ॐकार
१. `श्रीमद्भागवत सांगते, “समाहित ब्रह्माच्या हृदयकोशापासून नाद (अव्यक्त शब्द) प्रकटतो. दोन्ही कान बंद करून आत तो ध्वनी ऐकायला येतो. त्या अनाहत नादाची उपासना करून योगी मोक्षाचे अधिकारी होतात.
२. ॐकार त्याच परमात्म्याचा वाचक आहे.
३. त्या ॐ कारापासून सर्व वाक्प्रपंच आविर्भूत झाला. तो ॐ कारच सर्व मंत्राचे तसेच सर्व वेदांचे बीज आहे. त्या ॐ काराच्या `अ, उ, म' वर्णापासून सत्त्व, रज, तम; ऋक्, यजु, साम; भू:, भूव:, स्वर्लोक; स्वप्न, जागृत आणि सुषुप्ती अशा अवस्था निर्माण होतात. ब्रह्मदेवाने या `ॐ' बिजापासून वर्णमाला उत्पन्न केली. त्याने या अक्षरापासूनच यज्ञाकरता भू:, भुव:, स्व:, महा:, जन, तप, सत्यम, अशा सात व्याह्रती आणि प्रणव यांसह वेद प्रकाशित केले.'
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १० मे २००७, अंक १५)
वेदधर्माचे महत्त्व सर्वांना कळणे आवश्यक
वेद म्हणजे प्राचीन भारतीय ज्ञानाचा पाया. एकूण चार वेद आहेत आणि ते म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या वेदांमध्ये नेमकं काय लिहिलंय, हे किती जणांना ठाऊक आहे? वेदांचं योग्य उच्चारण अनेक जण करीत असतील, पण त्यातील ज्ञानसंपदेचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न कितीजण करतात? वाचकांची जिज्ञासा चाळवली जावी, म्हणून वेदांमध्ये नेमकं काय आहे? याची चुणूक दाखवायचा प्रयत्न केला आहे.
`सनातन हिंदु धर्माचा मुख्य ग्रंथ वेद. अपौरुषेय, अनादी, अनंत वेदांतून हिंदु धर्म निर्माण झाला. हिंदु धर्माची पुन्हा सुव्यवस्थित, सुरक्षित घडी बसवायची असेल, तर हिंदु समाजाचे वेदांकडे लक्ष वेधून घ्यायला हवे. वेदरक्षणाकरताच भगवंताचे वराह, राम, कृष्णादी अवतार झाले. त्या वेदांचे रक्षण व्हायला हवे. वेदज्ञान, वेदांचे अध्ययन, वेदांची महती, वेदांची कीर्ती, वेदज्ञान काश्मीरपासून कोचीनपर्यंत आणि बाणकोटापासून जगन्नाथपुरीपर्यंत सर्व आबालवृद्धांना झाले पाहिजे. वेदमंदिरात प्रवेश करा. तुम्हाला सनातन धर्म मिळेल. त्यातील एकेक दालन, त्यातील एकेक चौक, त्यातील एकेक सभामंडप इतका विलोभनीय, इतका शृंगारलेला, इतका विशाल आहे की, आम्हा हिंदूंच्या शेकडो पिढ्या आनंदाने आयुष्य काढतील. या वेदप्रसादाने सृष्टीनिर्मितीपासून ते या एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत आमचे संरक्षण केले आहे. वेदांच्या या दुर्भेद्य गडाला भगदाडे पाडण्याचा प्राचीन काळी काय थोडा प्रयत्न झाला ?
(संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)
संपूर्ण वेदवाङ्मय धर्माचा मूलस्त्रोत आहे. वेदांचा प्रतिपाद्य विषय धर्म आहे. वेदविहित पवित्र कर्तव्य कर्म हे धर्माचे स्वरूप आहे, जे कालाधीन आहे. 'काल' सूर्याधीन आहे. सूर्यामुळे दिवस व रात्र हा कालविभाग होतो. सूर्यच सृष्टी, स्थिती, संहाराचे मूळ कारण आहे. सूर्यामुळेच सृष्टी, स्थिती व संहार होतात. म्हणून सूर्यदेव ब्रह्मा, विष्णू, महेश स्वरूप आहेत.
ऋग्वेद सांगतो, "सूर्यदेव आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशित करतात."
यजुर्वेद सांगतो, "सूर्य देव समस्त भुवनांना उज्जीवीत करतात."
अथर्ववेद सांगतो, " हृद्रोग व श्वास रोग यांचा उपशम करतात."
वेदांवर भाष्य करणारे 'सायणाचार्य' यांच्या समालोचनावरून वेदांचा अर्थ लावता येतो. वेद जाणून घेता येतात. अधिक माहितीसाठी ६ वेदांगे आणि ४ उपांगे आहेत ज्यामुळे वेद नीट समजून घेण्यास मदत होते. शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ यांच्या शास्त्राशी संबंधीत वेदांग म्हणजे निरूक्त! ऋग्वेदातील ऋग् समजून घेण्यासाठी निरूक्त पहाणे आवश्यक आहे.
वेदांमध्ये मिळालेल्या या काही गोष्टी,
१) प्रकाशाचा वेग- ऋग्वेद, मण्डल १, सूक्त ५०, ऋचा ४.
२) विश्वाच्या केंद्रस्थानी सूर्य ही संकल्पना- यजुर्वेद (तैत्तिरीय संहिता), स्कंध ३, प्रपाठक ४, अनुवाक् १०, मंत्र ३.
३) पृथ्वीचा उपग्रह चंद्र – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १८९, ऋचा ८.
४) जन्मवेळी काढलेली बाळाची नाळ- अथर्ववेद, काण्ड १,सूक्त ११.
वेदांनी आमची संस्कृती घडविली, रक्षिली, चिरंतन केली.
(संवाद, गुरुदेव प्रकाशन, पृष्ठ २, ३ व ४)