अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम् |
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा |
अर्थ : ओंजळीतील फुले दोन्ही हातांना सुगंधित करतात. वा ! वा! सुमनाचे [ फुलांसारखे, सुंदर अन्तःकरण असणार्याचे ] प्रेम हे डाव्या उजव्या हातावर [फुलांच्या संदर्भात हात, सज्जनाच्या बाबतीत क्षुद्र व सामर्थ्यवान] सारखेच असते.
पायाद्वो जमदग्निवंशतिलकॉ वीरव्रतालंकृतो रामो नाम मुनीश्वरो नृपवधे भास्वत्कुठारायुधः |
येनाशेषहताहिताङ्गरुधिरैः सन्तर्पिताः पूर्वजा भक्त्या चाश्वमखे समुद्रवसना भूर्हन्तकारीकृता ||
अर्थ : ज्याने सर्व वाईट अशा शत्रूंच्या अंगातील रक्ताने आपल्या पूर्वजांचे श्राद्ध केले. [त्याच्या वडिलांना मारले अशा शत्रूंना मारताना ] ज्याचा परशू तळपत होता. पराक्रम हे ज्याचे व्रत होते. असे जमदग्नि कुलशिरोमणि परशुराम नावाचे श्रेष्ठ ऋषी तुमचे रक्षण करोत. असे की ज्यांनी अश्वमेध यज्ञात समुद्रापर्यन्तची सर्व जमीन [यज्ञातल्या पुरोहितांना] दान केली.
अर्थागमो नित्यमरोगिता च प्रिया च भार्या प्रियवादिनी च |
वश्यश्च पुत्रोऽर्थकरी च विद्या षड् जीवलोकस्य सुखानि राजन् ||
अर्थ : पैसे [नेहमी] मिळणे , कायम तब्येत चांगली असणे , आवडती पत्नी ,आणि ती गोड बोलणारी ,ताब्यात असलेला मुलगा आणि पैसे मिळवून देणारी विद्या , हे राजा , या सहा गोष्टी या जगात सुख देणाऱ्या आहेत.
वितरति यावद्दाता तावत्सकलोऽपि भवति कलभाषी |
विरते पयसि घनेभ्यः शाम्यन्ति शिखण्डिनां ध्वनयः ||
अर्थ : उदार मनुष्य जोपर्यंत दान करत असतो तो पर्यंत सर्वजण [ त्याच्या बद्दल] गोड बोलत असतात. [त्याला गरिबी आल्यावर किंवा तो देत नाही म्हटल्यावर कोणी तसं गोड बोलत नाही.] मोरांचा केकारव ढगातील पाणी संपल्यावर थांबतो.
दुर्बलस्य बलं राजा बालानां रोदनं बलम् |
बलं मूर्खस्य मौनित्वं चौराणामनृतं बलम् ||
अर्थ : राजा [शासनसंस्था] ही दुबळ्यांची ताकद आहे. लहान मुलांची ताकद म्हणजे त्याचं रडणं. गप्प बसणं ही मूर्खांची ताकद आहे आणि खोटेपणा ही चोरांची ताकद आहे.
आदानस्य प्रदानस्य कर्तव्यस्य च कर्मणः |
क्षिप्रमक्रियमाणस्य कालः पिबति तद्रसम् ||
अर्थ : देणं , घेणं ,कर्तव्य या गोष्टी लगेच न केल्या तर त्यातील गोडी काळ खाऊन टाकतो.
यदा न कुरुते भावं सर्वभुतेष्वमङ्गलम् |
समदृष्टेस्तदा पुंसः सर्वाः सुखमया दिशः || भागवत नववा स्कंध एकोणिसावा अध्याय १५ वा श्लोक
अर्थ : जेव्हा मनुष्य कुठल्याही प्राण्याबद्दल वाईट कल्पना करत नाही, त्याची दृष्टी सम असते, तेव्हा त्याला [जगात] सर्व ठिकाणी सुख लाभते.
न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति |
हविषा कृष्णवर्त्मेव पुनरेवाभिवर्धते || भागवत नववा स्कंध एकोणिसावा अध्याय १४ वा श्लोक.
अर्थ : वासना या [वस्तूंचा] उपभोग घेतल्याने शान्त [नाहीशा] होत नाहीत. तूप घातल्यावर अग्नी जसा वाढतो तशा त्या वाढतात.