चामुंडा अपभ्रंशे चावंड। जयावरी सप्तकुंड॥
गिरी ते खोदूनी अश्मखंड। प्रसन्नगडा मार्ग निर्मिला॥
जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे.
इतिहास
१) सन १४८५ मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणार्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामधे चावंडचे नाव आहे. बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे प्रांत मिळाले.
२) दुसरा बुर्हाण निजामशाह (इ.स. १५९०-१५९४) हा सातवा निजाम. याचा नातू बहादुरशाह १५९४ साली चावंडला कैदेत होता.
३) १६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला, त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला.
४) मे १६७२ पर्णाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकिरीने लढून घेतले. महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले.
५)या गडाची अनेक नावे अशाप्रकारे आहेत-चामुंड, चाऊंड, चावंड- ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत. चुंड- हे निजामशाही आमदानीतील नाव आहे. प्रसन्नगड-हे शिवाजी महाराजांनी ठेवलेले नाव. मलिक अहमदने शिवनेरी जिंकल्यावर आपल्या एका सरदाराच्या हाती हा किल्ला दिला. या किल्ल्यातही भरपूर लूट त्याच्या हाती आली. जोंड किल्ल्याचीही व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून त्याने लोहगडाकडे आपला मोर्चा वळवला. संदर्भ – अहमदनगरची निजामशाही मलिक अहमदच्या अधिकारापुढे नमूद केलेल्या किल्ल्यांच्या अधिकार्यांनी मान झुकवली नव्हती. त्यांचा पाडाव करण्यासाठी त्याने कूच केले. ते किल्ले म्हणजे- चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली. हे सर्व किल्ले त्याने बळाचा वापर करून आपल्या ताब्यात घेतले. संदर्भ – गुलशने इब्राहिमी आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वकील मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्याचवेळी त्यांने इब्राहीमच्या अल्पवयीन मुलाची म्हणजे बहादूरशाहची चावंडला बंदिवासासाठी रवानगी केली. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे सिद्ध झाले. निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंड किल्ल्याच्या सुभेदाराला राजपुत्र बहादूर याला आपल्या हवाली करण्यास हुकूम पाठवला. या हुकुमाचे पालन मिया मंजू याच्या लेखी आज्ञेशिवाय होणार नाही असे सुभेदाराने कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले. मुराद अहमदनगरच्या किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहा यांना मदतीस बोलावण्यास अहमदनगरच्या बाहेर पडला. चांदबीबीने याचा फायदा उठवीत त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला. आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची मुक्तता करत त्याची सुलतान म्हणून ग्वाही दिली.
१) जे किल्ले ऋषी नावांशी संबंधित आहेत ते अतिप्राचीन.
२) जे किल्ले बौद्ध, जैन लेण्यांनी अलंकृत आहेत ते प्राचीन.
३) जे किल्ले शैव, शाक्त, नाथ सांप्रदायाशी निगडित आहेत ते म्हणजे मध्यमयुगीन.
४) चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाणयाची सात टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्त मातृकांशी संबंधित आहे. म्हणून तो शाक्त पंथाशी निगडित आहे. चावंड निजामशाहीत जाण्याअगोदर तेथील किल्लेदार महादेवकोळी जमातीतला असावा असे तेथील स्थानिक महादेवकोळी वस्तीवरून प्रतीत होते. येथील अवशेषांना पाहता आणि राजमार्ग अभ्यासता चावंड सातवाहनकालीन असल्याची चिन्हे दिसतात. निजामशाही वारसदाराला येथे ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला गेला. यावरून त्याची दुर्गमता दिसून येते. त्याचा इतिहास बखरींच्या पानांत नसला तरी मौलिक लोकसाहित्यात नक्की सापडेल.
५) चामुंडा हे देवीचे क्रूर रूप. या रुपात सर्व काही भयानक, अमंगल. ही देवी बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहे. हाडकुळी, जीभ बाहेर, उभे केस, मुंडांच्या माळा, हाडांचे दागिने, व्याघ्रचर्म नेसलेली. स्मशानात पिंपळाखाली हिचे वास्तव्य. हिचे वाहन गाढव, प्रेत, घुबड, गिधाड. ध्वजावर अग्रीपुराणाप्रमाणे चार हात. शक्ती, मुंड, शूळ ही हिची आयुधे.
६) सप्त मातृका म्हणजे- ब्राम्ही, महेश्र्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इन्द्राणि आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ. संदर्भ – देवी भागवत
गडावरील ठिकाणे
दरवाजातून आत जाताच दहा पायर्या चढून गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्ध्वस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडे तटबंदीच्या बाजूने जाणारी वाट आहे. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायर्या चढून गेल्यावर काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला अशा बर्याच वास्तू दिसतात म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की इथेच सारा कारभार चालत असावा. जवळ जवळ १५ ते २० वास्तू इथे आहेत. जेथे चौथरा शिल्लक आहे तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्र अशी टाकी आहेत येथून उत्तरेस थोडे पुढे गेलो की एक खचत चाललेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते की हे एक मंदिर असावे. पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही. येथून आजूलाबाजूला साधारण ३०० मी. च्या परिसरात १०-१५ उद्ध्वस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात आपल्याला एकमेकांना लागून अशी सात टाकी आहेत. ही टाकी सप्त मातृकांशी निगडित आहेत. गडाच्या याच भागात बर्यापैकी तटबंदी असून आग्रेय भाग कडांनी व्यापला आहे. यावरून कळून येतं की गड किती दुर्गम आहे. म्हणूनच बहादूरशाह निजामाला येथे ठेवण्यात आले होते. ज्या भागात तटबंदी आहे त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. ही बहुदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. येथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, तिथे चिर्याचे दगड गाडग्यासारखे रचून ठेवले आहेत. हे कोणाचे काम असावे हे कळत नाही. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकर्यांच्या चौक्या असाव्यात. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौदसदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे ग्रामस्त सांगतात. येथे रॅपलिंग करून जाता येते.यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कडांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्तीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ जवळ अर्ध्या कि.मी.च्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याची दोन टाकी आहेत. इथून पुन्हा पश्चिमेकडे निघाल्यावर आपल्याला मजबूत अशा तटबंदीचे दर्शन घडते. दोन बुरूजही आढळतात. इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला.गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजुबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते जी एखाा ऋषीचे प्रतीक असावी. तसेच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या चामुंडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषांमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळही बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ही दीपमाळ असे सुचवते की इथे एक शिवमंदिर असावे.एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ कि.मी.चा व्यास असावा. गडाच्या ईशान्येस असणार्या गुहांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे. या वास्तूंविषयी बर्याच दंतकथा ऐकण्यात आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. सातवाहनांचा इतिहास फार भव्य आहे, पण त्यांच्या किल्ल्यांचे अजून संशोधन झाले तरच या भव्य इतिहासावर जास्त प्रकाश पडेल. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, त्यांना भेट ायला, तर का आपण जाऊ नये? इथल्या स्थानिक महादेवकोळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो, तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गडावर जाण्याच्या वाटा : गडमाथा गाठण्यासाठी गडाच्या पश्चिमेकडूनच वाट आहे. चावंड वाडीतील आश्रमशाळेपासून गड चढण्यास चांगली मळलेली पायवाट आहे. या वाटेने साधारण अर्धातास चढल्यानंतर आपण खडकात खोदलेल्या पायर्यांच्या समांतर रेषेत चालतो. ( प्रचलित दंतकथेनुसार ते गडावर पोहोचवणारे गुप्त भुयार असावे.) साधारण १५ पायर्या चढून गेल्यावर आपणास एक मन खिन्न करणारी गोष्ट जाणवते. पूर्वी कोणा अनामिकाने या पायर्या चढण्यासाठी आधार म्हणून एका छोटा तोफेची नळी जमिनीत पुरली आहे. साधारण २ इंच अंतर्गत व्यास असलेली ही तोफ २ ते २ १/२ फूट लांबीची आहे.जमिनीच्या वर असलेला हा भाग साधारण दोन तृतियांश आहे. या तोफेची लांबी साधारण ३ ते ३ १/४ फूट असावी. या तोफेला जंबुरका म्हणतात.या पायर्या अगदीच छोटा आहेत. इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायर्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला. तशा सुरुंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायर्या चढताना दिसतात. यानंतर २०-२५ पायर्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. येथे ३ मी. लांबीच्या प्रशस्त पायर्या आहेत, ज्यावर आज रानगवत माजलेले आहे. वर चढून गेल्यावर प्रथमदर्शनी नजरेस पडते ती कातळकोरीव गणेशप्रतिमा, आणि नैऋत्यमुखी प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरही एक गणपती कोरलेला आहे. यावरून असे कळते की पेशवे काळातही या गडावर बराच राबता असावा. दरवाजाची उजवी बाजू एक अखंड कातळ आहे. उजवा स्तंभही याच कातळातून कोरलेला आहे. गडावरची हीच वास्तू अबाधित राहिली आहे. दरवाजाजवळच एक उखळ पडले आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी. च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.
राहण्याची सोय: गडावरील कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात, तर चामुंडा मातेच्या मंदिरात २ जण. इथे उंदीर त्रास देऊ शकतात. चावंडवाडीत रहाण्याची उत्तम सोय होते.जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. मात्र चावंड गावात जेवणाची सोय होऊ शकते.
पाण्याची सोय: गडावर अनेक टाकी आहेत ज्यामध्ये बारामही पिण्याचे पाणी आहे.