॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ जगज्जोतीनाम दशक दहावा ॥
समास पहिला : अंतःकरणैकनिरूपण
॥ श्रीराम ॥
सकळांचे अंतःकरण येक । किंवा येक नव्हे अनेक ।
ऐसें हे निश्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥
ऐसें श्रोतयानें पुसिलें । अंतःकरण येक किं वेगळालें ।
याचे उत्तर ऐकिलें पाहिजे श्रोतीं ॥ २ ॥
समस्तांचे अंतःकर्ण येक निश्चयो जाणावा नेमक ।
हा प्रत्ययाचा विवेक । तुज निरोपिला ॥ ३ ॥
श्रोता म्हणे वक्तयासी । अंतःकरण येक समस्तांसी ।
तरी मिळेना येकायेकासी । काये निमित्य ॥ ४ ॥
येक जेवितां अवघे धाले । येक निवतां अवघे निवाले ।
येक मरतां अवघे मेले । पाहिजेत कीं ॥ ५ ॥
येक सुखी येक दुःखी । ऐसें वर्ततें लोकिकीं ।
येका अंतःकरणाची वोळखी । कैसी जाणावी ॥ ६ ॥
जनीं वेगळाली भावना । कोणास कोणीच मिळेना ।
म्हणौन हें अनुमाना । येत नाही ॥ ७ ॥
अंतःकरण येक असतें । तरी येकाचें येकास कळों येतें ।
कांहीं चोरितांच न येतें । गौप्य गुह्य ॥ ८ ॥
याकरणें अनुमानेना । अंतःकरण येक हें घडेना ।
विरोध लागला जना । काये निमित्य ॥ ९ ॥
सर्प डसाया येतो । प्राणी भेऊन पळतो ।
येक अंतःकरण तेरी तो । विरोध नसावा ॥ १० ॥
ऐसी श्रोतयांची आशंका । वक्ता म्हणे चळों नका ।
सावध होऊन ऐका । निरूपण ॥ ११ ॥
अंतःकर्ण म्हणिजे जाणीव । जाणिव जाणता स्वभाव ।
देहरक्षणाचा उपाव । जाणती कळा ॥ १२ ॥
सर्प जाणोन डंखूं आला । प्राणी जाणोन पळाला ।
दोहींकडे जाणीवेला । बरें पाहा ॥ १३ ॥
दोहींकडे जाणीवेसी पाहिलें । तरी अंतःकर्ण येकचि जालें ।
विचारितां प्रत्यया आलें । जाणीवरूपें ॥ १४ ॥
जाणीवरूपें अंतःकर्ण । सकळांचे येक हें प्रमाण ।
जीवमात्रास जाणपण । येकचि असे ॥ १५ ॥
येके दृष्टीचें देखणें । येके जिव्हेचें चाखणें ।
ऐकणें स्पर्शणें वास घेणें । सर्वत्रास येक ॥ १६ ॥
पशु पक्षी किडा मुंगी । जीवमात्र निर्माण जगीं ।
जाणीवकळा सर्वांलागीं । येकचि आहे ॥ १७ ॥
सर्वांस जळ तें सीतळ । सर्वांस अग्नि तेजाळ ।
सर्वांस अंतःकर्ण केवळ । जाणीव कळा ॥ १८ ॥
आवडे नावडे ऐसें जालें । तरी हें देहस्वभावावरी गेलें ।
परंतु हें कळों आलें । अंतःकर्णयोगें ॥ १९ ॥
सर्वांचे अंतःकर्ण येक । ऐसा निश्चयो निश्चयात्मक ।
जाणती याअचें कौतुक । चहुंकडे ॥ २० ॥
इतुकेन फिटली आशंका । आतां अनुमान करूं नका ।
जाणणें तितुकें येका । अंतःकर्णाचें ॥ २१ ॥
जाणोन जीव चारा घेती । जाणोन भिती लपती ।
जाणोनियां पळोन जाती । प्राणीमात्र ॥ २२ ॥
किडामुंगीपासून ब्रह्मादिक । समस्तां अंतःकर्ण येक ।
ये गोष्टीचें कौतुक । प्रत्यें जाणावें ॥ २३ ॥
थोर लहान तरी अग्नी । थोडें बहु तरी पाणी ।
न्यून पूर्ण तरी प्राणी । अंतःकर्णें जाणती ॥ २४ ॥
कोठें उणें कोठें अधीक । परंतु जिनसमासला येक ।
जंगम प्राणी कोणीयेक । जाटिल्याविण नाहीं ॥ २५ ॥
जाणीव म्हणिजे अंतःकर्ण । अंतःकर्ण विष्णूचा अंश जाण ।
विष्णु करितो पाळण । येणें प्रकारें ॥ २६ ॥
नेणतां प्राणी संव्हारितो । नेणीव तमोगुण बोलिजेतो ।
तमोगुणें रुद्र संव्हारितो । येणें प्रकारें ॥ २७ ॥
कांही जाणीव कांही नेणीव । हा रजोगुणाचा स्वभाव ।
जाणतां नेणतां जीव । जन्मास येती ॥ २८ ॥
जाणीवेनें होतें सुख । नेणीवेनें होतें दुःख ।
सुखदुःख अवश्यक । उत्पत्तिगुणें ॥ २९ ॥
जाणण्यानेणण्याची बुद्धि । तोंचि देहीं जाणावा विधी ।
स्थूळ देहीं ब्रह्मा त्रिशुद्धि । उत्पत्तिकर्ता ॥ ३० ॥
ऐसा उत्पत्ति स्थिति संहार । प्रसंगें बोलिला विचार ।
परंतु याचा निर्धार । प्रत्यें पाहावा ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अंतःकर्णयेकनाम समास पहिला ॥
समास दुसरा : देहआशंकानिरूपण
॥ श्रीराम ॥
स्वामीनें विचार दाखविला । येथें विष्णूचा अभाव दिसोन आला ।
ब्रह्मा विष्णु महेशाला । उरी नाहीं ॥ १ ॥
उप्तत्ति स्थिति संव्हार । ब्रह्मा विष्णु महेश्वर ।
याचा पाहातां विचार । प्रत्ययो नाहीं ॥ २ ॥
ब्रह्मा उत्पत्तिकर्ता चौंमुखांचा । येथें प्रत्ययो नाहीं त्याचा ।
पाळणकर्ता विष्णु चौभुजांचा । तो हि ऐकोन जाणों ॥ ३ ॥
महेश संव्हार करितो । हाहि प्रत्यय कैसा येतो ।
लिंगमहिमा पुराणीं तो । विपरीत बोलिला ॥ ४ ॥
मूळमायेस कोणें केलें । हें तों पाहिजे कळलें ।
तिहीं देवांचें रूप जालें । ऐलिकडे ॥ ५॥
मूळमाया लोकजननी । तयेपासून गुणक्षोभिणी ।
गुणक्षोभिणीपासून त्रिगुणी । जन्म देवा ॥ ६ ॥
ऐसें बोलती शास्त्रकारक । आणि प्रवृत्तीचेहि लोक ।
प्रत्ययें पुसतां कित्येक । अकांत करिती ॥ ७ ॥
म्हणोन त्यास पुसावेना । त्यांचेन प्रत्ययो आणवेना ।
प्रत्ययेंविण प्रेत्ना नाना । ठकाठकी ॥ ८ ॥
प्रचितवीण वैद्य म्हणवी । उगीच करी उठाठेवी ।
तया मुर्खाला गोवी । प्राणीमात्र ॥ ९ ॥
तैसाच हाहि विचार । प्रत्यये करावा निर्धार ।
प्रत्ययें नस्तां अंधकार । गुरुशिष्यांसी ॥ १० ॥
बरें लोकास काये म्हणावें । लोक म्हणती तेंचि बरवें ।
परंतु स्वामीनें सांगावें । विशद करुनी ॥ ११ ॥
म्हणों देवीं माया केली । तरी देवांचीं रूपें मायेंत आलीं ।
जरी म्हणों मायेनें माया केली । तरी दुसरी नाहीं ॥ १२ ॥
जरी म्हणो भूतीं केली । तरी ते भूतांचीच वळली ।
म्हणावें जरी परब्रह्में केली । तरी ब्रह्मीं कर्तुत्व नाहीं ॥ १३ ॥
आणी माया खरी असावी । तरी ब्रह्मीं कर्तुत्वाची गोवी ।
माया मिथ्या ऐसी जाणावी । तरी कर्तुत्व कैंचें ॥ १४ ॥
आतां हें अवघेंचि उगवें । आणी मनास प्रत्यये फावे ।
ऐसें केलें पाहिजें देवें । कृपाळूपणें ॥ १५ ॥
वेद मातृकावीण नाहीं । मातृका देहावीण नाहीं ।
देह निर्माण होत नाहीं । देहावेगळा ॥ १६ ॥
तया देहामधें नरदेहो । त्या नरदेहांत ब्राह्मणदेहो ।
तया ब्राह्मणदेहास पाहो । अधिकार वेदीं ॥ १७ ॥
असो वेद कोठून जाले । देह कासयाचे केले ।
दैव कैसे प्रगटले । कोण्या प्रकरें ॥ १८ ॥
ऐसा बळावया अनुमान । केलें पाहिजे समाधान ।
वक्ता म्हणे सावधान । होईं आता । १९ ॥
प्रत्यये पाहातां सांकडी । अवघी होते विघडाविघडी ।
अनुमानितां घडीनें घडी । काळ जातो ॥ २० ॥
लोकधाटी शास्त्रनिर्णये । येथें बहुधा निश्चये ।
म्हणोनियां येक प्रत्यये । येणार नाहीं ॥ २१ ॥
आतां शास्त्राची भीड धरावी । तरी सुटेना हे गथागोवी ।
गथागोवी हे उगवावी । तरी शास्त्रभेद दिसे ॥ २२ ॥
शास्त्र रक्षून प्रत्यये आणिला । पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत पाहिला ।
शहाणा मुर्ख समजाविला । येका वचनें ॥ २३ ॥
शास्त्रींच पूर्वपक्ष बोलिला । पूर्वपक्ष म्हणावें लटक्याला ।
विचार पाहातां आम्हांला । शब्द नाहीं ॥ २४ ॥
तथापि बोलों कांहींयेक । शास्त्र रक्षून कौतुक ।
श्रोतीं सादर विवेक । केला पाहिजे ॥ २५ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहआशंकानाम समास दुसरा ॥
समास तिसरा : देहआशंकाशोधन
॥ श्रीराम ॥
उपाधिविण जें आकाश । तेंचि ब्रह्म निराभास ।
तें निराभासीं मूळमायेस । जन्म जाला ॥ १ ॥
तें मूळमायेचे लक्षण ।वायोस्वरूपचि जाण ।
पंचभूतें आणी त्रिगुण । वायोआंगीं ॥ २ ॥
आकाशापासून वायो जाला । तो वायोदेव बोलिला ।
वायोपासून अग्नि जाला । तो अग्निदेव ॥ ३ ॥
अग्निपासून जालें आप । तें नारायणाचें स्वरूप ।
आपापासून पृथ्वीचें रूप । तें बीजाकारें ॥ ४ ॥
ते पृथ्वीचे पोटीं पाषाण । बहु देवांचें लक्षण ।
नाना प्रचित प्रमाण । पाषाणदेवीं ॥ ५ ॥
नाना वृक्ष मृत्तिका । प्रचित रोकडी विश्वलोकां ।
समस्त देवांचा थारा येका । वायोमध्यें ॥ ६ ॥
देव यक्षिणी कात्यायेणी । चामुंडा जखिणी मानविणी ।
नाना शक्ति नाना स्थानीं । देशपरत्वें ॥ ७ ॥
पुरुषनामें कित्येक । देव असती अनेक ।
भूतें देवतें नपुषक । नामें बोलिजेती ॥ ८ ॥
देव देवतांदेवतेंभूतें । पृथ्वीमध्यें असंख्यातें ।
परंतु यां समस्तांतें । वायोस्वरूप बोलिजे ॥ ९ ॥
वायोस्वरूप सदा असणें । प्रसंगें नाना देह धरणें ।
गुप्त प्रगट होणें जाणें । समस्तांसी ॥ १० ॥
वायोस्वरूपें विचरती । वायोमध्यें जगज्जोती ।
जाणीवकळा वासना वृत्ति । नाना भेदें ॥ ११ ॥
आकाशापासून वायो जाला । तो दों प्रकारें विभागला ।
सावधपणें विचार केला । पाहिजे श्रोतीं ॥ १२ ॥
येक वारा सकळ जणती । येक वायोमधील जगज्जोती ।
जगज्जोतीच्या अनंत मूर्ती । देवदेवतांच्या ॥ १३ ॥
वायो बहुत विकारला । परंतु दों प्रकारें विभागला ।
आतां विचार ऐकिला । पाहिजे तेजाचा ॥ १४ ॥
वायोपाऊन तेज जालें । उष्ण सीतळ प्रकाशलें ।
द्विविध रूप ऐकिलें । पाहिजें तेजाचें ॥ १५ ॥
उष्णापासून जाला भानु । प्रकाशरूप दैदीप्यमानु ।
सर्वभक्षक हुताशनु । आणी विद्युल्यता ॥ १६ ॥
सीतळापासून आप अमृत । चंद्र तारा आणी सीत ।
आतां परिसा सावचित्त। होऊन श्रोते ॥ १७ ॥
तेज बहुत विकारलें । परंतु द्विविधाच बोलिलें ।
आपहि द्विविधाच निरोपिलें । आप आणि अमृत ॥ १८ ॥
ऐकें पृथ्वीचा विचार । पाषाण मृत्तिका निरंतर ।
आणीक दुसरा प्रकार । सुवर्ण परीस नाना रत्नें ॥ १९ ॥
बहुरत्ना वसुंधरा । कोण खोटा कोण खरा ।
अवघें कळे विचारा- । रूढ होतां ॥ २० ॥
मनुष्यें कोठून जालीं । हे मुख्य आशंका राहिली ।
पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ २१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहआशंकाशोधननाम समास तिसरा ॥
समास चवथा : बीजलक्षण
॥ श्रीराम ॥
आतां पाहों जातां उत्पत्ति । मनुष्यापासून मनुष्यें होती ।
पशुपासून पशु निपजती। प्रत्यक्ष आतां॥ १ ॥
खेंचरें आणी भूचरें । वनचरें आणी जळचरें ।
नाना प्रकारीचीं शरीरें । शरीरांपासून होती ॥ २ ॥
प्रत्ययास आणी प्रमाण । निश्चयास आणी अनुमान ।
मार्ग देखोन आडरान । घेऊंच नये ॥ ३ ॥
विपरीतपासून विपरीतें होती । परी शरीरेंच बोलिजेती ।
शरीरावांचून उत्पत्ती । होणार नाहीं ॥ ४॥
तरी हे उत्पत्ति कैसी जाली । कासयाची कोणें केली ।
जेणें केली त्याची निर्मिली । काया कोणें ॥ ५ ॥
ऐसें पाहातां उदंड लांबलें । परी मुळीं शेरीर जैसें जालें ।
कासयाचें उभारिलें । कोणें कैसें ॥ ६ ॥
ऐसी हे मागील आशंका । राहात गेली ते ऐका ।
कदापी जाजु घेऊं नका । प्रत्ययो आलियानें ॥ ७ ॥
प्रत्ययोचि आहे प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण ।
पिंडें प्रचितशब्दें जाण । विश्वासासी ॥ ८ ॥
ब्रह्मीं मूळमाया जाली । तेचि अष्टधा प्रकृती बोलिली ।
भूतीं त्रिगुणीं कालवली । मूळमाया ॥ ९ ॥
तें मूळमाया वायोस्वरूप । वायोमध्यें जाणीवेचें रूप ।
तेचि इच्च्हा परी आरोप । ब्रह्मीं न घडे ॥ १० ॥
तथापि ब्रह्मीं कल्पिला । तरी तो शब्द वायां गेला ।
आत्मा निर्गुण संचला । शब्दातीत ॥ ११ ॥
आत्मा निर्गुण वस्तु ब्रह्म । नाममात्र तितुका भ्रम ।
कल्पून लाविला संभ्रम । तरी तो लागणार नाहीं ॥ १२ ॥
तथापि आग्रहें लाविला । जरी धोंडा मारिला आकाशाला ।
आकाशावरी थुंकिला । तरी तें तुटेना ॥ १३ ॥
तैसें ब्रह्म निर्विकार । निर्विकारीं लाविती विकार ।
विकार नासे निर्विकार । जैसें तैसें ॥ १४ ॥
आतां ऐका प्रत्ययो । जाणोनि धरावा निश्चयो ।
तरीच पाविजे जयो । अनुभवाचा ॥ १५ ॥
मायाब्रह्मीं जो समीर। त्यांत जाणता तो ईश्वर ।
ईश्वर आणि सर्वेश्वर । तयासीच बोलिजे ॥ १६ ॥
तोचि ईश्वर गुणासी आला । त्याचा त्रिगुणभेद जाला ।
ब्रह्मा विष्णु महेश उपजला । तये ठाईं ॥ १७ ॥
सत्व रज आणी तम । हे त्रिगुण उत्तमोत्तम ।
यांच्या स्वरूपाचा अनुक्रम । मागां निरोपिला ॥ १८ ॥
जाणता विष्णु भगवान । जाणता नेणता चतुरानन ।
नेणता महेश पंचानन । अत्यंत भोळा ॥ १९ ॥
त्रिगुण त्रिगुणीं कालवले । कैसे होती वेगळाले ।
परी विशेष न्यून भासले । ते बोलावे लागती ॥ २० ॥
वायोमध्यें विष्णु होता । तो वायोस्वरूपचि तत्वता ।
पुढें जाला देहधर्ता । चतुर्भुज ॥ २१ ॥
तैसाच ब्रह्मा आणी महेश । देह धरिती सावकास ।
गुप्त प्रगट होतां तयास । वेळ नाहीं ॥ २२ ॥
आतां रोकडी प्रचिती । मनुष्यें गुप्त प्रगटती ।
मां त्या देवांच्याच मूर्ती । सामर्थ्यवंत ॥ २३ ॥
देव देवता भूतें देवतें । चढतें सामर्थ्य तेथें ।
येणेंचि न्यायें राक्षसांतें । सामर्थ्यकळा ॥ २४ ॥
झोटींग वायोस्वरूप असती । सवेंच खुळखुळां चालती ।
खोबरीं खारिका टाकून देती । अकस्मात ॥ २५ ॥
अवघेंचि न्याल अभावें । तरी तें बहुतेकांस ठावें ।
आपुल्याला अनुभवें । विश्वलोक जाणती ॥ २६ ॥
मनुष्यें धरती शरीरवेष । नाना परकाया प्रवेश ।
मां तो परमात्मा जगदीश । कैसा न धरी ॥ २७ ॥
म्हणोनि वायोस्वरूपें देह धरिलें । ब्रह्मा विष्णु महेश जालें ।
पुढें तेचि विस्तारलें । पुत्रपौत्रीं ॥ २८ ॥
अंतरींच स्त्रिया कल्पिल्या । तों त्या कल्पितांच निर्माण जाल्या ।
परी तयापासून प्रजा निर्मिल्या । नाहींत कदा ॥ २९ ॥
इच्हून पुत्र कल्पिले । ते ते प्रसंगीं निर्माण जाले ।
येणें प्रकारें वर्तले । हरिहरादिक ॥ ३० ॥
पुढें ब्रह्मयानें सृष्टी कल्पिली । इच्हेसरिसी सृष्टी जाली ।
जीवसृष्टि निर्माण केली । ब्रह्मदेवें ॥ ३१ ॥
नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले । इच्हेसरिसे निर्माण जाले ।
अवघे जोडेचि उदेले । अंडजजारजादिक ॥ ३२ ॥
येक जळस्वेदापासून जाले । ते प्राणी स्वेदज बोलिले ।
येक वायोकरितां जाले । अकस्मात उद्भिज ॥ ३३ ॥
मनुष्याची गौडविद्या । राक्षसांची वोडंबरी विद्या ।
ब्रह्मयाची सृष्टिविद्या । येणें प्रकरें ॥ ३४ ॥
कांहीयेक मनुष्यांची । त्याहून विशेष राक्षसांची ।
त्याहून विशेष ब्रह्मयाची । सृष्टिविद्या ॥ ३५ ॥
जाणते नेणते प्राणी निर्मिले । वेद वदोन मार्ग लाविले ।
ब्रह्मयानें निर्माण केले । येणें प्रकारें ॥ ३६ ॥
मग शरीपासून शरीरें । सृष्टी वाढली विकारें ।
सकळ शरीरें येणें प्रकारें । निर्माण जाली ॥ ३७ ॥
येथें आशंका फिटली । सकळ सृष्टी विस्तारली ।
विचार पाहातं प्रत्यया आली । येथान्वयें ॥ ३८ ॥
ऐसी सृष्टी निर्माण केली । पुढें विष्णुनें कैसी प्रतिपाळिली ।
हेहि विवंचना पाहिली । पाहिजे श्रोतीं ॥ ३९ ॥
सकळ प्राणी निर्माण जाले । ते मूळरूपें जाणोन पाळिले ।
शरीरें दैत्य निर्दाळिले । नाना प्रकारींचे ॥ ४० ॥
नाना अवतार धरणें । दुष्टांचा संहार करणें ।
धर्म स्थापायाकारणें । विष्णुस जन्म ॥ ४१ ॥
म्हणोन धर्मस्थापनेचे नर । तेंहि विष्णुचे अवतार ।
अभक्त दुर्जन रजनीचर । सहजचि जाले ॥ ४२ ॥
आतां प्राणी जे जन्मले । ते नेणोन संव्हारिले ।
मूळरूपें संव्हारिलें । येणें प्रकारें ॥ ४३ ॥
शरीरें रुद्र खवळेल । तैं जीवसृष्टि संव्हारेल ।
अवघें ब्रह्मांडचि जळेल । संव्हारकाळीं ॥ ४४ ॥
एवं उत्पत्ति स्थिती संव्हार । याचा ऐसा आहे विचार ।
श्रोतीं होऊन तत्पर । अवधान द्यावें ॥ ४५ ॥
कल्पांतीं संव्हार घडेल । तोचि पुढें सांगिजेल ।
पंचप्रळय वोळखेल । तोचि ज्ञानी ॥ ४६ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बीजलक्षणशोधननाम समास चवथा ॥
समास पांचवा : पन्चप्रळयनिरूपण
॥ श्रीराम ॥
ऐका प्रळयाचें लक्षण । पिंडीं दोनी प्रळये जाण ।
येकनिद्रा येक मरण । देहांतकाळ ॥ १ ॥
देहाधारक तिनी मूर्ती । निद्रा जेव्हां संपादिती ।
तो निद्राप्रळय श्रोतीं । ब्रह्मांडींचा जाणावा ॥ २ ॥
तिनी मूर्तीस होईल अंत । ब्रह्मांडास मांडेल कल्पांत ।
तेव्हां जाणावा नेमस्त । ब्रह्मप्रळये जाला ॥ ३ ॥
दोनी पिंडीं दोनी ब्रह्मांडीं । च्यारी प्रळय नवखंडीं ।
पांचवा प्रळय उदंडी । जाणिजे विवेकाचा ॥ ४ ॥
ऐसे हे पांचहि प्रळये । सांगितले येथान्वयें ।
आतां हें अनुभवास ये । ऐसें करूं ॥ ५ ॥
निद्रा जेव्हां संचरे । तेव्हां जागृतीव्यापार सरे ।
सुषुप्ति अथवा स्वप्न भरे । अकस्मात आअंगीं ॥ ६ ॥
या नांव निद्राप्रळये । जागृतीचा होये क्षये ।
आतां ऐका देहांतसमये । म्हणिजे मृत्युप्रळये ॥ ७ ॥
देहीं रोग बळावती । अथवा कठीण प्रसंग पडती ।
तेणें पंचप्राण जाती । व्यापार सांडुनी ॥ ८ ॥
तिकडे गेला मनपवनु । इकडे राहीली नुस्ती तनु ।
दुसरा प्रळयो अनुमानु । असेचिना ॥ ९ ॥
तिसरा ब्रह्मा निजेला । तों हा मृत्यलोक गोळा जाला ।
अवघा व्यापार खुंटला । प्राणीमात्रांचा ॥ १० ॥
तेव्हां प्राणीयांचे सुक्ष्मांश । वायोचक्रीं करिती वास ।
कित्येक काल जातां ब्रह्मयास । जागृती घडे ॥ ११ ॥
पुन्हा मागुती सृष्टि रची । विसंचिले जीव मागुतें संची ।
सीमा होतां आयुष्याची । ब्रह्मप्रळय मांडे ॥ १२ ॥
शत वरुषें मेघ जाती । तेणें प्राणी मृत्यु पावती ।
असंभाव्य तर्के क्षिती । मर्यादेवेगळी ॥ १३ ॥
सूर्य तपे बाराकळी । तेणें पृथ्वीची होय होळी ।
अग्नी पावतां पाताळीं । शेष विष वमी ॥ १४ ॥
आकाशीं सूर्याच्या ज्वाळा । पाताळीं शेष विष वमी गरळा ।
दोहिकडून जळतां भूगोळा । उरी कैंची ॥ १५ ॥
सूर्यास खडतरता चढे । हलकालोळ चहुंकडे ।
कोंसळती मेरूचे कडे । घडघडायमान ॥ १६ ॥
अमरावती सत्यलोक । वैकुंठ कैळासादिक ।
याहिवेगळे नाना लोक । भस्मोन जाती ॥ १७ ॥
मेरु अवघाचि घसरे । तेथील महीमाच वोसरे ।
देवसमुदाव वावरे । वायोचक्रीं ॥ १८ ॥
भस्म जालिया धरत्री । प्रजन्य पडें शुंडाधारीं ।
मही विरे जळांतरीं । निमिष्यमात्रें ॥ १९ ॥
पुढें नुस्ते उरेल जळ । तयास शोषील अनळ ।
पुढें एकवटती ज्वाळ । मर्यादेवेगळे ॥ २० ॥
समुद्रींचा वडवानळ । शिवनेत्रींचा नेत्रानळ ।
सप्तकंचुकींचा आवर्णानळ । सूर्य आणी विद्युल्यता ॥ २१ ॥
ऐसे ज्वाळ एकवटती । तेणें देव देह सोडिती ।
पूर्वरूपें मिळोन जाती । प्रभंजनीं ॥ २२ ॥
तो वारा झडपी वैश्वानरा । वन्ही विझेल येकसरा ।
वायो धावें सैरावैरा । परब्रह्मीं ॥ २३ ॥
धूम्र वितुळे आकाशीं । तैसे होईल समीरासी ।
वहुतां मधें थोडियासी । नाश बोलिला ॥ २४ ॥
वायो वितुळतांच जाण । सूक्ष्म भूतें आणी त्रिगुण ।
ईश्वर सांडी अधिष्ठान । निर्विकल्पीं ॥ २५ ॥
तेथें जाणिव राहिली । आणी जगज्जोती निमाली ।
शुद्ध सारांश उरली । स्वरूपस्थिती ॥ २६ ॥
जितुकीं काहीं नामाभिधानें । तये प्रकृतीचेनि गुणें ।
प्रकृती नस्तां बोलणें । कैसें बोलावें ॥ २७ ॥
प्रकृती अस्तां विवेक कीजे । त्यास विवेकप्रळये बोलिजे ।
पांचहि प्रळय वोजें । तुज निरोपिलें ॥ २८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पंचप्रळयनिरूपणनाम समास पांचवा ॥
समास सहावा : भ्रमनिरूपण
॥ श्रीराम ॥
उत्पत्ति स्थिति संव्हार । याचा निरोपिला वेव्हार ।
परमात्मा निर्गुण निराकार । जैसा तैसा ॥ १ ॥
होतें वर्ततें आणि जातें । याचा समंध नाहीं तेथें ।
आद्य मद्य अवसान तें । संचलेंचि आहे ॥ २ ॥
परब्रह्म असतचि असे । मध्येंचि हा भ्रम भासे ।
भासे परंतु अवघा नासे । काळांतरी ॥ ३ ॥
उत्पत्तिस्थितीसंव्हारत । मध्येंहि अखंड होत जात ।
पुढें सेवटीं कल्पांत । सकळांस आहे ॥ ४॥
यामधें ज्यास विवेक आहे । तो आधींच जाणताहे ।
सारासार विचारें पाहे। म्हणौनियां ॥ ५ ॥
बहुत भ्रमिष्ट मिळाले । त्यांत उमजल्याचें काय चाले ।
सृष्टिमधें उमजले । ऐसें थोडे ॥ ६॥
त्या उमजल्यांचे लक्षण । कांहीं करूं निरूपण ।
ब्रम्हाहून विलक्षण । महापुरुष ॥ ७ ॥
भ्रम हा नसेल जयासी । मनीं वोळखावे तयासी ।
ऐके आतां भ्रमासीं । निरोपिजेल ॥ ८॥
येक परब्रह्म संचलें । कदापी नाहीं विकारले ।
त्यावेगळें भासलें । तें भ्रमरूप ॥ ९ ॥
जयासी बोलिला कल्पांत । त्रिगुण आणि पंचभूत ।
हें अवघेंचि समस्त । भ्रमरूप ॥ १० ॥
मी तूं हा भ्रम । उपासनाहि भ्रम ।
ईश्वरभाव हाहि भ्रम । निश्चयेंसीं ॥ ११ ॥
॥ श्लोक ॥ – भ्रमेणाहं भ्रमेण त्वं । भ्रमेणोपासका जनाः ।
भ्रमेणेश्वर भावत्वं । भ्रममूलमिदं जगत् ॥ १ ॥
याकारणें सृष्टि भासत । परंतु भ्रमचि हा समस्त ।
यामध्यें जे विचारवंत । तेचि धन्य ॥ १२ ॥
आतां भ्रमाचा विचारु । अत्यंतचि प्रांजळ करूं ।
दृष्टांतद्वारे विवरूं । श्रोतयासी ॥ १३॥
भ्रमण करीतां दुरीं देसीं । दिशाभूली आपणासी ।
कां वोळखी मोडे जीवलगांसी । या नांव भ्रम ॥ १४॥
कां उन्मत्त द्रव्य सेविलें । तेणें अनेक भासों लागलें ।
नाना वेथां कां झडपिलें । भुतें तो भ्रम ॥ १५ ॥
दशावतारीं वाटती नारी । कां ते मांडली बाजीगरी ।
उगाच संदेह अंतरीं । या नांव भ्रम ॥ १६ ॥
ठेविला ठाव तो विसरला । कां मार्गीं जातां मार्ग चुकला ।
पट्टणामधें भांबावला । या नांव भ्रम ॥ १७ ॥
वस्तु आपणापासीं असतां । गेली म्हणोनि होये दुचिता ।
आपलें आपण विसरतां । या नांव भ्रम ॥ १८ ॥
कांही पदार्थ विसरोन गेला । कां जें सिकला तें विसरला ।
स्वप्नदुःखें घाबिरा जाला । या नांव भ्रम ॥ १९ ॥
दुश्चिन्हें अथवा अपशकुन । मिथ्या वार्तेनें भंगे मन ।
वचके पदार्थ देखोन । या नांव भ्रम ॥ २० ॥
वृक्ष काष्ठ देखिलें । मनांत वाटें भूत आलें ।
कांहींच नस्तां हडबडिलें । या नांव भ्रम २१ ॥
काच देखोन उदकांत पडे । कां सभा देखोन दर्पणीं पवाडे ।
द्वार चुकोन भल्तीकडें जाणें या नांव भ्रम ॥ २२ ॥
येक अस्तां येक वाटे । येक सांगतां येक निवटे ।
येक दिसतां येक उठे । या नांव भ्रम ॥ २३ ॥
आतां जें जें देइजेतें । तें तें पुढें पाविजेतें ।
मेलें माणुस भोजना येतें । या नांव भ्रम ॥ २४ ॥
ये जन्मींचें पुढिले जन्मीं । कांहीं येक पावेन मी ।
प्रीतीगुंतली मनुष्याचे नामीं । या नांव भ्रम ॥ २५ ॥
मेलें मनुष्य स्वप्ना आलें । तेणें कांहीं मागितलें ।
मनीं अखंड बैसलें । यानांव भ्रम ॥ २६ ॥
अवघें मिथ्या म्हणोन बोले । आणि समर्थावरी मन चाले ।
ज्ञाते वैभवें दपटले । या नांव भ्रम ॥ २७ ॥
कर्मठपणें ज्ञान विटे । कां ज्ञातेपणें बळें भ्रष्टे ।
कोणीयेक सीमा फिटे । या नांव भ्रम ॥ २८ ॥
देहाभिमान । कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान ।
ज्ञानाभिमान मोक्षाभिमान । या नांव भ्रम ॥ २९ ॥
कैसा न्याय तो न कळे । केला अन्याने तो नाडले ।
उगाच अभिमानें खवळे । या नांव भ्रम ॥ ३० ॥
मागील कांही आठवेना । पुढील विचार सुचेना ।
अखंड आरूढ अनुमाना । या नांव भ्रम ॥ ३१ ॥
प्रचीतिविण औषध घेणे । प्रचित नस्ता पथ्य करणे ।
प्रचीतीविण ज्ञान सांगणें । या नांव भ्रम ॥ ३२ ॥
फळश्रुतीवीण प्रयोग । ज्ञानेंवीण नुस्ता योग ।
उगाच शरीरें भोगिजे भोग । या नांव भ्रम ॥ ३३ ॥
ब्रह्मा लिहितो अदृष्टीं आणि वाचून जाते सटी ।
ऐशा प्रकारीच्या गोष्टी । या नांव भ्रम ॥ ३४ ॥
उदंड भ्रम विसरला । अज्ञानजनीं पैसावला।
अल्प संकेतें बोलिला । कळावया कारणें ॥ ३५॥
भ्रमरूप विश्व स्वभावें । तेथें काये म्हणोन सांगावें ।
निर्गुण ब्रह्मावेगळें अघवें । भ्रमरूप ॥३६ ॥
ज्ञातास नाहीं संसार । ऐसें बोलती अपार ।
गत ज्ञात्याचे चमत्कार । या नांव भ्रम ॥ ३७ ॥
येथें आशंका उठिली । ज्ञात्याची समधी पूजिली ।
तेथें कांहीं प्रचीत आली । किंवा नाहीं ॥ ३८ ॥
तैसेचि अवतारी संपले । त्यांचेहि सामर्थ्य उदंड चाले ।
तरी ते काये गुंतले । वासना धरूनि ॥ ३९ ॥
ऐसी आशंका उद्भवली । समर्थें पाहिजे निरसिली ।
इतुकेन हे समाप्त जाली । कथा भ्रमाची ॥ ४० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भ्रमनिरूपणनाम समास सहावा ॥
समास सातवा : सगुणभजन
॥ श्रीराम ॥
अवतारादिक ज्ञानी संत । सारासारविचारें मुक्त ।
त्यांचे सामर्थ्य चालत । कोण्या प्रकारें ॥ १ ॥
हें श्रोतयांची आशंका । पाहातां प्रश्न केला निका ।
सावध होऊन ऐका । म्हणे वक्ता ॥ २ ॥
ज्ञानी मुक्त होऊन गेले । मागें त्यांचे सामर्थ्य चाले ।
परंतु ते नाहीं आले । वासना धरूनी ॥ ३ ॥
लोकांस होतो चमत्कार । लोक मानिती साचार ।
परंतु याचा विचार । पाहिला पाहिजे ॥ ४ ॥
जीत अस्तां नेणों किती । जनामधें चमत्कार होती ।
ऐसियाची सद्य प्रचिती । रोकडी पाहावी ॥ ५ ॥
तो तरी आपण नाहीं गेला । लोकीं प्रत्यक्ष देखिला ।
ऐसा चमत्कार जाला । यास काये म्हणावें ॥ ६ ॥
तरी तो लोकांचा भावार्थ । भाविकां देव येथार्थ ।
अनेत्र कल्पना वेर्थ । कुतर्काची ॥ ७ ॥
आवडे तें स्वप्नीं देखिलें। तरीकाय तेथून आलें ।
म्हणाल तेणें आठविलें । तरी द्रव्य कां दिसे ॥ ८ ॥
एवं आपली कल्पना । स्वप्नीं येती पदार्थ नाना ।
परी ते पदार्थ चालतीना । अथवा आठऊ नाहीं ॥ ९ ॥
येथें तुटली आशंका । ज्ञात्यास जन्म कल्पूं नका ।
उमजेना तरी विवेका । बरें पाहा ॥ १० ॥
ज्ञानी मुक्त होऊन गेले । त्यांचें सामर्थ्य उगेचि चाले ।
कां जे पुण्यमार्गें चालिलें । म्हणोनियां ॥ ११ ॥
याकारणें पुण्यमार्गें चालावें । भजन देवाचें वाढवावें ।
न्याये सांडून न जावें । अन्यायमार्गें ॥ १२ ॥
नानापुरश्चरणें करावीं । नाना तीर्थाटणें फीरावीं ।
नाना सामर्थ्यें वाढवावीं। वैराग्यबळें ॥ १३ ॥
निश्चये बैसे वस्तूकडे । तरी ज्ञानमार्गेंहि सामर्थ्य चढे ।
कोणीयेक येकांत मोडे । ऐसें न करावें ॥ १४ ॥
येक गुरु येक देव । कोठें तरी असावा भाव ।
भावार्थ नस्तां वाव । सर्व कांहीं ॥ १५ ॥
निर्गुणीं ज्ञान जालें । म्हणोन सगुण अलक्ष केलें ।
तरी तें ज्ञातें नागवलें । दोहिंकडे ॥ १६ ॥
नाहीं भक्ती नाहीं ज्ञान । मधेंच पैसावला अभिमान ।
म्हणोनियां जपध्यान । सांडूंच नये ॥१७ ॥
सांडील सगुणभजनासी । तरी तो ज्ञाता परी अपेसी ।
म्हणोनियां सगुणभजनासी । सांडूंच नये ॥ १८ ॥
निःकाम बुद्धीचिया भजना । त्रैलोकीं नाहीं तुळणा ।
समर्थेंविण घडेना । निःकाम भजन ॥ १९ ॥
कामनेनें फळ घडे । निःकाम भजनें भगवंत जोडे ।
फळभगवंता कोणीकडे । महदांतर ॥ २० ॥
नाना फळे देवापासी । आणी फळ अंतरीं भगवंतासी ।
याकारणें परमेश्वरासी । निःकाम भजावें ॥ २१ ॥
निःकामभजनाचें फळ आगळे । सामर्थ्य चढे मर्यादावेगळें ।
तेथें बापुडी फळें । कोणीकडे ॥ २२॥
भक्तें जें मनीं धरावें । तें देवें आपणचि करावें ।
तेथें वेगळें भावावें । नलगे कदा ॥ २३ ॥
दोनी सामर्थ्यें येक होतां । काळास नाटोपे सर्वथा ।
तेथें इतरांसी कोण कथा । कीटकन्यायें ॥ २४ ॥
म्हणोनि निःकाम भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान ।
तयास तुळितां त्रिभुवन । उणें वाटे ॥ २५ ।
येथें बुद्धीचा प्रकाश । आणिक न चढे विशेष ।
प्रताप कीर्ती आणी येश । निरंतर ॥ २६ ॥
निरूपणाचा विचार । आणी हरिकथेचा गजर ।
तेथें होती तत्पर । प्राणीमात्र ॥ २७ ॥
जेथें भ्रष्टाकार घडेना । तो परमार्थहि दडेना ।
समाधान विघडेना । निश्चयाचें ॥ २८ ॥
सारासारव्हिचार करणें । न्याये अन्याये अखंड पाहाणें ।
बुद्धि भगवंताचें देणें । पालटेना ॥ २९ ॥
भक्त भगवंतीं अनन्य । त्यासी बुद्धी देतो आपण ।
येदर्थीं भगवद्वचन । सावध ऐका ॥ ३० ॥
श्लोकार्ध ॥ ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयांति ते ॥
म्हणौन सगुण भजन । वरी विशेष ब्रह्मज्ञान ।
प्रत्ययाचें समाधान । दुर्ल्लभ जगीं ॥ ३१ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सगुणभजननिरूपणनाम समास सातवा ॥
समास आठवा : प्रचीतनिरूपण
॥ श्रीराम ॥
ऐका प्रचित्तीचीं लक्षणें । प्रचित पाहेल तें शाहाणें ।
येर वेडे दैन्यवाणे । प्रचितीविण ॥ १ ॥
नाना रत्नें नाना नाणीं । परीक्षून न घेतां हानी ।
प्रचित न येतां निरूपणीं । बैसोंच नये ॥ २ ॥
सुरंग शस्त्र दमून पाहिलें । बरें पाहातां प्रचितीस आले ।
तरी मग पाहिजे घेतलें । जाणते पुरुषीं ॥ ३ ॥
बीज उगवेलसें पाहावें । तरी मग द्रव्य घालून घ्यावें ।
प्रचित आलियां ऐकावें । निरूपण ॥ ४ ॥
देहीं आरोग्यता जाली । ऐसी जना प्रचित आली ।
तरी मग आगत्य घेतली । पाहिजे मात्रा ॥ ५ ॥
प्रचितीविण औषध घेणें । तरी मग धडचि विघडणें ।
अनुमानें जें कार्य करणें । तेंचि मुर्खपण॥६ ॥
प्रचितीस नाहीं आलें । आणि सुवर्ण करविलें ।
तरी मग जाणावें ठकिलें । देखतदेखतां ॥ ७ ॥
शोधून पाहिल्याविण । कांहींतरी येक कारण ।
होणार नाहीं निर्वाण । प्राणास घडे ॥ ८ ॥
म्हणोनी अनुमानाचें कार्य । भल्यानीं कदापि करूं नये ।
उपाय पाहतां अपाये । नेमस्त घडे ॥ ९ ॥
पाण्यांतील म्हैसीची साटी । करणें हें बुद्धिच खोटी ।
शोधिल्याविण हिंपुटी । होणें घडे ॥ १० ॥
विश्वासें घर घेतलें । ऐसें किती नाहीं ऐकलें ।
मैंदें मैंदावें केलें । परी तें शोधिलें पाहिजे ॥ ११ ॥
शोधिल्याविण अन्नवस्त्र घेणें । तेणें प्राणास मुकणें ।
लटिक्याचा विश्वास धरणें । हे।चि मूर्खपण ॥ १२ ॥
संगती चोराची धरितां । घात होईल तत्वता ।
ठकु सिंतरु शोधितां । ठाईं पडे ॥ १३ ॥
गैरसाळ तामगिरी । कोणी नवी मुद्रा करी ।
नाना कपट परोपरीं । शोधून पाहावें ॥ १४ ॥
दिवाळखोराचा मांड । पाहातां वैभव दिसे उदंड ।
परी तें अवघें थोतांड । भंड पुढें ॥ १५ ॥
तैसें प्रचितीवीण ज्ञान । तेथें नाहीं समाधान ।
करून बहुतांचा अनुमान । अन्हीत जालें ॥ १६ ॥
मंत्र यंत्र उपदेसिले । नेणतें प्राणी तें गोविलें ।
जैसें झांकून मारिलें । दुखणाईत ॥ १७ ॥
वैद्य पाहिला परी कच्चा । तरी प्राण गेला पोराचा ।
येथें उपाये दुसयाचा । काये चाले ॥ १८ ॥
दुःखें अंतरी झिजे । आणी वैद्य पुसतां लाजे ।
तरीच मग त्यासी साजे । आत्महत्यारेपण ॥ १९ ॥
जाणत्यावरी गर्व केला । तरी नेणत्याकरितां बुडाला ।
येथें कोणाचा घात जाला । बरें पाहा ॥ २० ॥
पापाची खंडणा जाली । जन्मयातना चुकली ।
ऐसी स्वयें प्रचित आली । म्हणिजे बरें ॥ २१ ॥
परमेश्वरास वोळखिलें । आपण कोणसें कळलें ।
आत्मनिवेदन जालें । म्हणिजे बरें ॥ २२ ॥
ब्रह्मांड कोणें केलें । कासयाचें उभारलें ।
मुख्य कर्त्यास वोळखिलें । म्हणिजे बरें ॥ २३ ॥
येथेंअनुमान राहिला । तरी परमार्थ केला तो वायां गेला ।
प्राणी संशईं बुडाला । प्रचितीविण ॥ २४ ॥
हें परमार्थाचें वर्म । लटिकें बोले तो अधम ।
लटिके मानी तो अधमोद्धम । येथार्थ जाणावा ॥ २५ ॥
येथें बोलण्याची जाली सीमा । नेणतां न कळे परमात्मा ।
असत्य नाहीं सर्वोत्तमा । तूं जाणसी ॥ २६ ॥
माझे उपासनेचा बडिवार । ज्ञान सांगावें साचार ।
मिथ्या बोलतां उत्तर । प्रभूस लगे ॥ २७ ॥
म्हणोनि सत्यचि बोलिलें ।कर्त्यास पाहिजे वोळखिलें ।
मायोद्भवाचें शोधिलें । पाहिजे मूळ ॥ २८ ॥
तेंचि पुढें नीरूपण । बोलिलेंचि बोलिलें प्रमाण ।
श्रोतीं सावध अंतःकर्ण । घातलेंचि घालावें ॥ २९ ॥
सूक्ष्म निरूपण लागलें । तेथें बोलिलेंचि मागुतें बोलिलें ।
श्रोत्यांस पाहिजे उमजलें ।म्हणौनियां ॥ ३० ॥
प्रचित पाहातां निकट । उडोन जाती परिपाठ ।
म्हणोनि हे खटपट । करणें लागे ॥ ३१ ॥
परिपाठेंचि जरी बोलिलें । तरी प्रचितसमाधान बुडालें ।
प्रचितसमाधान राखिलें । तरी परिपाठ उडे ॥ ३२ ॥
ऐसी सांकडी दोहींकडे । म्हणौन बोलिलेंचि बोलणें घडे ।
दोनी राखोनियां कोडें । उकलून दाऊं ३३ ॥
परीपाठ आणी प्रचित प्रमाण । दोनी राखोन निरूपण ।
श्रोते परम विचक्षण । विवरोत पुढें ॥ ३४ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रचितनिरूपणनाम समास आठवा ॥
समास नववा : पुरुषप्रकृति
॥ श्रीराम ॥
आकाशीं वायो जाला निर्माण । तैसी ब्रह्मीं मूळमाया जाण ।
त्या वायोमधें त्रिगुण । आणी पंचभूतें ॥ १ ॥
वटबीजीं असे वाड । फोडून पाहातां न दिसे झाड ।
नाना वृक्षांचे जुंबाड । बीजापासून होती ॥ २ ॥
तैसी बीजरूप मुळमाया । विस्तार जाला तेथुनियां ।
तिचें स्वरूप शोधुनियां । बरें पाहावें ॥ ३ ॥
तेथें दोनी भेद दिसती । विवेकें पाहावी प्रचिती ।
निश्चळीं जे चंचळ स्थिती । तोचि वायो ॥ ४ ॥
तयामधें जाणीवकळा । जगज्जोतीचा जिव्हाळा ।
वायो जाणीव मिळोन मेळा । मूळमाया बोलिजे ॥ ५ ॥
सरिता म्हणतां बायको भासे । तेथें पाहातां पाणीच असे ।
विवेकी हो समजा तैसें । मूळमायेसी ॥ ६ ॥
वायो जाणीव जगज्जोती । तयास मूळमाया म्हणती ।
पुरुष आणी प्रकृती । याचेंच नांव ॥ ७ ॥
वायोस म्हणती प्रकृती । आणी पुरुष म्हणती जगज्जोती ।
पुरुषप्रकृती शिवशक्ती । याचेंच नांव ॥ ८ ॥
वायोमधें जाणीव विशेष । तेंचि प्रकृतुमधें पुरुष ।
ये गोष्टीचा विश्वास । धरिला पाहिजे॥ ९॥
वायो शक्ति जाणीव ईश्वर । अर्धनारी नटेश्वर ।
लोक म्हणती निरंतर । येणें प्रकारें ॥ १० ॥
वायोमधें जाणीव गुण । तेंचि ईश्वराचें लक्षण ।
तयापासून त्रिगुण । पुढें जाले ॥ ११ ॥
तया गुणामधें सत्वगुण । निखळ जाणीवलक्षण ।
त्याचा देहधारी आपण । विष्णु जाला ॥ १२ ॥
त्याच्या अंशे जग चाले । ऐसे भगवद्गीता बोले।
गुंतले तेंचि उगवले । विचार पाहातां ॥ १३ ॥
येक जाणीव वांटली । प्राणीमात्रास विभागली ।
जाणजाणों वांचविली । सर्वत्र काया ॥ १४ ॥
तयेंचे नांव जगज्जोती । प्राणीमात्र तिचेन जिती ।
याची रोकडी प्रचिती । प्रत्यक्ष पाहावी ॥ १५ ॥
पक्षी श्वापद किडा मुंगी । कोणीयेक प्राणी जगीं ।
जाणीव खेळे त्याच्या आंगीं । निरंतर ॥१६ ॥
जाणोनी काया पळविती । तेणें गुणें वांचती ।
दडती आणि लपती । जाणजाणों ॥ १७ ॥
आवघ्या जगस वांचविती । म्हणोन नामें जगज्जोती ।
ते गेलियां प्राणी मरती । जेथील तेथें॥ १८॥
मुळींचे जाणीवेचा विकार । पुढें जाला विस्तार ।
जैसे उदकाचे तुषार । अनंत रेणु ॥१९ ॥
तैसे देव देवता भूतें । मिथ्या म्हणोनये त्यांतें ।
आपलाल्या सामर्थ्यें ते । सृष्टीमधें फिरती ॥२० ॥
सदा विचरती वायोस्वरूपें । स्वैछा पालटिती रूपें ।
अज्ञान प्राणी भ्रमें संकल्पें त्यास । बाधिती ॥ २१ ॥
ज्ञात्यास संकल्पेचि असेना । म्हणोन त्यांचेन बाधवेना ।
याकारणें आत्मज्ञाना । अभ्यासावें ॥ २२ ॥
अभ्यासिलिया आत्मज्ञान। सर्वकर्मास होये खंडण ।
हे रोकडी प्रचित प्रमाण । संदेह नाहीं ॥ २३ ॥
ज्ञानेविण कर्म विघडे । हें तों कदापि न घडे ।
सद्गुेरुवीण ज्ञान जोडे । हेंहि अघटीत ॥ २४ ॥
म्हणोन सद्गुरु करावा । सत्संग शोधून धरावा ।
तत्वविचार विवरावा । अंतर्यामीं ॥ २५॥
तत्वें तत्व निरसोन जातां । आपला आपणचि तत्वता ।
अनन्यभावें सार्थकता । सहजचि जाली ॥ २६ ॥
विचार न करितां जें जें केलें । तें तें वाउगें वेर्थ गेलें ।
म्हणोनि विचारीं प्रवर्तलें । पाहिजे आधीं ॥ २७ ॥
विचार पाहेल तो पुरुषु । विचार न पाहे तो पशु ।
ऐसी वचनें सर्वेशु । ठाईं ठाईं बोलिला ॥ २८ ॥
सिद्धांत साधायाकारणें । पूर्वपक्ष लागे उडवणें ।
परंतु साधकां निरूपणें । साक्षात्कार ॥ २९ ॥
श्रवण मनन निजध्यास । प्रचितीनें बाणतां विश्वास ।
रोकड साक्षात्कार सायास । करणेंचि नलगे ॥ ३० ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिश्यसंवादे पुरुषप्रकृतीनाम समास नववा ॥
समास दहावा : चळाचळनिरूपण
॥ श्रीराम ॥
गगनासारिखें ब्रह्म पोकळ । उदंड उंच अंतराळ।
निर्गुण निर्मळ निश्चळ । सदोदित ॥१ ॥
त्यास परमात्मा म्हणती । आणिक नामें नेणों किती ।
परी तें जाणिजे आदिअंतीं । जैसें तैसें ॥२ ॥
विस्तीर्ण पसरला पैस । भोंवता दाटला अवकाश ।
भासचि नाहीं निराभास । जैसें तैसें ॥ ३ ॥
चहुंकडे पाताळतळीं । अंतचि नाहीं अंतराळीं ।
कल्पांतकाळीं सर्वकाळीं । संचलेचि असे ॥ ४ ॥
ऐसें कांहींयेक अचंचळ । ते अचंचळीं भासे चंचळ ।
त्यास नामेंहि पुष्कळ । त्रिविधा प्रकारें ॥ ५ ॥
न दिसतां नांव ठेवणें । न देखतां खूण सांगणें ।
असो हें जाणायाकारणें । नामाभिधानें ॥ ६ ॥
मूळमाया मूळप्रकृति । मूळपुरुष ऐसें म्हणती ।
शिवशक्ति नामें किती । नाना प्रकारें ॥ ७ ॥
परी जें नाम ठेविलें जया । आधीं वोळखावें तया ।
प्रचितीवीण कासया । वलगना करावी ॥ ८ ॥
रूपाची न धरितां सोये । नामासरिसें भरंगळों नये ।
प्रत्ययाविण गळंगा होये । अनुमानज्ञानें ॥ ९ ॥
निश्चळ गगनीं चंचळ वारा । वाजों लागला भरारां ।
परी त्या गगना आणि समीरा । भेद आहे ॥ १० ॥
तैसें निश्चळ परब्रह्म । चंचळ माया भासला भ्रम ।
त्या भ्रमाचा संभ्रम । करून दाऊं ॥ ११ ॥
जैसा गगनी चालिला पवन । तैसें निश्चळीं जालें चळण ।
इछा स्फूर्तिलक्षण । स्फूर्णरूप ॥ १२ ॥
अहंपणें जाणीव जाली । तेचि मूळप्रकृति बोलिली ।
माहाकारणकाया रचली । ब्रह्मांडीची ॥ १३ ॥
माहामाया मूळप्रकृती । कारण ते अव्याकृती ।
सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती । विराट ते स्थूळ ॥ १४ ॥
ऐसें पंचीकर्ण शास्त्रप्रमये । ईश्वरतनुचतुष्टये ।
म्हणोन हें बोलणें होये । जाणीव मूळमाया ॥ १५ ॥
परमात्मा परमेश्वरु । परेश ज्ञानघन ईश्वरु ।
जगदीश जगदात्मा जगदेश्वरु । पुरुषनामें ॥ १६ ॥
सत्तारूप ज्ञानस्वरूप । प्रकशरूप जोतिरूप ।
कारणरूप चिद्रूप । शुद्ध सूक्ष्म अलिप्त ॥ १७ ॥
आत्मा अंतरात्मा विश्वात्मा । द्रष्टा साक्षी सर्वात्मा ।
क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा । देही कूटस्त बोलिजे ॥ १८ ॥
इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा । येमात्मा धर्मात्मा नैरूत्यात्मा ।
वरुणवायोकुबेरात्मा । ऋषीदेवमुनिधर्ता ॥ १९ ॥
गण गंधर्व विद्याधर । येक्ष किन्नर नारद तुंबर ।
सर्व लोकांचें अंतर । तो सर्वांतरात्मा बोलिजे ॥ २० ॥
चंद्र सूर्य तारामंडळें । भूमंडळें मेघमंडळें ।
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें । अंतरात्माच वर्तवी ॥ २१ ॥
गुप्त वल्ली पाल्हाळली । तिचीं पुरुषनामें घेतलीं ।
आतां स्त्रीनामें ऐकिलीं । पाहिजे श्रोतीं ॥ २२ ॥
मूळमाया जगदेश्वरी । परमविद्या परमेश्वरी ।
विश्ववंद्या विश्वेश्वरी । त्रैलोक्यजननी ॥ २३ ॥
अंतर्हेतु अंतर्कळा । मौन्यगर्भ जाणीवकळा ।
चपळ जगज्जोती जीवनकळा । परा पश्यंती मध्यमा ॥ २४ ॥
युक्ति बुद्धि मति धारणा । सावधानता नाना चाळणा ।
भूत भविष्य वर्तमाना । उकलून दावी ॥ २५ ॥
जागृति स्वप्न सुषुप्ती जाणे । तुर्या ताटस्ता अवस्ता जाणे ।
सुख दुःख सकळ जाणे । मानापमान ॥ २६ ॥
ते परम कठीण कृपाळु । ते परम कोमळ स्नेहाळु ।
ते परम क्रोधी लोभाळु । मर्यादेवेगळी ॥ २७ ॥
शांती क्ष्मा विरक्ती भक्ती । अध्यात्मविद्या सायोज्यमुक्ति ।
विचारणा सहजस्थिति । जयेचेनी ॥ २८ ॥
पुर्वीं पुरुषनामें बोलिलीं । उपरी स्त्रीनामें निरोपिलीं ।
आतां नपुषकनामें ऐकिलीं । पाहिजे चंचळाचीं ॥ २९ ॥
जाणणें अंतःकर्ण चित्त । श्रवण मनन चैतन्य जीवित ।
येतें जातें सुचीत । होऊन पाहा ॥ ३० ॥
मीपण तूंपण जाणपण । ज्ञातेंपण सर्वज्ञपण ।
जीवपण शिवपण ईश्वरपण । अलिप्तपण बोलिजे ॥ ३१ ॥
ऐसीं नामें उदंड असती । परी ते येकचि जगज्जोती ।
विचारवंत ते जाणती । सर्वांतरात्मा ॥ ३२ ॥
आत्मा जगज्जोती सर्वज्ञपण । तीनी मिळोन येकचि जाण ।
अंतःकर्णचि प्रमाण । ज्ञेप्तीमात्र ॥ ३३ ॥
ढीग जाले पदार्थाचे । पुरुष स्त्री नपुंसक नामांचे ।
परंतु सृष्टीरचनेचें । किती म्हणोन संगावें ॥ ३४ ॥
सकळ चाळिता येक । अंतरात्मा वर्तती अनेक ।
मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेंचि चालती ॥ ३५ ॥
तो अंतरात्मा आहे कैसा । प्रतुत वोळखाना आमासा ।
नाना प्रकारींचा तमासा । येथेंचि आहे ॥ ३६ ॥
तो कळतो परी दिसेना । प्रचित येते परी भासेना ।
शरीरीं असे परी वसेना । येके ठाईं ॥ ३७ ॥
तीक्षणपणें गगनीं भरे । सरोवर देखतां च पसरे ।
पदार्थ लक्षून उरे । चहूंकडे ॥ ३८ ॥
जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो । तो त्यासारिखाच होतो ।
वायोहूनि विशेष तो । चंचळविषईं ॥ ३९ ॥
कित्येक दृष्टीनें देखे । कितीयेक रसनेनें चाखे ।
कितीयेक ते वोळखे । मनेंकरूनि ॥ ४० ॥
श्रोतीं बैसोन शब्द ऐकतो । घ्राणेंद्रियें वास घेतो ।
त्वचेइंद्रियें जाणतो । सीतोष्णादिक ॥ ४१ ॥
ऐशा जाणे अंतर्कळा । सकळामधें परी निराळा ।
पाहातां त्याची अगाध लीळा । तोचि जाणे ॥ ४२ ॥
तो पुरुष ना सुंदरी । बाळ तारुण्य ना कुमारी ।
नपुंसकाचा देहधारी । परी नपुसक नव्हे ॥ ४३ ॥
तो चालवी सकळ देहासी । करून अकर्ता म्हणती त्यासी ।
तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी । देही कूटस्त बोलिजे ॥ ४४ ॥
॥ श्लोक ॥ द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते ॥
दोनी पुरुष लोकीं असती । क्षराक्षर बोलिजती ।
सर्व भूतें क्षर म्हणती । अक्षर कूटस्त बोलिजे ॥ ४५ ॥
उत्तम पुरुष तो आणीक । निःप्रपंच निःकळंक ।
निरंजन परमात्मा येक । निर्विकारी ॥ ४६ ॥
च्यारी देह निरसावे । साधकें देहातीत व्हावें ।
देहातीत होतां जाणावें । अनन्य भक्त ॥ ४७ ॥
देहमात्र निरसुनी गेला । तेथें अंतरात्मा कैसा उरला ।
निर्विकारीं विकाराला । ठाव नाहीं ॥ ४८ ॥
निश्चळ परब्रह्म येक । चंचळ जाणावें माईक ।
ऐसा प्रत्यय निश्चयात्मक । विवेकें पाहावा । ४९ ॥
येथें बहुत नलगे खळखळ । येक चंचळ येक निश्चळ ।
शाश्वत कोणतें केवळ । ज्ञानें वोळखावें ॥ ५० ॥
असार त्यागून घेईजे सार । म्हणोन सारासार विचार ।
नित्यानित्य निरंतर । पाहाती ज्ञानी ॥ ५१ ॥
जेथे ज्ञानचि होते विज्ञान । जेथें मनांचे होतें उन्मन ।
तेथें कैचें चंचळपण । आत्मयासी ॥ ५२ ॥
सांगणोवांगणीचें काम नव्हे । आपुल्या अनुभवें जाणावें ।
प्रत्ययाविण सिणावें । तेंचि पाप ॥ ५३ ॥
सत्यायेवढें सुकृत नाहीं । असत्यायेवढें पाप नाहीं ।
प्रचितीविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ ५४ ॥
सत्य म्हणिजे स्वरूप जाण । असत्य माया हें प्रमाण ।
येथें निरोपिलें पापपुण्य । रूपेंसहित ॥ ५५ ॥
दृश पाप वोसरलें । पुण्य परब्रह्म उरलें ।
अनन्य होतांच जालें । नामातीत ॥ ५६ ॥
आपण वस्तु स्वतसिद्ध । तेथें नाहीं देहसमंध ।
पापरासी होती दग्ध । येणें प्रकारें ॥ ५७ ॥
येरवी ब्रह्मज्ञानेंवीण । जें जें साधन तो तो सीण ।
नाना दोषांचे क्षाळण । होईल कैसें ॥ ५८ ॥
पापाचें वळलें शरीर । पापचि घडे तदनंतर ।
अंतरीं तोग वरीवरी उपचार । काय करी ॥ ५९ ॥
नाना क्षेत्रीं हें मुंडिलें । नाना तीर्थीं हें दंडिलें ।
नाना निग्रहीं खंडिलें । ठाईं ठाईं ॥ ६० ॥
नाना मृत्तिकेनें घांसिलें । अथवा तप्तमुद्रेनें लासिलें ।
जरी हें वरीवरी तासिलें । तरी शुद्ध नव्हे ॥ ६१ ॥
सेणाचे गोळे गिळिले । गोमुत्राचे मोघे घेतले ।
माळा रुद्राक्ष घातले । काष्ठमणी ॥ ६२ ॥
वेष वरीवरी केला । परी अंतरीं दोष भरला ।
त्या दोषाच्या दहनाला । आत्मज्ञान पाहिजे ॥ ६३ ॥
नाना व्रतें नाना दानें । नाना योग तीर्थाटणें ।
सर्वांहुनी कोटीगुणें । महिमा आत्मज्ञानाचा ॥ ६४ ॥
आत्मज्ञान पाहे सदा । त्याच्या पुण्यास नाहीं मर्यादा ।
दुष्ट पातकाची बाधा । निरसोन गेली ॥ ६५ ॥
वेदशास्त्रीं सत्यस्वरूप । तेंचि ज्ञानियांचें रूप ।
पुण्य जालें अमूप । सुकृतें सीमा सांडिली ॥ ६६ ॥
या प्रचितीच्या गोष्टी । प्रचित पाहावी आत्मदृष्टीं ।
प्रचितीवेगळे कष्टी । होऊंच नये ॥ ६७ ॥
आगा ये प्रचितीचे लोक हो । प्रचित नस्तां अवघा शोक हो ।
रघुनाथकृपेनें राहो । प्रत्यय निश्चयाचा ॥ ६८ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चळाचळनिरूपणनाम समास दहावा ॥
॥ दशक दहावा समाप्त ॥