पुस्तकाची काळजी घ्यावी !

पुस्‍तके व्‍यवस्‍थित हाताळली, तर ती अनेक वर्षे टिकतात. अशी पुस्‍तके पाठचे भावंड किंवा मित्र-मैत्रीण यांनाही वापरता येतात. समर्थ रामदासस्‍वामींनी म्‍हटले आहे –

नीगा न करी पुस्तकाची । तो येक मूर्ख ।।
– समर्थ रामदासस्वामी .
(श्री दासबोध, दशक २, समास १, ओवी १०)

अर्थ : जो पुस्तकाची काळजी घेत नाही, तो मूर्ख होय.

१. पुस्तकाला प्लास्टिकचे वेष्टन घालून मगच ते वाचा !

असे केल्‍याने हाताचा घाम, तेलकटपणा किंवा धूळ मुखपृष्‍ठ अथवा मलपृष्‍ठ यांना लागून ते मळत (खराब होत) नाही. हात अस्‍वच्‍छ किंवा तेलकट असल्‍यास ते स्‍वच्‍छ धुऊनच पुस्‍तक हाताळावे, म्‍हणजे आतील पानेही स्‍वच्‍छ रहातात.

२. बोटांना थुंकी लावून पाने उलटू नका !

पुस्तकाला थुंकी लावणे, हा श्री सरस्वती-देवीचा अपमान आहे. थुंकीच्या माध्यमातून पुस्तकाच्या नंतरच्या वाचकांना रोगजंतूंचा संसर्गही होऊ शकतो.

३. खूण म्हणून पानाचा कोपरा किंवा पान दुमडू नका !

१. दुमडलेल्या घडीवर पान फाटू शकते.

२. पुस्‍तक कोठपर्यंत वाचून झाले, याची खूण म्‍हणून पुस्‍तकात खुणेसाठी ठेवण्‍यात आलेला जाड दोरा, नाहीतर अन्‍य कागदाचा तुकडा वापरावा.

४. पुस्तक कपाटात ठेवतांना ते आडवे ठेवा !

कपाटात पुस्तक उभे ठेवल्यास बांधणीतून पाने सुटण्याचा संभव असतो किंवा पुस्तक तिरपे राहिल्यास त्याला बाक येतो.

५. अन्य सूचना

१. पुस्तकावर स्वत:चे नाव आणि ठिकाण (पत्ता) यांव्यतिरिक्त काही लिहू नका किंवा त्यावर वेड्यावाकड्या खुणा करू नका !

२. पुस्तकातील चित्रे विद्रूप करू नका किंवा पुस्तकातील पाने फाडू नका !

३. पुस्तक वाचून झाल्यावर टाकू नका, तर त्याचा मान ठेवण्यासाठी हळूवार खाली ठेवा !

४. पुस्तकाला पाय लावू नका; पाय चुकून लागल्यास त्याला नमस्कार करा !

विद्यार्थीमित्रांनो, केवळ स्वत:च्याच नव्हे, तर दुसर्‍याच्या किंवा सार्वजनिक वाचनालयातील पुस्तकांचीही अशीच काळजी घ्या !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी