गुरुभक्त संदीपक

गोदावरी नदीच्या काठी महात्मा वेदधर्म यांचा आश्रम होता. त्यांच्याकडे अनेक ठिकाणाहून वेदाध्ययन करण्यासाठी विद्यार्थी येत. त्यांच्या या शिष्यांमध्ये ‘संदीपक’ हा खूप बुध्दिमान होता. तो गुरुभक्तही होता. गुरुंची त्याच्यावर असलेली मर्जी बघून इतर शिष्य त्याचा मत्सर करत. ज्ञानार्जनाचे काम संपत आल्यावर वेदधर्मांनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हटले, ‘‘माझ्या प्रिय शिष्यांनो, तुम्ही सारे गुरुभक्त आहात यात संशय नाही. माझ्याकडून शक्य होते तेवढे ज्ञानदानाचे काम मी केले आहे, तथापि माझ्या पुर्वजन्मीच्या प्रारब्धामुळे आता मला कोड फुटेल, अंधत्व येईल, माझ्या शरीराला दुर्गंधी येईल. मी हा आश्रम सोडून निघून जाईन आणि हा व्याधीग्रस्त काळ काशीला राहून व्यतीत करीन. जोपर्यंत प्रारब्ध संपत नाही, तोपर्यंत माझ्या सेवेसाठी तुमच्यापैकी कोण कोण काशीला यायला तयार आहे.’’

त्यांचे ते बोलणे ऐकून सर्व शिष्यात शांतता पसरली. एवढ्यात संदीपक म्हणाला, ‘‘आचार्य, मी प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत राहून आपली सेवा करायला तयार आहे.’’

गुरुजी म्हणाले, ‘‘बघ, शरीराला कोड होईल, वास येईल, मी आंधळा होईन. तुला माझा खूप त्रास सोसावा लागेल. विचार करुन सांग.’’

संदीपक म्हणाला, ‘‘गुरुदेव, माझी तयारी आहे. आपण बरोबर येण्याची अनुमती द्यावी एवढेच ?’’

दुसर्‍या दिवशी वेदधर्म संदीपकासह काशीला निघाले. काशीत मणिककर्णिक घाटाच्या उत्तरेस कंवलेश्‍वर, येथे राहू लागले. अल्पावधीत त्यांना कोड झाले. त्यांची दृष्टी गेली. त्यांचा स्वभाव रागीट आणि विचित्र झाला. संदीपक अहोरात्र त्यांची सेवा करत होता. त्यांना आंघोळ घालणे, जखमा धुणे, औषध लावणे, कपडे धुणे, जेवू घालणे, सेवा करता करता त्याच्या सर्व इच्छावासना जळून गेल्या. त्याच्या बुध्दीत प्रकाश प्रगटला. ‘‘घर विच आनंद रह्या भरपूर । मनमुख स्वाद न पाया ॥’’ जय मनमुख होऊन साधना कराल तर हाती काही लागणार नाही. गुरुने सांगीतलेल्या मार्गाने आचरण कराल तर भटकणार नाही.

गुरुजींच्या सेवेत अनेक वर्षे लोटली. त्याची गुरुसेवा पाहून प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या पुढे प्रगटले आणि म्हणाले, ‘‘संदीपका, लोक काशीविश्‍वनाथाच्या दर्शनाला येतात; पण मी तुझ्याकडे, न बोलावता आलो आहे; कारण ज्यांच्या ह्रदयात मी सोहं स्वरुपात प्रगटलो अशा सद्गुरुची तू सेवा करतोस, त्यांची शारीरिक स्थिती व्याधीग्रस्त असली, तरी त्यांच्यात चिन्मय तत्व जाणून तू सेवा करतोस. मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तू जे हवे आहे ते माग ?’’

संदीपक संकोचला, ‘‘हे प्रभू आपली प्रसन्नता मला पुरे आहे.’’ असे म्हणाला. मात्र भगवान शंकर ऐकेनात. काहीतरी मागच म्हणून हट्ट धरला.

संदीपकाने सांगितले. ‘‘हे महादेवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे माझे भाग्य आहे. पण वर मागायला मी पराधीन आहे. माझ्या गुरुच्या आज्ञेशिवाय मी तुमच्याकडे काही मागू शकत नाही.’’

शंकरांनी गुरुला विचारुन येण्यास सांगितले. संदीपक गुरुकडे आला आणि विचारले, ‘‘आचार्य, आपल्या कृपेने भगवान शंकर माझ्यावर प्रसन्न होऊन वर देऊ इच्छित आहेत.आपली आज्ञा असेल, तर आपले कोड आणि अंधत्व बरे होण्याचा वर मागू ? ’’

हे ऐकताच वेदधर्म संतापले आणि म्हणाले, ‘‘नालायका ! सेवा टाळू बघतोस काय ? दुष्टा माझी सेवा करुन थकला आहेस म्हणून भीक मागतोस ? शंकर देऊन देऊन काय देतील ? शरीरासाठीचा ना ? प्रारब्ध चुकेल का त्याने ? जा चालता हो इथून. नको म्हणताना बरोबर आलासच का ?’’

संदीपक धावतच भगवान शंकराकडे गेला व काही नको म्हणून सांगितले. हे पाहून शंकर प्रसन्न झाले व सुचकपणे म्हणाले, ‘‘काय गुरु आहेत ? एवढी सेवा करणार्‍या शिष्यावरही रागावतात ?’’

संदीपकाला गुरुला नावे ठेवलेली आवडली नाहीत. ‘‘गुरुकृपा ही केवलं…’’ असे सांगून तो निघून गेला.

शंकरांनी ही हकीगत विष्णूंना सांगितली. त्याची सेवावृत्ती, गुरुनिष्ठा यांचे कौतुक केले. ‘‘गुरुद्वारी झाडलोट करणे, भिक्षा मागणे, त्याला आंघोळ घालणे, जेवु घालणे हीच त्याची पूजा आहे’’ असे सांगितले. त्यांचे ऐकून विष्णूनेही त्याची परीक्षा पाहिली. त्यानेही संदीपकाला वर मागण्यास सांगितले. हट्टच धरला. तेव्हा संदीपकाने विष्णूचे पाय धरले आणि म्हणाला, ‘‘हे त्रिभुवनपती, गुरुकृपेनेच मा आपले दर्शन झाले आहे. मला एवढाच वर द्या की गुरुचरणी माझी अढळ श्रद्धा कायम राहो. त्यांची निरंतर सेवा घडो !’’

विष्णूने प्रसन्न होऊन त्याला वर दिला. वेदधर्मांना ही हकीगत कळताच ते आनंदित झाले त्याला ह्रदयाशी कवटाळीत आशीर्वाद देत म्हणाले, ‘‘बाळा, तू सर्वश्रेष्ठ शिष्य आहेस. तुला सर्व सिध्दी प्राप्त होतील. तुझ्या चित्तात ऋध्दी-सिध्दी राहतील.’’ संदीपक म्हणाला, ‘‘गुरुवर ! माझ्या ऋध्दि-सिध्दी आपल्या चरणापाशीच आहेत. या नश्‍वराच्या मोहात न टाकता आपल्या चरणसेवेचा शाश्‍वत आनंद मला मिळावा एवढेच द्या.’’

त्याचक्षणी वेदधर्माचे कोड नाहीसे झाले. त्यांचे शरीर कांतीमान झाले. हा शिष्य सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झाला म्हणून वेदधर्मांनी ब्रम्हविद्येचा विशाल खजिना त्याला समर्पित केला. धन्य आहे संदीपकाची गुरुभक्ती.

 

Leave a Comment