स्वामी दयानंदांची एक सुंदर गोष्ट सांगतात. स्वामी दयानंद एकदा ऋषिकेशला गेलेले होते. त्या कालखंडामध्ये अनेक सिध्द पुरुष ऋषिकेशला वास्तव्य करून असत. आजही असे म्हणतात की, हिमालयाच्या परिसरामध्ये अनेक सिध्द पुरुष वास करून राहिलेले आहेत. स्वामी दयानंद हिमालयात गेले, अनेकांचे दर्शन घेतले, ज्यांना सिध्दी प्राप्त झाल्या आहेत, अशा अतिशय तपःपूत लोकांचे दर्शन झाले, ज्यांची तपश्चर्या सुफलित झाली आहे, अशा योग्यांचे दर्शन झाले. त्यावेळी त्यांना गंगेच्या काठावर एक तपस्वी दिसला. अतिशय तेजःपुंज, आणि त्याच्याबरोबर स्वामी दयानंदांचा संवाद झाला. दयानंद नवलाने म्हणाले,
‘आपण तपश्चर्येद्वारा काय काय प्राप्त केलेत?’ त्यावेळी ते सिध्द पुरुष हसायला लागले आणि म्हणाले, ‘मी अष्टांगयोगाचा अभ्यास केलेला आहे. काय मिळवले नाही म्हणून विचार! काय मिळवले म्हणून काय विचारतोस? मला अलौकिक सिध्दी प्राप्त झाल्या आहेत.’
आत्मज्ञान झाले होते की नाही कुणास ठाऊक! सिध्दी मात्र त्या व्यक्तीला प्राप्त झाल्या होत्या. मग ते म्हणाले, ‘सर्व सिध्दी मला प्राप्त आहेत, हे गंगेचे पात्र समोर पाहत आहेस ना! त्याच्यावरून मी रस्त्याप्रमाणे चालत जातो. हे गंगेचे पात्र अतीत होण्याचे सामर्थ्य मला प्राप्त झाले आहे. अशी सिद्धी मी माझ्या तपश्चर्येने प्राप्त करून घेतली आहे.’ त्यावेळी स्वामी दयानंदांनी स्मित केले, ते म्हणाले, ‘आपण खरच पाण्यावरून चालत जाता का?’ त्यावेळी ते म्हणाले, ‘तुला शंका वाटते का बेटा, मी चालून दाखवीन पाण्यावर!’
त्यावेळी दयानंद सरस्वती म्हणाले, ‘अलीकडे कसे येणार?’ त्यावेळी तो योगी मोठ्याने हसला. तो म्हणाला, ‘वेड्या, जसा पाण्यावरून चालत जाणार, तसा परत येणार.’ दयानंदांनी पुन्हा प्रश्न केला, ‘ही सिध्दी प्राप्त करण्यासाठी आपल्याला फार तपश्चर्या करावी लागली असेल.’ ते म्हणाले, ‘हो! साठ वर्षे मी याच्यात घालवलेली आहेत. ही एक सिध्दी प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या आयुष्याची साठ वर्षे गेलेली आहेत. अन तुला माझ्या वयाची कल्पनाही येणार नाही. अष्टसिद्धी प्राप्त करायची म्हणजे खेळ नव्हे! सोपे काम तर नव्हेच नव्हे! हे सगळे कित्येक वर्षाच्या उपासनेनंतर मला प्राप्त झालेले आहे.’
आपल्या पातंजल योगदर्शनामध्ये असे म्हटलेले आहे की ते अंतिम ज्ञानस्वरूप प्राप्त कण्यासाठी सिद्धींचा मोठा अडथळा पार करावा लागतो. सिध्दी मध्ये येतात आणि खुणावतात. म्हणतात, ‘अरे, आम्ही आलो, घे, आम्हाला स्वीकार.’ त्यावेळी योग्याने म्हणायचे असते, ‘नको एकही सिध्दी मला नको. मला निर्विकल्प समाधीचा आनंद घ्यायचा आहे. एकही सिद्धी मला नको.’ योगी प्रलोभनाला बळी पडले की तपश्चर्या नाश पावते.
इथे दयानंद म्हणाले, ‘खरचं का आपण साठ वर्षे दिली?’ ते म्हणाले, ‘एका सिध्दीसाठी मी साठ वर्षे दिली. अन्य सिद्धीसाठी किती वर्षे दिली सांगू का तुला?’ दयानंद म्हणाले, ‘नको !’ त्या योग्याला नवल वाटले. तो म्हणाला, ‘नको, असे का म्हणालात आपण?’ दयानंद म्हणाले, ‘अहो, साधी गोष्ट आहे. आपण यासाठी साठ वर्षे घालवली. आयुष्यातला इतका कालखंड आपण दिलात, मला वाईट वाटले.’ योगी म्हणाला, ‘का वाईट वाटले?’ ते म्हणाले, ‘अहो, ही नदी तरून जाण्यासाठी तुम्ही साठ वर्षे दिलीत, मला त्यात कोणतीच अडचण वाटत नाही.’ तो योगी म्हणाला, ‘हे काय म्हणत आहात आपण?’ त्यावेळी दयानंद म्हणाले, ‘साधी गोष्ट आहे, मला उत्तम पोहता येते, आणि फारच जर पूर असेल तर नावाड्याला बोलावीन, त्याला चार पैसे देईन आणि पलीकडे जाईन.’
तात्पर्य : व्यवहारातील साध्या गोष्टींसाठी तपश्चर्या पणाला लावायची नसते.