यज्ञसोमाची संपत्ती दुसर्याला साहाय्य करण्यात व्यय होणे आणि कीर्तीसोमाने स्वतःसाठी राखून ठेवणे : खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. पाटलीपुत्र नगरात दोन भाऊ रहात होते. एकाचे नाव यज्ञसोम तर दुसर्याचे कीर्तीसोम. यज्ञसोम मोठा. त्या दोघांनाही वडिलांची खूप संपत्ती मिळाली होती. यज्ञसोमाने आपली संपत्ती खाण्या-पिण्यात इतरांना सढळ हाताने साहाय्य करण्यात व्यय (खर्च) केली. अखेर त्याचा सगळा पैसा संपून तो निर्धन झाला. कीर्तीसोम मात्र व्यवहारी आणि चतुर होता. त्याने आपल्या संपत्तीचा योग्य उपयोग करून संपत्ती वाढवली.
परिस्थिती बिकट झाल्याने दुसरीकडे जावून उदरनिर्वाहाचे साधन शोधण्याचा निर्णय घेणे : एके दिवशी यज्ञसोम बायकोला म्हणाला, ‘‘आपली परिस्थिती पालटली आहे. दारिद्य्रावस्थेत इथे रहाण्यापेक्षा आपण दुसर्या गावी जाऊ या आणि तिथे काही काम मिळते का बघू या.’’
वाटखर्चासाठी भावाकडे पैसे मागितल्यावर भावाच्या मनात पैसे द्यायचे असूनही बायकोमुळेे नकार देण्याची वेळ येणे : त्याची बायको म्हणाली, ‘‘प्रवासाला जायचे म्हणजे वाटखर्चाला पैसे हवेत. आपल्या जवळ तर मुळीच पैसे नाहीत. कसे जाणार प्रवासाला ?’’ पण यज्ञसोमाने गावातून बाहेर पडायचा निश्चय केला होता. तेव्हा मग त्याची बायको म्हणाली,‘‘ आपण जातच आहात, तर आपल्या धाकट्या भावाकडे वाटखर्चासाठी थोडेसे पैसे मागा.’’ त्याप्रमाणे तो कीर्तीसोमकडे गेला. त्याने त्याच्याकडे
प्रवासखर्चासाठी पैसे मागितले; पण त्याची बायको म्हणाली, ‘‘ज्याने आपले सगळे धन वाटेल तसे उधळले, त्याला धन देऊन काय उपयोग ? जो दरिद्री होतो, तो आमच्या घरी पैसे मागायला कसा येतो, तेच कळत नाही.’’
भावाला त्याच्या अडचणीच्या वेळी काही साहाय्य करावे, कीर्तीसोमलाही वाटत होते; पण बायकोमुळे त्याचे काहीच चालले नाही.
‘देवच आता आपला सांभाळ करेल’, असा विश्वास बाळगून दोघांनी घराबाहेर पडणे : मग सोमाने येऊन सारी हकीकत बायकोला सांगितली. देवच आता आपला सांभाळ करील, असा विश्वास बाळगून ते गावाबाहेर पडले.
अरण्यातून मार्गक्रमणा करत असतांना एका अजगराने सोमयागास गिळण्यास प्रारंभ करणे : यज्ञसोम आणि त्याची बायको चालता चालता एका अरण्यात येऊन पोहोचले. वाटेत एक भला मोठा अजगर त्यांना आडवा आला. दोघेही भीतीने त्याच्याकडे बघत राहिले. एवढ्यात अजगराने यज्ञसोमला विळखा घातला आणि त्याला गिळण्यास प्रारंभ केला.
‘माझा पती माझे सर्वस्व आहे, माझे भिक्षापात्रच आहेे, तू माझ्या भिक्षापात्राचाच नाश करत आहेस; म्हणून त्याला तू गिळू नकोस’, अशी सोमयागाच्या बायकोने अजगराला विनंती करणे : त्याची बायको दुःखावेगाने आक्रोश करू लागली. तेव्हा अजगर म्हणाला, ‘हे कल्याणी तू एवढा आक्रोश का करतेस ?’
यज्ञसोमाची बायको म्हणाली, ‘‘अरे अजगरा, माझा पती हेच माझे सर्वस्व आहे. तू तर त्याला गिळून टाकतो आहेस. या अनोळखी प्रदेशात तू माझ्या भिक्षापात्राचाच नाश करत आहेस.’’
पत्नीच्या बोलण्याने अजगराला दया येणे, त्याने तिला एक सोन्याचे भिक्षापात्र देणे, मला सोन्याच्या भिक्षापात्रात कोण भिक्षा घालणार; म्हणून तिने ते घेण्यास नकार देणे : तिचे बोलणे ऐकून अजगराला तिची दया आली. त्याने आपल्या तोंडातून एक भिक्षापात्र काढले. तिला देत तो म्हणाला, ‘रडू नकोस. हे घे भिक्षापात्र.’ तरी त्या स्त्रीचे रडू काही थांबेना. ती म्हणाली, ‘‘अरे, या सोन्याच्या भिक्षापात्रात कोण मला भिक्षा घालणार ?’’
भिक्षा कोणी घातली नाही, तर त्याच्या मस्तकाचे १०० तुकडे होतील, असे अजगराने सांगताच त्या चतुर स्त्रीने त्या भिक्षापात्रात तिच्या नवर्याचीच भिक्षा मागणे : अजगर म्हणाला, ‘तू भिक्षा मागितल्यावर जर तुला कोणी भिक्षा घातली नाही, तर त्याच्या मस्तकाचे शंभर तुकडे होतील.’ अजगराचे बोलणे झाल्यावर ती चतुर साध्वी त्याला म्हणाली, ‘‘असं असेल, तर तूच मला या पात्रात माझ्या नवर्याची भिक्षा घाल.’’
अजगराने तिच्या पतीला तोंडातून सुखरूप बाहेर काढणे : तिचे बोलणे ऐकताच अजगराने यज्ञसोमला तोंडातून बाहेर काढले, यज्ञसोम जिवंत होता. विशेष म्हणजे त्याला कुठलीही जखम झाली नव्हती. अशा तर्हेने त्या साध्वीला तिचा पती सुखरूपपणे देऊन अजगरालाही आनंद झाला.
पतिव्रता स्त्रीशी संभाषण करण्याने अजगर शापमुक्त होऊन त्याचेे रूपांतर एका दिव्य पुरुषात होणे, नाना रत्नांनी भरलेले सोन्याचे भिक्षापात्र त्याने त्या पती-पत्नीला देऊन आकाश मार्गाने निघून जाणे : एवढ्यात आणखी एक नवलाची गोष्ट घडली. त्या अजगराचे रूपांतर एका दिव्य पुरुषात झाले. तो यज्ञसोम आणि त्याच्या पत्नीला म्हणाला, ‘माझ नाव कांचन वेग. मी विद्याधरांचा राजा होतो. गौतम मुनींच्या शापामुळे मला अजगराचा जन्म प्राप्त झाला. कुणा पतिव्रता स्त्रीशी माझं संभाषण होईपर्यंत मला अजगर म्हणूनच जीवन कंठावं लागणार होतं. आता मी शापमुक्त झालो आहे’, असे म्हणून कांचनवेगाने ते सोन्याचे भिक्षापात्र नाना रत्नांनी भरून यज्ञसोमाच्या हातात दिले आणि तो आकाशातून उडून गेला.
नंतर यज्ञसोम आणि त्याची बायको नाना रत्नांनी भरलेले ते भिक्षापात्र घेऊन घरी आले आणि मिळालेल्या द्रव्याचा उपभोग गरजवंतांसाठी करत सुखान राहू लागले.
– साप्ताहिक जय हनुमान (२०.२.२०१६)