एकदा तेनालीराम तीन मासाची सुट्टी घेऊन बद्रिनाथाच्या यात्रेला गेला. तो जाताच मंत्री सेनापती आणि काही सरदारांचे संगनमत झाले. मंत्रीने सम्राट कृष्णदेवरायना सुचविले की, राज्याच्या सीमेवर नेहमीच शत्रुंच्या आक्रमणाचा धोका असतो. आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की, ज्यामुळे सीमेच्या आसपास रहाणारी जनता निर्भय होऊन सुखाने जगेल. महाराजांना या गोष्टीत तथ्य वाटले. त्यांनी लगेच आदेश दिला की, याबाबतीत एक योजना बनवण्यात यावी.
मंत्रीमंडळाने त्वरीत योजना बनवली. खर्चासहीत पूर्ण. तपशील महाराजांना प्रस्तुत केला. महाराजांनीही त्याला अनुमती दिली. मंडळाची मजाच झाली. त्यांनी आपल्या परिवारांतील सदस्यांनाच नाही, तर दूर दूरच्या नातेवाईकांनाही चाकरीला (नोकरीवर) ठेवले. पैसा व्यर्थ खर्च होऊ लागला. सम्राट मंत्र्यांना त्याविषयी विचारित, तेव्हा मंत्री एकच उत्तर द्यायचे ‘‘अन्नदाता, पहात रहा. ही योजना पूर्ण होताच विजयनगरच्या शत्रुला ह्या सीमा हिमालय पर्वतासारख्या भासतील.’’ होता-होता दोन मास लोटले. तिसर्या मासात तेनालीराम यात्रेवरुन आला. विजयनगरची सीमा ओलांडताच त्याला सुगावा लागला की, योजने अंतर्गत मंत्री, सेनापती पंडित तसेच अनेक दरबारीही आपआपला स्वार्थ साधत होते. सीमा सुरक्षेच्या नावाखाली अनेक वस्त्या जमीनदोस्त केल्या होत्या. कित्येक शेतमळे उध्वस्त केले होते. अत्याचार आणि अराजकता माजलेली होती आणि सम्राटाच्या जवळ कोणालाही जाऊ दिले जात नव्हते.
सीमा क्षेत्रातील जनतेची करुण कहाणी ऐकून तो चिंताग्रस्त झाला; परंतु हे सर्व महाराजांना सांगणार कसे ? बराच विचार केल्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. तीन मासांच्या रजेनंतर ज्या दिवशी तेनालीराम दरबारात हजर झाला, तेव्हा राजा कृष्णदेव रायनी हसून स्वागत केले. मग म्हणाले, ‘‘तेनालीराम तुझ्या अनुपस्थितीत आम्ही पुष्कळ मोठे कार्य केले आहे. आम्ही विजयनगरच्या सर्व सीमा अभेद्य बनवल्या, आता तेथील रहिवाशी निर्भयतेने राहू शकतात.’’
‘‘खरे आहे महाराज ! ’’ तेनालीराम म्हणाला, ‘‘सीमा क्षेत्रात आपला जयजयकार होत आहे. मंत्रीजीच्या या महत्वपूर्ण कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत.’’ मंत्री तेनालीराम थोडा वेळ थांबून म्हणाला, ‘‘अन्नदाता, शत्रुच्या आक्रमणापासून भयमुक्त होऊन सीमांत गाववाल्यांनी नाट्यमंडळ बनवले आहे. आपण तर कलेचे पारखी आहात म्हणूनच आपल्या पहिल्या नाटकाचे उद्घाटन आपल्याच हस्ते व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.’’
सम्राट कृष्णदेवराय प्रसन्न झाले. त्यांनी लगेच स्वीकृती दिली आणि दुसर्याच दिवशी रंगशाळेत नाटक आयोजित केले गेले. कृष्णदेवराय सहपरिवार उपस्थित झाले. सर्व दरबारी तसेच राज्यातील प्रतिष्ठित नागरिकांनाही आमंत्रित केले गेले. नाटक वेळेवर चालू झाले; पण ते नाटक कसले होते ? तर सीमांत रहीवाशांवर होणार्या अत्याचारांवरची जिवंत प्रतिमा होती. मधे-मधे विदुषक रंगमंचावर येई आणि सम्राट कृष्णदेवरायांकडे पाहून मोठ्या आवाजात म्हणे, ‘‘दया करा महाराज ! आम्हाला वाचवा ! शत्रूच्या आक्रमणापेक्षा अधिक आम्हाला आपल्या माणसांपासून सुरक्षा हवी आहे.’’ मंत्री, सेनापती, पंडीत, राजदरबारी, नागरिक सर्वच हैराण झाले. महाराजांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी तेनालीरामला बोलवून विचारले, ‘‘हे सर्व काय आहे ?’’ ‘‘मला काही माहित नाही, महाराज’’ तेनालीराम भोळेपणाचा आव आणून म्हणाला, ‘‘तुम्ही ह्या लोकांनाच विचारा ना’’!
महाराजांनी रंगशाळेतच विचारपूस केली. तेव्हा खरी गोष्ट समोर आली. त्याच क्षणी बर्याचशा दरबार्यांना मिळणारी सवलत थांबवली गेली. मंत्री, सेनापती तसेच पंडितजीवर मोठे मोठे खटले भरले गेले आणि तेनालीरामची स्तुती करत सम्राट कृष्णदेव राय म्हणाले, ‘‘राजनीतीमध्ये तुझ्यासारखा चतुर कोणीच नाही, तेनालीराम तू मारतोही आणि आवाजही होऊ देत नाहीस.’’
– (संदर्भ : जय हनुमान साप्ताहिक २ जानेवारी २०१६)