अहंकारशून्य

ब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला

रोग गेलियाची लक्षणें । रोगी नेणे, वैद्य जाणे ।
तेवीं ब्रह्मा सांडिला अभिमानें । हें नारायणें जाणितले ॥७४॥

लक्ष भेदितां धनुर्धरें । जेवी कां निविजे निजकरें ।
तेवीं ब्रह्मा निवटला अहंकारें । हें स्वयें श्रीधरें जाणितलें ॥७५॥

जें बोधा आले शिष्यासी । तें नसांगतां कळे श्रीगुरुसी ।
तेवी जाणोनियां हषीकेशी । ह्नणे ब्रह्मयासी सावधान ॥७६॥

‘ निजानुभव पाहे पूर्ण । ’ ऐसें ऐकतां सदगुरुवचन ।
चमत्कारला चतुरानन । देहीं देहपण विदेहत्वा आलें ॥७७॥

जीवदशा वोवांडितां । निजात्मता पावोंजातां ।
ते संधीं सत्वावस्था । अतिसप्रेमता वोसंडे ॥७८॥

निजात्मरुपीं पडतां दृष्टी । सुखाचा पुर लोटे पोटीं ।
हर्षे बाष्प दाटे कंठीं । परेंसी गोष्टी सदगदित वाचा ॥७९॥

नेत्रीं आनंदाश्रूचिया धारा । सुखोमीं कांपे थरथरां ।
हर्षे उचलल्या रोममुद्रा । स्वेदामृतपुरा सार्द्रत्व ॥६८०॥

अहं सोहं जाले लीन । मनें मन झालें उन्मन ।
चित्त जालें चैतन्यघन । जीव परिपूर्ण ब्रह्म जाला ॥८१॥

जेथें एक ना दुसरें । सन्मुख ना पाठिमोरें ।
जें जागें ना निदसुरें । जें सहजान्वयें खरें सदोदित ॥८२॥

जे केलें ना झालें । जें गेलें ना आलें ।
जें होतें ना हरपलें । संपूर्णत्वें संचलें परिपूर्ण ॥८३॥

जेथें न साहे रुपनाम । जेथें नसाहे क्रियाकर्म ।
जेथें न रिघे धर्माधर्म । तें पूर्णब्रह्म परमेष्ठी झाला ॥८४॥

जेथें न रिघे हेतूमातू । जेथें न रिघे दृश्य दृष्टांतु ।
जिचा नसे आदिअंतू । ते वस्तु सदोदितू विरंची झाला ॥८५॥

ज्याचा न लागे लागमाग । ज्यासि न लगे अवयव अंग ।
आंगेंवीण अव्यंग । निजवस्तु सांग स्वयंभु झाला ॥८६॥

जेथें दुःखत्वें नरिघे दुःख । सुखत्वें नरिघे सुख ।
जिचें हरिहरां न करवे तुक । ते वस्तु सम्यक् स्त्रष्टा झाला ॥८७॥

जेणें सुखें आनंदमय शंभू । जेणें सुखें सुखरुप झाला स्वयंभू ।
तें सुखरुप पावला स्वयंभू । आनंदलाभु सदगुरुकृपा ॥८८॥

भावें सदगुरुतें भजतां । स्रष्टा पावला स्वस्वरुपता ।
यालागीं गुरुभक्तीपरता । मार्ग परमार्था असेना ॥८९॥

परमार्थ करणार्‍या सावकानें सकलसाधनश्रेष्ठ गुरुभक्तीच केली पाहिजे

जरी साच चाड परमार्था । तरी भावें भजावें गुरुनाथा ।
सकल साधनांच्या माथां । जाण तत्त्वतां गुरुभक्ति ॥६९०॥

ज्याचे मुखीं गुरुचें नाम । ज्यासि गुरुसेवा नित्यकर्म ।
तो देहासहित परब्रह्म । त्यासि कर्माकर्म बाधीना ॥९१॥

ज्यासि स्वानंदे गुरुभक्ती । त्याच्या चरणतीर्था तीर्थे येती ।
वेद बंदीजन होती । सुरनर वंदिती पदरज त्याचे ॥९२॥

गुरुभक्ती नांदे ज्याचे घरीं । यम त्याची तराळकी करीं ।
काळ आज्ञा वाहे शिरीं । तो पूजिजे हरी परमात्मभावें ॥९३॥

गुरुभक्तीचे पवाडे । वर्णितां वेदासि मौन पडे ।
गुरुभक्तीवरते चढे । ऐसें चोखडे साधन नाही ॥९४॥

Leave a Comment