अनुतापयुक्त ब्रह्मदेवाला तप ही दोन अक्षरें ऐकावयास आलीं
त्या चित्तशुद्धीलागीं जाण । भावें करावें भगवदभजन ।
कां गुरुदास्य करितां पूर्ण । परब्रह्म जाण पायां लागे ॥८३॥
ते घडावया भगवदभक्ती । तपादिसाधन सुयुक्ती ।
देव सांगे ब्रह्मयाप्रती । ऐक परीक्षिती नृपवर्या ॥८४॥
एवं कमलासनीं ब्रह्मा आपण । बैसलासे अनुतापें पूर्णं ।
तंव एकार्णवी निकट जाण । द्वयक्षर वचन द्विवार ऐके ॥८५॥
कोण रुप कोण वर्ण । कैसेपरीचें उच्चारण ।
त्या अक्षरांचा अर्थ कोण । तेंही लक्षण ऐक राया ॥८६॥
तकारापासुनी पकारावरी । ऐसें ब्रह्मा साक्षात्कारी ।
त्याची ऐक्यता झडकरी । हो लवकरी विधात्या तुज ॥८७॥
ऐसीं तप ही अक्षरें दोन्ही । परमेष्ठी ऐके कानी ।
तेचि दोन्ही वेळा करुनी । तपतप हे ध्वनी परिसत ॥८८॥
जैसा परमआप्त येऊनी । हितोपदेश सांगे कानीं ।
तेवीं आईकोनी दोन्ही । विधाता मनीं चमत्कारला ॥८९॥
हें तपस्वियांचे निजधन । यालागीं ते तपोधन ।
तपोबळे ऋषिजन । प्रतिसृष्टी जाण करुं शकती ॥९०॥