कोणी एक राजा जलक्रीडा करताना आपल्या राणीच्या अंगावर पाणी उडवायला लागला. दोघेही जलाशयामध्ये स्नानाला गेलेले होते, त्यावेळी ती म्हणाली, ‘मोदकै: ताडय l ‘ त्यावेळी तो म्हणाला, ‘मोदकै: ताडय ? अरे, कोण आहे रे तिकडे? ‘ ताबडतोब सगळे सेवक धावले. राजा म्हणाला, ‘ताबडतोब मोदक भरलेली ताटेच्या ताटे घेऊन या.’ मोदकाची ताटे आणल्यावर त्याने राणीच्या अंगावर एकेक मोदक मारायला सुरुवार केली. तेव्हा राणीने कपाळाला हात लावला. आता काय करायचे या राजाला? ‘मोदकै: ताडय ‘ म्हणजे ‘मा उदकै: ताडय l ‘ उदक म्हणजे पाणी, उदकाने, पाण्याने माझे ताडन करू नकोस. पाण्याने मला मारू नकोस. असा भाव त्याच्यामध्ये आहे. राजाला संधीचे ज्ञान नव्हते. ‘मोदकै:’ म्हणल्यावर आणा म्हणाला मोदक सगळे !
जोपर्यंत खरे स्वरूप उलगडत नाही तोपर्यंत आपली अवस्था त्या राजासारखी असते. म्हणूनच नेहमी अर्थ नीट समजून घ्यावा. नाहीतर त्या राजासारखी फजिती व्हायला वेळ लागणार नाही.