दिवेआगर

अनेक ऐतिहासिक संदर्भांवरून दिवेआगर हे गाव बरेच प्राचीन असल्याचे समजते. शिलाहार घराण्याची इ. स. ८०० ते १२६५ अशी सुमारे ४५० वर्षांची राजवट या भागावर होती. समुद्रमार्गे व्यापार चाले. त्यातूनच अरबी चाच्यांनी गाव लुटले, मंदिर उद्‌ध्वस्त केले असेही उल्लेख सापडतात. भट आणि बापट भावंडांनी दिवेआगरचा कायापालट सिद्दीच्या परवानगीने केला. मोडी लिपीत त्याविषयीची कागदपत्रे बापटांच्या वारसदाराकडे आजही ठेवलेली आहेत.

दिवेआगर गावाचे प्रथम दैवत म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर महत्त्वाचे आहे. शिलाहारांचे ते दैवत होते असे संदर्भ सापडतात. येथे श्री गजाननाची पाषाणमूर्ती आहे. शेजारी अन्नपूर्णा देवीची पितळी मूर्ती आहे. मराठी भाषेतील अतिशय प्राचीन असा (भाषेच्या अगदी सुरूवातीच्या अवस्थेतला) ताम्रपट येथे सापडला. हा इ.स. १०६० मधील ताम्रपट असल्याने मराठी भाषेच्या दृष्टीनेही दिवेआगर हे महत्त्वाचे स्थान आहे.

श्रीवर्धनमार्गे पुणे ते दिवेआगर हे अंतर १७१ कि. मी. आहे. पण म्हसळामार्गे ते १५६ कि. मी. आहे. रस्ता चांगला आहे. रेल्वेने यायचे असेल तर माणगाव स्टेशनवर उतरून खाजगी वाहन घेऊन रस्त्याने दिवेआगरला पोहोचता येते.

Leave a Comment