श्रीगणेश एकदन्त कसा झाला ?

      कार्तवीर्याचा वध करून कृतार्थ झालेला परशुराम कैलासावर आला. तिथे त्याची सर्व गणांशी आणि गणाधीश गणपतीचीही भेट झाली. शंकरांच्या दर्शनाची इच्छा परशुरामाच्या मनात होती. परंतु शिव-पार्वतीची ती विश्रांतीची वेळ होती.

      परशुराम गणेशाला म्हणाला, ‘अरे, मी परमेश्वराला नमस्कार करण्यासाठी अंतःपुरात जातो आहे. प्रणाम करून मी ताबडतोब परत येईन. ज्याच्या कृपेने मी कार्तवीर्य मारला, एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली, त्या जगदगुरूला शक्य तितक्या लवकर मला भेटलेच पाहिजे.’ हे ऐकताच गणेशाने सांगितले, ‘अरे, तू थोडा वेळ थांब.’

      परंतु गणेशाचे बोलणे न मानता हातातील परशु सरसावून परशुराम निर्भयतेने आत जाण्यास निघाला, तेव्हा गणेशाने उठून त्याला अडविले. प्रेमाने, नम्रतेने बाजूस सरले. तेव्हा रागाने त्याला मारण्यासाठी परशुरामाने परशु उचलला. त्या धकाधकीत गणेश खाली पडला, पण तरीही स्वतःला सावरून धर्माला साक्ष ठेवून त्याने पुन्हा परशुरामाला आत न जाण्याबद्दल बजावले. तरीही परशुराम ऐकेना. तेव्हा मात्र स्वतःची सोंड कोटी योजने वाढवून त्यात त्याला गुरफटवून सारे सप्त लोक हिंडवून आणले. त्या भ्रमणाने शुद्ध गेलेला परशुराम जेव्हा सावध झाला तेव्हा गुरु दत्ताने दिलीले स्तोत्रकवच म्हणून त्याने गणेशावर स्वतःचा परशु टाकला. तो व्यर्थ करण्यासाठी स्वतःचा डावा दात गणेशाने पुढे केला. पर्शुचा वार फुकट गेला, पण तो गणेशाचा दात मात्र तुटून पडला.

     सगळीकडे एकाच गोंधळ उडाला. सर्वजण जमा झाले. त्या गडबडीने शंकर-पार्वतीही बाहेर आली. सर्व समजल्यावर पार्वती परशुरामाला म्हणाली, ‘अरे, राम, तू ब्राह्मणवंशात जन्मलास आणि पंडितही आहेस. जमदग्नीचा पुत्र असून योगीराजांचा तू शिष्य आहेस. तुझी आई, मामा, आजोबा सारेच मोठे, मग तू कोणत्या दोषाने असा वागलास? अमोघ असा परशु घेऊन कोणीही  सिंहाला मारू शकेल, तसा तू परशु या गणेशावर चालविलास. तुझ्यासारख्या कोटी कोटी रामांना मारण्यास हा गणेश समर्थ आहे. अरे, हा गणेश कृष्णांश आहे. मोठ्या व्रताच्या प्रभावाने हा झाला आहे.

      श्रीविष्णु म्हणाले, ‘हे देवी पार्वती, माझे थोडे ऐक. तुला हा गजानन आणि कार्तिकेय जसा, तसाच हा परशुराम आहे. यांच्यावरील स्नेहात आणि प्रेमात काहीच भेद नाही. ‘आजपासून तुझ्या या मुलाचे नाव एकदंतही पडले आहे. त्याची एकूण आठ नावे आहेत- गणेश, एकदंत, हेरंब, विघ्ननायक, लंबोदर, शूर्पकर्ण, गजवक्त्र, गुहाग्रज ही ती नावे होत.’ असे सांगून श्रीविष्णूंनी गणेशस्तोत्र कथन केले व म्हटले, ‘हे दुर्गे, याच्यावर या परशुरामावर रागावू नकोस. त्या गणेशाचे एकदंत हे एक नाव या घटनेनेच प्राप्त झाले आहे. त्या घटनेमधील पुत्रवत असलेल्या परशुरामाला अभय दे.’ तेव्हापासून श्रीगणेश एकदंत झाला.

Leave a Comment