्ल्याची तटबंदी, बुरूज ढासळण्याच्या मार्गावर आहेत. किल्ल्याच्या आतील राणीमहाल, दरबार व तलाव आजही तत्कालीन वैभवाच्या खुणा जपून आहेत. या किल्ल्यापासून ४५ किलोमीटर अंतरावर असलेला आमनेर येथील छोटा किल्ला म्हणजे विदर्भाचे प्रवेशद्वार; मात्र तोही दुर्लक्षित आहे.
कसे जाल
मध्य रेल्वेचे बडनेरा हे जवळचे स्थानक ११० कि.मी. वर आहे. मुंबई पासूनचे अंतर ७६३ कि.मि आहे. एस टी महामंड्ळाच्या गाड्या अमरावती, अकोला, वर्धा, नागपुर इथून नियमीत सुटतात.
ऑक्टोबर ते जून मध्ये इथे हवामान खूपच छान असते.