॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक एकोणिसावा : शिकवण ॥
समास पहिला : लेखनक्रियानिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।
जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥
वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें ।
कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥ २ ॥
अक्षरमात्र तितुकें नीट । नेमस्त पैस काने नीट ।
आडव्या मात्रा त्या हि नीट । आर्कुलीं वेलांड्या ॥ ३ ॥
पहिलें अक्षर जें काढिलें । ग्रंथ संपेतों पाहात गेलें ।
येका टांकेंचि लिहिलें । ऐसें वाटे ॥ ४ ॥
अक्षराचें काळेपण । टांकाचें ठोसरपण ।
तैसेंचि वळण वांकाण । सारिखेंचि ॥ ५ ॥
वोळीस वोळी लागेना । आर्कुली मात्रा भेदीना ।
खालिले वोळीस स्पर्शेना । अथवा लंबाकार ॥ ६ ॥
पान शिषानें रेखाटावें । त्यावरी नेमकचि ल्याहावें ।
दुरी जवळी न व्हावें । अंतर वोळींचे ॥ ७ ॥
कोठें शोधासी आडेना । चुकी पाहातां सांपडेना ।
गरज केली हें घडेना । लेखकापसुनी ॥ ८ ॥
ज्याचें वय आहे नूतन । त्यानें ल्याहावें जपोन ।
जनासी पडे मोहन । ऐसें करावें ॥ ९ ॥
बहु बारिक तरुणपणीं । कामा नये म्हातारपणीं ।
मध्यस्त लिहिण्याची करणी । केली पाहिजे ॥ १० ॥
भोंवतें स्थळ सोडून द्यावें । मधेंचि चमचमित ल्याहावें ।
कागद झडतांहि झडावें । नलगेचि अक्षर ॥ ११ ॥
ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा । प्राणी मात्रास उपजे हेवा ।
ऐसा पुरुष तो पाहावा । म्हणती लोक ॥ १२ ॥
काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।
चटक लाउनी सोडावी । कांहीं येक ॥ १३ ॥
घट्य कागद आणावे । जपोन नेमस्त खळावे ।
लिहिण्याचे सामे असावे । नानापरी ॥ १४ ॥
सुया कातया जागाईत । खळी घोंटाळें तागाईत ।
नाना सुरंग मिश्रित । जाणोनि घ्यावें ॥ १५ ॥
नाना देसीचे बरु आणावे । घटी बारिक सरळे घ्यावे ।
नाना रंगाचे आणावे । नाना जिनसी ॥ १६ ॥
नाना जिनसी टांकतोडणी । नाना प्रकारें रेखाटणी ।
चित्रविचित्र करणी । सिसेंलोळ्या ॥ १७ ॥
हिंगुळ संग्रहीं असावे । वळले आळिते पाहोन घ्यावे ।
सोपें भिजौनी वाळवावे । संग्रह मसीचे ॥ १८ ॥
तगटी इतिश्रया कराव्या । बंदरी फळ्या घोटाव्या ।
नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रें ॥ १९ ॥
नाना गोप नाना बासनें । मेणकापडें सिंदुरवणें ।
पेट्या कुलुपें जपणें । पुस्तकाकारणें ॥ २० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लेखनक्रियानिरूपणनाम समास पहिला ॥
समास दुसरा : विवरणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
मागां बोलिले लेखनभेद । आतां ऐका अर्थभेद ।
नाना प्रकारीचे संवाद । समजोन घ्यावे ॥ १ ॥
शब्दभेद अर्थभेद । मुद्राभेद प्रबंधभेद ।
नाना शब्दाचे शब्दभेद । जाणोनी पाहावे ॥ २ ॥
नाना आशंका प्रत्योत्तरें । नाना प्रचित साक्षात्कारें ।
जेणें करितां जगदांतरें । चमत्कारती ॥ ३ ॥
नाना पूर्वपक्ष सिद्धांत । प्रत्ययो पाहावा नेमस्त ।
अनुमानाचे स्वस्तवेस्त । बोलोंचि नये ॥ ४ ॥
प्रवृत्ति अथवा निवृत्ती । प्रचितीविण अवघी भ्रांती ।
गलंग्यांमधील जगज्जोति । चेतेल कोठें ॥ ५ ॥
हेत समजोन उत्तर देणें । दुसयाचे जीवीचें समजणें ।
मुख्य चातुर्याचीं लक्षणें । तें हें ऐसीं ॥ ६ ॥
चातुर्येंविण खटपट । ते विद्यादि फलकट ।
सभेमधें आटघाट । समाधान कैचें ॥ ७ ॥
बहुत बोलणें ऐकावें । तेथें मोन्यचि धरावें ।
अल्पचिन्हें समजावें । जगदांतर ॥ ८ ॥
बाष्कळामधें बैसो नये । उद्धटासिं तंडों नये ।
आपणाकरितां खंडों नये । समाधान जनाचें ॥ ९ ॥
नेणतपण सोडूं नये । जाणपणें फुगो नये ।
नाना जनाचें हृदये । मृद शब्दें उकलावें ॥ १० ॥
प्रसंग जाणावा नेटका । बहुतांसी जाझु नका ।
खरें असतांचि नासका । फड होतो ॥ ११ ॥
शोध घेतां आळसों नये । भ्रष्ट लोकीं बैसों नये ।
बैसलें तरी टाकूं नये । मिथ्या दोष ॥ १२ ॥
अंतर आर्ताचें शोधावें । प्रसंगीं थोडें चि वाचावें ।
चटक लाउनी सोडावें । भल्या मनुष्यासी ॥ १३ ॥
मज्यालसींत बैसों नये । समाराधनेसी जाऊं नये ।
जातां येळीलवाणें होये । जिणें आपुलें ॥ १४ ॥
उत्तम गुण प्रगटवावे । मग भलत्यासी बोलतां फावे ।
भले पाहोन करावे । शोधून मित्र ॥ १५ ॥
उपासनेसारिखें बोलावें । सर्व जनासि तोषवावें ।
सगट बरेंपण राखावें । कोण्हीयेकासी ॥ १६ ॥
ठाईं ठाईं शोध घ्यावा । मग ग्रामीं प्रवेश करावा ।
प्राणीमात्र बोलवावा । आप्तपणें ॥ १७ ॥
उंच नीच म्हणों नये । सकळांचें निववावें हृदये ।
अस्तमानीं जाऊं नये । कोठें तर्ही ॥ १८ ॥
जगामधें जगमित्र । जिव्हेपासीं आहे सूत्र ।
कोठें र्ही सत्पात्र । शोधून काढावें ॥ १९ ॥
कथा होती तेथें जावें । दुरी दीनासारिखें बैसावें ।
तेथील सकळ हरद्र घ्यावें । अंतर्यामीं ॥ २० ॥
तेथें भले आडळती । व्यापा ते हि कळों येती ।
हळुहळु मंदगती । रीग करावा ॥ २१ ॥
सकळामधें विशेष श्रवण । श्रवणाहुनी थोर मनन ।
मननें होये समाधान । बहुत जनाचें ॥ २२ ॥
धूर्तपणें सकळ जाणावें अंतरीं अंतर बाणावें ।
समजल्याविण सिणावें । कासयासी ॥ २३ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवरणनिरूपणनाम समास दुसरा ॥
समास तिसरा : करंटलक्षणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
सुचित करूनी अंतःकर्ण । ऐका करंटलक्षण ।
हें त्यागितां सदेवलक्षण । आंगीं बाणें ॥ १ ॥
पापाकरितां दरिद्र प्राप्त । दरिद्रें होये पापसंचित ।
ऐसेंचि होत जात । क्षणक्षणा ॥ २ ॥
याकारणें करंटलक्षणें । ऐकोनी त्यागचि करणें ।
म्हणिजे कांहीं येक बाणें । सदेवलक्षण ॥ ३ ॥
करंट्यास आळस आवडे । यत्न कदापि नावडे ।
त्याची वासना वावडे । अधर्मीं सदा ॥ ४ ॥
सदा भ्रमिष्ट निदसुरा । उगेंचि बोले सैरावैरा ।
कोणीयेकाच्या अंतरा । मानेचिना ॥ ५ ॥
लेहों नेणे वाचूं नेणे । सवदासुत घेऊं नेणे ।
हिशेब कितेब राखों नेणे । धारणा नाहीं ॥ ६ ॥
हारवी सांडी पाडी फोडी । विसरे चुके नाना खोडी ।
भल्याचे संगतीची आवडी । कदापी नाहीं ॥ ७ ॥
चाट गडी मेळविले । कुकर्मी मित्र केले ।
खट नट येकवटिले । चोरटे पापी ॥ ८ ॥
ज्यासीं त्यासीं कळकटा । स्वयें सदाचा चोरटा ।
परघातकी धाटामोटा । वाटा पाडी ॥ ९ ॥
दीर्घ सूचना सुचेचिना । न्याय नीति हे रुचेना ।
पराभिळासीं वासना । निरंतर ॥ १० ॥
आळसें शरीर पाळिलें । परंतु पोटेंविण गेलें ।
सुडकें मिळेनासें जालें । पांघराया ॥ ११ ॥
आळसे शरीर पाळी । अखंड कुंसी कांडोळी ।
निद्रेचे पाडी सुकाळीं । आपणासी ॥ १२ ॥
जनासीं मीत्री करीना । कठिण शब्द बोले नाना ।
मूर्खपणें आवरेना । कोणीयेकासी ॥ १३ ॥
पवित्र लोकांमधें भिडावे । वोंगळामधें निशंक धांवे ।
सदा मनापासून भावे । जननिंद्य क्रिया ॥ १४ ॥
तेथें कैचा परोपकार । केला बहुतांचा संव्हार ।
पापी अनर्थी अपस्मार । सर्वाबद्धी ॥ १५ ॥
शब्द सांभळून बोलेना । आवरितां आवरेना ।
कोणीयेकासी मानेना । बोलणें त्याचें ॥ १६ ॥
कोणीयेकास विश्वास नाहीं । कोणीयेकासीं सख्य नाहीं ।
विद्या वैभव कांहींच नाहीं । उगाचि ताठा ॥ १७ ॥
राखावीं बहुतांची अंतरें । भाग्य येतें तदनंतरें ।
ऐसीं हें विवेकाचीं उत्तरें । ऐकणार नाहीं ॥ १८ ॥
स्वयें आपणास कळेना । शिकविलें तें ऐकेना ।
तयासी उपाय नाना । काये करिती ॥ १९ ॥
कल्पना करी उदंड कांहीं । प्राप्तव्य तों कांहींच नहीं ।
अखंड पडिला संदेहीं । अनुमानाचे ॥ २० ॥
पुण्य मार्ग संडिला मनें । पाप झडावें काशानें ।
निश्चय नाहीं अनुमानें । नास केला ॥ २१ ॥
कांहींयेक पुर्तें कळेना । सभेमधें बोलों राहेना ।
बाष्कळ लाबाड ऐसें जना । कळों आलें ॥ २२ ॥
कांहीं नेमकपण आपुलें । बहुत जनासी कळों आलें ।
तेंचि मनुष्य मान्य जालें । भूमंडळीं ॥ २३ ॥
झिजल्यावांचून कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची ।
जिकडे तिकडे होते ची ची । अवलक्षणें ॥ २४ ॥
भल्याची संगती धरीना । आपणासी शाहाणे करीना ।
तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे ॥ २५ ॥
लोकांसी बरें करवें । तें उसिणें सवेंचि घ्यावें ।
ऐसें जयाच्या जीवें । जाणिजेना ॥ २६ ॥
जेथें नाहीं उत्तम गुण । तें करंट्याचें लक्षण ।
बहुतांसीं न मने तें अवलक्षण । सहजचि जालें ॥ २७ ॥
कार्याकारण सकळ कांहीं । कार्येंविण तो कांहींच नाहीं ।
निकामी तो दुःखप्रवाहीं । वाहातचि गेला ॥ २८ ॥
बहुतांसीं मान्य थोडा । त्याच्या पापासी नाहीं जोडा ।
निराश्रई पडे उघडा । जेथें तेथें ॥ २९ ॥
याकारणें अवगुण त्यागावे । उत्तम गुण समजोन घ्यावें ।
तेणें मनासारिखें फावे । सकळ कांहीं ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे करंटलक्षणनिरूपणनाम समास तिसरा ॥
समास चौथा : सदेवलक्षणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
मागां बोलिले करंटलक्षण । तें विवेकें सांडावें संपूर्ण ।
आतां ऐका सदेवलक्षण । परम सौख्यदायेक ॥ १ ॥
उपजतगुण शरीरीं । परोपकारी नानापरी ।
आवडे सर्वांचे अंतरीं । सर्वकाळ ॥ २ ॥
सुंदर अक्षर लेहो जाणे । चपळ शुद्ध वाचूं जाणे ।
अर्थांतर सांगों जाणे । सकळ कांहीं ॥ ३ ॥
कोणाचें मनोगत तोडिना । भल्यांची संगती सोडिना ।
सदेवलक्षण अनुमाना । आणून ठेवी ॥ ४ ॥
तो सकळ जनासी व्हावा । जेथें तेथें नित्य नवा ।
मूर्खपणें अनुमानगोवा । कांहींच नाहीं ॥ ५ ॥
नाना उत्तम गुण सत्पात्र । तेचि मनुष्य जगमित्र ।
प्रगट कीर्ती स्वतंत्र । पराधेन नाहीं ॥ ६ ॥
राखे सकळांचें अंतर । उदंड करी पाठांतर ।
नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥ ७ ॥
नम्रपणें पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगों जाणे ।
बोलाऐसें वर्तों जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥
तो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी ।
धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष ॥ ९ ॥
तो परोपकार करितांचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला ।
मग काय उणें तयाला । भूमंडळीं ॥ १० ॥
बहुत जन वास पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे ।
उणें कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥
चौदा विद्या चौसष्टी कळा । जाणे संगीत गायेनकळा ।
आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें ॥ १२ ॥
सकळांसी नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें ।
अखंड कोणीयेकाचे उणें । पडोंचि नेदी ॥ १३ ॥
न्याय नीति भजन मर्याद । काळ सार्थक करी सदा ।
दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥
उत्तम गुणें श्रृंघारला । तो बहुतांमधें शोभला ।
प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा ॥ १५ ॥
जाणता पुरुष असेल जेथें । कळहो कैचा उठेल तेथें ।
उत्तम गुणाविषीं रितें । तें प्राणी करंटे ॥ १६ ॥
प्रपंची जाणे राजकारण । परमार्थीं साकल्य विवरण ।
सर्वांमधें उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥
मागें येक पुढें येक । ऐसा कदापी नाहीं दंडक ।
सर्वत्रांसीं अलोलिक । तया पुरुषाची ॥ १८ ॥
अंतरासी लागेल ढका । ऐसी वर्तणूक करूं नका ।
जेथें तेथें विवेका । प्रगट करी ॥ १९ ॥
कर्मविधी उपासनाविधी । ज्ञानविधी वैराग्यविधी ।
विशाळ ज्ञात्रुत्वाची बुद्धी । चळेल कैसी ॥ २० ॥
पाहातां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण ।
जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥ २१ ॥
आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लाहानथोर ।
तैसाचि करी परोपकार । मनापासुनी ॥ २२ ॥
दुसर्याच्या दुःखें दुखवे । दुसयाच्या सुखें सुखावे ।
आवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥
उदंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी ।
तैसी अवघ्यांची चिंता करी । माहांपुरुष ॥ २४ ॥
जयास कोणाचें सोसेना । तयाची निःकांचन वासना ।
धीकारिल्या धीकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥
मिथ्या शरीर निंदलें । तरी याचें काये गेलें ।
ज्ञात्यासी आणि जिंतिलें । देहेबुद्धीनें ॥ २६ ॥
हें अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण ।
कांहीं र्ही उत्तम गुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥
उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गुणासी प्राणी खेदे ।
तीक्षण बुद्धि लोक साधें । काये जाणती ॥ २८ ॥
लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलियां लोकांचे प्रचिती ।
मग ते लोक पाठी राखती । नाना प्रकारीं ॥ २९ ॥
बहुतांसी वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे विचार ।
धीर उदार गंभीर । माहांपुरुष ॥ ३० ॥
जितुके कांहीं उत्तम गुण । तें समर्थाचें लक्षण ।
अवगुण तें करंटलक्षण । सहजचि जालें ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सदेवलक्षणनिरूपणनाम समास चौथा ॥
समास पांचवा : देहमान्यनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
मातीचे देव धोंड्याचे देव । सोन्याचे देव रुप्याचे देव ।
काशाचे देव पितळेचे देव । तांब्याचे देव चित्रलेपे ॥ १ ॥
रुविच्या लांकडाचे देव पोंवळ्य्यांचे देव । बाण तांदळे नर्मदे देव ।
शालिग्राम काश्मिरी देव । सूर्यकांत सोमकांत ॥ २ ॥
तांब्रनाणीं हेमनाणी । कोणी पूजिती देवार्चनीं ।
चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती ॥ ३ ॥
उदंड उपासनेचे भेद । किती करावे विशद ।
आपलाले आवडीचा वेध । लागला जनीं ॥ ४ ॥
परी त्या सकळांचें हि कारण । मुळीं पाहावें स्मरण ।
तया स्मरणाचे अंश जाण । नाना देवतें ॥ ५ ॥
मुळीं द्रष्टा देव तो येक । त्याचे जाहाले अनेक ।
समजोन पाहातां विवेक । उमजों लागे ॥ ६ ॥
देह्यावेगळी भक्ति फावेना । देह्यावेगळा देव पावेना ।
याकारणें मूळ भजना । देहेचि आहे ॥ ७ ॥
देहे मुळींच केला वाव । तरी भजनासी कैंचा ठाव ।
म्हणोनी भजनाचा उपाव । देह्यात्मयोगें ॥ ८ ॥
देहेंविण देव कैसा भजावा । देहेंविण देव कैसा पुजावा ।
देह्याविण मोहछाव कैसा करावा । कोण्या प्रकारें ॥ ९ ॥
अत्र गंध पत्र पुष्प । फल तांबोल धूप दीप ।
नाना भजनाचा साक्षेप । कोठें करावा ॥ १० ॥
देवाचें तीर्थ कैसें घ्यावें । देवासी गंध कोठें लावावें ।
मंत्रपुष्प तरी वावें । कोणें ठाईं ॥ ११ ॥
म्हणोनी देह्याविण आडतें । अवघें सांकडेंचि पडतें ।
देह्याकरितां घडतें । भजन कांहीं ॥ १२ ॥
देव देवता भूतें देवतें । मुळींचे सामर्थ्ये आहे तेथें ।
अधिकारें नाना देवतें । भजत जावीं ॥ १३ ॥
नाना देवीं भजन केलें । तें मूळ पुरुषासी पावलें ।
याकारणें सन्मानिलें । पाहिजे सकळ कांहीं ॥ १४ ॥
मायावल्ली फांपावली । नाना देहेफळीं लगडली ।
मुळींची जाणीव कळों आली । फळामधें ॥ १५ ॥
म्हणोनी येळील न करावें । पाहाणें तें येथेंचि पाहावें ।
ताळा पडतां राहावें । समाधानें ॥ १६ ॥
प्राणी संसार टाकिती । देवास धुंडीत फिरती ।
नाना अनुमानीं पडती । जेथ तेथें ॥ १७ ॥
लोकांची पाहातां रिती । लोक देवार्चनें करिती ।
अथवा क्षत्रदेव पाहाती । ठाईं ठाईं ॥ १८ ॥
अथवा नाना अवतार । ऐकोनी धरिती निर्धार ।
परी तें अवघें सविस्तर । होऊन गेलें ॥ १९ ॥
येक ब्रह्माविष्णुमहेश । ऐकोन म्हणतीं हे विशेष ।
गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २० ॥
देवासी नाहीं थानमान । कोठें करावें भजन ।
हा विचार पाहातां अनुमान । होत जातो ॥ २१ ॥
नसतां देवाचें दर्शन । कैसेन होईजे पावन ।
धन्य धन्य ते साधुजन । सकळ जाणती ॥ २२ ॥
भूमंडळी देव नाना । त्यांची भीड उलंघेना ।
मुख्य देव तो कळेना । कांहीं केल्यां ॥ २३ ॥
कर्तुत्व वेगळें करावें । मग त्या देवासी पाहावें ।
तरीच कांहींयेक पडे ठावें । गौप्यगुह्य ॥ २४ ॥
तें दिसेना ना भासेना । कल्पांतीं हि नासेना ।
सुकृतावेगळें विश्वासेना । तेथें मन ॥ २५ ॥
उदंड कल्पिते कल्पना । उदंड इछिते वासना ।
अभ्यांतरीं तरंग नाना । उदयातें पावती ॥ २६ ॥
म्हणोनी कल्पनारहित । तेचि वस्तु शाश्वत ।
अंत नाहीं म्हणोनी अनंत । बोलिजे तया ॥ २७ ॥
हें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोनी तेथेंचि राहावें ।
निजध्यासें तद्रूप व्हावें । संगत्यागें ॥ २८ ॥
नाना लीळा नाना लघवें । तें काये जाणिजे बापुड्या जीवें ।
संतसंगें स्वानुभवें । स्थिति बाणे ॥ २९ ॥
ऐसी सूक्ष्म स्थिति गती । कळतां चुके अधोगती ।
सद्गुरुचेनि सद्गती । तत्काळ होते ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहमान्यणनिरूपणनाम समास पांचवा ॥
समास सहावा : बुद्धिवादनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
परमार्थी आणि विवेकी । त्याचें करणें माने लोकीं ।
कां जे विवरविवरों चुकी । पडोंचि नेदी ॥ १ ॥
जो जो संदेह वाटे जना । तो तो कदापी करीना ।
आदिअंत अनुमाना । आणून सोडी ॥ २ ॥
स्वतां निस्पृह असेना । त्याचें बोलणेंचि मानेना ।
कठिण आहे जनार्दना । राजी राखणें ॥ ३ ॥
कोणी दटून उपदेश देती । कोणी मध्यावर्ती घालिती ।
ते सहजचि हळु पडती । लालचीनें ॥ ४ ॥
जयास सांगावा विवेक । तोचि जाणावा प्रतिकुंचक ।
पुढें पुढें नासक । कारबार होतो ॥ ५ ॥
भावास भाऊ उपदेश देती । पुढें पुढें होते फजिती ।
वोळकीच्या लोकांत महंती । मांडूंचि नये ॥ ६ ॥
पहिलें दिसे परी नासे । विवेकी मान्य करिती कैसे ।
अविवेकी ते जैसे तैसें । मिळती तेथें ॥ ७ ॥
भ्रतार शिष्य स्त्री गुरु । हाहि फटकाळ विचारु ।
नाना भ्रष्टाकारी प्रकारु । तैसाचि आहे ॥ ८ ॥
प्रगट विवेक बोलेना । झांकातापा करी जना ।
मुख्य निश्चय अनुमाना । आणूंच नेदी ॥ ९ ॥
हुकीसरिसा भरीं भरे । विवेक सांगतां न धरे ।
दुरीदृष्टीचे पुरे । साधु नव्हेती ॥ १० ॥
कोण्हास कांहींच न मागावें । भगवद्भजन वाढवावें ।
विवेकबळें जन लावावे । भजनाकडे ॥ ११ ॥
परांतर रक्षायाचीं कामें । बहुत कठीण विवेकवर्में ।
स्वैछेनें स्वधर्में । लोकराहाटी ॥ १२ ॥
आपण तुरुक गुरु केला । शिष्य चांभार मेळविला ।
नीच यातीनें नासला । समुदाव ॥ १३ ॥
ब्रह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या ।
संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ १४ ॥
उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळीत अवघेंचि टाकावें ।
निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं ॥ १५ ॥
अक्षर बरें वाचणें बरें । अर्थांतर सांगणें बरें ।
गाणें नाचणें अवघेंचि बरें । पाठांतर ॥ १६ ॥
दीक्षा बरी मित्री बरी । तीक्षण बुधी राजकारणी बरी ।
आपणास राखे नानापरी । अलिप्तपणें ॥ १७ ॥
अखंड हरिकथेचा छंदु । सकळांस लागे नामवेदु ।
प्रगट जयाचा प्रबोधु । सूर्य जैसा ॥ १८ ॥
दुर्जनासी राखों जाणे । सज्जनासी निवऊं जाणे ।
सकळांचे मनीचें जाणे । ज्याचें त्यापरीं ॥ १९ ॥
संगतीचें मनुष्य पालटे । उत्तम गुण तत्काळ उठे ।
अखंड अभ्यासीं लगटे । समुदाव ॥ २० ॥
जेथें तेथें नित्य नवा । जनासी वाटे हा असावा ।
परंतु लालचीचा गोवा । पडोंचि नेदी ॥ २१ ॥
उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट च्यातुर्य उत्कट भजन ।
उत्कट योग अनुष्ठान । ठाईं ठाईं ॥ २२ ॥
उत्कट निस्पृहता धरिली । त्याची कीर्ति दिगांतीं फांकली ।
उत्कट भक्तीनें निवाली । जनमंडळी ॥ २३ ॥
कांहीं येक उत्कटेविण । कीर्ति कदापि नव्हे जाण ।
उगेंच वणवण हिंडोन । काये होतें ॥ २४ ॥
नाहीं देह्याचा भरंवसा । केव्हां सरेल वयसा ।
प्रसंग पडेल कैसा । कोण जाणे ॥ २५ ॥
याकारणें सावधान असावें । जितुकें होईल तितुकें करावें ।
भगवत्कीर्तीनें करावें । भूमंडळ ॥ २६ ॥
आपणास जें जें अनुकूळ । तें तें करावें तत्काळ ।
होईना त्यास निवळ । विवेक उमजावा ॥ २७ ॥
विवेकामधें सापडेना । ऐसें तो कांहींच असेना ।
येकांतीं विवेक अनुमाना । आणून सोडी ॥ २८ ॥
अखंड तजवीजा चाळणा जेथें । पाहातं काय उणें तेथें ।
येकांतेंविण प्राणीयांतें । बुद्धि कैसी ॥ २९ ॥
येकांती विवेक करावा । आत्माराम वोळखावा ।
येथून तेथवरी गोवा । कांहींच नाहीं ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बुद्धिवादनिरूपणनाम समास सहावा ॥
समास सातवा : यत्ननिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
कथेचें घमंड भरून द्यावें । आणी निरूपणीं विवरावें ।
उणें पडोंचि नेदावें । कोणीयेकविषीं ॥ १ ॥
भेजणार खालें पडिला । तो भेजणारी जाणितला ।
नेणता लोक उगाच राहिला । टकमकां पाहात ॥ २ ॥
उत्तर विलंबीं पडिलें । श्रोतयांस कळों आलें ।
म्हणिजे महत्व उडालें । वक्तयाचें ॥ ३ ॥
थोडें बोलोनि समाधान करणें । रागेजोन तरी मन धरणें ।
मनुष्य वेधींच लावणें । कोणीयेक ॥ ४ ॥
सोसवेना चिणचिण केली । तेथें तामसवृत्ती दिसोन आली ।
आवघी आवडी उडाली । श्रोतयाची ॥ ५ ॥
कोण कोण राजी राखिले । कोण कोण मनी भंगिले ।
क्षणक्षणा परीक्षिले । पाहिजे लोक ॥ ६ ॥
शिष्य विकल्पें रान घेत । गुरु मागें मागें धांवतो ।
विचार पाहों जातां तो । विकल्पचि अवघा ॥ ७ ॥
आशाबद्धी क्र्यियाहीन । नाहीं च्यातुर्याचें लक्षण ।
ते महंतीची भणभण । बंद नाहीं ॥ ८ ॥
ऐसे गोसावी हळु पडती । ठाईं ठाईं कष्टी होती ।
तेथें संगतीचे लोक पावती । सुख कैचें ॥ ९ ॥
जिकडे तिकडे कीर्ति माजे । सगट लोकांस हव्यास उपजे ।
लोक राजी राखोन कीजे । सकळ कांहीं ॥ १० ॥
परलोकीं वास करावा । समुदाव उगाच पाहावा ।
मागण्याचा तगादा न लवावा । कांहीं येक ॥ ११ ॥
जिकडे जग तिकडे जगन्नायेक । कळला पाहिजे विवेक ।
रात्रीदिवस विवेकी लोक । सांभाळीत जाती ॥ १२ ॥
जो जो लोक दृष्टीस पडिला । तो तो नष्ट ऐसा कळला ।
अवघेच नष्ट येकला भला । काशावरुनी ॥ १३ ॥
वोस मुलकीं काये पाहावें । लोकांवेगळें कोठें राहावें ।
तर्ह्हे खोटी सांडतें घ्यावें । कांहीं येक ॥ १४ ॥
तस्मात लोकिकीं वर्ततां नये । त्यास महंती कामा नये ।
परत्र साधनाचा उपाये । श्रवण करून असावें ॥ १५ ॥
आपणासी बरें पोहतां नये । लोक बुडवावयाचें कोण कार्य ।
गोडी आवडी वायां जाये । विकल्पचि अवघा ॥ १६ ॥
अभ्यासें प्रगट व्हावें । नाहीं तरी झांकोन असावें ।
प्रगट होऊन नासावें । हें बरें नव्हे ॥ १७ ॥
मंद हळु हळु चालतो । चपळ कैसा अटोपतो ।
अरबी फिरवणार तो । कैसा असावा ॥ १८ ॥
हे धकाधकीचीं कामें । तिक्षण बुद्धीचीं वर्में ।
भोळ्या भावार्थें संभ्रमें । कैसें घडे ॥ १९ ॥
सेत केलें परी वाहेना । जवार केलें परी फिरेना ।
जन मेळविलें परी धरेना । अंतर्यामीं ॥ २० ॥
जरी चढती वाढती आवडी उठे । तरी परमार्थ प्रगटे ।
घसघस करितां विटे । सगट लोकु ॥ २१ ॥
आपलें लोकांस मानेना । लोकांचें आपणांस मानेना ।
अवघा विकल्पचि मना । समाधान कैचें ॥ २२ ॥
नासक दीक्षा सिंतरु लोक । तेथें कैचा असेल विवेक ।
जेथें बळावला अविवेक । तेथें राहणें खोटें ॥ २३ ॥
बहुत दिवस श्रम केला । सेवटीं अवघाचि वेर्थ गेला ।
आपणास ठाकेना गल्बला । कोणें करावा ॥ २४ ॥
संगीत चालिला तरी तो व्याप । नाहीं तरी अवघाचि संताप ।
क्षणक्षणा विक्षेप । किती म्हणौनि संगावा ॥ २५ ॥
मूर्ख मूर्खपणें भरंगळती । ज्ञातेपणें कळ्हो करिती ।
होते दोहींकडे फजिती । लोकांमधें ॥ २६ ॥
कारबार आटोपेना करवेना । आणि उगेंहि राहेना ।
याकारणें सकळ जना । काये म्हणावें ॥ २७ ॥
नासक उपाधीस सोडावें । वय सार्थकीं घालावें ।
परिभ्रमणें कंठावें । कोठें तरी ॥ २८ ॥
परिभ्रमण करीना । दुसयाचें कांहींच सोसीना ।
तरी मग उदंड यतना । विकल्पाची ॥ २९ ॥
आतां हें आपणाचिपासीं । बरें विचारावें आपणासी ।
अनुकुळ पडेल तैसी । वर्तणूक करावी ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे येत्ननिरूपणनाम समास सातवा ॥
समास आठवा : उपाधिलक्षणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
सृष्टीमधें बहू लोक । परिभ्रमणें कळे कौतुक ।
नाना प्रकारीचे विवेक । आडळों लागती ॥ १ ॥
किती प्रपंची जन । अखंड वृत्ति उदासीन ।
सुखदुःखें समाधान । दंडळेना ॥ २ ॥
स्वभावेंचि नेमक बोलती । सहजचि नेमक चालती ।
अपूर्व बोलण्याची स्थिती । सकळांसी माने ॥ ३ ॥
सहजचि ताळज्ञान येतें । स्वभावेंचि रागज्ञान उमटतें ।
सहजचि कळत जातें । न्यायेनीतिलक्षण ॥ ४ ॥
येखादा आडळे गाजी । सकळ लोक अखंड राजी ।
सदा सर्वदा आवडी ताजी । प्राणीमात्राची ॥ ५ ॥
चुकोन उदंड आढळतें । भारी मनुष्य दृष्टीस पडतें ।
महंताचें लक्षणसें वाटतें । अकस्मात ॥ ६ ॥
ऐसा आडळतां लोक । चमत्कारें गुणग्राहिक ।
क्रिया बोलणें नेमक । प्रत्ययाचें ॥ ७ ॥
सकळ अवगुणामधें अवगुण । आपले अवगुण वाटती गुण ।
मोठें पाप करंटपण । चुकेना कीं ॥ ८ ॥
ढाळेंचि काम होतें सदा । जें जपल्यानें नव्हे सर्वदा ।
तेथें पीळपेंचाची आपदा । आडळेचिना ॥ ९ ॥
येकासी अभ्यासितां न ये । येकासी स्वभावेंचि ये ।
ऐसा भगवंताचा महिमा काये । कैसा कळेना ॥ १० ॥
मोठीं राजकारणें चुकती । राजकारणा वढा लागती ।
नाना चुकीची फजिती । चहुंकडे ॥ ११ ॥
याकारणें चुकों नये । म्हणिजे उदंड उपाये ।
उपायाचा अपाये । चुकतां होये ॥ १२ ॥
काये चुकलें तें कळेना । मनुष्याचें मनचि वळेना ।
खवळला अभिमान गळेना । दोहिंकडे ॥ १३ ॥
आवघे फडचि नासती । लोकांचीं मनें भंगती ।
कोठें चुकते युक्ती । कांहीं कळेना ॥ १४ ॥
व्यापेंविण आटोप केला । तो अवघा घसरतचि गेला ।
अकलेचा बंद नाहीं घातला । दुरीदृष्टीनें ॥ १५ ॥
येखादें मनुष्य तें सिळें । त्याचें करणेंचि बावळें
नाना विकल्पाचें जाळें । करून टाकी ॥ १६ ॥
तें आपणासी उकलेना । दुसयास कांहींच कळेना ।
नाचे विकल्पें कल्पना । ठाईं ठाईं ॥ १७ ॥
त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या । कोणें येऊन आटोपाव्या ।
ज्याच्या त्यानें कराव्या । बळकट बुद्धि ॥ १८ ॥
ज्यासी उपाधी आवरेना । तेणें उपाधी वाढवावीना ।
सावचित करूनियां मना । समाधानें असावें ॥ १९ ॥
धांवधावों उपाधी वेष्टी । आपण कष्टी लोक हि कष्टी ।
हे कामा नये गोष्टी । कुसमुसेची ॥ २० ॥
लोक बहुत कष्टी जाला । आपणहि अत्यंत त्रासला ।
वेर्थचि केला गल्बला । काअसयासी ॥ २१ ॥
असो उपाधीचें काम ऐसें । कांहीं बरें कांहीं काणोंसें ।
सकळ समजोन ऐसें । वर्ततां बरें ॥ २२ ॥
लोकांपासीं भावार्थ कैचा । आपण जगवावा तयांचा ।
सेवट उपंढर कोणाचा । पडोंचि नये ॥ २३ ॥
अंतरात्म्याकडे सकळ लागे । निर्गुणीं हें कांहींच न लगे ।
नाना प्रकारीचे दगे । चंचळामधें ॥ २४ ॥
शुद्ध विश्रांतीचें स्थळ । तें एक निर्मळ निश्चळ ।
तेथें विकारचि सकळ । निर्विकार होती ॥ २५ ॥
उद्वेग अवघे तुटोनि जाती । मनासी वाटे विश्रांती ।
ऐसी दुल्लभ परब्रह्मस्थिती । विवेकें सांभाळावी ॥ २६ ॥
आपणास उपाधी मुळींच नाहीं । रुणानुबंधें मिळाले सर्वहि ।
आल्यागेल्याची क्षिती नाहीं । ऐसें जालें पाहिजे ॥ २७ ॥
जो उपाधीस कंटाळला । तो निवांत होऊन बैसला ।
आटोपेना तो गल्बला । कासयासी ॥ २८ ॥
कांहीं गल्बला कांहीं निवळ । ऐसा कंठीत जावा काळ ।
जेणेंकरितां विश्रांती वेळ । आपणासी फावे ॥ २९ ॥
उपाधी कांहीं राहात नाहीं । समाधानायेवढें थोर नाहीं ।
नरदेहे प्राप्त होत नाहीं । क्षणक्षणा ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपाधिलक्षणनिरूपणनाम समास आठवा ॥
समास नववा : राजकारणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
ज्ञानी आणी उदास । समुदायाचा हव्यास ।
तेणें अखंड सावकाश । येकांत सेवावा ॥ १ ॥
जेथें तजवीजा कळती । अखंड चाळणा निघती ।
प्राणीमात्राची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥
जरी हा चाळणाचि करीना । तरी कांहींच उमजेना ।
हिसेबझाडाचि पाहीना । दिवाळखोर ॥ ३ ॥
येक मिरासी साधिती । येक सीध्या गवाविती ।
व्यापकपणाची स्थिती । ऐसी आहे ॥ ४ ॥
जेणें जें जें मनीं धरिलें । तें तें आधींच समजलें ।
कृत्रिम अवघेंचि खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥
अखंड राहतां सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते ।
याकारणें विश्रांती ते । घेतां नये ॥ ६ ॥
आळसें आळस केला । तरी मग कारबारचि बुडाला ।
अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा ॥ ७ ॥
उदंड उपासनेचीं कामें । लावीत जावीं नित्यनेमें ।
अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥ ८ ॥
चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा ।
गोवा मूर्खपणाचा काढावा । हळु हळु ॥ ९ ॥
या अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हता कष्टी ।
राजकारणें मंडळ वेष्टी । चहुंकडे ॥ १० ॥
नष्टासी नष्ट योजावे । वाचळासी वाचाळ आणावे ।
आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंच नेदी ॥ ११ ॥
कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी ते कळों नेदावी ।
कळकटेपणाची पदवी । असों द्यावी ॥ १२ ॥
न कळतां करी कार्य जें तें । तें काम तत्काळचि होतें ।
गचगचेंत पडतां तें । चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥
ऐकोनी आवडी लागावी । देखोनी बळकटचि व्हावी ।
सलगीनें आपली पदवी । सेवकामधें ॥ १४ ॥
कोणीयेक काम करितां होतें । न करितां तें मागें पडतें ।
या कारणें ढिलेपण तें । असोंचि नये ॥ १५ ॥
जो दुसयावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।
जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६ ॥
अवघ्यास अवघें कळलें । तेव्हां तें रितें पडिलें ।
याकारणें ऐसें घडलें । न पाहिजे कीं ॥ १७ ॥
मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें ।
कित्तेक खलक उगवावे । राजकारणामधें ॥ १८ ॥
बोलके पहिलवान कळकटे । तयासीच घ्यावे झटे ।
दुर्जनें राजकारण दाटे । ऐसें न करावें ॥ १९ ॥
ग्रामण्य वर्मीं सांपडावें । रगडून पीठचि करावें ।
करूनि मागुती सांवरावें । बुडऊं नये ॥ २० ॥
खळदुर्जनासी भ्यालें । राजकारण नाहीं राखिलें ।
तेणें अवघें प्रगट जालें । बरें वाईट ॥ २१ ॥
समुदाव पाहिजे मोठा । तरी तनावा असाव्या बळकटा ।
मठ करुनी ताठा । धरूं नये ॥ २२ ॥
दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे ।
सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी ॥ २३ ॥
जनामधें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटखट ।
याकारणें ते वाट । बुझूनि टाकावी ॥ २४ ॥
गनीमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुर्फुरिती भुजा ।
ऐसा पाहिजे किं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५ ॥
तयास देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचितीचे तडाखे ।
बंडपाषांडाचे वाखे । सहजचि होती ॥ २६ ॥
हे धूर्तपणाचीं कामें । राजकारण करावें नेमें ।
ढिलेपणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥ २७ ॥
कोठेंच पडेना दृष्टीं । ठाईं ठाईं त्याच्या गोष्टी ।
वाग्विळासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥ २८ ॥
हुंब्यासीं हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा ।
लौंदास पुढें उभा करावा । दुसरा लौंद ॥ २९ ॥
धटासी आणावा धट । उत्धटासी पाहिजे उत्धट ।
खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ ३० ॥
जैशास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मज्यालसी थाटे ।
इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे राजकारणनिरूपणनाम समास नववा ॥
समास दहावा : विवेकलक्षणनिरूपण
॥ श्रीरामसमर्थ ॥
जेथें अखंड नाना चाळणा । जेथें अखंड नाना धारणा ।
जेथें अखंड राजकारणा । मनासी आणिती ॥ १ ॥
सृष्टीमधें उत्तम गुण । तितुकें चाले निरूपण ।
निरूपणाविण क्षण । रिकामा नाहीं ॥ २ ॥
चर्चा आशंका प्रत्योत्तरें । कोण खोटें कोण खरें ।
नाना वगत्रुत्वें शास्त्राधारें । नाना चर्चा ॥ ३ ॥
भक्तिमार्ग विशद कळे । उपासनामार्ग आकळे ।
ज्ञानविचार निवळे । अंतर्यामीं ॥ ४ ॥
वैराग्याची बहु आवडी । उदास वृत्तीची गोडी ।
उदंड उपाधी तरी सोडी । लागोंच नेदी ॥ ५ ॥
प्रबंदाचीं पाठांतरें । उत्तरासी संगीत उत्तरें ।
नेमक बोलतां अंतरें । निववी सकळांचीं ॥ ६ ॥
आवडी लागली बहु जना । तेथें कोणाचें कांहीं चालेना ।
दळवट पडिला अनुमाना । येईल कैसा ॥ ७ ॥
उपासना करूनियां पुढें । पुरवलें पाहिजे चहुंकडे ।
भूमंडळीं जिकडे तिकडे । जाणती तया ॥ ८ ॥
जाणती परी आडळेना । काये करितो तें कळेना ।
नाना देसीचे लोक नाना। येऊन जाती ॥ ९ ॥
तितुक्यांचीं अंतरें धरावीं । विवेकें विचारें भरावीं ।
कडोविकडीचीं विवरावीं । अंतःकर्णें ॥ १० ॥
किती लोक तें कळेना । किती समुदाव आकळेना ।
सकळ लोक श्रवणमनना । मध्यें घाली ॥ ११ ॥
फड समजाविसी करणें । गद्यपद्य सांगणें ।
परांतरासी राखणें । सर्वकाळ ॥ १२ ॥
ऐसा ज्याचा दंडक । अखंड पाहाणें विवेक ।
सावधापुढें अविवेक । येईल कैचा ॥ १३ ॥
जितुकें कांहीं आपणासी ठावें । तितुकें हळुहळु सिकवावें ।
शाहाणें करूनी सोडावे । बहुत जन ॥ १४ ॥
परोपरीं सिकवणें । आडणुका सांगत जाणें ।
निवळ करुनी सोडणें । निस्पृहासी ॥ १५ ॥
होईल तें आपण करावें । न होतां जनाकरवीं करवावें ।
भगवद्भजन राहावें । हा धर्म नव्हे ॥ १६ ॥
आपण करावें करवावें । आपण विवरावें विवरवावें ।
आपण धरावें धरवावें । भजनमार्गासी ॥ १७ ॥
जुन्या लोकांचा कंटाळा आला । तरी नूतन प्रांत पाहिजे धरिला ।
जितुकें होईल तितुक्याला । आळस करूं नये ॥ १८ ॥
देह्याचा अभ्यास बुडाला । म्हणिजे महंत बुडाला ।
लागवेगें नूतन लोकांला । शाहाणे करावें ॥ १९ ॥
उपाधींत सांपडों नये । उपाधीस कंटाळों नये ।
निसुगपण कामा नये । कोणीयेकविषीं ॥ २० ॥
काम नासणार नासतें । आपण वेडें उगें च पाहातें ।
आळसी हृदयसुन्य तें । काये करूं जाणें ॥ २१ ॥
धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला ।
नाना बुद्धि शक्ताला । म्हणोनी शिकवाव्या ॥ २२ ॥
व्याप होईल तों राहावें । व्याप राहातां उठोन जावें ।
आनंदरूप फिरावें । कोठें र्ही ॥ २३ ॥
उपाधीपासून सुटला । तो निस्पृहपणें बळावला ।
जिकडे सानुकूळ तिकडे चालिला । सावकास ॥ २४ ॥
कीर्ति पाहातां सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ति नाहीं ।
केल्याविण कांहींच नाहीं । कोठें तर्ही ॥ २५ ॥
येरवीं काय राहातें । होणार तितुकें होऊन जातें ।
प्राणी मात्र अशक्त तें । पुढें आहे ॥ २६ ॥
अधींच तकवा सोडिला । मधेंचि धीवसा सांडिला ।
तरी संसार हा सेवटाला । कैसा पावे ॥ २७ ॥
संसार मुळींच नासका । विवेकें करावा नेटका ।
नेटका करितां फिका । होत जातो ॥ २८ ॥
ऐसा याचा जिनसाना । पाहातां कळों येतें मना ।
परंतु धीर सांडावाना । कोणीयेकें ॥ २९ ॥
धीर सांडितां कये होतें । अवघें सोसावें लागतें ।
नाना बुद्धि नाना मतें । शाहाणा जाणे ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवेकलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥
॥ दशक एकोणविसावा समाप्त ॥