हस्तिनापुरास आत्माराम म्हणून एक कनोजी ब्राह्मण अकबर बादशहाच्या पदरी होता. त्याच्या पत्नीचे नाव हुलसी. त्यांच्या पोटी मूळ नक्षत्रावर एक मूल जन्मले. मातेच्या उदरात ते मूल बारा महिने होते. मुखात बत्तीस दात होते. जन्मतःच या मुलाच्या मुखातून 'राम' हे नाम आले. अशा अद्भुत दुश्चीन्हांमुळे आई-वडिलांनी त्या मुलाला सुवर्णदानासह चुनिया नामक दासीला देऊन टाकले. मुलाची माता हुलसी हिचे निधन झाले. चुनिया दासीने मुलाचा पाच वर्षे सांभाळ केला. नंतर ती देखील मृत्यू पावली. जगज्जननी पार्वतीने एका ब्राह्मण स्त्रीच्या वेशात येऊन त्या मुलाला नरसिंहदास या साधूच्या स्वाधीन केले. त्याने त्या मुलाचे संगोपन केले. पुढे श्री शिवशंकराने नरहर्यानंदांना दृष्टांत देऊन त्या मुलाचे उपनयन करण्यास सांगितले. उपनयनानंतर मुलाचे नाव रामबोला ठेवण्यात आले. तेच तुलसीदास.
अयोध्येत बारा वर्षे श्री गुरूच्या सान्निध्यात राहून त्यांनी वेदशास्त्रांचे अध्ययन पूर्ण केले. नंतर ते हस्तिनापुरास गेले. आत्माराम दुबे या त्यांच्या वडिलांची तेथे भेट झाली. आत्माराम तुलसीदासाला अकबर बादशहाकडे घेऊन गेले. अकबर बादशहाची तुलसीदासावर खूपच मर्जी बसली. बादशहा तुलसीदासास स्वारी शिकारीस आपल्याबरोबर घेऊन जात असे. आत्माराम यांनी तुलसीदासाचे रत्नावली नावाच्या एका श्रीमंताच्या मुलीशी डामडौलाने लग्न लावून दिले. त्या दोघा पती-पत्नीचे एकमेकांवर अतिशयच प्रेम जडले. तुलसीदास यांना तिच्यावाचून घटकाभरही चैन पडत नसे.
एके दिवशी तुलसीदास अकबर बादशहाबरोबर दूरच्या देशी गेले. रत्नावली बोलावणे आल्यामुळे माहेरी गेली. तुलसीदास घरी परतले. रत्नावली माहेरी गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. ते तसेच सासुरवाडीस जाण्यास निघाले. तिथे पोहोचेपर्यंत दोन प्रहर रात्र झाली. घरातील सर्व माणसे दारे लावून झोपी गेली होती. तुलसीदास विचार करू लागले. आत प्रवेश कसा करावा? रत्नावलीस भेटण्यास ते अगदी उत्सुक झाले होते. एक सर्प खिडकीस वेढा देऊन लोंबत असलेला त्यांच्या दृष्टीस पडला. त्याला धरून तुलसीदास आत गेले. घरातील माणसे जागी झाली. तुलसीदास आल्याचे रत्नावलीस तिच्या आईने सांगितले. ती तुलसीदासांकडे आली व म्हणाली, ''सारे दरवाजे बंद असता आपण आत कसे आलात?'' यावर तुलसीदास म्हणाले, ''तू जो दोर मला आत येण्यासाठी लोंबत ठेवला होतास, त्या दोराला धरून मी आलो.'' हे ऐकून रत्नावलीस नवल वाटले. ती खिडकीपाशी जाऊन पाहते तो एक मोठा सर्प लोंबत असलेला तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा ती तुलसीदासांना म्हणाली, ''प्राणनाथ, तुम्ही माझ्यावर जेवढ प्रेम करता, तेवढ जर श्रीरामाच्या ठायी ठेवाल, तर तुमच्या जन्माचे सार्थक होईल.'' ते तीचे उद्गार ऐकून तुलसीदास विरक्त झाले. त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले. ते तसेच तिथून निघाले. आनंदवनास गेले. तिथे त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली. नंतर ते रामकथा कथन करू लागले. एकदा तुलसीदासांना पिशाच्च भेटले. पिशाच्चाने ''तुला काय हवे?'' म्हणून विचारले. ''रामाची भेट करून दे.'' असे तुलसीदासांनी सांगताच ते पिशाच्च मागे मागे जाऊ लागले. दूर जाऊन त्यांना म्हणाले, ''तू ज्या ठिकाणी पुराण ऐकावयास जातोस, तिथे एक म्हातारा ब्राह्मण हातात काठी घेऊन सर्वांच्या आधी येऊन बसतो व सर्वजण गेल्यावर निघून जातो. तो तुला रामाची भेट करवील. तो प्रत्यक्ष हनुमान आहे.'' असे सांगून पिशाच्च अदृश्य झाले.
दुसर्या दिवशी पुराण आटोपल्यानंतर तो ब्राह्मण जात असता तुलसीदासांनी त्याला मार्गात गाठून साष्टांग नमस्कार घातला. ''मी गरीब ब्राह्मण आहे. तुला देण्याकरता माझ्याजवळ काही नाही.'' असे ब्राह्मणाने म्हणताच तुलसीदास म्हणाले, ''तुम्ही हनुमान आहात. श्रीरामाचे दर्शन तुम्ही मला करून द्यावे.'' वाल्मिकीने अवतार घेतलेला हा तुलसीदास आहे, असे हनुमंताने ओळखले. त्यांना हनुमंताने प्रेमाने आलिंगन दिले. लवकरच श्रीरामाची भेट करवितो असे सांगून हनुमान अदृश्य झाले. हनुमंताने श्रीरामचंद्रांना सांगितले, ''तुमच्या आज्ञेवरून वाल्मिकीने तुलसीदास या नावाने अवतार घेतला आहे. त्यांना तुमच्या दर्शनाची तळमळ लागली आहे.'' तेव्हा प्रभू रामचंद्रांनी तुलसीदासांना वाल्मिकींनी वर्णन केलेल्या रुपात दर्शन देऊन आलिंगन दिले. त्यांच्या मस्तकावर हात ठेवून ते अदृश्य झाले.
तुलसीदास रामाचे भजन-कीर्तन करू लागले. काशी क्षेत्रात त्यांची कीर्ती फारच पसरली. लोकांनी तुलसीदासांना मठ बांधून दिला. धर्मकार्यासाठी श्रीमंत लोकांनी तुलसीदासांना द्रव्य आणून दिले. एकदा ब्राह्मणांसह तुलसीदास भोजनाला बसत होते. इतक्यात 'जय सीता-राम' असे म्हणत तेथे एक ब्राह्मण भिक्षा मागण्यास आला. तेव्हा तुलसीदासांनी त्याला आपल्या पंक्तीस बसविले. त्यामुळे सर्व ब्राह्मण उठून जाऊ लागले. ''तुम्ही का उठलात?'' तुलसीदासांनी विचारले. यावर ते म्हणाले, ''याच्या हातून ब्रह्महत्या झाली आहे. अशा पापी माणसाच्या पंगतीस आम्ही बसणार नाही.''
रामनामस्मरणाने हा पुण्यवान झाला आहे. याचे सर्व पाप नाहीसे झाले आहे. नामस्मरणाने भस्म होत नाही असे पातकच नाही, असे श्रीकृष्णाने उद्धवास सांगितले आहे.'' तुलसीदास म्हणाले. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, ''तुम्ही समोरच्या शिवमंदिरातील नंदीकडून नैवेद्य भक्षण करवून दाखवा. म्हणजे याचे ते पातक गेले असे आम्ही समजू! आम्हाला ब्रह्मज्ञान नको, प्रचीती दाखवा.'' हे त्याचे भाषण ऐकून तुलसीदास एका पत्रावळीत नैवेद्य घेऊन शिवमंदिरात गेले. नंदीसमोर तो नैवेद्य ठेवला व हात जोडून म्हणाले, ''देवा, समुद्रमंथनाच्या वेळी तू विषभक्षण केलेस, त्या वेळी तुझ्या सर्वांगाची झालेली आग रामनाम उच्चारताच शांत झाली. त्याच रामाचे नाव या ब्राह्मणाने घेतल्याने हा ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला नाही का? ती साक्ष या सर्वांना दाखविण्यासाठी पाषाणाच्या या नंदीने सर्वांसमक्ष नैवेद्य भक्षण करावा, अशी या दासाची तुम्हाला विनंती आहे. प्रार्थना आहे.'' तेव्हा सर्वांसमक्ष नंदीने तो नैवेद्य पत्रावळीसह खाल्ला. हा चमत्कार पाहून त्या सर्वांनी तुलसीदासांच्या चरणांवर लोटांगण घातले.
पुढे एकदा असे झाले की, जैतपाळ या नावाचा एक सावकार मृत्यू पावला. त्याची पत्नी सती जाण्याकरिता घरातून निघाली. जाताना वाटेत तिला तुलसीदासांचा मठ दिसला. तुलसीदासांना नमस्कार करण्यासाठी ती मठात गेली. तिने तुलसीदासांना भक्तिभावे नमस्कार केला. ''अष्टपुत्रा सौभाग्यवती भव !'' असा तुलसीदासांनी तिला आशीर्वाद दिला. तेव्हा ती म्हणाली, ''महाराज, माझे पती मरण पावले म्हणून मी सहगमन करण्यास चालले आहे. तेव्हा तुमचे आशीर्वचन कसे सत्य होणार?'' ते ऐकून तुलसीदास म्हणाले, ''श्रीरामाच्या चिंतनात मी निमग्न असताना तुला आशीर्वाद मिळाला. त्या अर्थी तो श्रीरामानेच दिला आहे असं समज, व तोच सर्वसमर्थ प्रभू तुला मिळालेले आशीर्वचन पूर्ण करील.'' हे ऐकून ती स्त्री आपल्या पतीच्या प्रेताजवळ आली. तोच तिचा पती उठून बसला. तो चमत्कार पाहून लोक आश्चर्यचकित झाले. तिने पतीला आपल्या बरोबर घेतले व मठात नेऊन दोघांनी तुलसीदासांच्या पायावर डोके ठेवले. ती दोघे पती-पत्नी तुलसीदासांची सेवा करू लागली. त्या मठात राहून तुलसीदास यांनी अनेकांना भक्ती मार्गाला लावले. नंतर गोकुळ, मथुरा इत्यादी तीर्थे करीत ते वृंदावन येथे गेले. त्यांची मीराबाईंशी भेट झाली.
संत तुलसीदास यांनी वाल्मिकी रामायणास हिंदी पेहराव चढविला. तुलसीदासकृत ''श्रीरामचरितमानस.'' तुलसी रामायणाने गरीबाच्या झोपडीपासून श्रीमंताच्या महालापर्यंत सगळीकडे सारखाच प्रवेश केला आहे. तुलसीदास यांना हनुमंताने विनयपदे लिहिण्याची आज्ञा केली. ती मान्य करून त्यांनी 'विनय-पत्रिका' नामक श्रेष्ठ काव्य रचिले. तुलसीदासाएवढा दुसरा कोणी लोकप्रिय कवी भारतात मध्ययुगात झालेला नाही.
तुलसी अयोध्यापती भजो l जुवो न दूजी कोर ll
|
संवत १६३१ च्या रामनवमी या दिवशी तुलसीदासांनी 'श्रीरामचरितमानस' लिहिण्यास प्रारंभ केला. दोन वर्षे, सात महिने, सत्तावीस दिवसांनी ही त्यांची रचना पूर्ण झाली. संवत १६३३ च्या मार्गशीर्षात शुक्ल पक्षात श्रीराम-सीता विवाहदिनी सातही कांडे पूर्ण लिहून झाली.
भगवान श्रीरामाच्या आज्ञेनुसार तुलसीदासांनी काशीला जाऊन श्री विश्वनाथ व अन्नपूर्णेला आपले काव्य वाचून दाखविले व ग्रंथ विश्वनाथाच्या मंदिराच्या गाभार्यात ठेवला. दुसर्या दिवशी ग्रंथावर 'सत्यं शिवं सुंदरम' असे लिहिलेले व त्याखाली 'श्री शंकर' ही अक्षरे दिसली. तुलसीदासांचे हे काव्य नष्ट करण्याचे काही दुष्ट पंडितांनी प्रयत्न केले. तो ग्रंथ चोरण्यासाठी त्यांच्या घरी चोरांनाही पाठविण्यात आले. पण दोन धनुर्धर तेथे पहारा देताना त्यांना दिसले. ते पळून गेले. तुलसीदासांनी नंतर तो ग्रंथ आपले जिवलग मित्र तोडरमल यांच्याकडे ठेवला. पुढे श्री मधुसूदन सरस्वती यांनी हा ग्रंथ वाचला. प्रसन्नता दर्शविली.
आनंद कानने यास्मिज्जडस्तुलसीतरुः l
|
असा अभिप्राय दिला.
अर्थ – या काशीवनात, या आनंदवनात एक चालते-फिरते तुळशीचे झाड आहे. त्याच्या कवितारुपी मंजिर्या फारच सुंदर आहेत. त्या मंजिर्यावर रामरूपी भुंगा सदा झेपावत असतो.
मारुतीच्या सांगण्याप्रमाणे तुलसीदासांनी विनयपदे रचली. त्यावर श्रीरामांनी सही केली. ही रचना विनयपत्रिका नावाने प्रसिद्ध आहे.
संवत १६८०, श्रावण वद्य तृतीय , शनिवार या दिवशी तुलसीदासांनी आसी घाटावर श्रीराम नाम घेत देह ठेवला .