नारद

पितृसेवेनें नारद ज्ञानी झाले

तो नारद महापवित्र । ब्रम्हयाचा मानसपुत्र ।
परमार्थालागीं तत्पर । सर्वस्वें सादर पितृसेवेसी ॥८४॥

तोचि आर्तीचा पूर्णचंद्र । विवेकाचा क्षीरसमुद्र ।
वैराग्याचा महारुद्र । आचरे नरेंद्र शमदमयुक्त ॥८५॥

पितृसेवा तोचि स्वार्थ । मानुनी सेवेसी नित्यरत ।
सदा सेवेचें दृढव्रत । निजपरमार्थ साधावया ॥८६॥

शमें ज्ञानेंद्रियां उपशम । दमें कर्मेद्रियां नित्यकर्म ।
सेवा करोनी उत्तमोत्तम । नारद परमप्रिय जाहला ॥८७॥

ज्ञानार्थी अतिउद्भट । अंतर्निग्रही एकनिष्ठ ।
आज्ञाधारी अतिश्रेष्ठ । परमवरिष्ठ सुशीलभावें ॥८८॥

मायानिरसनार्थ नारद ब्रह्मदेवाला उपाय विचारतात

मायानियंते ह्नणती राया त्या शिवादिकां मोहिलें माया ।
ते निजमाया निरसावया । नारद उपाया पुसोइच्छित ॥८९॥

माया निरसावया आपण । मायानियंता श्रीनारायण ।
त्यासी जाणावया संपूर्ण । अनन्यशरण निजजनकासी ॥७९०॥

पितामातागुरुत्वेंसी । ब्रह्मा पूज्य नारदासी ।
सद्भावें सेवितां अहर्निशीं । अतिउल्हासेंसी तुष्टोनियां ॥९१॥

नारद महाभागवत । भगवंती नित्य निरत ।
त्यासी ब्रह्मा प्रसन्न होत । निजबोधयुक्त स्वानंदें ॥९२॥

देखोनि नारदाची पूर्ण भक्ती । जाणोनी उत्तमोत्तमस्थिती ।
स्वानंदें तुष्टला प्रजापती । कृपामूर्ति निजबोधें ॥९३॥

नारदासी तुष्टला पिता । जो सकळ जगाचा प्रपिता ।
पूर्ण देखोनी प्रसन्नता । जाहला विनविता सप्रेमभावें ॥९४॥

तूं नातळोनि मायामोहासी । निजात्मबोधें विश्व सृजिसी ।
तुज प्रसन्न झाला हषीकेशी । तो प्रसाद आह्मासी कृपेनें दीजे ॥९५॥

ऐसें बोलतां चालिलें स्फुंदन । अश्रुपूर्ण झाले नयन ।
रोमांचित कंपायमान । सर्वांगी स्वेदकपण टवटवविन्नले ॥९६॥

हर्षे बाष्प दाटलें कंठीं । पुढारी न बोलवे गोष्टी ।
ते देखोनियां निजदृष्टी । स्रष्टा निजपोटीं निवाला थोर ॥९७॥

यासी पूर्णब्रह्म बोधितां । वचनें पावेल परमार्था ।
होय अधिकारी पुरता । ऐसें विधाता जाणों सरला ॥९८॥

मग नारदासी आपण । सद्भावें दिधलें आलिंगन ।
पुत्रसुखें निवाला पूर्ण । अधिकारीरत्न परमार्थीं ॥९९॥

ऐक राया परीक्षिती । जें तुवां पुसिलें मजप्रती ।
तेंचि नारदें प्रजापती । निजज्ञानार्थी पुसियेलें ॥८००॥

Leave a Comment