ब्राह्मणाचें सामर्थ्य
सभाग्य कोप ब्राह्मणाच । शापे अधिकार ब्रह्माचा ।
मिथ्या नव्हे ब्राह्मणवाचा । पूर्ण दैवाचा परीक्षिती ॥४७॥
शमीकाचा ब्रह्मचारी पुत्र । पाठकें दिधलें शिखासूत्र ।
त्याचेंनि शापें ब्रह्माधिकार । जाण ब्राम्हणमात्र ब्रम्हरुपी ॥४८॥
शाप देतील जरी ब्राह्मण । तरी वंदावे त्यांचे चरण ।
कोपा चढल्याही ब्राह्मण । पूर्ण तरी आपण वंदावे ते ॥४९॥
ब्राह्मण करुं आलिया घाता । त्याचे चरणी ठेवावा माथा ।
ब्राम्हणापरती पूज्यता । आन दैवता असेनाची ॥९५०॥
ब्रम्ह ब्राम्हण समसमान । हेंही वचन दिसे गौण ।
ब्रम्हदाते स्वये ब्राम्हण । यालागीं पूर्ण पूज्यत्वें श्रेष्ठ ॥५१॥
जें वस्तु असे ज्याअधीन । त्या वस्तूचे करितां दान ।
यालागी ब्रम्हस्वामित्वें ब्राम्हण । पूज्यत्वें पूर्ण तिही लोकी ॥५२॥
ब्राह्मण ब्रम्हातें प्रतिपादिते । तें ब्रह्म होते कोणी नव्हते ।
ब्रम्ह ब्राह्मणाचेनी हातें । पूर्ण प्रतिष्ठेतें पावले पैं ॥५३॥
यालागीं ब्रम्ह ब्राम्हणाधीन । कदा नुल्लंघी ब्राम्हणवचन ।
त्यांचे मंत्रमात्रें जाण । पाषाणाही पूर्ण ब्रम्हत्व प्रगटे ॥५४॥
जैसा मातेचा मोहकोप । तैसा ब्राम्हणांचा शाप ।
शापें फेडूनि पराचें पाप । वस्तू चिद्रूप कोपुनी देती ॥५५॥
ब्राम्हण कोपल्या अतिक्षोभता । एवढा लाभ आतुडे हाता ।
त्या ब्राह्मणां सुखी करितां । त्या लाभाची वार्ता न बोलवे वेदा ॥५६॥
यालागीं भूदेव ब्राह्मण । चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण ।
त्यांची निंदा आवज्ञा हेळण । विरुद्ध आपण नवदावें कदा ॥५७॥
त्या ब्राह्मणांच्या कोपबोला । राजा ब्रह्माधिकारी झाला ।
भाग्यें श्रीशुक पावला । भाग्यें आथिला परीक्षिती तो ॥५८॥