संस्कृत सुभाषिते : २३

या पाणिग्रहलालिता सुसरला तन्वी सुवंशोद्भवा

गौरी स्पर्शसुखावहा गुणवती नित्यं मनोहारिणी ।

सा केनापि हृता तया विरहितो गन्तुम् न शक्नोम्यहम्


रे भिक्षो तव कामिनी न हि न हि प्राणप्रिया यष्टिका ॥

अर्थ : (भिक्षू म्हणतो) जिचे लग्नानंतर लाड केले आहेत, जी सरळ स्वभावाची, सडपातळ, चांगल्या घरातील, गोरी, स्पर्श सुखकारक आहे, गुणवान, जी नेहमी मन हिरावून घेते, अश्या तिला कोणीतरी पळवले आहे. तिच्याशिवाय मी कोठे जाऊ शकत नाही. (हे ऐकणारा विचारतो) अरे भिक्षू, तुझी बायको का? (भिक्षू म्हणतो) नाही नाही, माझी प्राणाहून प्रिय काठी.

टीप : हा छेकापन्हुती अलङकार होतो त्यात द्व्यर्थी शब्दयोजना करून उत्सुकता कवी ताणतो आणि नर्म विनोद असतो. सुभाषिताच्या पहिल्या दोन चरणांमध्ये दिलेली विशेषणे स्त्री आणि काठीला दोघींना लागू होतात. काठीसाठी – जिचे हातात घेऊन लाड केले आहे, सरळ आहे (वेडीवाकडी नाही), बारीक आहे, चांगल्या बांबूपासून बनवलेली आहे, पांढरी, गुळगुळीत, जिला दोरा लावला आहे आणि नेहमी जिचे आकर्षण वाटते अशी.

उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।


न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखं मृगाः ॥

अर्थ : काम केल्यामुळेच कार्य पूर्ण होते फक्त स्वप्न बघून नाही. (जसे) झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतःहून जात नाही.


अष्टादशपुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् ।


परोपकरः पुण्याय पापाय परपीडनम् ॥

अर्थ : अठरा पुराणांमध्ये व्यासांनी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. दुसर्‍यावर उपकार करणे हे पुण्य तर दुसर्‍याल्या त्रास देणे हे पाप आहे.

काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम् |


व्यसनेन तु मूर्खाणां निद्रया कलहेन वा ||

अर्थ : बुद्धिमान लोकांचा वेळ काव्याचा [आस्वाद घेण्यात] शास्त्राच्या [चर्चेत] आणि करमणूकी मध्ये जातो. मूर्ख लोकांचा वेळ मात्र व्यसन [करणे] झोप [कंटाळा करत ] आणि भांडणात जातो.


दृष्टं किमपि लोकेऽस्मिन् न निर्दोषं न निर्गुणम्।


आवृणुध्वमतो दोषान् विवृणध्वं गुणान् बुधा : ॥

अर्थ : हे बुद्धीमान लोकांनो, या जगात कुठलीही गोष्ट दोषरहित किंवा काहीच गुण नाही अशी नसते. [प्रत्येकामध्ये थोडे गुण आणि थोडे दोष असतातच. कुठलीच गोष्ट निर्दोष नसते ] म्हणून दोष झाका [त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ] आणि गुणांचा विस्तार करा. [त्या माणसाचे गुण वाढतील असे बघा. ]


हारम् वक्षसि केनापि दत्तमज्ञेन मर्कट: |


लेढि जिघ्रति संक्षिप्य करोत्युन्नतमासनम् ||

अर्थ : कोणीतरी मूर्ख माणसाने माकडाला [रत्न] हार दिल्यावर [माकडाने] चाटला, वास घेतला आणि गुंडाळून [बैठक] उंच केली. [माकडाला रत्नांची किंमत काय कळणार?] त्याचप्रमाणे मूर्ख माणसाच्या ताब्यात फार चांगली गोष्ट मिळाली तर तो तिची किंमत ठेवत नाही.


सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।


प्रियं च नानृतं ब्रूयात् एषः धर्मो सनातनः ॥

अर्थ : खरे बोलावे, गोड बोलावे. खरे पण कटू बोलू नये. गोड परंतु खोटे बोलू नये असा फार पूर्वीपासून चालत आलेला धर्म आहे.

यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शास्त्रं तस्य करोति किम् ।


लोचनाभ्यां विहीनस्य दर्पणः किं करिष्यति ॥
अर्थ : ज्याला स्वत: ची बुद्धी नाही त्याला शास्त्र काय बरे [मदत] करणार. जसे आंधळ्याला आरशाचा काय बरे उपयोग ?


विदेशेषु धनं विद्या व्यसनेषु धनं मतिः ।


परलोके धनं धर्मः शीलं सर्वत्र वै गुणः ॥

अर्थ : परक्या ठिकाणी विद्या हेच धन असते (अनोळखी माणसे एखाद्याकडील विद्येमुळे त्याला सन्मान देतात). संकटात बुद्धी उपयोगी पडते. मृत्युपश्चात (जिवंतपणी केलेले) धर्माचरण उपयोगी येते तर शील (चांगली वागणूक) सगळीकडेच उपयोगी येते.


हंस श्वेतः बकः श्वेतः को भेदो बकहंसयोः ।


नीरक्षीरविवेकेतु हंसो हंसो बको बकः ॥

अर्थ : हंस पांढरा, बगळा पण पांढरा. हंस आणि बगळ्यात फरक काय? दूधातुन पाणी वेगळे करण्यात मात्र हंस तो हंस आणि बगळा तो बगळा. (अशी एक समजुत आहे की हंस, दूध आणि पाण्याच्या मिश्रणातुन पाणी वेगळे करुन फक्त दूध पितो).

Leave a Comment