गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान नाहीं
न होतां गुरुकृपा संपूर्ण । कदा न साधे आत्मज्ञान ।
त्या गुरुत्वालागी नारायण । आपुलें आपण स्वरुप दावी ॥५०॥
नसेवितां सदगुरुचरण । स्रष्टयासी नव्हे ब्रह्मज्ञान ।
त्या गुरुत्वाचें महिमान । श्रीनारायण स्वये दावी ॥५१॥
मागे उपदेशिलें ‘ तप तप ’ । परी प्रत्यक्ष नव्हे सदगुरुरुप ।
गुरुकृपा नव्हतां सद्रूप । शिष्याचे विकल्प न तुटती कदा ॥५२॥
संतोषोनी सदगुरुनाथ । शिष्याचे माथां जों न ठेवी हात ।
तोंवरी नातुडे परमार्थ । हा निश्चितार्थ हरि जाणे ॥५३॥
यालागी श्रीनारायण । गुरुत्वें आपुलें आपण ।
शिष्यासी देऊनी दर्शन । स्वयें ब्रह्मज्ञान उपदेशितसे ॥५४॥
निष्ठें केली तपस्थिती । तेणें झाली सदगुरुप्राप्ती ।
आतां गुरुमुखें प्रजापती । आत्मज्ञानप्राप्ती पावेल पां ॥५५॥
जैं पूर्वपुण्याची निष्काम जोडी । हैं सदगुरुचरण जोडिती जोडी ।
गुरुचरणी आवडी गाढी । तैं पाविजे रोकडी ब्रह्मप्राप्ती ॥५६॥
गुरुविषयीं लवमात्रहि विकल्प उपयोगी नाहीं
गुरुच्या ठायी नींचपण । शिष्यें देखिले असे जाण । अणुमात्र केलिया हेळण ।
ब्रह्मज्ञान कदा नुपजे यालागी कृष्णकृपानिधी । निजवैभवविद्धि स्त्रष्टयासी दावी ॥५८॥
गुरुचे अगाध महिमान । दावावया श्रीनारायण ।
जेथें लक्ष्मी करी संमार्जन । तें वैकुंठभुवन स्वयें दावे ॥५९॥