फार प्राचीन काळी अभिजित नावाचा एक राजा होता. त्याच्या पत्नीचे नाव गुणवती. सारे काही व्यवस्थित होते, पण राजाला पुत्रसंतान नव्हते. मग वैशंपायन नावाच्या ऋषीच्या आदेशानुसार राजा-राणीने वनात जाऊन तपश्चर्या केली. पुढे कालांतराने गुणवंतीला एक पुत्र झाला. त्याचे नाव ठेवले गण. गण मोठा पराक्रमी होता, पण तितकाच तापट होता. एकदा तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला. कपिलांच्याजवळ चिंतामणी रत्न होते. त्या रत्नाच्या सामर्थ्याने कपिलने गणला भोजन घातले. गणराजाला ते रत्न हवे होते, पण कपिलाने ते देण्यास नकार दिला. तेव्हा गणराजाने ते हिरावून नेले; कपिलाला फार वाईट वाटले. मग त्याने दुर्गादेवीच्या आज्ञेनुसार विनायकाची आराधना केली. विनायक प्रसन्न झाला व त्याचे गेलेले रत्न परत मिळवून देण्याचे त्याने कपिलाला वचन दिले.
पुढे विनायकाचे व गणराजाचे घनघोर युद्ध झाले. विनायकाने गणराजाला ठार मारले. तेव्हा त्याच्या पित्याने अभिजीताने ते चिंतामणी रत्न विनायकास परत दिले. विनायकाने ते कपिलाला परत दिले, पण कपिलाने ते स्वीकारले नाही. तेव्हा विनायकाने चिंतामणी नाव धारण केले व ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तेथेच तो वास्तव्य करू लागला, तो आजतागायत. पुढे त्या कदंब वृक्षाच्या सभोवती एक गाव वसले. त्याचे नव कदंबनगर. ते पुढे कदंबतीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले. हे कदंबतीर्थ म्हणजेच सध्याचे थेऊर व तेथील विनायक तो चिंतामणी विनायक.
अहल्येचा अपहार केल्याबद्दल इंद्राला गौतमाने शाप दिला असता गौतमाच्याच आदेशाने इंद्राने तपश्चर्या केली व तो शापमुक्त झाला. त्याचे शरीर पूर्वीप्रमाणेच सतेज झाले. इंद्राने ज्या ठिकाणी बसून तप केले व शापमुक्त झाला त्या ठिकाणी त्याने श्रीगणेशाची स्थापना केली व तेथील सरोवरास 'चिंतामणी' असे नाव दिले. तेच हे क्षेत्र.
ब्रह्मदेवाने आपल्या चंचल मनाला स्थिरता लाभावी, ते शांत व्हावे म्हणून श्रीगणेशाचे चिंतन व अनुष्ठान केले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या मनाची चंचल वृत्ती नाहीशी झाली. ही सिद्धी त्याला ज्या ठिकाणी प्राप्त झाली त्याला त्याने स्थावर क्षेत्र असे नाव दिले व तेथे 'चिंतामणी' गणेशाची स्थापना केली म्हणून या क्षेत्राला थेऊर असे नाव प्राप्त झाले.
थेऊर
श्री चिंतामणी
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.
थेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचे महाद्वार उत्तरभिमुख आहे पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे. देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा व मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे.
पुणे नजिकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी या तपस्वी पुरूषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती, असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणी देव यांनी बांधले आहे.
पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)