क्षमा

क्षमेला मोल नाही. क्षमा हे शस्त्र विलक्षण शक्तीमान आहे. क्षमेत तलवारीच्या धारा बोथट करण्याची क्षमता आहे. क्षमावान असतो, त्याला सगळे सहज साध्य होते. क्षमावान माणसाचे बळ, तेज वाढत असते. अपराध्याला शासन करण्याची क्षमता असूनही जो तसे करत नाही, तोच क्षमावान. क्षमावान बनणे दुबळ्याचे काम नाही. शक्तीशालीच क्षमावान बनू शकतो. क्षमावान माणसाला अहंकारी लोक दुबळा मानतात. वास्तविक अहंकारीच दुबळा असतो. क्षमा ‘ऊर्जा अकारण व्यर्थ होऊ देत नाही. क्रोधी माणूस दुबळा, तर क्षमावान शक्तीमान असतो.

एका गावाच्या सीमेवरून एक संत जात असतात. गावाच्या सीमेवर लोक एका स्त्रीला छळत असतात. त्या संतांनी त्यांना विचारल्यावर ते सांगतात, ‘ही स्त्री व्यभिचारी आहे. ही गावाचे दूषण आहे, धर्मशास्त्र सांगते, ‘हिला दगडांनी ठेचून ठार करा. आपण सांगता, पाप्यालाही क्षमा करा. तुम्ही खरे कि धर्मशास्त्र खरे ? क्षमा केली, तर धर्मशास्त्र खोटे ठरेल. दगडांनी ठेचून ठार करायला संमती दिली, तर तुमचे वचन खोटे ठरेल. आम्हाला निर्णय द्या.

मोठा पेच असतो. तिला दगडांनी ठेचून मारायची अनुमती दिली, तर क्षमेला अर्थ उरत नाही. मग महापाप्यालाही क्षमा करावी, असे जे धर्मशास्त्र सांगते त्याची काय वाट ? तो सत्पुरुष क्षणभर डोळे मिटून ध्यान करतो, अंतर्मुख होतो आणि निर्णय देतो, शास्त्रही सत्य आहे, माझे वचनही सत्य आहे. दोन्हींत अंतर नाही, विरोध नाही. ज्यांच्या अंतःकरणाला कधीच व्यभिचाराचा स्पर्श झाला नाही, त्यांनीच या व्यभिचारी पापिणीला दगड मारावे. या स्त्रीला दगड मारायचा अधिकार त्यांनाच आहे, ज्यांनी शरिरानेच नव्हे, तर मनानेही कधी व्यभिचार केलेला नाही. त्यांनी निःशंक या स्त्रीला दगडाने ठेचून टाका.

जो पुढारी होता, त्याची पावले मागे फिरतात. हळूहळू सगळे निघून जातात. उरते ती एकटी व्यभिचारीणी. ती त्या संताच्या पायावर डोके ठेवते. त्यांचे पाय अश्रूंनी भिजवून टाकते आणि म्हणते, हे सगळे लोक पापी होते. त्यांना मी पापी नाही, असे सांगू शकत होते. तुम्ही परम पवित्र आहात. मी गुन्हेगार आहे. मला क्षमा मागायचा अधिकार नाही. तुमच्याजवळ मी क्षमेची याचना करीत नाही. त्यांच्याकडून क्षमेची अपेक्षा होती; पण तुमची क्षमा कशी मागू ? मला ठार करा. तुमच्या पवित्र हातांनी माझे हे पापी शरीर नष्ट करून टाका.
ते

संत पुन्हा डोळे मिटतात. क्षणभर ध्यान करून म्हणतात, मी तुला शिक्षा देणारा कोण ? मी तुझा पालनकर्ता नाही. तुला मी शासन कसे करू ? मला काय अधिकार ? तो अधिकार परमात्म्याचा आहे.

ही क्षमा ! क्षमावान तोच असू शकतो, जो अखंड आपले दोष पहातो. इंद्रिये आणि विषय यांचा संपर्क आला, आसक्ती आली की, पाप घडतेच. स्वतःचे दोष जाणणाराच क्षमावान असू शकतो. स्वतःचे दोष जाणणे हीच शक्ती आहे. शक्तीमानच स्वतःचे दोष ओळखू शकतो. तोच निरहंकारी बनू शकतो. तोच क्षमावान होऊ शकतो.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, जून २०१०)

Leave a Comment