आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥
अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥
रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी ।
प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥
पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥
सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥
सगस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥
मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥
पितृवचना लागीं रामें वनवास केला ।
मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥
देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें ।
नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥
बौद्ध कलंकी कवियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ॥ ७ ॥