त्र्यंबकेश्वर




नाशिक पासून 30 कि.मी. अंतरावर‍ ब्रम्हगिरीच्या कुशीत त्र्यंबकेश्वर हे गाव वसले आहे. या गावातच ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचे पेशवेकालीन मंदिर आहे. वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे हे मंदिर नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ या काळात बांधले.

येथील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर ब्रम्हा, विष्णू, महेश यांची रूपे आहेत. येथील देऊळ काळ्या दगडापासून बांधले आहे. गावातच कुशावर्त तीर्थ हे कुंड आहे. गंगाद्वार हे ब्रम्हगिरी पर्वतावरील ठिकाण असून येथे गोदावरी नदी उगम पावली आहे.

वेगवेगळे धार्मिक कार्यांसाठी महाराष्ट्रातून लोक येथे येतात. गोदावरी नदी ब्रम्हगिरीतच उगम पावते. नारायण-नागबली, कालसर्प शांती, त्रिपिंडी श्राद्ध आदी विधी येथे केले जातात. त्र्यंबकेश्वराचे धार्मिक महत्त्व मोठे आहे.

सिंहस्थ कुंभमेळा येथेच भरतो. गौतम ऋषींनी येथेच प्रथम भाताची शेती केली, असे सांगितले जाते. त्र्यंबकेश्वराचे आणखी एक मह्त्त्व म्हणजे ज्ञानेश्वरांचे गुरू निवृत्तीनाथ यांची समाधीही येथेच आहे.

त्यामुळे वारकरी येथे मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात. नाथपंथीयांचे महत्त्वाचे पीठ असलेला गोरक्षनाथ आखाडाही येथेच आहे. कुंभमेळा येथे भरत असल्याने शैवपंथीयांच्या प्रमुख सातही आखाड्यांच्या येथे शाखा आहेत. याशिवाय येथे अनेक आश्रम व मठ आहेत. कोकणाला लागून व डोंगराच्या कुशीत असल्याने पावसाळ्यात येथील निसर्गसौंदर्य खुलते.

जाण्याचा मार्ग

नाशिक पासुन 30 कि.मी. अंतरावर. नाशिकहून येथे येण्यासाठी राज्य परिवहन मंडळे, खासगी गाड्यांची सोय उपलब्ध आहे.

Leave a Comment