गणेशदास

पुराणांचा आणि उपनिषदांचा अभ्यास केलेले एक सत्पुरुष काशीक्षेत्रात होते. त्यांचे नाव ‘गणेशदास’ असे होते. जसे महाराष्ट्रामध्ये रामदास तसे काशीक्षेत्रामध्ये गणेशदास ! रामदासांची जशी प्रतिज्ञा होती की ही रामकथा ब्रह्मांड ओलांडून पल्याड नेईन तशी गणेशदासांनी प्रतिज्ञा केली होती की ब्रह्मांड भेदून गणेशकथा पल्याड नेईन. अत्यंत सत्पुरुष आणि सगळ्या चराचरामध्ये त्यांना गणेशाचेच दर्शन होत असे. म्हणून त्यांना गणेशदास म्हणत असत. अत्यंत सत्पात्र, अंतर्बाह्य शुचि झालेला, अंतर्बाह्य संग टाकलेला असा हा महात्मा होता.

हे गणेशदास एकदा काशी-वाराणसीच्या क्षेत्रात हिंडत होते, संध्या-समय उलटून गेला आणि रात्र झाली. गणेशदास वाराणसीत मणि-कर्णीकेच्या घाटावरून हिंडत होते आणि नेमके काही चोर तेथे आले. त्यांनी चौकशी केली की, ‘कोण आहेस रे बाबा तू?’ त्यावेळी गणेशदास हसले. उन्मनी अवस्थेत होते आणि सगळीकडे त्यांना गजानन दिसत होता. हसले आणि म्हणाले, ‘जो तुम सो मैं l ‘ ‘तुम्ही जे आहात तेच मी l ‘ हे ऐकल्यावर चोरांना वाटले , आपल्याच जातीतला दिसतोय. बरे झाले. ते म्हणाले, चोरीच करायला निघालो आहोत, यालाही आपण बरोबर घेऊ या.’ म्हणून गणेशदासांनासुद्धा बरोबर नेले. एका मोठ्या वाड्यावर दरोडा घालायचे ठरवले. ते म्हणाले, ‘हा जरा नवीन आहे, याला काही आत न्यायला नको, याला बाहेर थांबवू. खांद्याला एक झोळी होती त्यांच्या. त्या झोळीमध्ये थोडे सोने भरून नेता येईल एवढाच त्याचा उपयोग ! म्हणून गणेशदासांना बाहेर उभे केले आणि आत जाताना बजावून ठेवले की आम्ही आतमध्ये दरोडा घालयला जातो, जर बाहेर कोणाची चाहूल लागली तर आम्हाला सावध करायचे. गणेशदासांनी मान डोलावली. हे सगळे चोर आत गेले. गणेशदासांच्या चित्तामध्ये सगळीकडे गणेशाचा प्रकाश दाटलेला आहे. गणेशदासांना सगळीकडे गणपती दिसत होता.

चोर घरात गेले आणि गणेशदासांनी स्मरले की यांनी मला असे सांगितले आहे की तुला चाहूल लागली किंवा कुणाचे दर्शन झाले की आम्हाला सावध कर. त्यांच्या झोळीमध्ये एक शंख होता, तो शंख गणेशदासांनी काढला आणि जोरात फुंकायला सुरुवात केली. त्या वाड्यामधली सगळी माणसे जागी झाली. पाहतात तो चोर ! आणि सगळे चोर घाबरून धावले. या गणेशदासालाही त्यांनी ओढून नेले. ते चोर म्हणाले, ‘अरे, काय बावळट आहेस ! आम्ही तुला आमच्याच जातीतला म्हणून घेतला, चोर समजून घेतला आणि काय हे मुर्खासारखे केलेस ! कशाला तो शंख वाजवलास ?’ गणेशदास म्हणाले, ‘तुम्ही मला काय सांगितले होते? कुणाची चाहूल लागली, कुणाचे दर्शन झाले की आम्हाला सावध कर. मी केले. कारण तुम्ही आत गेलात आणि चहूबाजूला पाहिले तर मला काय दिसले? चहूबाजूला गणेशच गणेश !’ गणेशदास म्हणाले, ‘मला त्या गणेशाचेच दर्शन सर्वत्र झाले. त्यावेळी मी इतका गहिवरून गेलो की त्याच्या स्वागतार्थ मी शंख फुंकला.’ मग त्या चोरांना इतका गहिवर आला की हातामधली सगळी शस्त्रे टाकली आणि गणेशदासांच्या चरणांवर शरण गेले, त्यांचे शिष्य झाले.

Leave a Comment