सर्वस्य हि परीक्ष्यन्ते स्वभावा नेतरे गुणाः |
अतीत्य हि गुणान्सर्वान्स्वभावो मूर्ध्नि वर्तते ||
अर्थ : कुणाच्याही स्वभावाची आधी पारख करावी, इतर गुणांची नव्हे. [त्या गुणांना नंतरच महत्व द्यावं] कारण सर्व गुणांना मागे टाकून स्वभाव हा उचल खातो.
एकं हन्यान्न वा हन्यादिषुर्मुक्तो धनुष्मता |
बुद्धिर्बुद्धिमता युक्ता हन्ति राज्यं सनायकम् ||
अर्थ : धनुष्य धारण करणाऱ्याने बाण सोडला तर तो एकच माणसाला मारेल किंवा [एखादे वेळी नेम चुकल्यास] मारणार पण नाही. परंतु बुद्धिमान माणसाने डोक्याने काम केले तर राजा सकट राज्याचा तो नाश करू शकतो.
राज्ञि धर्मिणि धर्मिष्ठाः पापे पापाः समे समाः |
लोकास्तमनुवर्तन्ते यथा राजा तथा प्रजा ||
अर्थ : राजा [प्रशासक] जर धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होते. तो दुराचारी असेल तर जनता दुराचारी होते. जर तो [सर्वाशी] सारखा वागत असेल तर ती पण तशीच वागते. माणसे नेहमी राजा प्रमाणेच वागतात.
बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते पिपासितैः काव्यरसो न पीयते |
न च्छन्दसा केनचिदुद्ध्रृतं कुलं हिरण्यमेवार्जय निष्फला गुणाः ||
अर्थ : भूकेलेल्यांची भूक व्याकरण खाऊन भागत नाही. तहानलेले काव्य परीक्षण पिऊ शकत नाहीत. वेदांच्या [ज्ञानाने] कोणी घरात बरकत आणू शकत नाही. त्यामुळे धन मिळवावेत, गुण वाया जातात.
व्रजत्यधः प्रयात्युच्चैर्नरः स्वैरेव चेष्टितैः |
अधः कूपस्य खनिता ऊर्ध्वं प्रासादकारकः ||
अर्थ : माणसाची स्वतःच्या कृत्यांमुळेच प्रगती किंवा अधोगती होते. विहीर खणणारा खाली खाली जातो आणि हवेली बांधणारा वर वर जातो.
उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीर्दैवं प्रधानमिति कापुरुषा वदन्ति |
दैवं विहाय कुरु पौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदि न सिध्यति कॉऽत्र दोषः ||
अर्थ : सिंहाप्रमाणे असणाऱ्या कामसू माणसाकडे लक्ष्मी [आपणहून] येते. मात्र घाबरट लोक नशीब महत्वाचे आहे असे म्हणतात. नशिबाचा विचार न करता स्वतःच्या सामर्थ्याने प्रयत्न कर आणि प्रयत्न करूनही जर [ध्येय] गाठता आलं नाही तर त्यात [तुझा] काय दोष आहे?
सौवर्णानि सरोजानि निर्मातुं सन्ति शिल्पिनः |
तत्र सौरभनिर्माणे चतुरश्चतुराननः ||
अर्थ : [चांगले] सोनार सोन्याची कमळे बनवू शकतात. पण त्यात सुगंध मात्र फक्त चतुर असा ब्रह्मदेवच निर्माण करू शकतो. [निसर्गा इतकी उत्तम आणि परिपूर्ण रचना मानव करू शकत नाही]
लुब्धानां याचकः शत्रुश्चोराणां चन्द्रमा रिपुः |
जारस्त्रीणां पतिः शत्रुर्मूखाणां बोधको रिपुः ||
अर्थ : [काहीतरी] मागणारा हा हावरटांचा शत्रु असतो. चन्द्र हा चोरांचा शत्रु आहे. वाईट चालीच्या स्त्रियांचा पति हा शत्रु असतो आणि [चांगले] शिकवणारा हा मूर्खांना शत्रु वाटतो.