श्री मोरया गोसावी (इ. स. १३७१ ते १५३१)

श्रीक्षेत्र मोरगाव हे श्रीगणेशाचे महत्वाचे स्थान आहे. ते महाराष्ट्रात पुण्यानजीकच आहे.

समर्थ रामदासस्वामी मोरगावच्या श्रीगणेशाच्या दर्शनास गेले. त्यांना श्री गणेशाने साक्षात दर्शन दिले. त्याच ठिकाणी समर्थांनी 'सुखकर्ता दुःखहर्ता' ही प्रसिद्ध प्रासादिक आरती लिहिली.

मोरगावच्या मयुरेश्वराचे परमभक्त गोसावीनंदन उर्फ मोरया गोसावी यांनी लिहिलेली 'सिंदूर लाल चढायो, अच्छा गजमुखको !' ही हिंदी भाषेतील आरती व 'नाना परिमळ दुर्वा, शेंदूर, शमीपत्रे' ही मराठी भाषेतील आरती सर्वत्र म्हटली जाते.

मोरगावच्या श्रीगणेशाच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक गणेशभक्तांना आला आहे.

मोरगाव येथे गोसावीनंदन – मोरया गोसावी हा परब्रह्माचा अवतार झाला तो त्यांचा वडिलांनी केलेल्या उग्र व खडतर गणेश-तपश्चर्येमुळे. गोसावीनंदनदेखील आपल्या वडिलांप्रमाणे गणेशाचीच उपासना करीत होते. तेही मयुरेश्वराचे भक्त होते.

मौजीबंधनानंतर अध्ययन चालू असताना योगीराज नयन भारती यांची भेट होऊन त्यांनी अंतरीची खूण पटवून दिली, अनुग्रह दिला व थेऊरला जाऊन चिंतामणीची सेवा करण्याची गोसावीनंदन यांना आज्ञा केली.

गोसावीनंदन यांनी थेऊरला जाऊन राहण्यास आपल्या आईवडिलांची परवानगी मिळवली. ते थेऊरला गेले.

गोसावीनंदन हे गणेशाचे परमभक्त. गणेशाचे स्मरण करून ते ध्यानस्थ बसू लागले. एकदा या अवस्थेतून ते समाधी अवस्थेत गेले. ही समाधी बेचाळीस दिवसांनी उतरली. त्यांनी आपल्या डोळ्यांनी चिंतामणी पाहिला. त्या दर्शनाने ते कृतार्थ बनले. धन्य झाले. गोसावीनंदन मोरया गोसावी बनले. गणपती मंगलमूर्ती आहे. 'मंगलमूर्ती मोरया' असे गर्जून लोक गणपतीचा जयजयकार तेव्हापासूनच करू लागले.

मोरया गोसावी यांना अष्टसिध्दी प्राप्त झाल्या होत्या. त्यांच्याकडे बघून लोकांना ते साक्षात मोरयाच वाटत. त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत राहिली. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांमुळे त्यांच्या गणेशसेवेत खंड पडू लागला. म्हणून ते चिंचवडजवळील थेरगाव येथील किवजाईच्या देवळात येऊन राहिले. तेथेही अष्टौप्रहर लोकांची वर्दळ सुरु झाली. नंतर ते लोकांच्या आग्रहास्तव चिंचवडलाच येऊन राहिले.

मोरगावला ते दार चतुर्थीला जाऊन मयुरेशाची पूजा करीत व पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत, असा त्यांचा नेम होता.

भाद्रपद चतुर्थी १४९२ मध्ये कऱ्हा नदीत स्नान करून अर्घ्य देत असता त्यांच्या हातात गणपती दिसला. तो घेऊन ते घरी परतले व कोठारेश्वरासमोर त्यांनी त्या मंगलमूर्तीची प्रतिष्ठापना केली.

काही काळानंतर पुत्र चि. चिंतामणी महाराज यांच्या हाती सर्व सूत्रे व कारभार सोपवून पवनेच्या काठी मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली.

मोरया गोसावी यांच्या घराण्यात सात पिढ्यांपर्यंत गणपतीचा अंश नांदला. जनमानसांत वंद्य मानलेल्या गणपतीच्या नावाबरोबर मोरयाचे नाव महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने घेतले जात आहे. 'मंगलमूर्ती मोरया… गणपतीबाप्पा मोरया !'