बालमित्रांनो, भगवान शंकराचार्य ही भारतवर्षात होऊन गेलेली एक दिव्य विभूती आहे. त्यांची तीक्ष्ण बुद्धी दर्शवणारा एक प्रसंग पुढे दिला आहे. सात वर्षे वयाच्या शंकराच्या प्रकांड पांडित्याची आणि ज्ञानसामर्थ्याची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. ती केरळचा राजा राजशेखर याच्या कानी गेली. राजा शास्त्रअध्ययनात आवड असणारा, विद्वान, ईश्वरभक्त, श्रद्धावान आणि पंडितांचा आदर करणारा होता. यामुळे या बालकाला पहाण्याची आणि भेटण्याची तीव्र इच्छा राजाच्या मनात उत्पन्न झाली.
राजा राजशेखर याने आपल्या प्रधानाला हत्तीची भेट घेऊन शंकराकडे पाठवले आणि त्याला राजवाड्यात येण्याचे आमंत्रण दिले. हत्ती घेऊन प्रधान शंकराच्या घरी आला आणि नम्रतेने त्याने राजाचा निरोप सांगितला. निरोप ऐकून शंकर त्याला म्हणाला, ”उपजीविकेसाठी भिक्षा हेच ज्याचे साधन आहे, त्रिकाळ संध्या ईश्वरचिंतन, पूजा-अर्चा आणि गुरुसेवा हीच ज्याच्या जीवनाची नित्य व्रते आहेत, त्याला आपल्या या हत्तीचा काय उपयोग आहे ? चार वर्णातील सर्व कर्तव्यांचे पालन करून ब्राह्मणादी धर्ममय जीवन जगू शकतील, अशी व्यवस्था करणे, हे राजाचे कर्तव्य आहे. माझा हा निरोप आपल्या स्वामींना सांगा.”
राजाला दिलेल्या या निरोपासह राजवाड्यात येण्याचे राजा राजशेखरचे निमंत्रणही त्याने स्पष्टपणे नाकारले. या उत्तराने राजा अधिकच प्रसन्न झाला. त्याच्या मनात शंकराविषयी श्रद्धा अधिकच तीव्र झाली आणि एक दिवस प्रधानाला समवेत घेऊन राजा स्वत:च कालडी येथे शंकराच्या दर्शनास आला. राजाने पाहिले, एक तेज:पुंज बालक समोर बसला आहे. त्याच्या चोहोबाजूस बसून ब्राह्मण वेदाध्ययन करत आहेत.
राजाला पहाताच शंकराने त्याचे नम्रतेने, सन्मानपूर्वक स्वागत केले. त्याच्याशी झालेल्या चर्चेतून शंकराचे अगाध पांडित्य आणि अलौकिक विचारशक्ती लक्षात आली. जातांना त्याने काही सोन्याच्या मुद्रा शंकराच्या चरणी अर्पण केल्या आणि त्या स्वीकारण्याची त्याला विनंती केली. शंकर राजाला म्हणाला, “महाराज, मी ब्राह्मण आहे, तसाच ब्रह्मचारी आहे. यांचा मला काय उपयोग ? आपण देवपूजेसाठी जी भूमी दिली आहे, तेवढी मला आणि माझ्या आईला पुरेशी आहे. आपल्या कृपेमुळे मला कशाचीच कमतरता नाही.”
शंकराच्या या उत्तरापुढे काय बोलावे, हे राजाला सुचेना. शेवटी हात जोडून तो म्हणाला, ”आपल्या दर्शनाने मी धन्य झालो; पण एकदा जी वस्तू अर्पण केली, ती मला परत घेता येणार नाही, तरी आपण हे धन योग्य अशा व्यक्तीला वाटून टाकावे.” सुहास्य मुखाने शंकर लगेच म्हणाला, ”महाराज, आपण राजे आहात. कोण सुपात्र, कोण योग्य याचे ज्ञान आपल्याला अवश्य असलेच पाहिजे. माझ्यासारख्या ब्रह्मचाऱ्याला हे ज्ञान कोठून असणार ? विद्यादान हा ब्राह्मणाचा धर्म आणि सत्पात्री दान करणे हा राजधर्म आहे. तेव्हा आपणच योग्य आणि सत्पात्र व्यक्ती निवडून हे धन वाटून टाका.”
राजा निरुत्तर झाला. त्याने शंकराला वंदन केले आणि तेथे असलेल्या ब्राह्मणांना ते धन वाटून टाकले.
मुलांनो, निरपेक्षपणे विद्यादान करण्याचे महत्त्व तुमच्या लक्षात आलेच असेल. आपणही असे करू शकतो. ज्या विषयाचे ज्ञान आपल्याला अधिक आहे, तो विषय दुसऱ्याला येत नसेल, तर आपण त्याला साहाय्य करू शकतो.
श्रीमद आद्य शंकराचार्यांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.