श्रीवर्धन

श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला ‘श्रीधर’ म्हटले जाते.. त्या ‘श्री’ च्या अस्तित्वामुळे वधर्न (वाढ) झालेले गाव म्हणजे ‘श्रीवर्धन’. या निसर्गरम्य गावाच्या उत्तरेस तांबडीचा डोंगर व पश्र्चिमेकडे समुद्र आहे. तर दक्षिणेस असलेल्या खाडीत हे गाव आखीव-रेखीव असे नटलेले आहे. श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव आहे. अशा या निसर्गाने, समुद्राने नटलेल्या ऐतिहासिक गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे –

कुसुमादेवी मंदिर (श्रीवर्धन)

कुसुमादेवी ही श्रीवर्धनची ग्रामदेवता आहे. हे मंदिर गावापासून लांब, डोंगरात, झाडांच्या हिरव्या छायेत वसलेले आहे. मंदिर कौलारू असून भोवती मोठे पटांगण आहे. येथे चतुर्भुज महासरस्वती, अष्टभुजा महालक्ष्मी आणि चतुर्भुज महाकाली या तीनही शक्ती एकत्र येऊन ‘महाकुसुमादेवी’ हे स्थान निर्माण झाले आहे. या सर्व मूर्ती काळ्या पाषाणातील असून प्रत्येकीची उंची सुमारे दीड-दोन फूट आहे. कुसुम म्हणजे फूल. जंगलातील फुलांच्या सहवासातील देवता म्हणून याचे नाव ‘कुसुमादेवी’ असावे. हे स्थान पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते.

लक्ष्मीनारायण मंदिर (श्रीवर्धन)

या मंदिरातील विष्णूची मूर्ती म्हणजे सुंदर शिल्पाकृती आहे. या मूर्तीची उंची दोन फूट असून ही काळ्या पाषाणात कोरलेली दक्षिण भारतीय शैलीची आहे. रेखीव व प्रमाणबद्ध अशी ही मूर्ती शिलाहार काळातील असावी. मूर्तीच्या उजव्या पायाशी गरुड तर डाव्या पायाशी लक्ष्मी आहे. प्रभावळीत दोन्ही बाजूस दशावतार कोरलेले आहेत. विष्णूसोबत लक्ष्मीपण आहे. त्यामुळे याला लक्ष्मी नारायण म्हटले जाते.

सोमजाई मंदिर (श्रीवर्धन)

हे स्थान प्राचीन आहे. अगस्ती मुनींनी सोमजाईची स्थापना केली असे मानले जाते. त्याचा जिर्णोद्धार पेशव्यांनी केलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मूळ मंदिरास कोकणी पद्धतीने कौलारू छपराने आच्छादलेले आहे.

सोमजाई देवी शाळीग्राम स्वरूपातील असून शिव, भवानी, नंदी, वासुकी या चार शक्ती मिळून सोमजाई नावाने प्रसिद्ध आहेत. सोमजाई व हरिहरेश्र्वराचे दर्शन एकाच दिवशी घेतल्यास दक्षिणकाशी पूर्ण केल्याचे पुण्य मिळते असे मानतात.

पेशवे मंदिर (श्रीवर्धन)

पेशव्यांचे हे मूळ गाव असल्यामुळे त्यांच्याच वास्तुत हे पेशवे मंदिर आहे. याच ठिकाणी श्रीमंत बाळाजी विश्र्वनाथ पेशवे यांचा पेशवाई पगडी व वस्त्र परीधान केलेला पूर्णाकृती सुंदर पुतळा आहे. उपरोक्त मंदिरांसह श्रीवर्धन येथे श्रीराममंदिर, आरवी -नारायण मंदिर, देवखोल -कुसुमेश्र्वर मंदिर, वाकळघर- गंगादेवी हीदेखील गावापासून थोडी लांब असलेली प्रेक्षणीय श्रद्धास्थाने आहेत.

शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली, लाकडी खांबांवर सुंदर नक्षीकाम असलेली, निसर्गाच्या कुशीतील, प्रसन्न शांततेतील ही सर्व मंदिरे इतिहास कथन करतात, तसेच सर्व पर्यटकांना निश्र्चितच खुणावतात.

Leave a Comment