॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु त्र्यंबका । ब्रह्मगिरिनिवासनायका ।
त्रिगुणत्रिपुरभेदका । कामांतका गिरिजेशा ॥ १ ॥
तुझा अनाहताचा डमरु । सर्व शब्दें करी गजरु ।
वेदानुवादें निरंतरु । त्रिकांडीं थोरु गर्जत ॥ २ ॥
तुझें हातींचें खट्वांग । करी जीवाचा जीवभंग ।
अनंगेंसीं जाळूनि अंग । अंगसंग तैं देशी ॥ ३ ॥
त्रिनयना त्र्यंबकलिंगा । तुजपासोनि प्रवाहे चिद्गंगा ।
ते पवित्रपणें उद्धरी जगा । प्रकाशगर्भा शंकरा ॥ ४ ॥
प्रत्यक्ष दिसती दोन्ही लोचन । तिसरा गुप्त ज्ञाननयन ।
यालागीं तूं त्रिलोचन । नयनेंवीण दीसशी ॥ ५ ॥
निजांगें वाहसी बोधचंद्र । यालागीं तूं चंद्रशेखर ।
चंद्रसूर्यादि चराचर । तुझेनि साचार प्रकाशे ॥ ६ ॥
` भव ' या नांवाची ख्याती । भवप्रकाशक तुझी चिच्छ्क्ती ।
तूंचि विष्णु प्रजापती । रुद्र तूं अंतीं संहर्ता ॥ ७ ॥
मोडूनियां नामरूपमुद्रा । जीव आणिशी एकाकारा ।
अत्यंत प्रळयींच्या प्रळयरुद्रा । चित्समुद्रा शिवरूपा ॥ ८ ॥
शिव शिव जी गुरुराया । निजभावें लागतां पायां ।
तंव गुरुशिष्यत्व गेलें लया । दावूनियां निजरूप ॥ ९ ॥
तें निजरूप देखतां दृष्टीं । कैंचा जीव कैंची सृष्टी ।
निमाली त्रिगुणेंसीं त्रिपुटी । पडली मिठी स्वानंदीं ॥ १० ॥
त्या स्वानंदाचे उद्गार । सांवरतां नावरती थोर ।
त्या स्वानंदाचें निजसार । सत्य साचार एकादश ॥ ११ ॥
त्याहीमाजीं अतिगहन । सुखस्वानंदनिरूपण ।
तो हा एकुणिसावा अध्याय जाण । परमकारण शास्त्रार्थीं ॥ १२ ॥
जें ऐकतां निरूपण । परमानंद उथळे जाण ।
एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ १३ ॥
सत्रावे अठरावे अध्यायांप्रती । स्वधर्मकर्में ब्रह्मप्राप्ती ।
वर्णाश्रमस्थितिगती । उद्धवाप्रती सांगीतली ॥ १४ ॥
एकुणिसावे अध्यायीं जाण । जेणें ज्ञानें साधिलें निजज्ञान ।
त्या ज्ञानाचें त्यागलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ १५ ॥
कर्म-कर्तव्यता-कारण । जीवन्मुक्तासी नाहीं जाण ।
उद्धवाचे यमादि प्रश्न । हेही श्रीकृष्ण सांगेल ॥ १६ ॥
शास्त्रयुक्त पांडित्यज्ञान । प्रपंचाचें मिथ्या निरूपण ।
तें `आनुमानिक' पुस्तकज्ञान । सत्यपण त्या नाहीं ॥ १७ ॥
पूर्वे आहे माझें गमन । हें पूर्वील शुद्ध स्मरण ।
परी दिग्भ्रम पडिल्या जाण । पश्चिमे आपण पूर्व मानी ॥ १८ ॥
तैसें शाब्दिक शास्त्रज्ञान । बोले आन करी आन ।
तेणें नव्हे समाधान । सर्वथा जाण साधकां ॥ १९ ॥
जेवीं कां दिग्भ्रम मोडे । तैं पूर्वेचा चाले पूर्वेकडे ।
तेवीं अपरोक्षज्ञान जैं जोडे । तैं साधक पडे स्वानंदीं ॥ २० ॥
जें जें ऐके वेदांतश्रवण । तें अंगें होत जाण आपण ।
हें अपरोक्षाचें लक्षण । सत्यत्वें जाण अतिशुद्ध ॥ २१ ॥
ऐसें नव्हतां अपरोक्षज्ञान । सांडूं नये श्रवणमनन ।
अवश्य करावें साधन । प्रत्यगावृत्ती जाण अत्यादरें ॥ २२ ॥
झालिया अपरोक्षज्ञान । प्रपंचाचें मिथ्या भान ।
विषयांसी पडलें शून्य । कल्पना जाण निमाली ॥ २३ ॥
तेणेंचि पुरुषें आपण । त्यागावें गा ज्ञानसाधन ।
हेंचि निरूपणीं निरूपण । देव संपूर्ण सांगत ॥ २४ ॥
श्रीभगवानुवाच-
यो विद्याश्रुतसंपन्न आत्मवात्रानुमानिकः ।
मायामात्रमिदं ज्ञात्वा ज्ञानं च मयि संन्यसेत् ॥ १ ॥
वेदशास्त्रार्थीं परिनिष्ठित । श्रवणमननाभ्यासयुक्त ।
ज्यासी ब्रह्मविद्या प्राप्तः । सुनिश्चित स्वानुभवें ॥ २५॥
तोचि अनुभव ऐसा । दोराअंगी सर्पु जैसा ।
न मारितां नाशे आपैसा । भवभ्रम तैसा त्या नाहीं ॥ २६ ॥
जेवीं कां नटाची रावो राणी । दोघें खेळती लटिकेपणीं ।
तेवीं प्रकृतिपुरुषउभवणी । मिथ्यापणीं जो जाणे ॥ २७ ॥
जैशीं भिंतीमाजीं नानाकार । चित्रें लिहिलीं विचित्र ।
ते भिंतीचि एक साचार । तेंवी ऐक्यें चराचर जो देखे ॥ २८ ॥
स्वप्नींचीं नाना कर्में जाण । त्याचें जागृतीं नव्हे बंधन ।
तेवीं मिथ्या निजकर्माचरण । जीवीत्वेंसीं प्राण जो देखे ॥ २९ ॥
ऐशी साचार ज्याची स्थिती । त्या नांव शुद्ध `आत्मप्राप्ती' ।
`निजानुभव' त्यातें म्हणती । हें जाण निश्चितीं उद्धवा ॥ ३० ॥
आणिक एक तेथींची खूण । `विषयावीण स्वानंद पूर्ण' ।
हें अनुभवाचें मुख्य लक्षण । सत्य जाण सात्वता ॥ ३१ ॥
ऐसा अनुभव नसतां देख । केवळ ज्ञान जें शाब्दिक ।
त्यातें म्हणिजे `आनुमानिक' । जाण निष्टंक निजभक्ता ॥ ३२ ॥
ज्याच्या अनुभवाभीतरीं । नाहीं अनुमानासी उरी ।
जो अपरोक्षसाक्षात्कारीं । निरंतरी नांदत ॥ ३३ ॥
ऐसा जो पुरुष जाण । तेणें ज्ञानाचें साधन ।
आणि वृत्तिरूप जें ज्ञान । तेंही आपण त्यागावें ॥ ३४ ॥
तें न त्यागितां लवलाहें । सहजचि त्याचा त्याग होये ।
जेवीं सूर्योदयीं पाहें । सचंद्र तेज जाये तारागणाचें ॥ ३५ ॥
जेवीं हनुमंत देखोनि येतां । नवचंडी पळे तत्त्वतां ।
मा राहावया येरां भूतां । उरी सर्वथा उरेना ॥ ३६ ॥
तेवीं माझे साक्षात्कारीं । त्यासी बद्धता नाहीं खरी ।
मा ज्ञान तियेचे निवृत्तीवरी । कैशापरी राहेल ॥ ३७ ॥
माझिया अनुभवाच्या ठायीं । बंधमोक्ष मिथ्या पाहीं ।
तेथ साधनज्ञानाचा कांहीं । उपेगु नाहीं उद्धवा ॥ ३८ ॥
परमात्मस्वरूपाच्या ठायीं । बंधमोक्ष मायिक पाहीं ।
तेथें ज्ञानध्यान जें कांहीं । न त्यागितां पाहीं त्यागिलें ॥ ३९ ॥
त्यागोनियां ज्ञानध्यान । ज्ञानियांसी माझी प्रीति गहन ।
तेंचि प्रीतीचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४० ॥
ज्ञानिनस्त्वहमेवेष्टः स्वार्थो हेतुश्च संमतः ।
स्वर्गश्चैवापवर्गश्च नान्योऽर्थो मदृते प्रियः ॥ २ ॥
जो मी अद्वयानंदस्थिती । त्या माझी ज्ञानियांसी प्रीती ।
ते प्रीतीची उपपत्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ४१ ॥
ज्ञानियांसी अतिवल्लभ । जो मी परमात्मा स्वयंभ ।
ज्ञानियांचा परम लाभ । मी पद्मनाभ निजधन ॥ ४२ ॥
ज्ञानियांसी जो स्वर्ग चांग । तो मज वेगळा नाहीं मार्ग ।
ज्ञानियांचा जो मोक्षभाग । तो मी श्रीरंग निजात्मा ॥ ४३ ॥
ज्ञानियांचें स्वधर्मसाधन । तें मी परमात्मा नारायण ।
मजवेगळें कांहीं आन । ज्ञात्यांसी जाण असेना ॥ ४४ ॥
ज्ञात्यांसी स्वर्गमोक्षसुख । मजवेगळें उरलें नाहीं देख ।
मी चिदात्मा निजव्यापक । भावें निष्टंक पावले ॥ ४५ ॥
ज्ञात्यांचा अर्थ स्वार्थ परमार्थ । मी पुरुषोत्तम गा समस्त ।
आद्य अव्यय अनंत । माझें निजसुख प्राप्त त्यां जाहलें ॥ ४६ ॥
ऐशी ज्ञानियांसी माझी प्रीती । तेही तैसेच मज प्रिय होती ।
तेंचि स्वयें श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥ ४७ ॥
ज्ञानविज्ञानसंसिद्धाः पदं श्रेष्ठं विदुर्मम ।
ज्ञानी प्रियतमोऽतो मे ज्ञानेनासौ बिभर्ति माम् ॥ ३ ॥
ज्ञानविज्ञाननिजसंपत्ती । जाहलियावीण माझी प्राप्ती ।
कोणासी नव्हे स्वरूपस्थिती । मत्पदीं गती ज्ञानविज्ञानें ॥ ४८ ॥
करितां गुरुमुखें शास्त्रशुद्धश्रवण । तेणें जाहलें तें म्हणिजे `ज्ञान' ।
त्याचा अनुभव तेंचि `विज्ञान' । ऐक लक्षण त्याचेंही ॥ ४९ ॥
स्वयें स्वयंपाक केला जाण । न जाणे कटु मधुर लवण ।
जंव चाखिला नाहीं आपण । ते दशा सज्ञान `ज्ञान' म्हणती ॥ ५० ॥
केलिया रसाचें रसस्वादन । स्वयें गोडी सेवी आपण ।
ऐशी जे दशा तें `विज्ञान' । उद्धवा जाण निश्चितीं ॥ ५१ ॥
एवं विज्ञानज्ञाननिजसंपत्तीं । माझ्या उत्तमपदाची पदप्राप्री ।
माझें वास्तवस्वरूप जे जाणती । त्यांची मज प्रीती अनन्यत्वें ॥ ५२ ॥
वेद-शास्त्र-युक्तिबळें । माझें स्वरूप काइसेनि न कळे ।
तें ज्यासी वस्तुतां आकळे । मज त्यावेगळें प्रिय नाहीं ॥ ५३ ॥
तेंचि अतिप्रीतीचें लक्षण । त्याच्या पाउलापाउलीं जाण ।
सर्वांग वोडवीं मी आपण । करीं निंबलोण । सर्वस्वें ॥ ५४ ॥
त्यासी जे वेळे जें लागे । तें मी न मागतां पुरवीं वेगें ।
त्यासी विरुद्ध ये जेणें मार्गें । तें मी निजांगें निवारीं ॥ ५५ ॥
त्यासी झणीं संसारवारा लागे । यालागीं मीच मी पुढेंमागें ।
सभंवतां राहें सर्वांगें । अतिप्रीतिपांगें पांगलों ॥ ५६ ॥
जेणें ज्ञानें ज्ञानी प्रिय होती । त्या ज्ञानाची पवित्र कीर्ती ।
देवो सांगे उद्धवाप्रती । यथार्थस्थिती निजबोधें ॥ ५७ ॥
तपस्तीर्थं जपो दानं पवित्राणीतरणि च ।
नालंकुर्वन्ति तां सिद्धिं या ज्ञानकल्या कृता ॥ ४ ॥
सकळ साधनां नव्हे जे शुद्धी । ते ज्ञानलेशें होय त्रिशुद्धी ।
ऐक उद्धवा सुबुद्धी । ते ज्ञानशुद्धीचा महिमा ॥ ५८ ॥
`तप' जें परार्क पंचाग्नी । `तीर्थ' गंगादि सविता त्रिवेणी ।
`जपु' जे नाना मंत्रश्रेणी । गो-भू-तिल `दानीं' सुवर्णादि ॥ ५९ ॥
आणिकही इतर `पवित्रें' । जें `स्वधर्मकर्मादि' स्वाचारें ।
नाना `याग' अग्निहोत्रें । पवित्रकरें अतिशुद्ध ॥ ६० ॥
एवं तपादिक जें साधन । या सकळांची शुद्धी गहन ।
ते ज्ञानलेशासमान । पवित्रपण तुळेना ॥ ६१ ॥
ज्ञाननिष्ठा अर्धक्षणें । जे पवित्रता स्वयें लाहणें ।
तें तपादि नाना साधनें । नाहीं पावणें कल्पांतीं ॥ ६२ ॥
ऐसें जें `पवित्रज्ञान' । तें मुख्यत्वें धरोनि जाण ।
माझे करावें भजन । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ६३ ॥
तस्माञ्ज्ञानेन सहितं ज्ञात्वा स्वात्मानमुद्धव ।
ज्ञानविज्ञानसंपन्नो भज मां भक्तिभावितः ॥ ५ ॥
याकारणें गा उद्धवा । ऐसा पवित्र ज्ञानाचा यावा ।
तेथ प्रक्षाळूनि निजभावा । जीवु तो वोळखावा परमात्मत्वें ॥ ६४ ॥
जीवु परमात्मा दोनि एक । ऐसें जाणणें तें `ज्ञान' देख ।
ऐक्यें भोगणें परमात्मसुख । `विज्ञान' सम्यक त्या नांव ॥ ६५ ॥
ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । होऊन करावें माझें भजन ।
त्या निजभजनाची खूण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ६६ ॥
तेव्हां जेथें देखे जें कांहीं । तें मीवांचूनि आन नाहीं ।
मग अनन्यभावें तिये ठायीं । भजे पाहीं भावार्थें ॥ ६७ ॥
ऐशिया माझ्या भजनाहातीं । उसंत नाहीं अहोरातीं ।
जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । माझी निजभक्ती न मोडे ॥ ६८ ॥
विसरोनि जावें जेथें । तेथेंचि देखे मातें ।
मरण आलें विस्मरणातें । स्मरणही तेथें हारपलें ॥ ६९ ॥
यापरी ज्ञानविज्ञानसंपन्न । मजवेगळें न देखती आन ।
तैसेंचि माझें अनन्य भजन । `शुद्धभक्ति' जाण या नांव ॥ ७० ॥
मागां मुनीश्वरीं याचि गतीं । माझी करोनि अनन्य भक्ती ।
मज पावले जैशा रीतीं । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ७१ ॥
ज्ञानविज्ञानयज्ञेन मामिष्ट्वाऽऽत्मानमात्मनि ।
सर्वयज्ञपतिं मां वै संसिद्धिं मुनयोऽगमन् ॥ ६ ॥
जे ज्ञानधनें अतिसंपन्न । परम पवित्र विज्ञानें जाण ।
ऐसे ब्रह्मभूत जे ब्राह्मण । यज्ञद्वारा यजन करिती माझें ॥ ७२ ॥
हृदयाच्या निजभुवनीं । विकल्पाची भूमि खाणोनी ।
शम-दम-विरक्ती कुंडें तिन्ही । केलीं आवो साधुनी श्रद्धेचा ॥ ७३ ॥
तेथ क्षराक्षर अरणी दोन्ही । गुरुमंत्रें दृढ मंथूनी ।
काढिला सूक्ष्म निर्धूमाग्नी । कुंडीं स्थापूनी पेटविला ॥ ७४ ॥
शुद्धसत्त्वाचें घृत तेथ । रजतमद्रव्येंसीं मिश्रित ।
वैराग्यस्त्रुवेनें आहुती देत । मंत्र तेथ युक्तीचे ॥ ७५ ॥
घेऊनि विद्याशस्त्र लखलखित । संकल्पपशूचा करूनि घात ।
तेणें यज्ञपति श्रीअनंत । केला तृप्त निजबोधें ॥ ७६ ॥
तेथ पूर्णाहुतीस कारण । घालितां जीवभावाचें अवदान ।
यज्ञभोक्ता मी श्रीनारायण । परमात्मा जाण सुखी झालों ॥ ७७ ॥
यापरी माझें यजन । करूनियां मुनिगण ।
निवारूनि जन्ममरण । माझी सिद्धि जाण पावले ॥ ७८ ॥
मुनीश्वरीं साधिली सिद्धी । तेचि उद्धवालागीं त्रिशुद्धी ।
व्हावया कृष्ण कृपानिधी । प्रपंचनिषेधीं वस्तु सांगे ॥ ७९ ॥
त्वय्युद्धवाश्रयति यस्त्रिविधो विकारो मायान्तराऽऽपतति नाद्यपवर्गयोर्यत् ।
जन्मादयोऽस्य यदमी तव तस्य किं स्युराद्यन्तयोर्यदसतोऽस्ति तदेव मध्ये ॥ ७ ॥
`मी उद्धव' ऐसें म्हणतां । तूं कोण आहेसी तत्त्वतां ।
ऐक त्या स्वरूपाची कथा । तुज मी आतां सांगेन ॥ ८० ॥
जन्म स्थिति आणि निधन । त्रिविधविकारेंसीं त्रिगुण ।
त्यांची अधिष्ठात्री माया जाण । तिसी चळण तुझेनी ॥ ८१ ॥
मायादि गुणकार्यां समस्तां । तूं आश्रयो पैं सबाह्यतां ।
तुझेनि अंगें यासी चपळता । तूं यापरता चिदात्मा ॥ ८२ ॥
`माझेनि गुणकर्मा चळणता । तैं प्रपंचासी आली सत्यता' ।
हें मायामय गा तत्त्वतां । मृगजळता आभासु ॥ ८३ ॥
सकळ प्रपंचाचें जें भान । तें तंव मृगजळासमान ।
दिसे तेंही मिथ्या दर्शन । वस्तुत्वें जाण सत्य नव्हे ॥ ८४ ॥
तूं जन्ममरणापरता । त्रिगुणांतें नातळता ।
प्रपंचासी अलिप्तता । तुझी तत्त्वतां तूं ऐक ॥ ८५ ॥
तेचि प्रपंचाची अलिप्त युक्ती । ऐशी आहे परम प्रतीती ।
उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । प्रपंचाची वस्ती सत्यत्वें नाहीं ॥ ८६ ॥
उत्पत्ति आदीं प्रपंच नसे । अंतीं कांहीं उरला न दिसे ।
मध्यें जो कांहीं आभासे । तो मायावशें मिथ्याभूत ॥ ८७ ॥
प्रपंचाआदीं परब्रह्म । अंतीं तेंचि उरे निरुपम ।
मध्यें स्थितिकाळीं तेंचि ब्रह्म । मिथ्या भवभ्रम भ्रांतासी ॥ ८८ ॥
सूर्याआदीं मृगजळ नसे । अस्तमानीं उरलें न दिसे ।
मध्यें जें काहीं आभासे । तेथही नसे जळलेश ॥ ८९ ॥
सर्पाआदीं दोरत्वें दोरु । अंतीं दोर उरे साचारु ।
मध्यें भ्रमें भासे सर्पाकारु । तोही दोरु दोररूपें ॥ ९० ॥
यापरी आद्यंतीं विचारिता । वस्तु सत्य प्रपंच मिथ्या ।
हें उद्धवा जाण तत्त्वतां । वेदशास्त्रार्थां संमत ॥ ९१ ॥
ऐशी या प्रपंचाची घडामोडी । होतां जन्ममरणकोडी ।
उद्धवा तुज न लागे वोढी । तूं परापरथडीं नित्यमुक्त ॥ ९२ ॥
निर्गुण निःसंग निर्विकार । अज अव्यय अक्षर ।
ब्रह्म अनंत अपरंपार । तें तूं साचार उद्धवा ॥ ९३ ॥
हे ऐकोनि देवाची गोष्टी । उद्धवें बांधिली शकुनगाठीं ।
हरिखें आनंदु न जिरे पोटीं । एकला सृष्टीं न समाये ॥ ९४ ॥
`तूं ब्रह्म' म्हणतां यदुराजें । तेणें हरिखाचेनि फुंजें ।
उद्धव नाचे स्वानंदभोजें । वैकुंठराजे तुष्टले ॥ ९५ ॥
स्वमुखें तुष्टोनि श्रीकृष्ण । मज म्हणे `तूं ब्रह्म पूर्ण' ।
आजि मी सभाग्य धन्य धन्य । धांवोनि श्रीचरण वंदिले ॥ ९६ ॥
तूंचि अंगें परब्रह्म' । ऐसें बोलिला मेघश्याम ।
तेचि अर्थींचें निजवर्म । उद्धव सप्रेम पूसत ॥ ९७ ॥
उद्धव उवाच-
ज्ञानं विशुद्धं विपुलं यथैतद्वैराग्यविज्ञानयुतं पुराणम् ।
आख्याहि विश्वेश्वर विश्वमूर्ते त्वद्भक्तियोगं च महद्विमृग्यम् ॥ ८ ॥
विष्वक्सेना विश्वेश्वरा । विश्वमूर्ती विश्वंभरा ।
जेणें पाविजे ब्रह्मसाक्षात्कारा । त्या ज्ञाननिर्धारा मज सांगा ॥ ९८ ॥
नुसधें सांगती ज्ञान । ते केवळ मूढ जाण
सांग तूं वैराग्ययुक्ति तीक्ष्ण । जें छेदी बंधन जीवांचें ॥ ९९ ॥
ज्ञानेंवीण वैराग्य आंधळें । तें अरडीदरडी आदळे ।
वैराग्येंवीण ज्ञान पांगळें । युक्ति देखे परी न चले पुरुषार्थ ॥ १०० ॥
विवेक वैराग्य दोनी । प्रवेशल्या हृदयभुवनीं ।
तों विषयावस्था निरसूनी । सोहंपणीं जीव वर्तें ॥ १ ॥
जंव ज्ञानासी न भेटे विज्ञान । तंव न निरसे जीवपण ।
यालागीं सांगावें विज्ञान । जें जीवशिवपण निवारी ॥ २ ॥
असंभावनादोषशून्य । तें बोलिजे `शुद्ध ज्ञान' ।
जें विपरीतभावनेवीण । त्यातें सज्ञान `विपुल' म्हणती ॥ ३ ॥
ऐसें विशुद्ध-विपुल-ज्ञान । तद्युक्त वैराग्य-विज्ञान ।
त्यांमाजींही श्रेष्ठ तुझें भजन । कृपा करून सांगिजे ॥ ४ ॥
ज्ञान-विज्ञान-वैराग्यस्थितीं । जुनाट तुझी भगवद्भक्ती ।
मज सांगावी सुनिश्चितीं । कृपामूर्ती श्रीकृष्णा ॥ ५ ॥
तुझे उत्तमभक्तिकारणें । साधु पडले गवेषणें ।
धरणें बैसले जीवेंप्राणें । ते भक्ती सांगणें मजलागीं ॥ ६ ॥
तुझी करितां उत्तम भक्ती । त्रिविध ताप क्षया जाती ।
आपुली लाभे निजमुक्ती । उद्धव ते अर्थीं विनवीत ॥ ७ ॥
तापत्रयेणाभिहतस्य घोरे सन्तप्यमानस्य भवाध्वनीश ।
पश्यामि नान्यच्छरणं तवाङ्घ्रि द्वन्द्वातपत्रादमृताभिवर्षात् ॥ ९ ॥
जे त्रिविध तापें तापले । जे कामक्रोधीं जर्जर केले ।
आशातृष्णा विसंचिले । जे निर्बुजले जन्ममरणें ॥ ८ ॥
संसारमार्ग अतिघोर । दुःखें नुल्लंघवे दुस्तर ।
ऐसे श्रमले जे नर । त्यांसी निजछत्र हरिपादपद्म ॥ ९ ॥
तुझ्या चरणारविंदापरतें । शरण्य न देखों अणिकांतें ।
यालागीं कायावाचाचित्तें । शरण भावार्थें तुज आलों ॥ ११० ॥
छत्र निवारी केवळ ताप । चरणछत्राचें भिन्न रूप ।
त्रिविध तापेंसीं संताप । निरसोनि निष्पाप करी जन ॥ ११ ॥
एक शरण निजचित्तें । एक वैरें मिसळले तूतें ।
एक ते भजनभावार्थें । एक ते भयार्तें स्मरले तूतें ॥ १२ ॥
एक ते सुहृदत्वें सगोत्र । एकाचें केवळ स्नेहसूत्र ।
एका अंगसंग कामतंत्र । एक आज्ञाधारक नेमस्त ॥ १३ ॥
एवं नानापरी विचित्र । जिंहीं ठाकिलें चरणच्छत्र ।
भवभय जें महाघोर । तें त्यांसमोर हों न शके ॥ १४ ॥
भक्त वैरी आणि सुहृद । अवघ्यां देणें निज ऐक्यपद ।
बाप उदारता अगाध । तूं स्वानंदबोध सर्वांचा ॥ १५ ॥
होमें जें दीजे अग्नीवरी । तें अग्नी आपुल्याऐसें करी ।
मा अवचटें पडिल्यावरी । तेंही करी तैसेंचि ॥ १६
एवं नानायोगें गोविंदा । जे मीनले तुझिया संबंधा ।
त्यांची निरसोनि संसारबाधा । समत्वें निजपदा तूं नेसी ॥ १७ ॥
त्या तुझें चरणछत्र येथें । निवारी त्रिविध तापांतें ।
सदा वर्षे परमामृतें । शरण चरणांतें यालागीं ॥ १८ ॥
ज्या संसारभयाभेण । तुझ्या चरणा आलों शरण ।
त्या भवभयाचें निरूपण । उद्धव आपण सांगत ॥ १९ ॥
दष्टं जनं संपतितं बिलेऽस्मिन् कालाहिना क्षुद्रसुखोरुतर्षम् ।
समुद्धरैनं कृपयाऽऽपवर्ग्यैर्वचोभिरासिञ्च महानुभाव ॥ १० ॥
संसारकुहरामाजीं जन । गृहदाराकूपीं पडले जाण ।
त्याहीमाजीं दुःख गहन । काळसर्पें दारुण डंखिलें ॥ १२० ॥
त्या काळसर्पाचें विख । क्षणक्षणां चढे देख ।
अभिमानें भुलले लोक । विषयसुख वांछिती ॥ २१ ॥
नवल काळसर्पाचा पडिपाडु । विषप्राय विषय केले गोडु ।
गोडांचा गोड परमार्थ दृढु । तो केला कडू जीवेंभावें ॥ २२ ॥
विखाहूनि विषय अधिक । विख एक वेळां मारक ।
विषयो पुनः पुनः घातक । काळसर्पें लोक भुलविले ॥ २३ ॥
विषय तो केवळ विख । त्यालागीं भुलले मूर्ख ।
विषयांची तृष्णा देख । अधिकाधिक वाढविती ॥ २४ ॥
ऐसे दुःखनिमग्न जे जन । त्यांचें करावें जी उद्धरण ।
म्हणशील `हे करितील साधन । तैं उद्धरण करीन मी' ॥ २५ ॥
स्वामी तुझी कृपा न होतां । कोट्यानुकोटी साधन तें वृथा ।
तुझी कृपा जाहलिया अच्युता । भवव्यथा स्पर्शेना ॥ २६ ॥
ऐकें कृपाळुवा श्रीअनंता । तुझ्या मोक्षफळरूप ज्या कथा ।
तेणें अमृतें शिंपोनि कृष्णनाथा । जनां समस्तां उद्धरीं ॥ २७ ॥
तुझे मुखींचें कथापीयूख । बिंदुमात्र लाभतां देख ।
भवसर्पाचें उतरे विख । उपजवी सुख स्वानंदें ॥ २८ ॥
सकळ जनांच्या विषयीं' । म्हणसी आग्रह कां तुझ्या ठायीं ।
जन मातें प्रार्थीत नाहीं । देवा ऐसें कांहीं कल्पिसी ॥ २९ ॥
अंधळें अंधकूपीं पडतां । देखणेनीं लावावें सत्पथा ।
तेवीं ज्ञानांध दुःखी बुडतां । उद्धरावया तत्त्वतां मी प्रार्थितसें ॥ १३० ॥
जन अंध कां जाहले म्हणसी । संसारसर्पें ग्रासिलें त्यांसी ।
यालागीं विसरोनि निजसुखासी । विषयसुखासी लोधले ॥ ३१ ॥
ऐशिया दीनांतें श्रीअनंता । कृपेनें उद्धरावें तत्त्वतां ।
म्हणोनि चरणीं ठेविला माथा । श्रीकृष्णनाथा प्रार्थिलें ॥ ३२ ॥
ऐकोनि भक्ताची विनंती । संतोषला भक्तपती ।
उत्तम सभेची ज्ञानस्थिती । उद्धवाप्रती सांगेल ॥ ३३ ॥
जे सभेसी मुख्यत्वें हृषीकेशी । देवर्षी आणि ब्रह्मर्षी ।
तेथ मीनले राजर्षी । तपोराशी ज्ञाननिधी ॥ ३४ ॥
ते सभेचा ज्ञानमथितार्थ । उद्धवासी सांगेल श्रीकृष्णनाथ ।
श्रोतीं अवधान द्यावें तेथ । एका विनवीत जनार्दनु ॥ ३५ ॥
ज्ञान आणि पुरातन । वक्ता भगवंत आपण ।
श्रोता उद्धव सावधान । काय श्रीकृष्ण बोलिला ॥ ३६ ॥
श्रीभगवानुवाच-
इत्थमेतत्पुरा राजा भीष्मं धर्मभृतां वरम् ।
अजातशत्रुः पप्रच्छ सर्वेषां नोऽनुश्रृण्वताम् ॥ ११ ॥
तुवां पुशिलें जैशा रीतीं । तैसियाचि गा उपपत्तीं ।
धर्में पुशिले भीष्माप्रती । देहांतीं शरपंजरीं ॥ ३७ ॥
ऐक त्या धर्माची थोरी । ज्यासी शत्रु नाहीं संसारीं ।
सत्यवादी निजनिर्धारीं । जो ऋषिमंत्रीं जन्मला ॥ ३८ ॥
करावया पांडवनिर्दळण । वज्रदेही व्हावया आपण ।
वर्म पुसतां दुर्योधन । धर्म असत्य वचन न बोले ॥ ३९ ॥
ऐसा राजा युधिष्ठिर । निर्मत्सर परम पवित्र ।
तेणें करूनि अत्यादर । भीष्म महावीर विनविला ॥ १४० ॥
जो परम धार्मिक निजनिर्धारीं । जो स्वधर्मनियमें व्रतधारी ।
जो यावज्जन्म ब्रह्मचारी । जो महाशूरीं वंदिजे ॥ ४१ ॥
न मोडतां गुरुत्वाची पायरी । जो परशुरामेंसीं युद्ध करी ।
परी काशीश्वराची कुमरी । जो न करीच नोवरी ब्रह्मचर्यें ॥ ४२ ॥
धनुर्विद्येसी गुरु परशुराम । तो रणीं जिंतिला करूनि नेम ।
तेणें संतोषोनि परम । आपुलें नाम आंकणां घातलें ॥ ४३ ॥
अधिक संतुष्टे परशुराम । माझ्या ब्रह्मचर्याचा व्रतनेम ।
भीष्मा तुज कदा बाधिना काम । वर परम दीधला ॥ ४४ ॥
जनकसंतोषाकारणें । आपुलें तारुण्य दीधलें जेणें ।
वार्धक्य घेऊनि आपणें । सुखी करणें शंतनु ॥ ४५ ॥
पित्यानें दीधलें आशीर्वादा । `ऐक भीष्मा अतिप्रबुद्धा ।
वार्धकीं क्षीणशक्तीची आपदा । ते तुज कदा बाधेना' ॥ ४६ ॥
यालागीं जंव जंव म्हातारपण । तंव तंव त्याचा प्रताप गहन ।
काळाची शक्ति खुंटली जाण । ज करवे क्षीण भीष्मासी ॥ ४७ ॥
यालागीं तोडरीं काळ काम । आंकणा रिघाला परशुराम ।
हाचि धर्मिष्ठीं `वरिष्ठधर्म' । हें साजे नाम भीष्मासी ॥ ४८ ॥
ज्याचिये प्रतिज्ञेच्या निर्धारीं । देवासी लावूनियां हारी ।
निःशस्त्रा करी शस्त्रधारी । एवढी थोरी प्रतिज्ञेची ॥ ४९ ॥
न मोडतां भजनमर्यादा । युद्धीं मिसळोनि गोविंदा ।
हारी लावूनियां मुकुंदा । चरणारविंदा लागला ॥ १५० ॥
आण वाहूनि निर्धारीं । शस्त्रास्त्रें सांडिलीं दूरीं ।
पुढती बाण भेदितां जिव्हारीं । शस्त्र करीं न धरीच ॥ ५१ ॥
बाणीं खडतरलें जिव्हार । विकळता देखोनि थोर ।
भीष्में करूनि निजनिर्धार । जाहला तत्पर देहत्यागा ॥ ५२ ॥
हें दक्षिणायन अतिघोर । भीष्में ऐकतां उत्तर ।
काळासी करूनियां दूर । स्वशरीर राखिलें ॥ ५३ ॥
मग निजात्मनिर्धारीं । भीष्म पहुडे शरपंजरीं ।
त्यातें युधिष्ठिर प्रश्न करी । महाऋषीश्वरीं परिवारिला ॥ ५४ ॥
आम्हां सकळां देखतां । जाहला युधिष्ठिर पुसता ।
तेचि पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥ ५५ ॥
निवृत्ते भारते युद्धे सुहृन्निधनविह्वलः ।
श्रुत्वा धर्मान् बहून्पश्चान्मोक्षधर्मानपृच्छत ॥ १२ ॥
मी संधि करितां श्रीकृष्ण । तें न मानीच दुर्योधन ।
व्यासें वर्जितां आपण । तरी दृप्तपण युद्धासी ॥ ५६ ॥
एवं दैवबळें कुरुक्षेत्रीं । कौरवपांडवां झुंजारीं ।
सापत्न दुर्योधनादि वैरी । सपरिवारीं मारिले ॥ ५७ ॥
युद्ध निवर्तल्यापाठीं । धर्म बैसल्या राज्यपटीं ।
तेणें अभिमान घेतला पोटीं । महादोषी सृष्टीं मी एक ॥ ५८ ॥
मी राज्यीं बैसवितां आपण । म्हणें म्यां मारिला गुरु ब्राह्मण ।
म्यां मारिला कर्ण दुःशासन । राजा दुर्योधन म्यां मारिला ॥ ५९ ॥
उत्पत्तिस्थितिप्रलयकर्ता । येथ ईश्वरु जाण तत्त्वतां ।
तें सांडोनियां सर्वथा । `अहं कर्ता' म्हणे धर्म ॥ १६० ॥
देहाभिमानाचे खटाटोपीं । थोर होऊनियां अनुतापी ।
गोत्रहंता मी महापापी । ऐसें आरोपी निजमाथां ॥ ६१ ॥
त्यासी द्यावया समाधान । समयो भीष्माचें निर्याण ।
तेथें म्यां नेउनियां जाण । धर्में केले प्रश्न ते ऐका ॥ ६२ ॥
राजधर्म दानधर्म । पुशिला तेणें आपद्धर्म ।
मुख्यत्वें पुशिला `मोक्षधर्म' । उत्तमोत्तम परियेसीं ॥ ६३ ॥
तानहं तेऽभिधास्यामि देवव्रतमुखाच्छ्रुतान् ।
ज्ञानवैराग्यविज्ञान श्रद्धाभक्त्युपबृंहितान् ॥ १३ ॥
ते भीष्ममुखींचे मोक्षधर्म । म्यां परिशिले अतिउत्तम ।
जे निरसिती भवभ्रम । सकळ कर्मदाहक ॥ ६४ ॥
ज्ञान विज्ञान श्रद्धा भक्ती । अनित्य नासे वैराग्यस्थिती ।
भीष्में सांगितली धर्माप्रती । ते मी निश्चितीं सांगेन ॥ ६५ ॥
म्हणणें भीष्मासी `देवव्रत' । तेणें देवावरी ठेवूनि चित्त ।
शरपंजरीं सुनिश्चित । निजात्मयुक्त पहुडला ॥ ६६ ॥
तेणें सांगितला मोक्षधर्म । त्यांत मुख्यत्वें `ज्ञान' प्रथम ।
तें ज्ञान सांगे पुरुषोत्तम । अतिउत्तम अवधारीं ॥ ६७ ॥
नवैकादश पञ्च त्रीन् भावान् भूतेषु येन वै ।
ईक्षेताथैकमप्येषु तञ्ज्ञानं मम निश्चितम् ॥ १४ ॥
प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंचतन्मात्रा सूक्षस्वभाव ।
अहंकारासकट `नव' । तत्त्ववैभव हे संख्या ॥ ६८ ॥
एकादश' बोलिजेतें । तें अकराही इंद्रियें येथें ।
पंच' ते पंचमहाभूतें । `तिनी' ते निश्चित तीन गुण ॥ ६९ ॥
हे तत्त्वसंख्या उणखूण । गणितां अठ्ठावीस जाण ।
इयें सर्व भूतीं समसमान । तत्त्वें जाण वर्तती ॥ १७० ॥
हिरण्यगर्भादि स्थावरान्त । तत्त्वें समान गा समस्त ।
अधिक उणें नाहीं येथ । जाण निश्चित उद्धवा ॥ ७१ ॥
तैसेंचि गा जीवचैतन्य । प्रतिबिंबलेंसे समसमान ।
जें नाम रूप अभिमान । सर्वांसी जाण प्रकाशक ॥ ७२ ॥
थिल्लरीं विहिरीं सागरीं । चंद्रमा प्रतिबिंब समचि धरी ।
तेवीं ब्रह्मादि मशकवरी । जीवत्व शरीरीं समसाम्यें ॥ ७३ ॥
भूतें समसमान चैतन्य । एकात्मता देखणें जाण ।
या नांव गा `शुद्धज्ञान' । माझाही जाण हा निश्चय ॥ ७४ ॥
आतां विज्ञानाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
ते श्लोकार्धें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ ७५ ॥
एतदेव हि विज्ञानं न नथैकेन येन यत् ॥
पूर्वीं देखतेनी स्वभावें । व्यापक वस्तूनियें सर्वें ।
व्यापिलीं असती देहादि तत्त्वें । हें मानी जीवेंभावें निश्चित ॥ ७६ ॥
जेवीं कां घटमात्रास । सबाह्य व्यापक आकाश ।
तेवीं सकळ प्रपंचास । चिदाभास व्यापक ॥ ७७ ॥
ऐसें जें कां शुद्ध ज्ञान । तें ज्ञेयप्राप्तीचें कारण ।
ज्ञेय पावलिया ज्ञान । हारपे जाण वृत्तींसीं ॥ १८ ॥
ज्ञानैकगम्य वस्तु जे । यालागीं त्या `ज्ञेय' म्हणिजे ।
ज्ञेय पावलिया ज्ञान लाजे । जेवीं कां सूर्यतेजें खद्योत ॥ ७९ ॥
जळीं रिघल्या लवण । लवणपणा मुके जाण ।
तेवीं ज्ञेय पावलिया ज्ञान । ज्ञातेपण हारवी ॥ १८० ॥
ज्ञेय पावलिया सम्यक । स्वरूपीं चिन्मात्रैक एक ।
तेथ मिथ्या व्याप्यव्यापक । साधक बाधक असेना ॥ ८१ ॥
जेवीं उदेलिया गभस्ती । सतारा लोपे रोहिणीपती ।
तेवीं जगेंसीं ज्ञानसंपत्ती । ज्ञेयाचे प्राप्तीपुढें लोपे ॥ ८२ ॥
ऐसें अपरोक्ष नव्हतां साङ्ग् । देहादि प्रपंचाचें लिंग ।
आत्म्यवेगळें देखे जग । शब्दें लगबग ब्रह्मज्ञाना ॥ ८३ ॥
शुद्ध शब्दिक जें ब्रह्मज्ञान । तेहीं गुणात्मक जाण ।
वस्तु निराकार निर्गुण । जन्ममरण तिशी नाहीं ॥ ८४ ॥
त्रिगुण तितुकें नाशवंत । येचि विखीं प्रस्तुत ।
सांगाताहे श्रीकृष्णनाथ । अंतवंत साकार ॥ ८५ ॥
(उत्तरार्ध) स्थित्युत्पत्त्यप्ययान्पश्येद्भावानां त्रिगुणात्मनाम् ॥ १५ ॥
जरी नसतें नाशवंत । तरी सगुण मानूं येतें सत्य ।
उत्पत्तिस्थितिनिदानवंत । जाण येथ त्रिगुणाचि ॥ ८६ ॥
रजोगुणें होय उत्पत्ति । सत्वगुणें कीजे स्थिती ।
तमोगुण नाशी अंतीं । हा गुणप्रवृत्ती-स्वभावो ॥ ८७ ॥
या गुणांमाजीं वस्तु असे । जिचेनि गुणकर्म प्रकाशे ।
परी जन्ममरणादि दोषें । अलिप्त वसे अविनाशी ॥ ८८ ॥
जे तिनी गुणां आश्रयभूत । जिचेनि गुणकर्में वर्तत ।
ती वस्तु त्रिगुणातीत । तेचि सांगत श्रीकृष्ण ॥ ८९ ॥
आदावन्ते च मध्ये च सुज्यात्सृज्यं यदन्वियात् ।
पुनस्तत्प्रतिसंक्रामे यच्छिष्येत तदेव सत् ॥ १६ ॥
गुणां आदि-मध्य-अवसानीं । सृष्टिउत्पत्ति-स्थिति-निदानीं ।
जें असे अविनाशपणीं । तें मी मानें संतत्वें ॥ १९० ॥
तेंचि संतत्व गा ऐसें । ज्याचेनि आधारें जग वसे ।
जें जगा सबाह्य भरलें असे । जग प्रकाशे ज्याचेनी ॥ ९१ ॥
हें जगचि होय जाये । परीं तें संचलेंचि राहे ।
ऐशी जे निजवस्तु आहे । ते तूं पाहे संतत्वें ॥ ९२ ॥
जैसे घटमठ होती जाती । आकाश राहे सहजगती ।
तेवीं ब्रह्मांडा लयोत्पत्ती । वस्तूची स्थिती संचली ॥ ९३ ॥
जेवीं अलंकारपूर्वीं सोनें । अलंकारीं सोनें सोनेंपणें ।
अलंकारनाशीं नासों नेणे । जेवीं कां सोनें निजस्थिती ॥ ९४ ॥
तेवीं आकळोनि चराचर । वस्तु असे अखंडाकार ।
होतां जातां आकारविकार । वस्तु अणुमात्र विकारेना ॥ ९५ ॥
ऐशी जे वस्तु अखंडपणें । तिच्या ठायीं चार प्रमाणें ।
इहीं प्रामार्णीं वस्तु जाणणें । प्रपंच देखणें मिथ्यात्वें ॥ ९६ ॥
श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यमनुमानं चतुष्टयम् ।
प्रमाणेष्वनवस्थानाद्विकल्पात्स विरज्यते ॥ १७ ॥
एक अद्वैत ब्रह्म पाहीं । दूसरें आणिक कांहीं नाहीं ।
प्रपंच विथ्या वस्तूचे ठायीं । हें प्रमाण पाहीं `वेदवाक्य' ॥ ९७ ॥
प्रत्यक्ष' देखिजे आपण । देहादिकांचें नश्वरपण ।
हें दुसरें परम प्रमाण । जें क्षणिकत्व जाण प्रपंचा ॥ ९८ ॥
मार्कंडेयो आणि भुशुंडी । इंहीं प्रपंचाची राखोंडी ।
देखिली गा रोकडी । वेळां कोडी कल्पांतीं ॥ ९९ ॥
महाजनप्रसिद्ध हें श्रवण । प्रपंचासी क्षणिकपण ।
हें तिसरें गा प्रमाण । उद्धवा जाण `ऐतिह्य' ॥ २०० ॥
शास्त्रप्रसिद्धी अनुमान । मिथ्या प्रपंचाचें भान ।
दिसे मृगजळासमान । वस्तुतां जाण असेना ॥ १ ॥
दोर दोरपणें साचार । भ्रमें भासे नानाकार ।
काष्ठ सर्प कीं मोत्यांचा हार । ना हे जळधार जळाची ॥ २ ॥
तेवीं वस्तु एक चिद्घन । तेथ भ्रमें मतवाद गहन ।
हें शून्य किंवा सगुण । कर्मधर्माचरण तें मिथ्या ॥ ३ ॥
यापरी करितां `अनुमान' । मिथ्या प्रवृत्तिप्रपंचज्ञान ।
हें वेदान्तमत प्रमाण । सत्य जाण उद्धवा ॥ ४ ॥
तंतूवेगळा पट कांहीं । योजेना आणीकिये ठायीं ।
तेंवी ब्रह्मावेगळा पाहीं । प्रपंचु नाहीं सत्यत्वें ॥ ५ ॥
चहूं प्रमाणीं प्रपंचस्थिती । मिथ्या साधिली निश्चितीं ।
ते प्रपंचीं विषयासक्ती । सांडूनि विरक्ती धरावी ॥ ६ ॥
येचिविखींचें निरूपण । स्वयें सांगताहे नारायण ।
उभय लोकीं विषयध्यान । तें मिथ्या जाण अमंगळ ॥ ७ ॥
कर्मणां परिणामित्वादाविरिञ्चादमङ्गलम् ।
विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥ १८ ॥
करूनि कर्मांचें साधन । पाविजे लोक तो नश्वर जाण ।
आदिकरूनि ब्रह्मसदन । नश्वरत्वें जाण अमंगळ ॥ ८ ॥
जें ते लोकींचें सुख गहन । तें विखें रांधिलें जैसें अन्न ।
खातां गोड परिपाकें मरण । तेवीं अधःपतन स्वर्गस्था ॥ ९ ॥
जैसा देखिला हा लोक येथ । तैसाचि स्वर्गभोग तेथ ।
जे दोन्ही जाण अंतवंत । नाश प्राप्त दोंहीसी ॥ २१० ॥
काळें पांढरें दोनी सुणीं । जेवीं सम अपवित्रपणीं ।
तेवीं इहपरलोक दोन्ही । नश्वरपणीं समान ॥ ११ ॥
इहामुत्र भोगासक्ती । यांवरी धरावी विरक्ती ।
या नांव `वैराग्यस्थिती' । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १२ ॥
मागील तुझी प्रश्नस्थिती । पुशिली होती माझी भक्ती ।
ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं निजबोधें ॥ १३ ॥
भक्तियोगः पुरैवोक्तः प्रीयमाणाय तेऽनघ ।
पुनश्च कथयिष्यामि मद्भक्तेः कारणं परम् ॥ १९ ॥
पूर्वीं भक्तीची महत्ख्याती । तुज सांगितली निजस्थिती ।
ते भक्तीची तुज अति प्रीती । तरी मी मागुतीं सांगेन ॥ १४ ॥
ऐक उद्धवा पुण्यमूर्ती । ज्यासी आवडे माझी भक्ती ।
तो मज पढिया त्रिजगतीं । भजनें परम प्राप्ती मद्भक्तां ॥ १५ ॥
ते भक्तीचें निजलक्षण । प्रथम भूमिका आरंभून ।
देवो सांगताहे आपण । येथें सावधान व्हावें श्रोतां ॥ १६ ॥
श्रद्धामृतकथायां मे शश्वन्मदनुकीर्तनम् ।
परिनिष्ठा च पूजायां स्तुतुभिःस्तवनं मम ॥ २० ॥
अमृतरूपा ज्या माझ्या कथा । श्रद्धायुक्त श्रवण करितां ।
फिकें करूनियां अमृता । गोडी भक्तिपंथा तत्काळ लागे ॥ १७ ॥
अमर अमृतपान करिती । तेही शेखीं मरोनि जाती ।
माझें कथामृत जे सेविती । ते नागवती कळिकाळा ॥ १८ ॥
सेवितां कथासारामृत । अतिशयें जाहले उन्मत्त ।
मातले मरणातें मारित । धाकें पळे समस्त संसारु ॥ १९ ॥
सेवितां कथामृतसार । मद्भावीं रंगलें अंतर ।
तैं माझे गुण माझें चरित्र । गाती सादर उल्हासें ॥ २२० ॥
माझे नाम माझीं पदें । नाना छंदें अद्वैतबोधें ।
कीर्तनीं गाती स्वानंदें । परमानंदें डुल्लत ॥ २१ ॥
सप्रेम संभ्रमाचे मेळीं । गर्जती नामाच्या कल्लोळीं ।
नामासरिसी वाजे टाळी । जाहली होळी महापापां ॥ २२ ॥
ऐशिया कीर्तनाचे आवडीं । जाहलीं प्रायश्चित्तें देशधडी ।
तीर्थें होऊनि ठेलीं बापुडीं । फिटलीं सांकडीं जपतपांचीं ॥ २३ ॥
ऐकोनि कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकींचा व्यापार ।
रिकामें यमकिंकर । यमें पाशभार लपविला ॥ २४ ॥
देखोनि कीर्तनाचे गोडी । देव धांवे लवडसवडीं ।
वैकुंठींहनि घालीं उडी । अतितांतडीं स्वानंदें ॥ २५ ॥
ऐसा कीर्तनाचा गजर । करितां नित्य निरंतर ।
त्या अधीन मी श्रीधर । भुललों साचार कीर्तनें ॥ २६ ॥
जैसें कीर्तन तैशीच पूजा । आदरें पूजी गरुडध्वजा ।
पुष्पादिसंभारसमाजा । अतिवोजा घमघवीत ॥ २७ ॥
अतिनिष्ठा सावधान । यापरी करी माझें पूजन ।
माझी स्तुति माझें स्तवन । रिकामा अर्ध क्षण जावों नेदी ॥ २८ ॥
आदरः परिचर्यायां सर्वाङ्गैरभिवन्दनम् ।
मद्भक्तपूजाऽभ्यधिका सर्वभूतेषु मन्मतिः ॥ २१ ॥
इंद्रिये' वेंचिलीं पूजाविधानें । `वाचा' वेंचली हरिकीर्तनें ।
हृदय' वेंचलें माझोनि ध्यानें । `अष्टांग' नमनें वेंचले ॥ २९ ॥
ऐसा अत्यादरे वाडेंकोडें । सबाह्य वेंचला मजकडे ।
माझे भक्त देखिल्या पुढें । हरिखें मजकडे येवोंचि विसरे ॥ २३० ॥
माझे भक्त भाग्यें येती घरा । तैं पर्वकाळ दिवाळी दसरा ।
तेथें तीर्थें धांवती माहेरा । जेवीं सासराहूनि कुमारी ॥ ३१ ॥
पहावया भक्तपूजेची आवडी । सनकादिकांची पडे उडी ।
नारदप्रल्हादादि भक्तकोडी । चढोवढी धांवती ॥ ३२ ॥
तेथ सिद्ध येती गा अलोटें । सुरवरांचे टेक फुटे ।
महानुभवांचा ढीग दाटे । पितर नेटेंपाटें धांवती ॥ ३३ ॥
वेदांसी रिघावा न घडे । विधि निर्बुजला मागें मुरडे ।
माझ्या भक्तपूजेचेनि कोडें । दारापुढें थाट दाटे ॥ ३४ ॥
मद्भक्तपूजेचिया उल्हासा । मज टक पडे हृषीकेशा ।
इतरांचा पाड काइसा । भक्तपूजनीं ऐसा महिमा आहे ॥ ३५ ॥
मागां सांडूनि माझी पूजा । जेणें मद्भक्त पूजिले वोजा ।
तेणें मज पूजिलें अधोक्षजा । परिवारसमाजासमवेत ॥ ३६ ॥
प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । भक्त माझ्या सचेतन मूर्ति ।
त्यांसी पूजिल्या मीं श्रीपती । यथानिगुतीं संतोषें ॥ ३७ ॥
जैसा मद्भाव मद्भक्तीं । तोचि भावो सर्वांभूतीं ।
नानाकार भूताकृती । परी आत्मस्थिती अविकार ॥ ३८ ॥
दिसे देहाकृती मुंडली । तीतें म्हणती हे रांडली ।
परी आत्म्याची रांड नाहीं जाहली । असे संचली आत्मस्थिति ॥ ३९ ॥
दीर्घ वक्र आणि वर्तुळ । दिसती भिन्न इंगळ ।
परी अग्नि एकचि केवळ । तेवीं भूतें सकळ मद्रूपें ॥ २४० ॥
चित्रांमाजीं नानाकृती । पाहतां अवघी एकचि भिंती ।
तेवीं मी चिदात्मा सर्वभूतीं । निजभावें निश्चितीं जाणावा ॥ ४१ ॥
सांडूनि अहंकार दुजा । सर्व भूतीं भावो माझा ।
हे उत्तमोत्तम माझी पूजा । मज अधोक्षजा पढियंती ॥ ४२ ॥
ऐशी जो माझी पूजा करी । तो मज पढियंता गा भारी ।
मी सर्वांगे राबें त्याच्या घरीं । तो मजवरी मिराशी ॥ ४३ ॥
त्याच्या चेष्टांची जे गती । तेचि माझी भजनस्थिती ।
हेंचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती सांगता ॥ ४४ ॥
मदर्थेष्वङ्गचेष्टा च वचसा मद्गुणेरणम् ।
मय्यर्पणं च मनसः सर्वकामविवर्जनम् ॥ २२ ॥
लौकिक शरीर कर्मगती । तद्वारा निपजे माझी भक्ती ।
अभिनव माझी भजनस्थिती । सांगों किती उद्धवा ॥ ४५ ॥
बैसोनियां हाटवटीं । सांगतां लौकिकीही गोष्टी ।
त्यांमाजीं माझे कीर्तन उठी । मद्गुणें गोमटी गर्जे वाचा ॥ ४६ ॥
स्वधर्मकर्मक्रिया करणें । तेही अर्पी मजकारणें ।
मजवेगळें कांहीं करणें । करूं नेणे अणुमात्र ॥ ४७ ॥
सर्वेंद्रियांचिये स्थितीं । सहजें निपजे माझी भक्ती ।
माझें नाम माझी कीर्ती । वाचा रिती राहो नेणे ॥ ४८ ॥
मनासी आवडे जें जें कांहीं । ते तें अर्पी मजचि पाहीं ।
शेखीं आपुलें मन तेंही । माझ्या ठायीं समर्पीं ॥ ४९ ॥
माझे स्वरूपाचे ठायीं जाण । केवीं घडे मनाचें अर्पण ।
तेचिविषयींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ २५० ॥
मदर्थेऽर्थपरित्यागो भोगस्य च सुखस्य च ।
इष्टं दत्तं हुतं जप्तं मदर्थं यद्व्रतं तपः ॥ २३ ॥
मी परमात्मा परम स्वार्थ । ऐसा करूनि निश्चितार्थ ।
वेंचिती धन धान्य सर्वार्थ । निजपरमार्थ साधावया ॥ ५१ ॥
परमार्थ साधावया अव्यंग । साचार पोटींचा विराग ।
मी भेटावया श्रीरंग । सकळ भोग सांडिती ॥ ५२ ॥
छत्र चामर हस्ती घोडे । त्यागून होती गा उघडे ।
ऐसें वैराग्य धडपुडें । मज रोकडें पावायया ॥ ५३ ॥
माझें पावावया निजसुख । द्रव्यदारापुत्रादिक ।
त्यागूनि सांडिती निःशेख । यापरी देख अनुतापी ॥ ५४ ॥
आवडीं करितां माझें भजन । विसरे भोगाची आठवण ।
माझे प्राप्तीलागीं जाण । रिता क्षण जावों नेदी ॥ ५५ ॥
माझोनि उद्देशें परम । करी श्रौतस्मार्त स्वकर्म ।
अग्निहोत्रादि याग परम । व्रत नेम भजलागीं ॥ ५६ ॥
माझें ठाकावया चिद्रूप । गायत्रादि मंत्रजप ।
माझें पावावया निजस्वरूप । दुष्कर तप आचरती ॥ ५७ ॥
मी विश्वात्मा विश्वतोमुखी । विश्वंभर होतसें सुखी ।
यालागीं तो दीनमुखीं । करी आवश्यकीं अन्नदान ॥ ५८ ॥
हृदयीं मी स्वतःसिद्ध जाण । त्या माझें करूनि आवाहन ।
आपण करी जें भोजन । तेंही मदर्पण तो करी ॥ ५९ ॥
कवळकवळीं हरिस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण ।
यापरी माझे भक्त जाण । कर्म मदर्पण स्वयें करिती ॥ २६० ॥
ऐशीं सर्व कर्में कृष्णार्पण । सर्वदा जो करी जाण ।
त्यांचे मन होय मदर्पण । तेंचि निरूपण देवो सांगे ॥ ६१ ॥
एवं धर्मैर्मनुष्याणामुद्धवात्मनिवेदिनाम् ।
मयि सञ्जायते भक्तिः कोऽन्योऽर्थोऽस्यावशिष्यते ॥ २४ ॥
सर्व कर्में मदर्पण । करितां शुद्ध होय मन ।
जेवीं लोह कमावितां जाण । होय दर्पण सोज्ज्वळ ॥ ६२ ॥
पुटीं घालितां सुवर्ण । अधिक तेज चढे जाण ।
करितां वस्त्राचें क्षाळण । स्वच्छपण धोवटी ॥ ६३ ॥
तैसीं सर्व कर्में मदर्पण । करितां निर्मळ होय मन ।
ते काळीं मनाचें अर्पण । मद्रूपीं जाण हों लागे ॥ ६४ ॥
पूर दाटलिया सरितांसी । सवेग ठाकती सिंधूसी ।
तेवीं निर्मळत्वें मनासी । माझ्या स्वरूपासी पावणें ॥ ६५ ॥
माझे स्वरूपीं मनाचे स्थिती । तैं आर्त जिज्ञासु अर्थार्थी ।
हे तीनही ते काळीं हारपती । माझी भक्ती चौथी उल्हासे ॥ ६६ ॥
माझें भांडवल मज एक भक्ती । तेथ दुजी तिजी आणि चौथी ।
हे साधकांची साधनभ्रांती । बहुता भक्ती मज नाहीं ॥ ६७ ॥
तेचि माझी मुख्य भक्ती । येणें साधनें होय प्राप्ती ।
जे भक्तीस्तव भक्त म्हणविती । ब्रह्मा उमापती सनकादिक ॥ ६८ ॥
निःशेष मावळल्या अहंकृती । भूतें निजात्मरूप दिसती ।
माझ्या स्वरूपाची `सहजस्थिती' । ते माझी मुख्य भक्ती उद्धवा ॥ ६९ ॥
ये भक्तीच्या लेशस्थितीं । आर्त जिज्ञासु अर्थार्थी ।
प्रकाशले गा वर्तती । निजस्वार्थी साधक ॥ २७० ॥
हेचि आर्ताच्या विषयीं । आर्तीतें प्रकाशी पाहीं ।
मग आर्त' ऐसे त्याच्या ठायीं । नांवाची नवायी उपतिष्ठे ॥ ७१ ॥
रोगिया नांव आर्तता । हें व्याख्यान नव्हे परमार्था ।
भगवत्प्राप्तीची तीव्र व्यथा । ते आर्तता परमार्थी ॥ ७२ ॥
जो भगवंताचे प्राप्तीलागीं । कडां घालूं धांवे वेगीं ।
कां रिघों पाहे जळते आगीं । तो `आर्ता' सावेगीं बोलिजे ॥ ७३ ॥
आर्ताची स्थिति ऐसी । जिज्ञासु निवारी त्यासी ।
मनुष्यदेह ब्रह्मप्राप्तीसी । तो आत्महत्येसी नको योजूं ॥ ७४ ॥
मागील भक्त कोणें रीतीं । जाणोनि पावले भगद्भक्ती ।
जीवेंभावें त्या विवरी युक्ती । `जिज्ञासा' निश्चितीं या नांव ॥ ७५ ॥
मज जाणावयाची ऐशी जे आशा । तीतें म्हणती शुद्ध `जिज्ञासा' ।
तेही प्रकाशक माझ्या प्रकाशा । मी जिज्ञासु ऐसा तेणें जाणें ॥ ७६ ॥
ब्रह्मप्रापक युक्तीचा ठसा । या नांव `शुद्ध-जिज्ञासा' ।
वेदशास्त्रजाणीववळसा । `लौकिक-जिज्ञासा' त्या नांव ॥ ७७ ॥
सर्वां अर्थीं मीचि अर्थना । शुद्ध `अथार्थी' या नांव जाणा ।
म्हणती अर्थार्थीं द्रव्यकामना । ते मंद व्याख्याना प्रवर्तती ॥ ७८ ॥
दृष्टी पडे नाना अर्थीं । जो विवंचोनि लावी परमार्थीं ।
त्या नांव बोलिजे `अर्थार्थीं' । त्यातेंही निजभक्ती प्रकाशे माझी ॥ ७९ ॥
एवं आर्त-जिज्ञासु-अर्थार्थी । त्यांतें प्रकाशे माझी `सहजभक्ती' ।
तीतें भक्त चतुर्धा मानिती । अधिकारस्थितिविभागें ॥ २८० ॥
भक्त कल्पनेचिया भ्रांती । माझी भक्ति चतुर्धा मानिती ।
ते मिथ्या गा वदंती । माझी निजभक्ती एकली ॥ ८१ ॥
ऐशिये निजभक्तीची प्राप्ती । आत्मनिवेदनाची स्थिती ।
उद्धवा म्यां तुजप्रती । यथानिगुतीं निरूपिली ॥ ८२ ॥
माझिये निजभक्तीचें सार । भक्त पावले जे साचार ।
त्यांचे सर्वही व्यापार । मदाकार होऊनि ठाकती ॥ ८३ ॥
तो जेउती वास पाहे । ते दिशाचि मी होऊनि ठायें ।
तो जेउतें चालवी पाये । ते धरा मी होयें धराधर ॥ ८४ ॥
तो करूं बैसल्या भोजन । षड्रस होय मी आपण ।
त्यासी करावया प्राशन । निजजीवन मी होयें ॥ ८५ ॥
त्यासी चालतां निजपदीं । बोधें दृष्याची निवारीं मांदी ।
शांति पायघड्या घाली आधीं । करी पदोपदीं निंबलोण ॥ ८६ ॥
शम दम आज्ञाधारी । हात जोडूनि उभे द्वारीं ।
ऋद्धिसिद्धी दासी घरीं । विवेक कामारी घरींचा सदा ॥ ८७ ॥
त्याचा बैसता अवकाश । अंगें मी होय हृषीकेश ।
तो निजावया सावकाश । समाधि मी त्यास आंथुरीं ॥ ८८ ॥
तो जे कांहीं बोल बोले । ते निःशब्द ब्रह्म-शब्दा आलें ।
यालागीं श्रोत्यांसी वहिलें । होय भलें समाधान ॥ ८९ ॥
तो अवलीला बोले वोठीं । शब्दासवें माझी गोठी उठी ।
श्रोत्यांची तथ पडे मिठी । स्वभावें गोठी ऐकतां ॥ २९० ॥
चढतां परेचे उपरी । वैकुंठ कैलास पायरी ।
उन्मनी घालोनि बाहेरी । सुखशेजारीं तो पहुडे ॥ ९१ ॥
मिळोनियां मुक्ती चारी । पाणी वाहती त्याच्या घरीं ।
श्रीसहित राबें मी श्रीहरी । येरांची थोरी कोण पुसे ॥ ९२ ॥
अवचटें ये त्याच्या मुखासी । म्हणे ज्यासी `तूं उद्धरिलासी' ।
तो माथां वाहें मी हृषीकेशी । शब्दें निजधामासी पाववीं वेगीं ॥ ९३ ॥
जे पावले माझी `सहजभक्ती' । त्यांचे लळे पाळीं मी या रीतीं ।
त्यांची मज अनन्य प्रीती । सांगों किती उद्धवा ॥ ९४ ॥
बहुत बोलीं काय कारण । मी देहो तो आत्मा जाण ।
तो माझा जीवप्राण । हे जाणती खूण निजभक्त ॥ ९५ ॥
नांदतां सहजभक्ती' आंत । मी देवो तो माझा भक्त ।
येरवीं मी सगळा त्याआंत । तो समस्त मजमाजीं ॥ ९६ ॥
निजभक्त मजभीतरीं । मी तया आंतबाहेरी ।
ऐसे सामरस्यें नांदों भारी । वेगळे बाहेरीं नाममात्र ॥ ९७ ॥
माझिया सायुज्या जे आले । ते मीचि होऊनियां ठेले ।
परी मी होऊनि मज भजलें । ते `भक्त' मानिले म्यां ऐसे ॥ ९८ ॥
सायुज्यापरीस भक्ति गोड । याचि निरूपणांचे कोड ।
उद्धवा तुझी जाणोनि चाड । विशद निवाड सांगितला ॥ ९९ ॥
ऐशिया माझ्या निजभक्तांसी । अवशेष अर्थ नुरेचि त्यांसी ।
मी तुष्टलों गा हृषीकेशी । निज भावासी सर्वस्वें ॥ ३०० ॥
भक्तिप्राधान्य भागवतशास्त्र' । तें निजभक्तीचें निजसार ।
तुज मी सांगितले साचार । अत्यादरपूर्वक ॥ १ ॥
उद्धवा तुझे प्रीतीचेनि व्याजें । मज गुह्यांचें निजगुह्य हें जें ।
तें भक्तीचें करूनियां खाजें । तुज म्यां वोजें दीधलें ॥ २ ॥
म्यां सांगितलें जैशा रीतीं । तैशी सेवावी माझी निजभक्ती ।
ऐसें बोलत श्रीपती । उद्धव प्रीतीं उचलिला ॥ ३ ॥
मागां टाकूनि पीतांबरें । सांडोनियां शंखचक्रें ।
उद्धव उचलिला श्रीधरें । तरी प्रेम न सांवरे देवाचें ॥ ४ ॥
हांव न बाणेचि दों करीं । मग चारी भुजा पसरी ।
उद्धवातें हृदयावरी । प्रीतीं थोरीं आलिंगी ॥ ५ ॥
हृदयीं हृदय एक जाहलें । ये हृदयींचें ते हृदयीं घातिलें ।
कृष्णें सर्वस्व जें आपुलें । तें हृदयीं सूदलें उद्धवाचे ॥ ६ ॥
देव आवाप्तकाम निचाड । त्यासीही भक्तीची ऐसी चाड ।
अतिशयें उद्धव लागला गोड । स्वानंदें कोड पुरवी त्याचें ॥ ७ ॥
उद्धव प्रेमाचा लवलाहो । आलिंगन सोडूं विसरे देवो ।
कृष्णहृदया हृदय जडल्या पहा हो । उद्धवा उद्धवो विसरला ॥ ८ ॥
ऐसे स्वानंदीं वाडाकोडा । दोघेहि मिसळले निचाडचाडा ।
भक्तिसुखाचा सुरवाडा । उद्धव गाढा मीनला ॥ ९ ॥
कृष्णें सर्वस्व आपुलें । उद्धवाचे हृदयीं सूदलें ।
हें उद्धवा कळों नाहीं दीधलें । लाघव केलें गोविंदें ॥ ३१० ॥
हा अर्थ कळल्या उद्धवासी । हा येईल मजसी ऐक्यासी ।
पुढील कथा सुरस ऐसी । मग कोणापाशीं सांगावी ॥ ११ ॥
उद्धवा मज वाडेंकोडें । अखंड हेंचि बोलों आवडे ।
परी तैसा श्रोता न जोडे । हें थोर सांकडें मजलागीं ॥ १२ ॥
भक्तिसुखाचा सुरवाड । सांगतां माझें पुरे कोड ।
ऐसा श्रोता कैंचा गोड । यालागीं उद्धवा आड प्रेम सूये ॥ १३ ॥
सूर्यापासूनि फांकती किरण । तैसें सुटलें आलिंगन ।
कृष्ण उद्धव जाहले भिन्न । परी अभिन्नपण मोडे ना ॥ १४ ॥
पुढील कथेची संगती । दूर ठेली श्लोकसंगती ।
श्रोतां विरुद्ध न घ्यावें चित्तीं । समूळार्थ निश्चितीं विचारावा ॥ १५ ॥
मूळींचें पद संकोचित । तेथ उत्तम भक्तिभावार्थ ।
स्वयें बोलिला श्रीकृष्णनाथ । तोचि म्यां अर्थ विस्तरिला ॥ १६ ॥
नारळांतल्या वस्त्राची घडी । उकलितां थोर वाढे वाढी ।
तेवीं मूळपदाची घडामोडी । कथा एवढी विस्तारली ॥ १७ ॥
मूळपदाचा पदपदार्थ । श्लोकीं पहावा सावचित्त ।
श्लोकौत्तरार्धीं भगवंत । ध्वनितार्थ बोलोनि गेला ॥ १८ ॥
त्याचि ध्वनिताचे पोटीं । होती भक्तिरहस्याची पेटी ।
ते म्यां उघडूनि दाविली दिठीं । वृथा चावटी झणें म्हणाल ॥ १९ ॥
तंव श्रोते म्हणती नवल येथ । मूळींचें पद होतें गुप्त ।
तें काढिलें भक्तिसारामृत । सुहृदयस्थ हरीचें ॥ ३२० ॥
तुझे हृदयीं श्रीकृष्णनाथ । प्रकटोनि आपुलें हृद्गत ।
ग्रंथीं असे बोलवित । हें सुनिश्चित कळलें आम्हां ॥ २१ ॥
आम्हा ऐकतां भक्तिसारामृत । चित्तीं चैतन्य उथळत ।
होशी देखणा सुनिश्चित । ग्रंथ यथार्थ अर्थिला ॥ २२ ॥
हें ऐकोनि संतांचे वचन । हरिखला एकाजनार्दन ।
मस्तकीं वेदिले श्रीचरण । पुढील निरूपण अवधारा ॥ २३ ॥
निजभक्तीचे दृढीकरण । आदरें करिताहे श्रीकृष्ण ।
सांगितलें तेंचि निरूपण । पुढती जाण सांगता ॥ २४ ॥
यदाऽऽत्मन्यर्पितं चित्तं शान्तं सत्त्वोपबृंहितम् ।
धर्मं ज्ञान सवैराग्यमैश्वर्यं चभिपद्यते ॥ २५ ॥
आपुलें जें कां अंतःकरण । तें करितां गा मदर्पण ।
माझी निजभक्ति उल्हासे जाण । जिचें निरूपण म्यां केलें ॥ २५ ॥
मद्रूपीं अर्पावया मन । सुगम वर्म सांगेन जाण ।
माझें करितां नामस्मरण । पापनिर्दळण तेणें होय ॥ २६ ॥
सकाम स्मरतां नाम । नाम पुरवी सकळ काम ।
निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें ॥ २७ ॥
होतां पापाचें क्षालण । रज तम जिणोनि जाण ।
सहजें वाढे सत्त्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥ २८ ॥
स्वधर्मनिष्ठ सत्त्वगुणें । अढळ पडे वैराग्याचें ठाणें ।
वैराग्यें विषय निर्दळणें । निजज्ञान तेणें प्रकाशे ॥ २९ ॥
वाढल्या सविवेक ज्ञान । लागे स्वरूपाचें अनुसंधान ।
चढे शांतीचें समाधान । तैं मदर्पण मन होये ॥ ३३० ॥
मन जाहल्या मदर्पण । निजभक्ति उल्हासे जाण ।
जिचें गतश्लोकीं निरूपण । म्यां संपूर्ण सांगितलें ॥ ३१ ॥
निजभक्ति पावल्या संपूर्ण । भक्तें न मागतां जाण ।
अष्ट महासिद्धी आपण । त्याचें आंगण वोळंगती ॥ ३२ ॥
जो सिद्धींकडे कदा न पाहे । त्यासी अवशेष कोण अर्थ राहे ।
माझी संपूर्ण पदवी लाहे । मदैक्य होये मद्भक्तां ॥ ३३ ॥
ऐशी न जोडतां माझी भक्ती । न लाभतां आत्मस्थिती ।
वर्तणें जैं विषयासक्तीं । तैं अनर्थप्राप्ती अनिवार ॥ ३४ ॥
यदर्पितं तद्विकल्पे इंद्रियैः परिधावति ।
रजस्वलं चासन्निष्ठं चित्तं विद्धि विपर्ययम् ॥ २६ ॥
जो सत्य न मानी वेदशास्त्रार्थ । साच न म्हणे तो परमार्थ ।
जो ग्रहदाराद्रव्यासक्त । लोलंगत विषयांसी ॥ ३५ ॥
तेणें अत्यंत समळमेळें । दारुण रजोगुण खवळे ।
तेणें चित्त होय ज्ञानांधळें । विपरीत कळे ज्ञानार्थ ॥ ३६ ॥
ज्यासी विषयांच्या युक्ती गहन । त्यासी म्हणती अतिसज्ञान ।
जो करी युक्तीचें छळण । होय मान्य पंडितपणें ॥ ३७ ॥
ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार । त्यास म्हणती भाग्य थोर ।
जो नाना भोगीं पाळी शरीर । सुकृती नर त्या म्हणती ॥ ३८ ॥
जो अनुपाती परमार्थविखीं । त्यासी म्हणती परम दुःखी ।
जो नाना विषयांतें पोखी । त्यांते महासुखी मानिती ॥ ३९ ॥
ज्याचेनि बोलें मनुष्य मरे । त्याचें सिद्धत्व मानिती खरें ।
जो उदास राहटे अनाचारें । मुक्त निर्धारे तो म्हणती ॥ ३४० ॥
ज्याचा दांभिक आचार । त्यातें म्हणती पवित्र नर ।
जे स्त्रियादि शूद्रां देती मंत्र । ते ज्ञाते थोर मानिती ॥ ४१ ॥
जो कां अनुतापी वैरागी । त्यानें म्हणती अतिअभागी ।
जो उघड विषयांतें भोगी । तो राजयोगी मानिती ॥ ४२ ॥
स्वयें द्रव्याचा अभिलाखी । द्रव्य वेंची त्यातें मूर्ख लेखी ।
न वेंची त्यातें म्हणती विवेकी । धर्मज्ञ लोकीं हा एक ॥ ४३ ॥
ज्याचे गांठी बहुसाल धन । तो सर्वांसी अवश्य मान्य ।
तोचि पवित्र तोचि सज्ञान । ऐसें विपरीत ज्ञान हों लागे ॥ ४४ ॥
आपण सर्वात्मा सर्वेश । हें विसरोनियां निःशेष ।
अधर्मी अकर्मी अनीश । मी अज्ञान पुरुष हें मानी ॥ ४५ ॥
तेथ कैं उपजे माझी भक्ती । कैसेनि होईल माझी प्राप्ती ।
ऐसे भ्रमले नेणों किती । संसारआवर्ती वर्ततां ॥ ४६ ॥
परमात्मप्राप्तीचीं कारणें । अतिगुह्य चारी लक्षणें ।
पोटंतुल्या कृपागुणें । उद्धवाकारणें हरि सांगे ॥ ४७ ॥
धर्माची भजन भोय । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।
माझी प्राप्ती अवश्य होय । ते चारी उपाय अवधारीं ॥ ४८ ॥
धर्मो मद्भक्तिकृत्प्रोक्तो ज्ञानं चैकात्म्यदर्शनम् ।
गुणेष्वसङ्गो वैराग्यमैश्वर्यं चाणिमादयः ॥ २७ ॥
ऐक उद्धवा निजवर्म । गुह्य सांगेन मी परम ।
माझी भक्ति जे सप्रेम । उत्तम `धर्म' तो जाण ॥ ४९ ॥
ऐक्यें एकात्मता निजबोध । परतोनि कदा नुपजे भेद ।
या नांव गा `ज्ञान' शुद्ध । कृष्ण परमानंद सांगत ॥ ३५० ॥
धनधान्य रत्नांच्या राशी । उर्वशी आल्या शेजारासी ।
तें अवघें तृणप्राय ज्यासी । `वैराग्य' त्यासी आम्ही म्हणों ॥ ५१ ॥
ऐक उद्धवा सुबुद्धी । माझ्या ज्या अष्ट महासिद्धी ।
त्या मजवेगळ्या दूरी कधीं । जाण त्रिशुद्धी न ढळती कदा ॥ ५२ ॥
माझे निजभक्तीच्या निर्धारीं । जो माझी पदवी घे ऐक्येंकरीं ।
माझ्या सिद्धी त्याच्या घरीं । होती किंकरी निजदासी ॥ ५३ ॥
सिद्धी सेवा करिती । हेंचि नवल सांगों किती ।
श्रियेसहित मी श्रीपती । भक्तांची भक्ती सर्वस्वें करीं ॥ ५४ ॥
ऐश्वर्याचें मुख्य लक्षण' । अतिशयेंसी संपूर्ण ।
भगवत्पदवी घेणें आपण । अतिसंपन्न ऐश्वर्यें ॥ ५५ ॥
म्यां हे सांगितली जे बोली । ते निजगुह्यभांडाराची किल्ली ।
येणें उघडूनि स्वानंदखोली । भोगीं आपुली सुखसिद्धी ॥ ५६ ॥
चहूं पदांचीं उत्तरें । वाखाणिलीं अतिगंभीरें ।
ऐकोनि उद्धव चमत्कारें । अत्यादरें विस्मित ॥ ५७ ॥
धर्मादि चहूं पदांचा अर्थ । अलोलिक सांगे श्रीकृष्णनाथ ।
तरी यमादिकांचा उत्तमार्थ । देवासी प्रत्यक्ष पुसो पां ॥ ५८ ॥
गुह्यार्थ सांगेल श्रीकृष्ण । यालागीं यमादिकांचे प्रश्न ।
उद्धव पुसताहे आपण । परमार्थ पूर्ण आकळावया ॥ ५९ ॥
पांच श्लोक पंचतीस प्रश्न । उद्धवें केलें ज्ञानगहन ।
ज्याचें ऐकतां प्रतिवचन । समाधान जीवशिवां ॥ ३६० ॥
पहिल्या श्लोकींचे सहा प्रश्न । दुसर्यामाजीं नव जाण ।
तिसरा चौथा आठ आठ पूर्ण । चारी प्रश्न पंचमीं ॥ ६१ ॥
उद्धव उवाच-
यमः कतिविधः प्रोक्तो नियमो वाऽरिकर्शन ।
कः शमः को दमः कृष्ण का तितिक्षा र्थतिः प्रभो ॥ २८ ॥
अहंरिपुनिर्दळणा श्रीपती । `यम' `नियम' प्रकार किती ।
शम' `दम' `कोण म्हणीजेती तितिक्षा' `धृती' ते कैशी ॥ ६२ ॥
किं दानं किं तपः शौर्यं किं सत्यमृतमुच्यते ।
कस्त्यागः किं धनं चेष्टं को यज्ञः का च दक्षिणा ॥ २९ ॥
कोण दान' कोण `तप' येथ । शौर्य' कोण कैसें तें `सत्य' ।
ऋत' जें कां म्हणिजेत । तेंही निश्चित सांगावें ॥ ६३ ॥
कोणता जी `त्याग' येथें । इष्ट धन' कोण पुरुषातें ।
यज्ञ' कशातें म्हणिजेतें । दक्षिणा' तेथें ते कायी ॥ ६४ ॥
पुंस किंस्विद्बलं श्रीमन् दया लाभश्च केशव ।
का विद्या ह्रीः परा का श्रीः किं सुखं दुःखमेव च ॥ ३० ॥
पुरुषासी बळाची' कोण शक्ती । `दया' बोलिजे कोणे स्थितीं ।
लाभ' तो कोण गा श्रीपती । सांग कृपामूर्ती केशवा ॥ ६५ ॥
विद्या' म्हणावें कशातें । लज्जा' कोणे ठायीं वर्ते ।
उत्कृष्ट लक्ष्मी' कोण येथें । तेही अनंतें सांगावी ॥ ६६ ॥
येथील कोण पां कैसें सुख' । मज सांगावें कृपापूर्वक ।
सुखाचे सांगाती जें दुःख' । त्याचेंही रूपक सांगावें ॥ ६७ ॥
कः पण्डितः कश्च मूर्खः कः पन्था उत्पथश्च कः ।
कः स्वर्गो नरकः कः स्वित्को बन्धुरुत किं गृहम् ॥ ३१ ॥
पण्डिताचें' काय लक्षण । `मूर्ख' म्हणावया कोण गुण ।
सुमार्ग' म्हणावया तो कोण । सांगे निरूपण उन्मार्गाचें' ॥ ६८ ॥
स्वर्ग' कशातें बोलिजे । `नरक' कैसा वोळखिजे ।
सखा बंधु' कोण म्हणिजे । `गृह' माझें तें कोण ॥ ६९ ॥
क आढ्यः को दरिद्रो वा कृपणः कः क ईश्वरः ।
एतान् प्रश्नान्मम ब्रूहि विपरीतांश्च सत्पते ॥ ३२ ॥
आढ्य' कैसेनि म्हणिजे । दरिद्री' कैसेनि जाणिजे ।
कृपण' कोणातें बोलिजे । ईश्वर' वोळखिजे तो कैसा ॥ ३७० ॥
हे माझे प्रश्न जी समस्त । यांचा सांगावा विशदार्थ ।
जो लौकिकाहूनि विपरीत । उपयुक्त परमार्थ ॥ ७१ ॥
लौकिकाहूनि विपरीतार्थ । त्यातें बोलती गा `विपरीत' ।
या अवघियांचा मथितार्थ । परमार्थयुक्त प्रश्न सांगा ॥ ७२ ॥
ज्ञानें सज्ञान संतमूर्ती ॥ त्यांचा स्वामी तूं निश्चितीं ।
यालागीं तूतें गा `सत्पत्ती' । सज्ञान म्हणती शास्त्रार्थें ॥ ७३ ॥
माझ्या प्रश्नांची प्रश्नोक्ती । परमार्थप्राप्तीलागीं श्रीपती ।
मज सांगावें यथार्थस्थिती । देवासी विनंती उद्धवें केली ॥ ७४ ॥
ऐकोनि भक्ताची विनवण । कृपा द्रवला नारायण ।
परमार्थरूप त्याचे प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ७५ ॥
प्रथम तीं श्लोकीं यम नियम । विशद सांगेल पुरुषोत्तम ।
इतर प्रश्न अतिउत्तम । सांगे मेघश्याम अध्यायांतीं ॥ ७६ ॥
श्रीभगवानुवाच-
अहिंसा सत्यमस्तेयमसङ्गो ह्रीरसञ्चयः ।
आस्तिक्यं ब्रह्मचर्यं च मौनं स्थैर्यं क्षमाभयम् ॥ ३३ ॥
प्रथम श्लोकींचा उभारा । यमाचीं लक्षणें बारा ।
पुशिल्या प्रश्नानुसारा । प्रतिउत्तरा हरि बोले ॥ ७७ ॥
पुढां प्रश्न आहेत फार । यालागीं यमनियमांचें उत्तर ।
आवरूनि संक्षेपाकार । स्वयें श्रीधर सांगत ॥ ७८ ॥
अहिंसा' कायावाचामनें । परपीडात्याग करणें ।
सत्य' यें यथार्थ बोलणें । `अचौर्य' लक्षणें तीं ऐक ॥ ७९ ॥
हातें चोरी नाहीं करणें । परी परद्रव्याकारणें ।
मनीं अभिलाष नाहीं धरणें । `अस्तेय' लक्षण त्या नांव ॥ ३८० ॥
असतां देहगेहसंगती । ज्याचे पोटीं नाहीं आसक्ती ।
जेवीं यात्रेमाजीं लोक येती । परी संगासक्ती त्यां नाहीं ॥ ८१ ॥
स्फटिक ठेविला ज्या रंगावरी । त्यासारिखा दिसे बाहेरी ।
आपण निर्विकार अंतरीं । तेवीं जो शरीरीं `असंगता' ते ॥ ८२ ॥
निंद्य कर्माकारणें । पोटांतूनि कंटाळणें ।
लौकिकीं निंद्य कर्मा लाजणें । `ह्रीं' म्हणणें या नांव ॥ ८३ ॥
इहलोकीं संग्रह करूं नेणें । जाणे दैवाधीन देहाचे जिणें ।
स्वर्गसुख भोगाकारणें । नाहीं संग्रहणें पुण्यातें ॥ ८४ ॥
पुण्यें स्वर्गभोगप्राप्ती । पुण्यक्षयें होय पुनरावृत्ती ।
जेणें क्षयो पावे पुण्यसंपत्ती । तें न संचिती निजभक्त ॥ ८५ ॥
या नांव गा 'असंचयो' । ऐक 'आस्तिक्याचा' निर्वाहो ।
सर्वत्र माझा ब्रह्मभावो । कोठेंही अभावो घेऊं नेणें ॥ ८६ ॥
ब्रह्मचर्य' ऐसें येथ । जैसे आश्रमप्रयुक्त ।
बोलिलें शास्त्रीं यथोचित । तेंचि निश्चित करावें ॥ ८७ ॥
मौनिं' न बोलावें इतुकें जाण । मिथ्यालाप असंभाषण ।
नित्य करावें वेदपठण । गायत्रीस्मरण कां हरिनाम ॥ ८८ ॥
स्तिरवृत्ति आत्मारामीं । कां असावी निजधर्मीं ।
भावार्थें संतसमागमीं । `स्थिरता' उपक्रमीं या नांव ॥ ८९ ॥
स्वदेह दंडिलें कां वंदिलें । परी क्षमा सम दोंही काळें ।
देहाचा भोग तो दैवमेळें । येणें विवेकमेळें क्षमावंत ॥ ३९० ॥
या नांव `क्षमा' म्हणिजे । अभय तें ऐसें जाणिजे ।
जें जें पारिखें देखिजे । तें तें होइजे आपणचि ॥ ९१ ॥
आत्मा एक पंचभूतें एक । दुजें पाहतां नाहीं देख ।
निमालें भयाचें महादुःख । `अभय' निःशेख या नांव ॥ ९२ ॥
निमाल्या दुजयाच्या गोठी । वोखदासी भय न मिळे सृष्टीं ।
अभयाची स्वानंदपुष्टी । निजदृष्टीं ठसावें ॥ ९३ ॥
या नांव गा बाराही `यम' । उद्धवा सांगितले सवर्म ।
आतां जयाचें नाम `नेम' । तेंही सुगम अवधारीं ॥ ९४ ॥
शौचं जपस्तपो होमः श्रद्धाऽऽतिथ्यं मदर्चनम् ।
तीर्थाटनं परार्थेहा तुष्टिराचार्यसेवनम् ॥ ३४ ॥
शौचाची ऐशी परी । अंतरीं शुचि विवेकेंकरीं ।
बाह्य तें वेदाज्ञेवरी । `शौच' करीं मृज्जलें ॥ ९५ ॥
परिसें जपाचा' विचार । ज्यासी जैसा अधिकार ।
तैसा जपावा नाममंत्र । कां स्वतंत्र गुरुनाम ॥ ९६ ॥
ब्राह्मणाचा जप वेदोच्चार । संन्यासी जपे ओंकार ।
द्विजन्म्यासी आगममंत्र । कां नाममंत्र सर्वांसी ॥ ९७ ॥
तपाचा जो मुख्य प्रकार । जेणें शुद्ध होय अभ्यंतर ।
तो स्वधर्मीं गा सादर । अत्यादर करावा ॥ ९८ ॥
शरीरशोषणा नांव तप । हा मूर्खाचा खटाटोप ।
हृदयीं श्रीहरि चिंतणें सद्रूप । परम `तप' या नांव ॥ ९९ ॥
ऐक होमाचा विचार । देवाचे मुख वैश्वानर ।
पंचमहायज्ञ अग्निहोत्र । `होम' साचार या नांव ॥ ४०० ॥
भजनाची अतिआवडी । कां धर्माची अधिक गोडी ।
या नांव `श्रद्धा' रोकडी । जाण धडपडी उद्धवा ॥ १ ॥
नसतांही अन्नधनें । आतिथ्यें दे समाधानें ।
मस्तकीं वंदूनियां दीनें । निववी वचनें सुखरूपें ॥ २ ॥
दीन देखोनि तत्त्वतां । अतिनम्र विनीतता ।
यथाशक्ति अर्पणें अर्था । `आतिथ्य' तत्त्वतां या नांव ॥ ३ ॥
पोटींच्या कळवळेंनि वोजा । अत्यादरें गरुडध्वजा ।
सांङ्ग साजिरी करणें पूजा । श्रद्धा समाजासंभारीं ॥ ४ ॥
मेळवूनि ब्राह्मणसंभार । श्रद्धायुक्त षोडशोपचार ।
पूजितां संतोषें मी श्रीधर । `पूजा' पवित्र ब्राह्मणांची ॥ ५ ॥
शुद्ध व्हावया अंतःकरण । करावें गा तीर्थगमन ।
तीर्थयात्रीं श्रद्धा गहन । `तीर्थाटन' या नांव ॥ ६ ॥
पदोपदीं माझें नाम । गर्जतां स्मरती माझें कर्म ।
यात्रा करणें निजनिष्काम । `तीर्थयात्रा' परम या नांव ॥ ७ ॥
परोपकारार्थ पर्वत । जेंवी कां सामग्री वाहत ।
तेवीं क्रियामात्रें उपकारार्थ । सदा वर्तत उपकारीं ॥ ८ ॥
जेवीं का चंद्राचे किरण । लागतंचि निवनिती जाण ।
तेवीं जयाचें आचरण । `उपकारें' जन सुखी करी ॥ ९ ॥
जें प्राप्त जाहलें अदृष्टीं । तेणें काळ यथासुखें लोटी ।
कदा समासम नाहीं पोटीं । `यथालाभसंतुष्टी' या नांव ॥ ४१० ॥
कायावाचामनें धनें । जो विनटला गुरूकारणें ।
त्याचें उठे संसारधरणें । `गुरुसेवा' म्हणणें या नांव ॥ ११ ॥
उभय शौचाचे दोनी गुण । जपादि येर दशलक्षण ।
हे बारा `नेम' जाण । देवो आपण बोलिला ॥ १२ ॥
एते यमाः सनियमा उभयोर्द्वादश स्मृताः ।
पुंसामुपासितास्तात यथाकामं दुहन्ति हि ॥ ३५ ॥
दोंही श्लोकीं यम नियम । निरूपिले उत्तमोत्तम ।
बारा बारा यांचें वर्म । गुह्य परम शास्त्रार्थी ॥ १३ ॥
पुरुष यांचें उपासन । जरी करी सकामन ।
तैं कामधेनूच्या ऐसें जाण । करिती पूर्ण सकळ काम ॥ १४ ॥
हेचि पैं गा यम नेम । पुरुष उपासी निष्काम ।
तैं त्यासी माझें निजधाम । अतिसुगम निजप्राप्ती ॥ १५ ॥
आतां शमदमादिक तुझे प्रश्न । जेणें हाता पावे ब्रह्मज्ञान ।
तें सांगेन गुह्य निरूपण । सावधान उद्धवा ॥ १६ ॥
प्रश्नोत्तर सांगेल श्रीकृष्ण । तें अवधारितां सावधान ।
तत्काळ होय ब्रह्मज्ञान । हें परम प्रमाण अतिगुह्य ॥ १७ ॥
तृप्त व्हावया बालकासी । निजकरें माता ग्रास दे त्यासी ।
तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मज्ञानासी देतसे ॥ १८ ॥
जो रसु गोड लागे पित्यासी । तो बळेंचि पाजी बालकासी ।
तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मरसासी देतसे ॥ १९ ॥
आधींचि तानयाचें प्रेम मोठें । वरी लागतां त्याचें मुखवटें ।
मग स्वानंदाचेनि नेटें । पान्हा लोटे अनिवार ॥ ४२० ॥
तेवीं स्वयें श्रीकृष्ण । दाटूनि देतसे ब्रह्मज्ञान ।
तेथें उद्धवें पुशिलें प्रश्न । तेणें अधिक जाण तुष्टला ॥ २१ ॥
आधींच पर्जन्य खरा । वरी मीनलासे वीजवारा ।
मग अनिवार वर्षे धारा । खणोनि धरा वाहतसे ॥ २२ ॥
तेवीं द्यावया ब्रह्मज्ञान । मिष उद्धवाचे प्रश्न ।
स्वानंदें तुष्टला श्रीकृष्ण । ब्रह्म पूर्ण देतसे ॥ २३ ॥
निमोले देतां मिठाचे खडे । चिंतामणी हातीं चढे ।
कां विटेसाठीं परीस जोडे । न घे तो नाडे निजस्वार्था ॥ २४ ॥
तेवीं उद्धवाचे थोडे प्रश्न । तेणें आतुडे ब्रह्म पूर्ण ।
एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ २५ ॥
उद्धवाचे चौतीस प्रश्न । त्यांत यम नियम जाहले जाण ।
उरले बत्तीस गुण । तेंही विवंचन अवधारा ॥ २६ ॥
प्रश्नीं दयेचें प्रतिउत्तर । न सांगेचि शारंगधर ।
त्या अर्थीं भावगर्भ सार । षड्गुणैश्वर्य बोलिलें ॥ २७ ॥
एही विखींचें व्याख्यान । पुढें सांगेल श्रीकृष्ण ।
दयेच्या ठायीं भाग्य संपूर्ण । कोण कारण सांगावया ॥ २८ ॥
एवं उरले एकतीस प्रश्न । आधिक एक सांगेल श्रीकृष्ण ।
कर्मस्वसंगम शौच' जाण । कार्यकारणसंबंधा ॥ २९ ॥
ऐसे हे तेहतीस प्रश्न । व्याख्यान सांगेल श्रीकृष्ण ।
तें करतळीं ब्रह्मज्ञान । उद्धवासी जाण देतसे ॥ ४३० ॥
शमो मन्निष्ठता बुद्धेर्दम इन्द्रियसंयमः ।
तितिक्षा दुःखसंमर्षो जिह्वोपस्थजयो धृतिः ॥ ३६ ॥
बुद्धि जे कां विवेकवंती । असार सांडूनि सार धरिती ।
तिणें मनाच्या सकळ वृत्ती । विवेकस्थिती आवरोनि ॥ ३१ ॥
त्या वृत्तीसमवेत आपण । बुद्धि परमात्मीं मिळे जाण ।
जेवीं सागरासी लवण । दे आलिंगन भावार्थें ॥ ३२ ॥
समुद्रीं मिळतां लवण । समुद्रचि होय आपण ।
तेवीं आत्मनिश्चयें बुद्धि पूर्ण । चैतन्यघन स्वयें होय ॥ ३३ ॥
ऐसा बुद्धीचा उपरम । त्यानें म्हणिजे गा `शम' ।
यापूर्वी करावया दम । तोही अनुक्रम अवधारीं ॥ ३४ ॥
शत्रूचें जें दुर्दमन । तो दमु येथें नव्हे जाण ।
करावें इंद्रियदमन । तेंही लक्षण अवधारीं ॥ ३५ ॥
जेणें सहाय होती शमासी । त्या युक्तीं राखणें इंद्रियांसी ।
विधीवेगळें नेदी भोगासी । आवरी अहर्निशीं वैराग्यें ॥ ३६ ॥
ऐसें इंद्रियांचें निग्रहण । त्या नांव गा `दम' गुण ।
आतां तितिक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ३७ ॥
महासुख आलें होये । तें जेणें उल्हासें अंगीं वाहे ।
तेणेंचि उल्हासे पाहे । दुःखही साहे निजांगीं ॥ ३८ ॥
तेज आणि महा अंधारी । नभ समत्वें अंगीं धरी ।
तेवीं जो अविकारी । सुखदुःखपरी साहता ॥ ३९ ॥
गोफणेचा सुवर्णपाषाण । लागे तो दुःखी होय पूर्ण ।
तेचि वोळखिलिया सुवर्ण । दुःख जाऊन सुख वाटे ॥ ४४० ॥
तैसें द्वंद्वांचें निजस्वरूप । वोळखिलिया सद्रूप ।
तेव्हा द्वंद्वें होती चिद्रूप । हें मुख्य स्वरूप तितिक्षेचें ॥ ४१ ॥
सांडूनियां देहअहंते । सुखदुःखांहीपरतें ।
देखणें जें आपणातें । तेचि येथें `तितिक्षा' ॥ ४२ ॥
स्वप्नींचे दरिद्र आणि सधनता । जागृतीसी दोन्ही मिथ्या ।
तेवीं सुखदुःखापरता । देखणें तत्त्वतां ते `तितिक्षा' ॥ ४३ ॥
जिव्हा आणि दुसरें शिश्न । यांचा जयो करावा आपण ।
या नांव `धृति' संपूर्ण । विद्याधारण धृती नव्हे ॥ ४४ ॥
जेवीं कृष्णसर्प धरिजे हातीं । हे दोनी धरिजे तैशिया रीतीं ।
अळुमाळ ढिलावतां धृती । परतोनि खाती धरित्यासी ॥ ४५ ॥
ज्यासी द्रव्यदारासक्ती । तेथ कदा न रिगे हे धृती ।
द्रव्यदाराअनासक्ती । त्याचे घरीं धृती पोषणी सदा ॥ ४६ ॥
दण्डन्यासः परं दानं कामत्यागस्तपः स्मृतम् ।
स्वभावविजयः शौर्यं सत्यं च समदर्शनम् ॥ ३७ ॥
सर्व भूतांसी न द्यावें दुःख । याचे पोटीं आलें सुख ।
महादान' तें हेंचि देख । द्यावें सुख सर्वांसी ॥ ४७ ॥
दुःख निरसूनि भूतांसी । सुख देणें गा सर्वांसी ।
हेंचि उत्तम दान पृथ्वीसी । आन यासी तुकेना ॥ ४८ ॥
जन्ममरणाचें दुःख । निरसूनि द्यावें निजसुख ।
याचि नांवें `दान' देख । अलौकिक उद्धवा ॥ ४९ ॥
या नांव गा `परमदान' । उद्धवा निश्चयेंसीं जाण ।
ऐक तपाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥ ४५० ॥
करूनियां कामाचा त्याग । तप करणें तें अतिचांग ।
हृदयीं असतां कामदाघ । तपाचें लिंग शोभेना ॥ ५१ ॥
सकाम वना जाय तपासी । तो वनींही चिंती वनितेसी ।
तें तपचि बाधक होय त्यासी । काम आंगेंसीं वर्ततां ॥ ५२ ॥
त्यागोनि कामाची कामस्थिती । तैं तपाची उत्तम गती ।
अखंड लागे माझी स्मृती । `शुद्धतप' प्राप्ती या नांव ॥ ५३ ॥
माझ्या ठायीं अनुताप । त्या नांव गा `शुद्ध' तप ।
कां हृदयीं चिंतितां चित्स्वरूप । हें `परमतप' तपांमाजीं ॥ ५४ ॥
ऐक शौर्याचा विचार । रणीं मर्दूनि अरिवीर ।
जिंतिला शत्रूंचा संभार । तो एथ शूर मानेना ॥ ५५ ॥
प्रवाहरूपें अनिवार । जीवभाव लागला थोर ।
त्यातें जिंके जो महावीर । तो `परम शूर' बोलिजे ॥ ५६ ॥
माझा सदाचार निर्वाहो । मी सज्ञान निःसंदेहो ।
माझा पवित्र ब्राह्मणदेहो'' । हा `जीवभावो' जीवाचा ॥ ५७ ॥
देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म ।
तो कर्माभिमान ज्यां परम । त्यांसी देहभ्रम अनिवार ॥ ५८ ॥
जिणोनि जीवाचे स्वभाव । चिदानंदाची राणीव ।
भोगिजे स्वराज्यवैभव । हें परम गौरव शौर्याचें ॥ ५९ ॥
ज्या नांव बोलिजे निजसत्य । तें मी सांगेन निश्चित ।
सम ब्रह्म देखणें संतत । तें `परम सत्य' उद्धवा ॥ ४६० ॥
वस्तु न देखतां सर्वसम । जें जें देखणें गा विषम ।
तेंचि असत्य अतिदुर्गम । `सत्य' तें ब्रह्म समसाम्य ॥ ६१ ॥
केवळ जें सत्य भाषण । तें निजसत्य नव्हे जाण ।
तेचिविखींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६२ ॥
ऋतं च सूनृता वाणी कविभिः परिकीर्तिता ।
कर्मस्वसङ्गमः शौचं त्यागः संन्यास उच्यते ॥ ३८ ॥
इतर कवींची वदंती । `ऋत' या नांव सत्य म्हणती ।
हें सत्य मानावें प्रवृत्तीं । सम ब्रह्म निवृत्तीमाजीं सत्य ॥ ६३ ॥
ऋत म्हणिजे तें ऐसें येथ । सत्य वाचा जें श्रोत्यांचें हित ।
तेंही दुःखसंबंधरहित । `ऋत' निश्चित या नांव ॥ ६४ ॥
चित्रीं पाहतां दिसे विषम । त्यामाजीं भिंती सदा सम ।
तेवीं जग देखतां विषम । ज्यां ब्रह्म सम निजबोधें ॥ ६५ ॥
या नांव गा `सत्य' जाण । उद्धवें केला नाहीं जो प्रश्न ।
त्या शौचाचें निरूपण । देवो आपण सांगत ॥ ६६ ॥
नव्हतां शुद्ध अंतःकरण । त्याग संन्यास न घडे जाण ।
अंतरशुद्ध्यर्थ शौच पूर्ण । स्वधर्माचरण हरि सांगे ॥ ६७ ॥
अंतरीं कर्ममळाचें बंधन । त्याचें स्वधर्में करावें क्षालन ।
कर्मे कर्माचें निर्दळण । करूनि आपण निष्कर्म व्हावें ॥ ६८ ॥
ते स्वधर्मीं फळाशा सुटता । कर्मबंधनें तुटती सर्वथा ।
यालागीं फळनिराशता । अंतरशौचता अतिशीघ्र ॥ ६९ ॥
नैराश्यें स्वधर्माचरण । तेणें अंतरमळाचें क्षालन ।
या नांव गा शौच जाण । `शौच' संपूर्ण नैराश्यें ॥ ७० ॥
शौच' शुद्धअंतःकरणीं । ते भूमिका संन्यासग्रहणीं ।
यालागीं शौच अप्रश्नीं । सारंगपाणी बोलिला ॥ ७१ ॥
सकळ संकल्पांचा त्याग । हाचि पैं `संन्यास' चांग ।
ऐसें बोलिला तो श्रीरंग । `त्याग' तो चांग या नांव ॥ ७२ ॥
मी देह हे दृढता जीवीं । संकल्पें तगमग नित्य नवी ।
बाह्य दंड कमंडलु भगवीं । हें संन्यासपदवी लौकिक ॥ ७३ ॥
धर्म इष्टं धनं नॄणां यज्ञोऽहं भगवत्तमः ।
दक्षीणा ज्ञानसंदेशः प्राणायामः परं बलम् ॥ ३९ ॥
धन धान्य पशु रत्न । हें प्राण्यासी नव्हे इष्ट धन ।
मोक्षामार्गीं सबळ जाण । इष्ट धन तो धर्म ॥ ७४ ॥
घरीं जें पुरिलें धन । तें घरींच राहे जाण ।
धर्म तो स्वयें चालतें धन । अंगा बंधन येवो नेदी ॥ ७५ ॥
धर्मिष्ठायेवढा कृपण । न देखें मी आणिक जाण ।
मरतांही स्त्रीपुत्रां वंचून । अवघेंचि धन सवें ने ॥ ७६ ॥
धार्मिकीं धर्मार्थ वेंचूनि धन । मी भांडारी केला नारायण ।
जे समयीं जें जें लागे जाण । तें मी आपण स्वयें पुरवीं ॥ ७७ ॥
यालागीं धर्म तो इष्ट धन । हें सत्य सत्य माझें वचन ।
ऐक यज्ञाचें व्याख्यान । यथार्थ जाण सांगतों ॥ ७८ ॥
अग्नि तो माझें मुख जाण । यज्ञभोक्ता मी नारायण ।
अवघा यज्ञचि मी श्रीकृष्ण । परम प्रमाण वेदोक्त ॥ ७९ ॥
तेथें माझें स्वरूप ब्राह्मण । मद्दीक्षादीक्षित जाण ।
सद्भावें करूनियां यजन । माझें सुख संपूर्ण पावले ॥ ४८० ॥
तेथ अधर्मद्रव्याचेनि कोडें । अविधी दांभिक याग घडे ।
तोही मज मुखींच पडे । परी ते कोरडे खडखडीत ॥ ८१ ॥
अविधी जाहले पशुघातकी । तेणें अवदानें मी नव्हें सुखी ।
दंभे पडले कुंभिपाकीं । महानरकीं रौरवीं ॥ ८२ ॥
सर्व भूतांच्या भूतमुखीं । अर्पी तें पावे यज्ञपुरुखीं ।
हे दीक्षा नेणोनि याज्ञिकीं । जाहले नारकी हिंसादोषें ॥ ८३ ॥
जो मद्भावें दीक्षित जाण । विश्वतोमुखीं ज्यांचे यजन ।
तयांचा `यज्ञ' तो मी नारायण । दक्षीणा कोण ते ऐका ॥ ८४ ॥
यज्ञासी मोल नाहीं देख । ज्यासी ज्ञानदक्षिणा अमोलिक ।
हातां येतांचि याज्ञिक । महासुख पावले ॥ ८५ ॥
दक्षिणा आल्या ज्ञानघन । याज्ञिक होती अतिसंपन्न ।
कल्पांतीं वेंचेना तें धन । निजीं समाधान जीवशिवां ॥ ८६ ॥
सर्वांमाजीं प्राण सबळ । प्राणबळें बळी सकळ ।
प्राणयोगें मन चपळ । अतिचंचळ प्राणस्पंदे ॥ ८७ ॥
यापरी गा बळिष्ठ प्राण । प्राणाअधीन सदा मन ।
तो प्राण जिंकावा आपण । `बळवंतपण' या नांव ॥ ८८ ॥
गज उपडिजे पायीं धरून । घायीं चूर कीजे पंचानन ।
प्राण न जिंकतां जाण । शूरांचें प्रमाण नव्हे बळ ॥ ८९ ॥
प्राणाअधीन जीव मन । त्या प्राणाचें करूनि दमन ।
तो स्वयें कीजे गा स्वाधीन । `अतिबळ' जाण या नांव ॥ ४९० ॥
दृढ प्राणायाम साधिल्यापाठीं । थोरला देवो धांवे भेटी ।
भेटलिया न सुटे मिठी । ऐसा `बळी' सृष्टीं प्राणायामी ॥ ९१ ॥
भगो म ऐश्वरो भावो लाभो मद्भक्तिरुत्तमः ।
विद्याऽऽत्मनि भिदाबाधो जुगुप्सा ह्रीरकर्मसु ॥ ४० ॥
उद्धवें पुशिला दयेचा प्रश्न । तें न सांगोनि श्रीकृष्ण ।
परम भाग्याचें निरूपण । स्वयें आपण सांगत ॥ ९२ ॥
केवळ भाग्येंवीण । दया तितुकी वांझ जाण ।
यालागीं भाग्यनिरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ९३ ॥
म्हणसी कृपणाचें भाग्य । तो असतेनि धनें अभाग्य ।
परम भाग्य त्याचें चांग । जो दयेतें साङ्ग प्रतिपाळी ॥ ९४ ॥
त्या परम भाग्याचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
ऐक तेथींची उणखूण । उदारपण भाग्याचें ॥ ९५ ॥
ज्ञान' आणि `वैराग्य' पूर्ण । `लक्ष्मी' आणि `औदार्य' गुण ।
`ऐश्वर्य' आणि `यश' गहन । हे षड्गुण जाण महाभाग्य ॥ ९६ ॥
हे षड्गुण माझें भाग्य । भाग्यें पावे जो सभाग्य ।
तोचि दयेतें पाळी साङ्ग । अतिअव्यंग पूर्णत्वें ॥ ९७ ॥
जो षड्गुणेंशीं संपन्न । तोचि दीनदयाळू जाण ।
देऊं जाणे दान सन्मान । दरिद्रविच्छिन्न करूं शके ॥ ९८ ॥
ऐशिया सभाग्याची भेटी । होय तें भाग्य पाहिजे ललाटीं ।
माझ्या भाग्यास सृष्टीं । आणिक दृष्टीं दिसेना ॥ ९९ ॥
ऐसोनि ऐश्वर्यें संपन्न । तो दयेचें माहेर जाण ।
तिसी सोहळे करिती आपण । दया संपन्न त्याचेनि ॥ ५०० ॥
यालागीं दयेचे पोटीं । म्यां सांगितली भाग्याची गोठी ।
भूतदया जयाच्या पोटीं । तो अभाग्य सृष्टीं कदा नोहे ॥ १ ॥
तुवां पुशिला लाभ तो कोण । ऐक त्याचेंही लक्षण ।
माझी उत्तम भक्ति जाण । `लाभ' संपूर्ण त्या नांव ॥ २ ॥
माझी करिता उत्तम भक्ती । चारी मुक्ती पायां लागती ।
सुरवर लोटांगणीं येती । लाभ श्रीपति मी लाभें ॥ ३ ॥
हा लाभ न येतां हातीं । धनादिकांची जे प्राप्ती ।
तो नाडु जाण निश्चितीं । नरकगतिदायक ॥ ४ ॥
यालागीं परम लाभ माझी भक्ती । जेणें मी लाभें श्रीपती ।
ऐक विद्येची व्युत्पत्ती । यथानिगुतीं सांगेन ॥ ५ ॥
दृढ वासनेचिया संबंधा । शुद्धास आणी जीवपदा ।
अभेदीं उपजवी भेदा । `अविद्याबाधा' या नांव ॥ ६ ॥
देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म ।
त्या कर्माचा अभिमान परम । तो `जीवधर्म' देहबुद्धी ॥ ७ ॥
ते छेदोनि जीवाची बाधा । तो मेळविजे चिदानंदा ।
ती नांव शुद्ध `आत्मविद्या' । येर ते अविद्या सर्वही ॥ ८ ॥
जे निरसी गा अविद्या । ते बोलिजे शुद्ध विद्या ।
येरी शास्त्रादि चौदा विद्या । ते जाण अविद्या पाल्हेली ॥ ९ ॥
जे निरसी जीवाची बाधा । ते बोलिजे शुद्ध आत्मविद्या ।
आइक ह्रीच्या संबंधा । लाजावें सदा निंद्यकर्मी ॥ ५१० ॥
केवळ अवयव झांकणें । ते लज्जा येथ कोण म्हणे ।
गेलियाही जीवेंप्राणें । अकर्म न करणें ते `लज्जा' ॥ ११ ॥
श्रीर्गुणा नैरपेक्ष्याद्याः सुखं दुःखसुखात्ययः ।
दुःखं कामसुखापेक्षा पण्डितो बन्धमोक्षवित् ॥ ४१ ॥
सकळ साम्राज्यवैभवेंसीं । चतुर्दशभुवनविलासेंसीं ।
अंगीं लक्ष्मी आलिया जयापाशीं । परी थुंकोनि तिसी पाहेना ॥ १२ ॥
ऐशी ज्याचे निरपेक्षता । ते उत्कृष्ट `श्री' तत्त्वतां ।
त्यासी मी श्रीकृष्ण वंदीं माथां । इतरांची कथा कायसी ॥ १३ ॥
ज्यासी लक्ष्मीची निरपेक्षता । त्याची नित्य वस्ती माझे माथां ।
त्याहीहोनि पढियंता । आणिक सर्वथा मज नाहीं ॥ १४ ॥
सुख आणि महादुःख । दोनींतें ग्रासोनियां देख ।
प्रकटे स्वानंद स्वाभाविक । या नांव `सुख' उद्धवा ॥ १५ ॥
जेथ दुजयाची चाड नाहीं । इंद्रियांचा पांग न पडे कांहीं ।
विषयावीण आनंद हृदयीं । `निजसुख' पाहीं या नांव ॥ १६ ॥
विसरोनि हें निजसुख । कामापेक्षा करणें देख ।
याचि नांव गा परम `दुःख' । केवळ ते मूर्ख सेविती ॥ १७ ॥
नित्य होतां कामप्राप्ती । कदा नव्हे कामतृप्ती ।
कामापेक्षा पाडी दुःखावर्ती । दुःख निश्चितीं कामापेक्षा ॥ १८ ॥
हा बंध हा मोक्ष चोख । जाणणें जें अलौकिक ।
कदा नव्हे आनुमानिक । `पंडित' देख या नांव ॥ १९ ॥
ऐशी न जोडतां अवस्था । आम्ही सज्ञान वेदशास्त्रतां ।
ऐशी अभिमानि पंडितता । ते न ये सर्वथा उपेगा ॥ ५२० ॥
ज्यासी शांति आणि समाधान । साचार बंधमोक्षाचें ज्ञान ।
तो `महापंडित' जाण । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ २१ ॥
मूर्खो देहाद्यहंबुद्धीः पन्था मन्निगमः स्मृतः ।
उत्पथश्चित्तविक्षेपः स्वर्गः सत्त्वगुणोदयः ॥ ४२ ॥
वेदशास्त्र नेणता एक । त्यासी मूर्ख म्हणती लोक ।
ते मूर्खता येथें न मने देख । केवळ मूर्ख देहाभिमानी ॥ २२ ॥
केवळ नश्वर देह देख । तो मी म्हणोनि मानी हरीख ।
देहाभिमानें भोगी नरक । यापरता मूर्ख कोण आहे ॥ २३ ॥
विटाळें देहाचा संभवो । विटाळें देहाचा उद्भवो ।
विटाळेंचि निधन पहा हो । विटाळासी ठावो देहापाशीं ॥ २४ ॥
देहाचें निजरूप येथ । अस्थि चर्म विष्ठा मूत्र ।
तो मी म्हणवूनि जो श्लाघत । `मूर्ख' निश्चित तो जाण ॥ २५ ॥
ऐशी जे कां देहअहंता । ती नांव परममूर्खता ।
चालणें माझ्या वेदपंथा । `सन्मार्गता' ती नांव ॥ २६ ॥
ज्यासी जाहली चित्तविक्षेपता । तो निंदी गुरुदेवता ।
जो न मानी वेदशास्त्रार्था । तो उत्पथामाजीं पडे ॥ २७ ॥
जो गुरुदोषदर्शी समत्सरता । जो क्रोध करी सुहृदआप्तां ।
जो धिक्कारी मातापिता । `चित्तविक्षेपता' त्या नांव ॥ २८ ॥
जो सन्मानालागीं पाही । साधुसज्जनांतें करी द्रोही ।
जो दोष देखे ठायीं ठायीं । `चित्तविक्षेप' पाहीं या नांव ॥ २९ ॥
जो वदे परापवादा । जो करूं रिघे परनिंदा ।
जो विश्वासे स्त्रियेचे शब्दा । `चित्तविक्षेपबाधा' । ती नांव ॥ ५३० ॥
जो सन्मार्गापासूनि चेवता । पडे अधर्मअकर्मउत्पथा ।
तेही `चित्तविक्षेपता' । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३१ ॥
आपण तत्त्वतां परब्रह्म । जाणणें हा `वेदमार्ग' उत्तम ।
हें नेणोनि वर्तणें सकाम । तोचि परम `उन्मार्ग' ॥ ३२ ॥
स्वर्गशब्दाची व्युप्तत्ती । ते सत्त्वगुणाची उत्पत्ती ।
जेणें निजसुखाची होय प्राप्ती । परी इंद्रलोकगति तो स्वर्ग नोहे ॥ ३३ ॥
अमरभुवना जे जे गेले । ते परतोनि पतना आले ।
शुद्धसत्त्वीं जे मिसळले । ते पावले निजसुख ॥ ३४ ॥
ऐसा जो कां सत्त्वगुण । तोचि येथें `स्वर्ग' जाण ।
आतां नरकाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥ ३५ ॥
नरकस्तमउन्नाहो बंधुर्गुरुरहं सखे ।
गृहं शरीरं मानुष्यं गुणाढ्यो ह्याढ्य उच्यते ॥ ४३ ॥
कामक्रोधलोभउद्रेक । तेणें खवळे महामोह देख ।
तो बुडवी सज्ञान विवेक । एकलें एक तम वाढे ॥ ३६ ॥
अरुणोदयीं दाट कुहर । निबिड पडे अंधकार ।
न कळे दिवसनिशाव्यवहार । सूर्यचंद्र दिसेना ॥ ३७ ॥
यापरी गा निजचित्तीं । अंधमते वाढे वृत्ती ।
कर्तव्याकर्तव्यस्थिती । एकही स्फूर्ति स्फुरेना ॥ ३८ ॥
ऐसा तमाचा उन्नाह उद्रेक । त्या नांव जाण `महानरक' ।
परी यमयातना जें दुःख । तो नरक म्हणों नये ॥ ३९ ॥
यमयातनां पाप झडे । महामोहें पाप वाढे ।
याम्य नरक ते बापुडे । अतिनरक गाढे महामोहीं ॥ ५४० ॥
काम क्रोध लोभ देख । हेचि तीनी निरयदायक ।
तेथ महामोहो आवश्यक । जें होय एक अंधतम ॥ ४१ ॥
इतुका मिळे जेथ समुदावो । त्यांते बोलिजे `तमउन्नाहो' ।
ऐसा जेथ घडे भावो । तो पुरुष पहा हो नरकरूप ॥ ४२ ॥
जो घोरनरकाप्रती जाये । त्याचा तेथूनि उद्धार होये ।
`तमउन्नाह' ज्या प्राप्त होये । त्याचा निर्गम नोहे महाकल्पांतीं ॥ ४३ ॥
ऐशी तमउन्नाहाची ख्याती । ऐकोनि उद्धव कंटाळे चितीं ।
ऐसे बुडते जीव तमोवृत्तीं । त्यांची उद्धारगति कोण करी ॥ ४४ ॥
ऐसा उद्धवाचा भावो । जाणोनि बोलिला देवाधिदेवो ।
बुडतयातें उद्धरी पहा हो । गुरुरावो निजसखा ॥ ४५ ॥
ऐसा गुरु तो तूं कोण म्हणशी । मी नित्य लागें ज्याच्या पायांशीं ।
जो दे चिन्मात्र पूर्णब्रह्मासी । `गुरु' नाम तयासी बोलिजे ॥ ४६ ॥
त्या ब्रह्मापरीस अधिकता । गुरूसी आलिसे तत्त्वतां ।
ब्रह्म ब्रह्मत्वें हा प्रतिपादिता । येर्हवीं ब्रह्माची वार्ता कोण पुसे ॥ ४७ ॥
अज अव्यय अनंत । अच्छेद्य अभेद्य अपरिमित ।
हे ब्रह्ममहिमा समस्त । सद्गुरूंनीं येथ विस्तारिली ॥ ४८ ॥
ऐशी ऐकतां सद्गुरुकीर्ती । जडजीव उद्धरती ।
`गुरु' नामाची महाख्याती । ऐकोनि कांपती यमकाळ ॥ ४९ ॥
त्या सद्गुरूचें महिमान । करी बुडत्याचें उद्धरण ।
निवारी जन्ममरण । शिष्यसमाधान निजदाता ॥ ५५० ॥
सुहृद आप्त सखा बंधु । शिष्याचे सद्गुरु प्रसिद्धु ।
निवारूनि नरकसंबंधु । परमानंदु सुखदाता ॥ ५१ ॥
आतां गृहाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण ।
माड्या गोपुरें धवलारें जाण । गृहप्रमाण तें नव्हे ॥ ५२ ॥
मनुष्यदेह तो गृहाश्रम । जेथें नित्य वसें मी पुरुषोत्तम ।
तेथील करितां स्वधर्मकर्म । आत्माराम उल्हासे ॥ ५३ ॥
ज्या नरदेहाचिये प्राप्ती । इंद्रादिक देव वांछिती ।
वेद वानी ज्या देहाची कीर्ति । निजमोक्षप्राप्ती नरदेहीं ॥ ५४ ॥
निज `गृह' जें साचार । तें जाणावें नरशरीर ।
आतां आढ्यपणाचा विचार । तोही प्रकार अवधारीं ॥ ५५ ॥
जो ज्ञानगुणीं अतिसंपन्न । जें कल्पांतींही न वेंचे धन ।
तोचि `आढ्यतम' जाण । येर तें धन नश्वर ॥ ५६ ॥
नश्वर धनाची आढ्यता । अवश्य नेत अधःपाता ।
ज्ञानधने जे आढ्यता । तेणें ये हाता परब्रह्म ॥ ५७ ॥
दरिद्रो यस्त्वसंतुष्टः कृपणो योऽजितेन्द्रियः ।
गुणेष्वसक्तधीरीशो गुणसङ्गो विपर्ययः ॥ ४४ ॥
ऐक दरिद्राचें लक्षण । गांठीं असतां कोटी धन ।
ज्याचें संतुष्ट नाहीं मन । परम `दरिद्री' जाण या नांव ॥ ५८ ॥
ज्याचे गांठीं नाहीं कांचवटी । परी संतुष्टता नित्य पोटीं ।
तोचि संपन्न सकळ सृष्टीं । सत्य गोष्टी हे उद्धवा ॥ ५९ ॥
गांठीं असोनियां धन । जो पोटा न खाय आपण ।
सदा लोलिंगत मन । दरिद्रलक्षण या नांव ॥ ५६० ॥
यापरी जें कृपणपण । ऐक त्याचेंही लक्षण ।
जेवीं राजा बांधी सेवकजन । तेवीं इंद्रियांअधीन जो होय ॥ ६१ ॥
निर्धारितां निजरूप जाण । सर्वांचा राजा तो आपण ।
तें विसरोनि होय दीन । इंद्रियांअधीन होऊनि ठाके ॥ ६२ ॥
मन तयाचें आज्ञाधार । मनाचीं इंद्रियें किंकर ।
त्यांचाही हा होय डिंगर । अजितेंद्रियें होय थोर `कृपणत्व' ऐसें ॥ ६३ ॥
निज किंकराचीं किंकरें । त्या इंद्रियांचीं हा वोळंगे द्वारें ।
अजितेंद्रियत्वें अतिखरें । निजांगीं सुभरे कृपणत्व ॥ ६४ ॥
या नांव गा `कृपणपण' । तुज म्यां सांगितले जाण ।
आतां ईश्वराचें सुलक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ६५ ॥
कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी ।
तोचि `ईश्वर' त्रिभुवनीं । सत्य सत्य हे वाणी उद्धवा ॥ ६६ ॥
तुवां जितुके केले प्रश्न । तितुके ज्यासी वोळंगती गुण ।
त्यांसीही ज्याचें अलिप्तपण । ईश्वरत्व संपूर्ण त्या नांव ॥ ६७ ॥
कनक आणि कामिनी । यांचा पंगिस्त मनींहूनी ।
तोचि `अनीश्वरु' जनीं । हें सत्य मानीं उद्धवा ॥ ६८ ॥
शमादि सांगितले प्रश्न । त्यांचें जें विपरित लक्षण ।
तेंचि अनीश्वरत्व जाण । अशमादि गुण जे ठायीं ॥ ६९ ॥
एत उद्धव ते प्रश्नाः सर्वे साधु निरूपिताः ।
किं वर्णितेन बहुना लक्षणं गुणदोषयोः ॥ ४५ ॥
उद्धवा तुझे सकळ प्रश्न । म्यां निरूपिले सुलक्षण ।
जेणें होइजे ब्रह्मसंपन्न । तैसें व्याख्यान सांगितले ॥ ५७० ॥
संसारीं गुणदोषलक्षण । सांगता अपरिमित जाण ।
यालागीं धरावें गा मौन । परम कठिण गुणदोष ॥ ७१ ॥
गुणदोष नायकावे कानीं । गुणदोष न देखावे नयनीं ।
गुणदोष न बोलावे वदनीं । गुणदोष मनीं न धरावे ॥ ७२ ॥
ब्रह्मज्ञानाचें मुख्य लक्षण । तेंही बहुत नाहीं निरूपण ।
श्लोकार्धें श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ ७३ ॥
गुणदोषदृशिर्दोषो गुणस्तूभयवर्जितः ॥ ४६ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
ब्रह्म एक परिपूर्ण । तेथें कैंचे दोष कैंचे गुण ।
अविद्या क्षोभली ते जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥ ७४ ॥
जो देखों लागे दोषगुण । त्याची अविद्या क्षोभली जाण ।
जो न देखे गुणदोषभान । तो `ब्रह्मसंपन्न' उद्धवा ॥ ७५ ॥
पराचा देखावा दोषगुण । हाचि दोषांमाजीं महादोष जाण ।
गुणदोष न देखावा आपण । हा उत्तम गुण सर्वार्थीं ॥ ७६ ॥
ब्रह्मीं नाहींत दोषगुण । हें सर्वार्थीं सत्य जाण ।
जो देखे गा दोषगुण । ब्रह्मत्व जाण तेथें नाहीं ॥ ७७ ॥
जे गुणदोष देखों लागले । त्यांचें ब्रह्मत्व कैसेनि गेलें ।
त्यांपाशीं तें वोस जाहलें । कीं रुसूनि गेलें तेथूनी ॥ ७८ ॥
जेवीं रविबिंबा राहु ग्रासी । तैं दिवसा देखिजे नक्षत्रांसी ।
तेवीं अविद्या ब्रह्मत्व जैं प्राशी । तैं गुणदोषांसी देखिजे ॥ ७९ ॥
आदरें सांगे श्रीकृष्ण । उद्धवा न देखावे दोषगुण ।
हे माझे जीवींची निजखूण । तुज म्यां संपूर्ण सांगितली ॥ ५८० ॥
जनीं चौर्यांशीं लक्षयोनी । त्यांत गुणदोष एके स्थानीं ।
न देखावे मनुष्ययोनीं । तूं इतुकेनी नित्यमुक्त ॥ ८१ ॥
म्हणसी स्वाचारपरिपाठीं । गुणदोष देखावे दृष्टीं ।
उद्धवा हे गोष्टी । स्वधर्मराहाटी ते भिन्न ॥ ८२ ॥
निजदोष निरसावयाकारणें । स्वधर्मकर्म आचरणें ।
तेणें गुणदोष देखणें । तैं नागवी धांवणें तैसें जाहलें ॥ ८३ ॥
साळी पिकावया शेतीं । तृण जाळूनि दाढ करिती ।
तेथ पिकली साळी जैं जाळिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥ ८४ ॥
व्हावया दोषनिवृत्ती । वेदें द्योतिली धर्मप्रवृत्ती ।
तेणें स्वधर्में जैं दोष देखती । तैं निजप्राप्ती नागवले ॥ ८५ ॥
जेवी कां सोंगें नटनटी । दाविती हावभाव नाना गोठी ।
परी तो भाव नाहीं त्यांचे पोटीं । स्वधर्म त्या दृष्टीं करावा ॥ ८६ ॥
न देखोनि दोषगुण । स्वधर्म-मर्यादा नोसंडून ।
करावें गा स्वधर्माचरण । हें मुख्य लाक्षण कर्मांचें ॥ ८७ ॥
ऐशिया स्वधर्मगती । कर्ममळ निःशेष जाटी ।
साधकां निजपदप्राप्ती । गुणदोषस्थिती सांडितां ॥ ८८ ॥
गुणदोष देहाचे ठायीं । आत्मा नित्य विदेही ।
गुणदोष त्याच्या ठायीं । सर्वथा नाहीं उद्धवा ॥ ८९ ॥
साधकें न देखावे दोषगुण । सिद्धासी सहजचि नाहीं जाण ।
जरी दिसों लागले दोषगुण । तरी आली नागवण दोघांसी ॥ ५९० ॥
साधकाची प्राप्ती बुडे । सिद्धाची सिद्धी तत्काल उडे ।
एवं गुणदोषांचें सांकडें । दोंहीकडे उद्धवा ॥ ९१ ॥
गुणदोषीं भरली सृष्टी । तेथ न ठेवावी निज-दृष्टी ।
हे कळवळोनियां पोटीं । श्रीकृष्णें गोष्टी सांगितली ॥ ९२ ॥
गुणदोष विविधभेद । ऐसे आहेत निषिद्ध ।
तरी कां पां स्वमुखें श्रीगोविंद । बोलिला प्रसिद्ध वेदानुवादें ॥ ९३ ॥
येचि अर्थींचा प्रश्न । पुढें उद्धव करील जाण ।
तेंचि व्यासाचें निरूपण । विसावा जाण जीवशिवां ॥ ९४ ॥
तेथ सकाम आणि निष्काम भक्त । यांचे अधिकार अभिव्यक्त ।
स्वयें सांगेल भगवंता । कथा अद्भुत ते आहे ॥ ९५ ॥
संतीं द्यावें अवधान । श्रोतां व्हावें सावधान ।
एका विनवी जनार्दन । रसाळ निरूपण पुढें आहे ॥ ५९६ ॥
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवद्उद्धवसंवादे
एकाकारटीकायां एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४६॥ ओव्या ॥५९६॥