पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना कुण्डे कुण्डे नवं पयः ।
जातौ जातौ नवाचाराः नवा वाणी मुखे मुखे ॥
अर्थ : प्रत्येक देहाची बुद्धी वेगळी, प्रत्येक कुण्डामधे वेगळे पाणी, प्रत्येक जातीमधे नवीन (वेगळे) आचार तर प्रत्येकाच्या मुखी वेगळी वाणी (बोली).
अतिदानात् बलिर्बद्धो ह्यतिमानात् सुयोधनः ।
विनष्टो रावणो लौल्यादति सर्वत्र वर्जयेत् ॥
अर्थ : अतिदान केल्यामुळे बळी बांधला गेला, तर अ्ती अहंकारामुळे दुर्योधन. अति लोभापायी रावणाचा नाश झाला. त्यामुळे सर्व ठिकाणी "अती" चा त्याग करावा. (अती तेथे माती).
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते|
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ||
अर्थ : हे लक्ष्मणा, लंका सोन्याने जरी मढलेली असली, तरी देखील ती मला रुचत नाही. [कारण] माता आणि (मातेसमान असणारी) जन्मभूमी हि मला स्वर्गाहूनही प्रिय आहे.
अव्याकरणमधीतं भिन्नद्रोण्या तरङगिणीतरणम् |
भेषजमपथ्यसहितं त्रयमिदं कृतं वरं न कृतम् ||
अर्थ : व्याकरणाशिवाय [भाषा] शिकणे, फुटक्या होडीतून नदी पार करणे, औषध घेत असताना पथ्य न करणे या तीन गोष्टी करण्यापेक्षा न करणे बरे.
पादं गुरुभ्यो आदत्ते पादं शिष्य: स्वमेधया |
पादं सब्रह्मचारिभ्य: पाद: कालेन पच्यते ||
अर्थ : शिष्य एक चतुर्थांश [ज्ञान] गुरूकडून घेतो. एक चतुर्थांश स्वत:च्या अकलेने [समजून] घेतो. एक चतुर्थांश सहाध्यायींबरोबर [त्याला] कळतात. [आणि ] पाव गोष्टी [काही]काळाने मुरतात.
उदारस्य तृणं वित्तम् शूरस्य मरणं तृणम् ।
विरक्तस्य तृणं भार्या निस्प्रृहस्य तृणं जगत् ।।
अर्थ : उदार माणसाला पैसे क्षुल्लक, वीरासाठी मरण क्षुल्लक, विरक्तासाठी बायको क्षुल्लक तर कशाची इच्छा नसलेल्यासाठी हे जग क्षुल्लक.
यस्तु संचरते देशान् सेवते यस्तु पंडितान् ।
तस्य विस्तारिता बुद्धिः तैलबिंदुरिवाम्भसि ॥
अर्थ : जे वेगवेगळ्या देशात (ठिकाणी) फिरतात, जे विद्वानांची सेवा करतात त्यांची बुद्धी पाण्यावर पडलेल्या तेलाच्या थेंबाप्रमाणे (सगळीकडे) पसरते.
कन्या वरयते रूपं माता वित्तं पिता श्रुतम्|
बान्धवा: कुलम् इच्छन्ति मिष्टान्नम् इतरे जना: ॥
अर्थ : [लग्नामधे] मुलगी वराच्या रुपाला वरते, मुलीची आई त्याच्या पैशाकडे, तर वडील त्याच्या गुणांकडे पहातात. नातलग चांगल्या कुळाची अपेक्षा करतात आणि इतर सर्व लोक फक्त उत्तम जेवणावर लक्ष ठेवतात.
कुसुमं वर्णसंपन्नं गन्धहीनं न शोभते |
न शोभते क्रियाहीनं मधुरं वचनं तथा ||
अर्थ : सुगंध नसणारे फूल सुंदर रंगाचे असले तरी शोभून दिसत नाही. त्याचप्रमाणे काम न करता [मदत न करता फक्त] गोड बोलणे शोभून दिसत नाही.
अधीष्व पुत्रकाधीष्व दास्यामि तव मोदकान् |
अथान्यस्मै प्रदास्यामि कर्णावुत्पाटयामि ते ||
अर्थ : बाळा, अभ्यास कर रे. मी तुला [खूप] लाडू देईन. [न केलास तर] दुसऱ्या [मुलाला] देईन. [बरं का] आणि [तरी नाही केलास तर] तुझे कान पिळवटीन.
राजनीतीमधील साम-दाम-भेद-दंड या उपायांचे हे उदाहरण आहे.