मुलांनो, हॅरी पॉटरची गोष्ट ही वास्तवतेचा आधार नसलेली काल्पनिक गोष्ट आहे. ही काल्पनिक साहसकथा कधीतरी सत्यात उतरेल काय ? केवळ त्याच्या नादी लागून आपल्या संस्कृतीतील अनमोल ठेवा विसरू नका ! आमच्याकडे `श्यामची आई ‘ आहे. `चिंगी’ आहे, `गोट्या’ आहे. `सोनेरी टोळी’ आहे. `फास्टर फेणे ”आहे. `पंचतंत्र’ आहे. एवढेच कशाला खरोखरचा अद्वितीय पराक्रम गाजवणारे राष्ट्रपुरुष आणि क्रांतिवीर आहेत; युगपुरुष आहेत. शिवछत्रपतींचे सर्वच आयुष्य कुठल्याही चित्तथरारक प्रसंगांपेक्षा कमी नव्हे ! शिवरायांनी अवघ्या १६ व्या वर्षी मोगलांना कसे जेरीस आणले, ते वाचा ! बालवयात `ज्ञानेश्वरी’ हा महान ग्रंथ लिहिणारे संत ज्ञानेश्वर कसे घडले, ते अभ्यासा ! भक्तीसाठी आणि सेवेसाठी आकाशात उड्डाण करणार्या मारुतीची गोष्ट केव्हाही अधिक संस्कारक्षम नाही काय ?
कुणाला वाटेल मुलांच्या गोष्टींमध्ये धर्म कुठे आणता ? साहित्य हे साहित्य असते. त्याला देशाची, धर्माची बंधने नसतात. पालकांनो, लक्षात ठेवा गोष्ट आली की `संस्कार’ आला. पाश्चात्त्य गोष्टींत पाश्चात्य रीतीरिवाज आले, पाश्चात्य आदर्श आले; आणि तेच आपले आदर्श झाले, असे होणार; नव्हे असे होत आहे. सध्या पालकांना आणि शिक्षकांनाही वाटते की, हॅरीच्या रहस्यकथा खरोखरीच रम्य आहेत. आमच्या बाळकृष्ण हरीच्या बाललीला केवळ रम्यच नव्हेत, तर साहसी, रहस्यमय, चित्तथरारक शिवाय संस्कार करणार्या आहेत व मुख्य म्हणजे सत्य आहेत, हे या पालकांना पटवून देण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न केवळ एका गोष्टीशी किंवा मुलांच्या गोष्टीशी संबंधित न रहाता तो भाषा, संस्कृती, धर्म इथपर्यंत मोठा होतो. आपण इतके इंग्रजाळलेले झालो आहोत की, इंग्रजी शब्द, खाणे-पिणे आणि पेहराव आता आपल्यासाठी अपरिहार्य झाले आहेत. हे असेच सुरू राहिले तर उद्या त्यांच्यातील अतीवाईट गोष्टीही सर्वसामान्यांना अपरिहार्य झाल्याशिवाय रहाणार नाहीत.
१. ‘कार्टून’ बघण्यापेक्षा पंच-तंत्रातील बोधपूर्ण गोष्टी वाचाव्यात
आजकालची मुले घंटोन्घंटे (तासन्तास) पाश्चात्त्यांनी बनवलेले ‘टॉम अँड जेरी’सारखे निरर्थक आणि केवळ करमणूकप्रधान लघुपट पहात बसतात. त्या लघुपटांत केवळ एकमेकांवर कुरघोडी आणि मारझोडच दाखवलेली असल्याने त्यांतून काहीच बोध मिळत नाही. यापेक्षा मुलांनी पंचतंत्रातील गोष्टी वाचल्यास त्यांतून त्यांना नीतीशास्त्र आणि व्यवहार यशस्वी करण्याविषयीचे ज्ञान मिळेल. पंचतंत्रातील गोष्टींमधून संस्कृत सुभाषितेही शिकवलेली आहेत. अनेक पाश्चात्त्य कथालेखकांना पंचतंत्राकडूनच प्रेरणा मिळाली आणि त्यांनी ‘इसापनीती’ आदी कथा लिहिल्या !
२. राष्ट्रासाठीच जगलेल्या बालक्रांतीकारकांचा इतिहास वाचावा
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक तरुण क्रांतीकारकांनी भाग घेतला, हे सर्वांनाच ठाऊक असते. मात्र त्या क्रांतीकार्यात शाळकरी मुलांनीहा भाग घेतला होता, हे बऱ्याच जणांना ठाऊकच नसते. बंगालच्या बालक्रांतीविरांगना शांती घोष आणि सुनीती चौधरी, शिरीषकुमार, चंद्रशेखर आझाद ही अशा काही बालक्रांतीकारकांची उदाहरणे आहेत.
३. मुलांनी चित्रकथा (कॉमिक्स) वाचण्यापेक्षा पुराणातील कथा वाचण्याने त्यांचा सर्वंकष विकास होईल !
‘मुले कुठेही, केव्हाही, कुणाही बरोबर असू देत, त्यांना चित्रकथांचीच धुंद असते. चित्रकथा (कॉमिक्स) मुलांचा मानसिक, वैचारिकआणि चारित्र्यगत अधःपात करतात. चित्रकथा मुलांचे मन, बुद्धी आणि सगळेव्यक्तित्वच अपंग, एकाकी, संवेदनाहीन, रुक्ष बनवतात. त्या मुलांची धारणा `जीवनात कोणतीही समस्या, अडचण येताच पॅन्टम वा सुपरमॅन पापणी लवताच दूर करील’,अशी होते. त्यामुळे ते वास्तवापासून दूर जातात आणि त्यांचे पाय भूमीवर ठरत नाहीत. धैर्य, साहस असलेला तो काल्पनिक शक्तीशाली मुलांचा आदर्श होतो. वास्तवात तो नसतो, हे सत्य मुले स्वीकारूच शकत नाहीत. याचबरोबर चित्रकथांची भाषा अश्लील,भोंगळ आणि व्याकरणदृष्ट्याही शुद्ध नसते. चित्रकथांमध्ये वाक्यांचे प्रमाण अल्प आणि चित्रांचे प्रमाण अधिक असते.चित्रांवरूनच मुले कल्पना करतात. त्यांच्यामध्ये स्वतंत्रपणे कल्पना करणे वा चिंतन करण्याची क्षमताच नसते. त्यांची दृष्टीद्वारा ग्रहणक्षमता क्षीण होत जाते.
आपण मुलांना पुराणातल्या कथा का नाही देत वाचायला ? त्यामुळे त्यांचे ज्ञान वाढेलच, त्याचबरोबर त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासही होईल. मुलांत साहस, धैर्य येईल. त्यांच्यात कुतुहलता आणि जिज्ञासा वाढेल. त्यांचे मन सागरासारखे विशाल होईल.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जून २००९)
४. संतचरित्रे वाचा आणि भारत देशाचे आदर्श नागरिक बना !
हिंदुस्थान ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदासस्वामी, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, तुकडोजी महाराज आदी अनेक संत हिंदुस्थानात होऊन गेले. अशा या संतांची चरित्रे वाचल्याने काय लाभ होतात, ते पाहूया.
५. संतचरित्रे वाचण्याचे लाभ
अ. संतचरित्रांतून आदर्श उभे रहाणे : सध्या समाजासमोर फारसे आदर्श नाहीत. त्यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. ‘आपण कुणाचे अनुकरण करावे’, असा प्रश्न समाजासमोर उभा रहातो. काहीजण लेखक, संगीतकार, गायक यांना आदर्श मानतात, तर काहीजण शिक्षणक्षेत्रातील व्यक्ती, उद्योगपती यांना आदर्श मानतात. लहान मुले तर चित्रपट अभिनेते, खेळाडू यांनाच आदर्श मानून त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात; पण संतचरित्रांतूनच सर्वांसमोर योग्य आदर्श उभे रहातात. संतांची चरित्रे वाचून त्यांचे अनुकरण कसे करायचे, तेही कळते.
आ. संतांची शिकवण वाचून वाचक चांगल्या मार्गाकडे वळणे : संतांनी वेळोवेळी समाजाला योग्य दिशा देऊन चांगल्या मार्गाकडे वळवले आहे. ती उदाहरणे वाचून आपणही चांगल्या मार्गाकडे वळतो, उदा. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्याकडून वेद वदवून ‘सर्व प्राणीमात्रांत ईश्वर असल्याने सर्वांवर प्रेम करा’, असे शिकवले. विठ्ठलभक्तीत सदा रमणार्या संत तुकारामांनी ‘सुख-दुःखाच्या प्रसंगी देवाला आठवा’, ही शिकवण दिली.
इ. संतचरित्राचा अभ्यास केल्याने ईश्वरावरील श्रद्धा वाढायला लागणे आणि जीवन आनंदी बनणे : संतचरित्राचा अभ्यास केला, तर आपली ईश्वरावरील श्रद्धा वाढायला लागते. संतचरित्र आणि संतांचे विचार अभ्यासल्यामुळे जीवनात ईश्वराची उपासना करण्याचे महत्त्व कळते. ईश्वराची उपासना केल्यामुळे आपल्यातील सद्गुण वाढून जीवन आनंदी बनते.
इ. संतलिखित ग्रंथ वाचावेत : मुलांनो, संतचरित्रांसह संतलिखित ग्रंथही वाचावेत. संतलिखित ग्रंथांमध्ये ईश्वरी चैतन्य असल्याने ते वाचल्याने ज्ञानासह त्या चैतन्याचाही लाभ होतो.
मुलांनो, संतांचे आचरण कसे होते, त्यांनी राष्ट्रकार्य, तसेच साधना आणि गुरुसेवा कशी केली, हे वाचा अन् तुम्हीही त्याप्रमाणे आचरण करून भारत देशाचे आदर्श नागरिक बना !
संतचरित्रे व संतांनी उपदेशलेले विचार अभ्यासल्याने जीवनात ईश्वराची उपासना करण्याचे महत्त्व कळते. ईश्वराची उपासना केल्यामुळे आपल्यातील सद्गुण वाढून जीवन आनंदी बनते. राष्ट्रपुरुष व क्रांतीकारक यांची चरित्रे अभ्यासल्यामुळे धर्म व राष्ट्र यांविषयी अभिमान वाढतो व आपल्या हातून धर्म व राष्ट्र कार्य घडते !
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी‘
var addthis_config = {“data_track_clickback”:true};