पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने हे सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो.
देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे २०० पायर्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. ‘नवलाख पायरीचा (नऊ लाख पायर्या) डोंगर’ असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणार्या व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दसर्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते.तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांची या देवळातच आपले वडील शहाजीराजे यांच्याशी भेट झाली होती असा उल्लेख इतिहासात आढळतो. बरेच दिवस मोहीमांवर असल्याने दोघे परस्परांस भेटले नव्हते. त्यामुळे त्यांच्या या भेटीला व स्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
जेजुरीच्या मंदिराचे उत्कृष्ट कोरीव काम जरूर पाहण्याजोगे आहे. आसपासही जुन्या वास्तू पाहायला मिळतात. जेजुरी हा शिवकाळातील दक्षिणेकडचा एक मोठा किल्ला होता.
‘यळकोट यळकोट जयमल्हार’ असा जयघोष करत देवाच्या भेटीला भक्तगण, दर्शनार्थी येतात. दर्शनाला येताना लोक भंडारा (हळद) उधळतात व श्रद्धेने कपाळाला लावतात. लग्न झाल्यानंतर वधु-वरांनी जोडीने खंडोबाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून येथे नवविवाहीत जोडपी दर्शनासाठी येतात.
जेजुरी पुण्यापासून ५० कि. मी. अंतरावर असून, अष्टविनायकाचे स्थान मोरगाव जेजुरीपासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर आहे.