आत्मज्ञान

आत्मज्ञान चार श्लोकांत नारायणानें शब्दबद्ध केलें.

इतरासी ज्ञान सांगतां । अमूप वाढेल ग्रंथकथा ।
पुत्रस्नेहें कळवळोनि आतां । चौंश्लोकीं निजात्मता उपदेशी देवो ॥२५॥

यालागीं श्रोते सज्जन । धांवा पावा सावधान ।
कल्पादी जें पुरातन । अनादि ज्ञान हरी सांगें ॥२६॥

ज्ञानधन नारायण । देऊरिघे पुत्राकारणें ।
एका जनार्दनाचे तानें । विभागी परी नेणें वांटा मागों ॥२७॥

यालागीं श्रीजनार्दनें । मर्‍हाटी वाटा मजकारणें ।
दीधला ज्ञानें समसमानें । माउली जाणे कदां तान्हें न करी ॥२८॥

तें श्रीनाथांनी मराठींत रुपांतरित केलें

यालागीं संस्कृताचा ज्ञानार्थू । मर्‍हाटियामाजीं सांगतू ।
निडारिला घमघमितू । असे नांदतू परमानंदें ॥२९॥

पहातां चारी श्लोक नेमस्त । तेणें हाता चढे परमार्थ ।
थोडेनि जीडे निजस्वार्थ । संसाराचें खत समूळ फाटे ॥४३०॥

विषयाचें धरणें उठी । अहंकाराची विरे गांठी ।
हे चतुः श्लोकींची गोष्टी । सर्वथा धाकुटी ह्नणों नये ॥३१॥

हें चतुःश्लोकी भागवत । स्रष्टयाशी सांगे श्रीभगवंत ।
तेथें श्रोती व्हावें दत्तचित्त । श्रवणे परमार्थ जिवासी जोडे ॥३२॥

पुढील ज्ञान सांगावयासी । अनुग्रहिले विधातयासी ।
मग उल्हासें हषीकेशी । काय त्यापाशीं बोलत ॥३३॥

पूर्णबोधाचा ज्ञानोपदेश

जें समस्तज्ञानाची आदी । जें सृष्टिकर्माचेही आधीं ।
ते स्वरुप सांगेन त्रिशुद्धी । आइक सुबुद्धी विधातया ॥३४॥

जें निजज्ञानाचें निजमूळ । जें विज्ञानाचें परिपक्व फळ ।
जें स्वरुप शुद्ध केवळ । सांगेन अढळ आत्मभूतुज ॥३५॥

जें समस्त गुह्यांचें निजसार । जें प्रेमाचें निजभांडार ।
ज्याचा वेदशास्त्रां नकळे पार । ते परात्पर सांगेन ॥३६॥

जो आनंदाचा निजानंदू । जो बोधाचाही निजबोधू ।
जेंणें होय परमानंदू । तो पूर्णबोधू परियेसी विधातया ॥३७॥

जें सुखाचें परमसुख । जें अमृताचें निजपीयूष ।
जेणें निवारे जन्मदुःख । तें ब्रह्मतारक ऐक विधात्या ॥३८॥

जें मनें नाही देखिलें ॥ जें बुद्धीनें नाही ओळखिलें ।
तें निजस्वरुप आपुलें । सांगेन संचलें परमेष्ठी ॥३९॥

ज्यापूर्वी कोणी नाहीं । शेवट ठाई नपडे कांहीं ।
ऐसे स्वरुप जें कांहीं । तें सांगेन. पाही परमेष्ठी ॥४४०॥

मीचि एकू असुळ विसुळू । मीच एकू सकळीं सकळू ।
मीचि एकू सूक्ष्मस्थूळू । तें स्वरुप प्रांजळू परियेसी ॥४१॥

नारायण म्हणाले – " सृष्टीपूर्वी मी स्वानंदस्थित होतों "

सृष्टिपूर्वी मी निजरुप । शुद्धब्रह्म निर्विकल्प ।
स्वानंदकंद स्वरुप । पूर्णत्वें पूर्ण अमूप मीचि स्वयें ॥४२॥

न पेरितां उंसाचीं कांडीं । रस नचाखतांही तोंडीं ।
जैशी आहे उंसाची गोडी । तेवीं स्वानंदस्थिती चोखडी पूर्वी माझी ॥४३॥

बोल नयेतां वाचे आंतू । बोलें न बोलतां ते मातू ।
ते कालींचा जैसा शद्वार्थू । तेवीं मी अच्युतू सृष्टिपूर्वी ॥४४॥

दृष्टी नरिघतां दृष्टीसी । भेटी नहोतां दृश्याती ।
ते देखणी स्थिती जैसी । तेवीं मी अच्युत सृष्टिपूर्वीं ॥४५॥

ननिफजतां निशाणासी । घावो नघालितां तयासी ।
ते त्या नादाची स्थिती जैशी । तेवीं मी हषीकेशी सृष्टिपूर्वी ॥४६॥

रसीं नयेतां रसत्वासी । रसनेनें नचाखतां त्यासी ।
तेच्या स्वादाची स्थिती जैशी । तेवी मी हषीकेशी सृष्टिपूर्वी ॥४७॥

स्त्रीपुरुषयोग जो बोधू । नहोतां रतीरमणसंबंधू ।
तेकाळीं जैसा असे आनंदू । तेवीं मी परमानंदू सृष्टिपूर्वी ॥४८॥

ननिपजतां चराचर । नहोतां धटमठादि आकार ।
गगन जैसें निर्विकार । तेवीं मी चिदंबर सृष्टिपूर्वी ॥४९॥

पूर्वी ह्नणावयाचें लक्षण । नसतां सत् असत् कारण ।
मी परमानंदें परिपूर्ण । या नांव जाण सृष्टिपूरी ॥४५०॥

सत म्हणिजे सूक्ष्ममूळ । असत् म्हणिजे नश्वरस्थूळ ।
या अतीत मी निर्मळ । या नांव केवळ सृष्टिपूर्वी ॥५१॥

सूक्ष्म स्थूळ माया घटी । माझ्या निजांगें जगवें उठी ।
माझे पूर्णत्वाचे पोटीं । भासली सृष्टी तेही मीचि ॥५२॥

सांजवेळें पडिला दोर । त्यातें म्हणती सर्प थोर ।
तेंवीं पूर्णब्रह्म परमेश्वर । त्या मातें संसार मानवी म्हणती ॥५३॥

भिंतीवेगळें चित्र नुठी । तेवीं मजवेगळी नदिसे सृष्टी ।
मी जगद्रूप जगजेठी । माझिया निजपुष्टी जगत्व जगा ॥५४॥

जगाचें जें नांवरुप । तो मी परमात्मा चित्स्वरुप ।
माझ्या निजांगाचें स्वरुप । तें विश्वरुप स्वयें भासे ॥५५॥

जेवीं सुवर्णाचें केलें लेंणें । तें सोन्यावेगळें होऊं नेणे ॥
तेवीं माझेनि पूर्णपणें । जगाचें नांदणें मद्रूपें नांदे ॥५६॥

गोडी तेचि साखर देख । तेवीं चिदात्मा मी तेचि हे लोक ।
जगासी मज वेगळिक । अणुमात्र देख असेना ॥५७॥

जेवीं सोनेंचि अलंकार । तेवीं संसार मी सर्वेश्वर ।
मजवेगळावेव्हार । नाहीं अणुमात्र भवभावा ॥५८॥

जेवीं तंतूवेगळा नव्हे पट । मृत्तिकेवेगळा नव्हे घट ।
अक्षरावेगळा नव्हे पाठ । तेवी मी चिद्रूपें प्रगट संसार भासे ॥५९॥

जो मी सृष्टिपूर्वी एकला । एकपणेंचि असें संचला ।
तो मी सृष्टी आकारें आकारला । परी दुजा नाहीं आला वटीं बीज जेवीं ॥४६०॥

जैशा वटाचिया पारंबिया । वटीं वटरुप निघालिया ।
तैसा मी संसारा यया । स्थूलसूक्ष्ममायाकारणरुपें ॥६१॥

पारंबिया नांवाच्या भिन्नता । हरवीचिना स्वस्वरुपता ।
तेवी स्थूलसूक्ष्म माया ह्नणतां । माझी चित्सत्ता मोडेना ॥६२॥

तेवीं जंगमस्थावरादि आकारें । अंडजस्वैदजादिसाकारें ।
सृष्टी भासली सृष्टयाकारें । जाण साचारें मद्रूप जग ॥६३॥

एवं मीचि मी सृष्टयाकारा । भूतभौतिकादिपसारा ।
विषम आकारविकारा । नाना कल्लोळ सागरामाजीं जैसे ॥६७॥

जें अद्वितीय अत्यंतिक । निर्विकल्प वस्तु एक ।
तेंचि केवी जालें अनेक । तदर्थीचा देख दृष्टांत दाखवूं ॥६८॥

पहातां जे गोडी उंसीं । तेचि गोडीं ओसंडे रसी ।
ते गोडी बांधयासी । गूळी गूळरुपें गुळासि झाली ॥६९॥

त्या स्वादाची साखर केली । तेचि गोडी नाबद जाली ।
ऐशी नानाकारें रुपा आली । परी गोडी ते संचली जैशी तैशी ॥४७०॥

तेवीं मी चिदूपें प्रबळ । स्वयें जालों सूक्ष्मस्थूळ ।
मायागुणें सृष्टी सकळ । चित्सत्ता केवळ मीचि भासें ॥७१॥

कां मृतिकेची गोकुळे केली । नानानामाकारें पूजिली ।
परी मृत्तिकेपणा नाही मुकली । तेवीं सृष्टी जाली मद्रूपें सकळ ॥७२॥

यापरी गा सृष्ट्याकारें । असिजे मीया श्रीधरें ।
तेचि सृष्टीनंतरें उरे । स्वरुप साचोकारें चिन्मात्र माझें ॥७३॥

जेवीं कां कुलालाचें चक्र । गरगरा भोवें चक्राकार ।
भंवोनि रहातां स्थिर । उरे पैं चक्र चक्ररुपें ॥७४॥

तेवीं नामरुप संबंध । जाऊनि भूतमौतिकभेद ।
अंती उरे मी परमानंद । स्वानंदकंद निजरुपें ॥७५॥

दोर भासला सर्पांकारु । सर्परुपें भासे दोरु ।
दोरी लोपल्या अजगरुं । अंतीं उरे दोरु दोररुपें ॥७६॥

जळींचिया जळगारा । भासती नानाकार अपारा ।
अंतीं विरोनियां साचारा । उरती त्या नीरा नीररुपें ॥७७॥

तेवी सृष्टीआदिमध्य अंतीं । मीच एक भासें चैतन्यमूर्ती ।
हें सत्य जाण प्रजापती । इतर उपपत्ती ते वावो ॥७८॥

जेवीं सुताचिये सुतगुंजे । आदिमध्यअंती नाहीं दुजे ।
तेवी म्यां एकले अधोक्षजें । सृष्टीचा होइजे आदिमध्यअंतू ॥७९॥

होकां ज्याचें नांव ह्नणती लुगडें । तें पाहों जातां सूतचि उघडें ।
तेवी जग पहातां धडफूडें । आद्यंती चोखडें निजरुप माझें ॥४८०॥

यालागीं सृष्टिआदी मीचि असें । सृष्टिरुपे मीचि भासें ।
अंतीं सृष्टिचेनि नाशें । म्यां उरिजे अविनाशें अच्युतानतें ॥८१॥

Leave a Comment