अलिबाग – रेवस रस्त्यावर अलिबागपासून १२ कि. मी. अंतरावर कनकेश्र्वर फाटा लागतो. टेकडीवर कनकेश्र्वर हे शिव मंदिर आहे. या टेकडीला कनकडोंगरी नावाने ओळखतात. भगवान परशुरामांनी ती निर्माण केली अशी श्रद्धा आहे. ७०० ते ७५० पायर्यांचा इ. स. १७६४ मध्ये बांधलेला रस्ता टेकडी चढण्यासाठी आहे. येथील श्री कनकेश्र्वरांच्या शिवलिंगातून सतत जलप्रवाह सुरू असतो. टेकडीवरील घनदाट जंगल, पवित्र शांतता यांमुळे पर्यटकांना व भाविकांना एक सुंदर अनुभव या ठिकाणी मिळतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचे स्वरूप स्पष्ट करणारा ‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ लिहिणारे रामचंद्र अमात्य हे कनकेश्र्वराला वास्तव्य करून होते. त्यांनी राजकारण संन्यास घेतला होता असे सांगतात.
कनकेश्र्वरला श्रीसिद्धिविनायक मंदिरही आहे. १७९८ मध्ये ते बांधले, कराडच्या लंबोदर स्वामींनी. बडोद्याच्या मैराळस्वामींनी गणेशाची मूर्ती दिली असून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात केली आहे.