शंकराचार्य हिमालयाकडे प्रवास करत असताना सगळे त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर होते. समोर अलकनंदेचे विस्तीर्ण पात्र होते. कोणीतरी एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती आरंभिली. तो म्हणाला, ‘आचार्य अहो केवढे ज्ञान आहे आपल्याजवळ ! ही अलकनंदा समोरून वाहत आहे ना! कसा पवित्र प्रवाह खळखळत वाहत आहे! याच्यापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आपल्याला आहे ! महासागरासारखे !
त्यावेळी शंकराचार्यांनी हातातला दंड पाण्यामध्ये बुडवला, बाहेर काढला आणि आणि शिष्याला दाखवला. ‘बघ किती पाणी आले? एक थेंब आला त्याच्यावर.’ शंकराचार्य हसून म्हणाले, ‘वेड्या, माझे ज्ञान किती आहे सांगू? अलकनंदेच्या पात्रात अवघे जल आहे ना, त्यातील अवघा एक बिंदू काठीला आला. तेवढेच माझे ज्ञान अवघ्या ज्ञानातील बिंदू एवढे आहे. आदी शंकराचार्य जर असे म्हणतात, तर मग तुम्ही-आम्ही काय म्हणायचे?
तात्पर्य, कोणत्याही गोष्टीचा अहंकार नको.