अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव-निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या जीवन चरित्राचा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे. या काळामध्ये महाराजांनी खूपच चमत्कार केले.
श्री गजानन महाराज हे वऱ्हाडात शेगाव (शिवगाव) येथे होऊन गेले. २३ फेब्रुवारी, १८७८ रोजी ते प्रथमतः ऐन तारुण्यात शेगावी दिसले. त्यावेळी श्रीगजानन महाराज, तेथील साधू देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील कण वेचून खात होते. गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिऊन ते निघून गेले. पुढे ब्रह्मनिष्ठ गोविंद महाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्या वेळी टाकळीकर महाराजांच्या बेफाम असलेल्या घोड्याच्या चौपायांत श्री गजानन महाराज हे ब्रह्मानंदीनि मग्न होऊन निजलेले आढळले. तो द्वाड घोडा शांत होऊन स्वस्थ उभा राहिला होता. कीर्तन संपल्यानंतर गोविंद महाराज मंदिरात झोपले, परंतु त्यांचे लक्ष त्या घोड्यावर होते. रोज दांडगाई करणारा घोडा आज स्वस्थ उभा कसा ? या गोष्टीचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी उठून निरखून पाहिले तेव्हा गजानन महाराजांनी घोड्याच्या चौपायी शयन केलेले दिसले. दुसऱ्या दिवशी कीर्तनात टाकळीकर महाराजांनी सांगितले की, ”हा साक्षात शिव अवतार आहे. त्याची उपेक्षा करू नका.” टाकळीकरांनी त्यांची पूजा केली. ‘गण गण गणात बोते’, बोटावरी वाजवून बोटें असे ते भजन अहर्निश गात असत. म्हणून लोक त्यांना श्री गजानन महाराज असे संबोधू लागले. ते वाटेल ते खात. कोठेही पडून राहात. कोठेही संचार करीत. लोक त्यांना बहुमोल वस्त्रे, अलंकार, पैसे, खाद्यपदार्थ अर्पण करीत. पण ते सर्व तिथेच टाकून निघून जात. लोकांना त्यांच्या दर्शनाने मनःशांती मिळे.
बंकटलाल आगरवाल हे गजानन महाराजांच्या चरणी लीन होऊन त्यांना आपल्या घरी घेऊन आले. एक अवतारी स्वामी आगरवाल चे घरी येऊन राहिल्याची बातमी घरोघरी गेली. महाराजांचे दर्शन घेण्यास गावागावातून लोक येऊ लागले. महाराजांचे चरण वंदून कोणी धन मागू लागले, पुत्र संतान मागू लागले, विद्या मागू लागले. त्यांचे मनोरथ पूर्ण होऊ लागले. महाराजांनी तिथे अलौकिक चमत्कार केले. गजानन महाराजांच्या चेहऱ्यावर सदैव ब्रह्मानंदव ब्रह्मतेज झळकत असे. हजारो लोक त्यांच्याभोवती जमा होऊ लागले.
एकदा मुलांनी गजानन महाराजांना चिलीम भरून दिली आणि विस्तव आणण्यास म्हणून बंकटलालने त्यांना गल्लीतल्या जानकीराम सोनाराकडे पाठविले. सोन्या चांदीचा त्याचा मोठा धंदा होता. नळी फुंकीत तो बसला होता. मुलांनी त्याच्या दुकानात जाऊन विस्तव मागितला. विस्तव देत नाही असे त्याने मुलांना स्पष्ट सांगितले आणि महाराजांची त्याने निंदा केली. मुलांना त्याने घालवून दिले. मुले रिकामी परत आली. सोनार विस्तव देत नाही असे म्हणाली. तेव्हा महाराज म्हणाले, ”अरे चिलमीवर काडी धरा, विस्तव येईल. ”बंकटलालने महाराजांच्या चिलमीवर काडी धरतच चिलमीत तात्काळ विस्तव पेटला. महाराजांच्या मुखातून धूर निघाला.
श्री गजानन महाराज यांना कोणी रामावतार म्हणत, कोणी कृष्णअवतार तर कोणी शिवशंकर शेगावी प्रकटले असे समजत.
अकोल्यात भास्कर नावाचा एक शेतकरी होता. शेतावर तो काम करी. महाराज भर दुपारी त्याच्याकडे पाणी मागण्यास गेले. भास्कर शेतकरी महाराजांना रागाने म्हणाला, ”सकाळी घडा भरून आणला आहे. तुम्हाला देऊन काय करू ? चालते व्हा इथून ! म्हणे पाणी पाज ! चालते व्हा इथून ! . . . शेजारी कोरडी विहीर होती. त्याच्या काठावर महाराज बसले होते. महाराजांनी लगेच त्या कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न केले. भास्कर शेतकऱ्याने क्षमा मागितली. त्या वेळेपासून तो महाराजांच्या संगे शेगावी राहिला.
शेगावचा खंडू पाटील महाराजांकडे आला. त्याला मुलबाळ नव्हते. त्याने महाराजांचे पाय धरून गळ घातली, ”स्वामी, मला एक पुत्र द्या !” तेव्हा महाराज म्हणाले, ”अरे, तू श्रीमंत पाटील. माझ्या जवळ भीक मागतोस. जा रे, तुला होईल बाळ. नाव त्याचे भिक्या ठेव !” काही काळात खंडू पाटलाला पुत्र झाला. त्याचे नाव भिक्या ठेवले. पाटलाने आंबरस-पुरीचे जेवण गावास घातले.
आषाढ शुध्द एकादशीस हरी पाटलास बरोबर घेऊन गजानन महाराज पंढरीस विठ्ठलाच्या दर्शनास गेले. भक्त आणि इतर पाच-पन्नास शेगावकर महाराजांच्या बरोबर होते. ‘जय जय राम कृष्ण हरी !’ म्हणत टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी चालली. गजानन महाराजांच्या समवेत दिंडी पंढरपुरास आली. सर्वांचा विठ्ठल दर्शनाचा हेतू होता, तो महाराजांनी पुरविला. श्री गजानन महाराजांनी पंढरीस बापू काळ्याला श्रीविठ्ठल स्वरुपात दर्शन दिले. पंढरीची वारी करून विठ्ठल नामाचा गजर करीत शेगावकरी परतून आले.
भाद्रपद शुध्द पंचमी, सन १९१० गुरुवार रोजी विठ्ठलाच्या नाम-गजरात शेगाव येथे गजानन महाराज समाधीस्थ झाले. ज्यांच्या ठिकाणी गजानन महाराजांबद्दल प्रेम, भक्ति, श्रद्धा व निष्ठा आहे, त्यांना आजही साक्षात्काराचा पूर्ण अनुभव येतो, याची प्रचीती गजानन महाराज आजही भक्तांना देत असतात. त्यांच्या संकटी धावून जातात. त्यांचे मनोरथ पूर्ण करतात. दारिद्र्यासी धन देतात, रोग्यास उत्तम आरोग्य देतात, निपुत्रिकासी पुत्र देतात, कल्याण करतात.