‘संगणक आणि त्यामुळे निर्माण झालेली प्रतियंत्रणा पाहिल्यास विश्वामित्राच्या प्रतिसृष्टीनिर्मितीच्या प्रयत्नांचीच आठवण येते’, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. संगणक ही काही दशकांआधी ठराविक बुद्धीजीवी वर्गाकडे असणारी आणि चैनीच्या वस्तूंमध्ये गणना होणारी वस्तू आज अत्यावश्यक अन् जीवनाचे अभिन्न अंग बनली आहे. त्याचा मानवाला होणारा मोठ्या प्रमाणातील लाभ पाहिला, तरी त्यानुषंगाने येणारे तोटे दुर्लक्षण्यासारखे नव्हेत. अशाच काही परिणामांचा विचार करण्यासाठी हा लेख प्रस्तुत करण्यात आला आहे.
१. संगणकीय खेळांचा शरीर आणि मनोधारणा यांवर विपरीत परिणाम होणे
दिवसेंदिवस शहरातील रहात्या जागेचे वाढणारे भाव लक्षात घेऊन मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार्या मैदानांना दुय्यम महत्त्व प्राप्त होऊन त्यांचे प्रमाण अल्प झाले. साहजिकच मैदानी खेळांची जागा बैठ्या खेळांनी घेतली. बैठ्या खेळांतही विविध संगणकीय तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे संगणकीय खेळांचा जास्त प्रमाणात वापर होऊ लागला. त्याचा शरीर आणि मनोधारणा यांवर अर्थातच विपरीत परिणाम झाला.
२. जागतिकीकरणाचा दुष्परिणाम – पालकांचे व्यापारीकरण
आज विभक्त कुटंबपद्धतीत आई-बाबा दोघेही कमावते असतात. घरी शक्यतो एकटेच मूल असते. त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, तर त्या मोबदल्यात त्या मुलाच्या कुठल्याही बर्या-वाईट हट्टांना बालमानसशास्त्रानुसार मान्यता दिली जाते. मुलांना संगणक, भ्रमणसंगणक, व्हिडीओ गेम्स, भ्रमणभाष, डिजीटल छायाचित्रक, दुचाकी आणि चारचाकी गाड्या अशी महागडी उपकरणे विनासायास, कधी कधी हट्ट न करताही मिळतात.
३. संगणकीय खेळांमुळे मुले कृतीच्या स्तरावर वहावत जाणे
संगणकीय खेळांमुळे मुले तासन्तास नव्हे, दिवसेंदिवस त्याच्यासमोर बसतात. त्या खेळातील वेगवेगळ्या पातळ्या (लेवल्स) पार करणे आणि पुढच्या पुढच्या टप्प्यात जाणे, असा विचारध्यास (Obsession) इतका बळावतो की, शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यास, परीक्षा, इतर कर्तव्ये, नातेसंबंध यांचाही विसर पडायला लागतो. रात्रंदिवस खेळाचेच विचार मनात असतात. समवयस्कांसमवेतचे बोलण्याचे विषयही अशा खेळांसंदर्भात आणि तदनुषंगिक तंत्रज्ञान, संगणकातील `सॉफ्टवेअर्स’ असेच असतात. अशा वेळी अशा खेळांकडे `मनोरंजन’ म्हणून पहाण्याचा सूज्ञपणा फारच अल्प मुलांकडे असतो. बहुतांश मुले विचार अन् कृतीच्या स्तरावर वहावत जातात.
४. पालक किंवा शिक्षक यांनी जाणीव करून देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते
अर्थातच त्यांच्याकडेही `करडी नजर’ ठेवण्याइतपत वेळ नसतोच, ‘जाणीव करून दिली की, कर्तव्य संपले’, असे वाटणारेच पालक अधिक असतात!
५. संगणकीय खेळांविषयी ऊहापोह करण्यापूर्वी त्याचे काही प्रकार जाणून घेऊ
अ. Arcade (हिंसात्मक खेळ)
आ. Strategy (धोरणात्मक खेळ)
इ. Racing (शर्यतीचे खेळ) आणि इतर
ई. अनैतिक कृत्ये असलेल्या खेळ
अ. हिंसात्मक खेळांमुळे तशा प्रकारची प्रवृत्ती मुलांमध्ये वाढीस लागणे
पहिल्या प्रकारात, खेळातील प्रतिस्पध्र्यावर मात करण्यासाठी रक्तपात आणि हिंसाचार यांचा स्वैरपणे वापर केला जातो. असे खेळ बालपणापासून (अलीकडे ६-७ वर्षांची मुलेही सराईतपणे खेळ खेळतात) खेळल्यामुळे मुलांच्या मनातील क्रोध, ईष्र्या, स्वतःला एखादी गोष्ट सरळपणे मिळत नसेल, तर हिंसात्मक मार्गाचा अवलंब करणे, सातत्याने स्वार्थी, आत्मवेंâद्रित, नकारात्मक विचार करणे, एकलकोंडेपणा इत्यादी गोष्टी प्रमाणाबाहेर वाढल्या आहेत.
आ. मन आणि बुद्धी यांना भुरळ पाडणारे धोरणात्मक खेळ
दुसर्या प्रकारातील खेळांचा वरकरणी जरी धोका जाणवत नाही; कारण ह्या खेळात वरील प्रकाराप्रमाणे हिंसाचार नसतो; परंतु ह्या खेळात पुरवलेल्या अल्पतम सुविधांमधून स्वतःचे शहर, साम्राज्य उभारायचे असते. त्यातील मायावी नियोजनाचा (Virtual Management) भाग मन आणि बुद्धी यांना इतका आव्हानात्मक अन् भुरळ पाडणारा असतो की, पहिल्या प्रकारातील खेळ हे काही घंटे चालत असतील, तर दुसर्या प्रकारातील खेळ हे काही दिवस ते सप्ताह इतका काळ चालतात.
इ. शर्यतीच्या खेळांमध्ये चुकीच्या पद्धतीने जिंकण्याचे शिकवले जाणे
तिसर्या प्रकारात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या शर्यती लावलेल्या असतात. यात सरळमार्गाने प्रतिस्पर्ध्याला हरवता आले नाही, तर त्याला वाहतुकीचे नियम डावलून, वेळप्रसंगी इतरांना इजा पोहोचवून केवळ स्वतःच्या जिंकण्यासाठी हा खेळ खेळला जातो. याचा एक उघड दुष्परिणाम म्हणजे मुले सायकल, दुचाकी गाडी चालवतांना रस्त्यावरील गाड्यांशी खेळाप्रमाणे शर्यत करण्याचा, वाहतुकीचे नियम मोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तो केवळ त्यांच्या जिवाशीच नव्हे, तर समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनेही हानीकारक आहे.
ई. अनैतिक कृत्ये असलेल्या खेळांमुळे नैतिकतेच्या सर्व संकल्पना मोडीस निघणे
वरील खेळांव्यतिरिक्त आणखी काही प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यात जुगार, अनैतिक कृत्ये इत्यादीचा समावेश आहे. या सर्व गोष्टी या खेळांत इतक्या सर्रास दाखविल्या जातात की, जणु या निरोगी समाजजीवनाचा एक अविभाज्य घटक आहेत. या सर्वांच्या वारंवार खेळण्यामुळे मनातील श्लील-अश्लीलतेच्या, पर्यायाने नैतिकतेच्या सर्व संकल्पना मोडीस निघतात.
६. तंत्रज्ञानाच्या भस्मासुराचा अनुभव घेण्यापेक्षा आध्यात्मिकतेचे धडे गिरवा
आज पाश्चिमात्य देश या तंत्रज्ञानाच्या भस्मासुराचा अनुभव घेत आहेत. उच्च तंत्रज्ञानाचे बाळकडू प्यायलेली सध्याची पिढी नैराश्य, नकारात्मकता, अनैतिकता, हिंसाचार यांची बळी ठरत आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षक यांना पिस्तुलाने उडविणारे ६-७ वर्षाचे बालक, हसण्या-खेळण्याच्या वयातील न कळत्या वासनोपभोगाला बळी पडलेल्या कुमारी माता, दिशाहीन युवक, असुरक्षित वृद्ध ही आहे उच्च तंत्रज्ञानाची पाश्चिमात्य जगताला मिळालेली देणगी !
८. संगणकातील खेळांच्या मायेत गुरफटू नका !
‘मुळातच ईश्वराने निर्मिलेले हे जगच `माया’ आहे आणि या मायेतच गुरफटून न जाता ब्रह्माकडे, म्हणजे ईश्वरप्राप्तीकडे साधनेद्वारे वाटचाल करणे, हे मनुष्यमात्राचे जन्मजात ध्येय आहे’, असे ऋषीमुनींनी सांगितले आहे; परंतु संगणक आणि त्यातील हे संगणकीय खेळांचे विश्व पाहिले की, कलियुगातील जिवांना ‘साधना’ या विषयाकडेच काय; पण तारतम्याने व्यवहारादी गोष्टींकडेही वळू न देण्यासाठी रचलेली मायावी अडथळ्यांची यंत्रणा (तिलिस्म) आहे’, असे जाणवते. संगणकीय खेळ हे मायेतील माया आहेत. (Computer Games are Illusion in Illusion.) यापासून ईश्वरानेच भावी पिढीचे रक्षण करून त्यांना साधनेकडे वळवावे, ही प्रार्थना !’