बालमित्रांनो, रामनवमीला प्रभु श्रीरामाचा जन्म झाला. आदर्श राजा म्हणून आपण श्रीरामाचा सर्वत्र उल्लेख करतो. आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीचाही त्याग करणाऱ्या रामाने वालीचा वध करून सुग्रीवाला त्याचे राज्य कसे मिळवून दिले, ते आज आपण पाहू.
वाली आणि सुग्रीव हे दोघे भाऊ किश्किंदा नगरीत रहात होते. दोघांचेही एकमेकांवर फार प्रेम होते. त्यांच्यापैकी वाली हा मोठा असल्यामुळे तो त्या नगरीचा राजा होता. एकदा मायावी नावाचा एक बलाढ्य राक्षस त्या नगरीत आला. वाली आणि तो राक्षस यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. दोघेही तितकेच पराक्रमी होते. युद्ध करत ते दोघेही एका गुहेत शिरले. गुहेच्या दाराशी उभ्या असलेल्या सुग्रीवला गुहेत फार भयंकर युद्ध चालले असल्याचे आतून ऐकू येणाऱ्या आवाजामुळे समजले. अचानक एका मोठ्या आवाजासह रक्ताचा पाट गुहेतून येतांना दिसला. ते पाहून आपल्या भावाला वीरगती प्राप्त झाली, असे सुग्रीवला वाटले. मायावी राक्षस आता गुहेतून बाहेर येऊन आपल्यालाही मारून टाकेल, या भीतीने सुग्रीवने एका मोठ्या दगडाने गुहेचे दार बंद करून तो नगरीत परतला. आपला भाऊ आपल्याला सोडून गेल्याचे दु:ख सुग्रीवला होते; परंतु लोकांच्या आग्रहास्तव आणि वालीचा मुलगा वयाने लहान असल्यामुळे शेवटी सुग्रीवने राज्याभिषेक करवून घेतला.
काही दिवसांनंतर वाली परत आला. तेव्हा राज्याच्या लालसेने सुग्रीवने आपल्याला धोका दिला, असा त्याचा गैरसमज झाला. त्यामुळे त्याला अतिशय राग आला. रागाच्या भरात त्याने आपल्या प्रिय भावाला राज्यातून हाकलून लावले आणि त्याच्या पत्नीला बंदिस्त केले. आपल्या बलाढ्य भावाच्या रागाला घाबरून सुग्रीव पळाला आणि ऋष्यमूक डोंगरावर सुरक्षित राहिला. वालीला मातंगऋषींचा शाप असल्यामुळे तो तेथे येऊ शकत नव्हता.
मध्यंतरी राम आणि लक्ष्मण हे दोघेही सीतेच्या शोधात या डोंगराच्या जवळून जात होते. ते पाहून हनुमंताने ही माहिती सुग्रीवाला सांगितली. त्या क्षणी सुग्रीवने जाऊन रामाचे पाय धरले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाविषयी सांगितले. सर्व शांतपणे ऐकून घेतल्यानंतर रामाने सांगितले, ”मातेसमान असलेल्या आपल्या वहिनीला त्याने बंदिस्त केल्यामुळे वाली मृत्यूस पात्र आहे. मी वालीचा वध करून तुझी पत्नी आणि तुझे राज्य तुला मिळवून देईन.”
ठरल्याप्रमाणे राम आणि लक्ष्मण यांसह सुग्रीव किश्किंदला गेला आणि वालीला युद्धासाठी आव्हान केले. आधीच चिडलेला वाली सुग्रीवला पहाताच अतिशय क्रोधाने त्याच्यासमोर उभा राहिला. दोघांमध्ये युद्ध चालू झाले. इकडे झाडाच्या आडोशाला असलेले राम आणि लक्ष्मण भ्रमात पडले; कारण वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये इतके साम्य होते की, त्यांना ओळखणे कठीण झाले. नंतर खुणेसाठी रामाने सुग्रीवला गळयात घालण्यासाठी फुलांचा एक हार दिला. आपल्या पाठीशी राम असल्यामुळे तो हार गळयात घालून अतिशय आत्मविश्वासाने सुग्रीव युद्ध करू लागला. काही वेळानंतर सुग्रीव युद्धामध्ये हतबल होत असलेला पाहून रामाने आपल्या बाणाने वालीला ठार केले. छातीत घुसलेल्या रामाच्या बाणामुळे वाली धाडकन् भूमीवर कोसळला आणि मरण पावला. शेवटच्या क्षणी मात्र त्याने राम आणि सुग्रीव यांच्याकडे क्षमायाचना केली.
मुलांनो, गैरसमजाने केवढा अनर्थ होतो, हे वाली आणि सुग्रीव यांच्या कथेवरून दिसून आले. म्हणून चौकशी केल्याविना कुठलीही कृती करू नये.