‘संत कबीर एकदा बाजारातून जात असतांना वाटेत त्यांना एक वाण्याची बायको दळत बसलेली दिसली. जात्याकडे पाहून कबिरांना रडू आले. अनेक लोकांनी त्यांना अचानक रडण्याचे कारण विचारले; परंतु कबीर काहीच बोलले नाहीत. एवढ्यात तिथे निपट निरंजन नावाचा साधू आला. त्याने कबिरांना रडण्याचे कारण विचारले. त्या साधूचा अधिकार ओळखून कबीर म्हणाले, ‘‘हे जाते फिरतांना पाहून मला मनात चिंता उत्पन्न झाली की, त्या जात्यात टाकलेल्या दाण्याचे जसे पीठ होत आहे, त्याप्रमाणेच या भवचक्रात सापडल्यामुळे आपलेही होणार.’ या विचाराने मन उद्विग्न झाले आहे. तेव्हा साधू म्हणाला, ‘‘कबिरा थोडा विचार कर. जात्यात पडलेले दाणे भरडले जाऊन पीठ होते, ही गोष्ट सत्य आहे; परंतु खुंट्याजवळ जे दाणे रहातात त्यांचे पीठ होत नाही.’’तसेच परमेश्वराच्या नामापासून (साधनेपासून) जे लांब रहातात, ते काळाच्या तडाख्यात सापडतात; परंतु ईश्वराचा नामजप करणार्यांना, ईश्वराच्या जवळ रहाणार्यांना काळाचे भय नाही.’
– डॉ. वसंत बाळाजी आठवले (खिस्ताब्द १९९०)