श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु धन्वंतरी । ज्याची दृष्टीचि निरुज करी ।
त्यावांचोनि संसारीं । भवरोगु दुरी न करवे ॥१॥
ज्या भवरोगाचेनि दर्पें । फुंफात तापलीं त्रिविधतापें ।
'मी माझे' येणें संकल्पें । वाग्जल्पें जल्पती ॥२॥
पडिलीं द्वैताचिया दुखणा । तोंडींची चवी गेली जाणा ।
मुखा आला कडवटपणा । कटु वचना बोलतु ॥३॥
जेथें व्याधीचेनि सन्निपातें । विवेक हाणोनियां लातें ।
उमरुडूनि धैर्य हातें । वासनावनातें हिंडती ॥४॥
मनोरथकर्दमीं चरफडित । संकल्पमृगजळीं बुडत ।
वेगीं निसरोनियां पडत । टेंक चढतां स्वर्गाचें ॥५॥
वोरबडत स्नेहाची आराटी । गोंवीत लोभाची बोरांटी ।
खिळिला प्रपंचाचिया कंठीं । मारितां नुठी तेथूनि ॥६॥
भवरोगभ्रमें भ्रमले कैसे । खावों नये तें खावों बैसे ।
करूं नये तें करितां दिसे । योषितांसरिसें धांवत ॥७॥
तेथ धनभयाचे शारे येत । तेणें थरथरां कांपत ।
धाकें धाकें घामेजत । दडी देत गुप्तत्वें ॥८॥
भोगाभिमानु चढे देहीं । तेव्हां न राहे खाटे भुईं ।
विधीचें पांघरूण टाकी पाहीं । डोळा ठायीं लागेना ॥९॥
उभें न राहवे ऐक्यवृत्ती । क्षीण झाली ज्ञानशक्ती ।
पडलीं जडत्वें लोळती । पाणी मागती विषयांचे ॥१०॥
अल्पअल्प देतां तें जळ । कडकडूनि झोंबती प्रबळ ।
'आम्हांसी फार द्या गा जळ । तृषा केवळ वोळेना' ॥११॥
कुपथ्य करितां निरंतर । तंव तो झाला जीर्णज्वर ।
क्षयो लागला जी थोर । क्षीण शरीर पडियेलें ॥१२॥
क्षणाक्षणां अतिक्षीणता । विकार संचरले जीविता ।
तेणें प्रबळ वाढली चिंता । सुख सर्वथा बुडालें ॥१३॥
नवल रोगाचा पडिपाडु । गोड परमार्थ तो जाला कडू ।
केवळ विषप्राय विषय कडू । तोचि गोडु पैं झाला ॥१४॥
ते व्याधीचिया उफाडा । देतां सत्कथाकाढा ।
श्रवणमुखींच्या भावार्थदाढा । पाडी पुढां दांतखिळी ॥१५॥
देतां तुलसीमकरंद नसू । वरता जावों नेदी श्वासु ।
मस्तक झाडी मानी त्रासु । रोगें बहुवसु व्यापिला ॥१६॥
ऐसा रोग देखोनियां गाढा । वैद्य आचार्य धडफुडा ।
कृपा पाहे जयाकडा । तो रोकडा वांचवी ॥१७॥
निधडा वैद्य तो सुबुद्धि । जीवु गेलिया मरों नेदी ।
जीवेंवीण वांचवी त्रिशुद्धि । अगाध सिद्धि तयाची ॥१८॥
शुद्धभाग्येंकरूनि जाण । तो करी कृपाकूर्मावलोकन ।
तेंचि रोगिया अमृतपान । होय सावधान तत्काळ ॥१९॥
एवं झालिया सावधान । रोगी आपणिया आपण ।
नित्यानित्याचें पाचन । करी सेवन साक्षेपें ॥२०॥
तेणें न फिटेचि जीर्णज्वरु । न तुटे क्षयाचा महामारु ।
हें देखोनियां वैद्यसद्गुरु । रसोपचारु मांडिला ॥२१॥
तेणें अक्षररस-अर्धमात्रा । देतां क्षयाचा थारा ।
मोडूनियां शरीरा । पूर्वपरंपरा अक्षय केलें ॥२२॥
दारुण चुकवावया कुपथ्य । वैराग्य राखण ठेविलें नित्य ।
लावूनि अनुसंधानाचें पथ्य । निर्दाळिला तेथ भवरोगु ॥२३॥
रोगी उपचारिल्यावरी । प्रबळ क्षुधा खवळे भारी ।
चित्तचिंतेच्या लाह्या करी । क्षणामाझारीं खादल्या ॥२४॥
काळे गोरे चतुर्वर्णचणे । आश्रमेंसीं भाजिले फुटाणे ।
'अहं-सोहं' गुळेंसीं तेणें । निःशेष खाणें तत्काळ ॥२५॥
फळाभिलाषेंसीं आशा- । बोंडें भरलीं होतीं खसखसा ।
तींही खादलीं घसघसां । न लगतां घांसा गिळियेलीं ॥२६॥
गूळ साखरेचा पडिपाडु । खादले कर्माकर्माचे लाडू ।
खातां न म्हणे गोड कडू । लागला झोडूं स्वइच्छा ॥२७॥
'ब्रह्माहमस्मी' चीं गोमटीं । पक्कन्नें देखिलीं दिठीं ।
तींही खाऊनि उठाउठी । मायेपाठीं लागला ॥२८॥
ते धाकें धाकेंचि निमाली । मिथ्यात्वें नासोनि गेली ।
स्वानंदें पुष्टि आली । झाडी केली भवरोगा ॥२९॥
ऐसा सद्गुरु वैद्य गाढा । जेणें उपचारोनि केलों निधडा ।
शरण रिघावें तुजपुढां । तंव चहूंकडां तूंचि तूं ॥३०॥
तुजवेगळें आपणियातें । देखोनि शरण यावें तूतें ।
तंव मीतूंपण हारपलें थितें । कैसेनि तूतें भजावें ॥३१॥
* ज्यांच्या सुटल्या जीवग्रंथी । झाले आत्माराम निश्चितीं ।
तेही अहेतुक भक्ति करिती । प्राप्तांची स्थिति हे जाणा ॥३२॥
गुरुभजनापरतें सुख । मोक्ष मानिती तेही मूर्ख ।
मोक्ष गुरुचरणींचा रंक । विरळा लोक हें जाणती ॥३३॥
आम्हां सद्गुरुदृष्टीं परमारोग्य । आम्ही सद्गुरुकृपा सदा श्लाघ्य ।
गुरुसेवें आम्ही सभाग्य । परम योग्य गुरुस्तवनें ॥३४॥
सद्गुरूचें नाममात्र । तेंचि आम्हां वेदशास्त्र ।
सकळ मंत्रावरिष्ठ मंत्र । नाम सर्वत्र गुरूचें ॥३५॥
सद्गुरूचें तीर्थमात्र । सकळ तीर्थां करी पवित्र ।
गुरुचरण तें आमचें क्षेत्र । वृत्ति स्वतंत्र ते आम्हां ॥३६॥
तूं पुरे पुरे म्हणसी स्तवन । परी वर्णितां तुझे उदार गुण ।
अतृप्त सर्वथा नुठी मन । तुझी आण वाहातसें ॥३७॥
तुझे गुण वर्णावया तत्त्वतां । मी प्रवर्तलों श्रीभागवता ।
त्वां मज लाविलें भक्तिपंथा । निजकथाकीर्तनीं ॥३८॥
जय जय सद्गुरु जनार्दना । भवगजपंचानना ।
एकाकी शरण आलों जाणा । तुझ्या श्रीचरणा पावलों ॥३९॥
पावलों शास्त्र श्रीभागवत । अवधारा तेथींचा मथितार्थ ।
उद्धवासी श्रीकृष्णनाथ । परम परमार्थ सांगेल ॥४०॥
यदुअवधूतसंवादेंसीं । लक्षणोक्त चोविसां गुरूंसी ।
परिसोनियां उद्धवासी । भावना ब्रह्मेंसीं लिगटली ॥४१॥
ब्रह्म सर्वगत सत्य होये । मज सबाह्य कोंदलें आहे ।
तेंचि माझें मज ठाउकें नोहे । कोण उपाये करावा ॥४२॥
ऐसी उद्धवाची चिंता । कळों सरली कृष्णनाथा ।
तोचि उपावो सर्वथा । होय सांगता अविरोधें ॥४३॥
श्रीभगवानुवाच ।
मयोदितेष्ववहितः स्वधर्मेषु मदाश्रयः ।
वर्णाश्रमकुलाचारं अकामात्मा समाचरेत् ॥ १ ॥
पूर्वीं वेदरूपें वर्णाश्रम । मीचि बोलिलों स्वधर्म ।
पंचरात्रादि वैष्णवधर्म । हें उपासनावर्म गुह्य माझें ॥४४॥
जो वर्ण जो आश्रम । तेणेंचि ते करावे स्वधर्म ।
आचरतां परधर्म । दुःख परम पाविजे ॥४५॥
उद्धवा येथ जाण । कर्ता पाहिजे सावधान ।
ते सावधानतेचें लक्षण । अतिविचक्षण जाणती ॥४६॥
कर्म चतुर्विध येथ । 'नित्य' आणि 'नैमित्त' ।
'काम्य' आणि 'प्रायश्चित्त' । जाण निश्चित विभाग ॥४७॥
येथ कर्म आचरती स्थिती । सावधान राखावी वृत्ती ।
आचरावयाची व्युत्पत्ती । विचित्र स्थिती सांगेन ॥४८॥
नित्य आणि नैमित्तिक । हें कर्म जाण आवश्यक ।
सांडोनियां फलाभिलाख । विधिप्रमुख आचरावें ॥४९॥
नित्यकर्म अधिक वाढे । तैं नैमित्तिकाचे अंगा चढे ।
काम्य उचंबळलें विषयचाडें । तैंचि पडे 'निषिद्धी' ॥५०॥
फलाभिलाषेंविण । नित्य नैमत्तिक जाण ।
करावें गा कृष्णार्पण । अर्पिती खूण जाणोनि ॥५१॥
काम्य कर्म आवश्यक । त्यजावें गा निःशेख ।
जेवीं कां वमिलें वमक । परतोनि लोक न पाहती ॥५२॥
समूळीं कामनेतें दंडावें । तैंचि काम्य कर्म सांडावें ।
येर्हवीं काम्यत्यागु न संभवे । कामना जीवें राखतां ॥५३॥
अंतरीं अनिवार कामना । बाह्य विरक्ती दावी जना ।
ते सविया विटंबना । त्यागु विचक्षणा तो नव्हे ॥५४॥
कामनेचेनि अधिक मदें । कर्में निपजती निषिद्धें ।
समूळ कामनेचेनि छेदें । सर्व निषिद्धें मावळती ॥५५॥
अथवा देखतांचि निषिद्ध दिठीं । जो हरिनामें गर्जत उठी ।
निषिद्ध पळे बारा वाटीं । प्रायश्चित्तकोटी हरिनामें ॥५६॥
जेथ हरिनामाचे उमाळे । तेथ निषिद्ध तत्काळ जळे ।
निषिद्ध अभक्तां आदळे । भक्तांजवळें तें न ये ॥५७॥
काम्यनिषिद्धाची कथा । भक्तांसी नातळे सर्वथा ।
भगवंतु रक्षी निजभक्तां । दोषु तत्त्वतां त्यां नाहीं ॥५८॥
नामें प्रायश्चित्तांच्या कोटी । हे म्यां सांगितली गुह्य गोठी ।
प्रकट न करावी सृष्टीं । गुप्त पोटीं राखावी ॥५९॥
काम्यनिषिद्धाचे त्याग । तुज म्यां सांगीतले साङ्ग ।
नित्यनैमित्तविभाग । तोही विनियोग परियेसीं ॥६०॥
मदर्पणें आवश्यक । करावें नित्यनैमित्तिक ।
तेंचि चित्ताचें शोधक । साधन मुख्य परमार्थी ॥६१॥
एक म्हणती स्वधर्म निर्फळ । वर्म नेणतीच ते बरळ ।
स्वधर्में होय जन्म सफळ । परमार्थफळ स्वधर्मीं ॥६२॥
किडाळ झाडावया दृष्टीं । रज देऊनि पाठींपोटीं ।
सुवर्ण घालितां पुटीं । झळकत उठी निजतेजें ॥६३॥
तैसा मज अर्पितां स्वधर्म । त्याचें सफळ होय निजकर्म ।
ऐसें नेणोनियां निजवर्म । कर्मभ्रम कर्मठां ॥६४॥
मज अर्पिती हातवटी । अवघड वाटेल जगजेठी ।
ज्यासी आवडी माझी मोठी । त्याची दृष्टी मदर्पण ॥६५॥
कृष्णीं निश्चळ ज्याचें मन । त्याचें कर्म तितुकें कृष्णार्पण ।
त्यासी न अर्पितांही जाण । सहजें मदर्पण होतसे ॥६६॥
जो रथीं निश्चळ होऊनियां बैसे । तो न चळतांही चालतु दिसे ।
जाण स्वकर्म त्याचें तैसें । अनायासें मज अर्पे ॥६७॥
यापरी होऊनि अकामात्मा । सुखें आचरावें स्वधर्मा ।
तेणें सांडूनि रजतमा । सत्त्वें पुरुषोत्तमा पावती ॥६८॥
वर्णाश्रमसमुद्भवा । मूळ आश्रयो मी वोळ्खावा ।
कळकर्मनिजस्वभावा । उपासावा मी एकु ॥६९॥
वर्णासी आश्रयो मी प्रसिद्ध । जे जन्मले मुखबाहूरुपाद ।
आश्रमा आश्रयो मी विशद । गर्जती वेद ये अर्थीं ॥७०॥
देवो देवी कुळाचार । यांचें वस्तीचें मी घर ।
एवं मी सर्वाधार । हा कर्मी विचार देखावा ॥७१॥
गुज परियेसीं उद्धवा । कर्माकर्माध्यक्षु मी जाणावा ।
कर्मी मीचि अभिलाषावा । क्रियेनें धरावा मी एकु ॥७२॥
एवं आदि-मध्य-अंतीं । मी अविनाशु धरितां चित्तीं ।
तीं कर्मेंचि निष्कर्में होतीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥
अन्वीक्षेत विशुद्धात्मा देहिनां विषयात्मनाम् ।
गुणेषु तत्त्वध्यानेन सर्वारंभविपर्ययम् ॥ २ ॥
यापरी स्वधर्म जाण । ज्यांचें विशुद्ध अंतःकरण ।
ते विषयीं उदासीन । हें वोळखण तयांचे ॥७४॥
तयांसी विषयाची आस्था । नाहीं नाहीं गा सर्वथा ।
परी सर्वार्थविपरीतता । विषयासक्तता देखती ॥७५॥
भरलीं मृगजळाचीं तळीं । तेणें न पिकती साळी केळी ।
तैसी विषयबुद्धी जवळी । स्वसुखफळीं फळेना ॥७६॥
पाहें पां विषयासक्त । कर्मारंभीं संकल्प करित ।
आयुःकामार्थ क्षेमार्थ । धनधान्यार्थसमृद्धी ॥७७॥
या हेतू कर्म आरंभित । तें स्वकर्म नव्हे निश्चित ।
स्वधर्ममिषें मनोरथ । उपासित सर्वदा ॥७८॥
बैलाची कांस दुहितां । शिंपीभरी दूध न ये हाता ।
तेवीं मनोरथ उपासितां । न लभे सर्वथा 'निजसुख' ॥७९॥
एवं कर्मचि तें कर्म नव्हे । केल्याही सिद्धी न पवे ।
तें विघ्नबाहुल्यें नाश पावे । विघ्न संभवे देवांचें ॥८०॥
विषयसेवनीं आहे सुख । या बुद्धीं शिणशिणोनि मूर्ख ।
पावले परम दुःखें दुःख । मुख्य याज्ञिक घालूनि ॥८१॥
वेदत्रयी जाणूनि सकळ । यज्ञकर्मी अतिकुशळ ।
वांछितां स्वर्गादिक फळ । पतन केवळ अधोमुखें ॥८२॥
ऐसेनि विवेकें निपुणदृष्टी । जो स्वर्गु नेघे तृणासाठीं ।
वैराग्य लागे त्यापाठीं । उठाउठी घर रिघे ॥८३॥
तो वैराग्याचें माहेर । विश्रांतीचें विसावतें घर ।
तो नररूपें साचार । 'विवेकु' साकार पैं झाला ॥८४॥
ऐसेनि विवेकें विवेकदृष्टी । स्वर्गादि विषय मिथ्या सृष्टी ।
ते मिथ्यात्वाची गोठी । ऐक जगजेठी उद्धवा ॥८५॥
सुप्तस्य विषयालोको ध्यायतो वा मनोरथः ।
नानात्मकत्वाद् विफलस्तथा भेदात्मधीर्गुणैः ॥ ३ ॥
स्वप्न आणि मनोरथ । मनोमात्र-विलासित ।
ते निद्रितासी सत्य पदार्थ । मिथ्या होत जागृतीं ॥८६॥
तैसें कामनेचेनि उल्हासें । इंद्रियांचेनि सौरसें ।
उभय भोगपिसें । नाथिलें वसे बुद्धीसी ॥८७॥
शिंपी शिंपपणें असे । धनलोभ्या रुपें भासे ।
तेवीं विषयाचेनि अभिलाषें । भेदपिसें नसतेंचि ॥८८॥
स्वप्नीं देखिलें आत्ममरण । जागृतीं मिथ्या म्हणे आपण ।
तैसा स्वरूपीं जागा झाल्या जाण । जन्ममरण त्या नाहीं ॥८९॥
जंववरी भेदाची भेदसिद्धी । तंववरी जन्ममरण बाधी ।
भेदु मिथ्या झालिया त्रिशुद्धी । अभेदीं बाधी तें नाहीं ॥९०॥
तो भेदु कैसेनि तुटे । निजस्वरूप कैसेनि भेटे ।
ते अर्थी साधन गोमटें । ऐक चोखटें विभागें ॥९१॥
निवृत्तं कर्म सेवेत प्रवृत्तं मत्परस्त्यजेत् ।
जिज्ञासायां संप्रवृत्तो नाद्रियेत् कर्मचोदनाम् ॥ ४ ॥
चित्तीं वासनांचे मळ । तेणें भेदु भासे सबळ ।
तो नाशावया चित्तमळ । कर्म निर्मळ सेवावें ॥९२॥
मागां सांगीतलें निश्चित । जें कां नित्यनैमित्य ।
तेंचि कर्म गा 'निवृत्त' । साधकीं प्रस्तुत सेवावें ॥९३॥
जो प्रवर्तला माझ्या भजनीं । तेणें 'काम्य' सांडावें निपटूनी ।
हें मागां सांगितलें विवंचूनि । कामना मनीं न धरावी ॥९४॥
धरोनि मदर्पणाचें बळ । 'नित्य' आचरतां निर्मळ ।
चित्ताचे चैत्य-मळ । जाती तत्काळ नासोनि ॥९५॥
कृषीवळु करी शेतासी । यथार्थ द्रव्य दे राजयासी ।
तो न भी ग्रामकंटकांसी । तेवीं कृष्णार्पणेंसीं होतसे ॥९६॥
जाहल्या चित्तमळक्षाळणें । नित्यविवेकु उपजे तेणें ।
इहामुत्रां लाता हाणे । अनित्य त्यजणें वैराग्यें ॥९७॥
एवं वैराग्य झालिया अढळ । तेणें सत्त्व होय प्रबळ ।
तेव्हां मज जाणावया केवळ । वृत्ति निर्मळ ते काळीं ॥९८॥
करितां माझीं चिंता । कामक्रोध नाठवती चित्ता ।
थोर लागली माझी अवस्था । न राहे सर्वथा अणुभरी ॥९९॥
हो कां ऐशिये अवस्थेसी । कर्मक्रिया नावडे ज्यासी ।
तेणें संन्यासूनि सर्व कर्मांसी । ब्रह्मज्ञानासी रिघावें ॥१००॥
श्रवण मनन करितां । कर्मासी झालिया विगुणता ।
बाधक नव्हे माझ्या भक्तां । कर्मकिंकरता त्यां नाहीं ॥१॥
स्वधर्म केलिया फळ काये । चित्ताचा मळमात्र जाये ।
भक्तु भजनें निर्मळ आहे । बाधूं न लाहे स्वकर्म ॥२॥
एवं कर्माची चोदना । मद्भक्तासी नाहीं जाणा ।
करितां श्रवणकीर्तना । कर्मबंधना नातळती ॥३॥
ऐशिया जिज्ञासावस्थेसी । कर्मबाधा नाहीं त्यासी ।
मुख्य तात्पर्य ब्रह्मज्ञानासी । हेंचि उद्धवासी सांगतु ॥४॥
यमान् अभीक्ष्णं सेवेत नियमान् मत्परः क्वचित् ।
मदभिज्ञं गुरुं शांतं उपासीत मदात्मकम् ॥ ५ ॥
होआवया वृत्तीचा उपरम । अहिंसा-सत्यादि धर्म ।
आचरावे अविश्रम । बाह्य नेम अविरोधें ॥५॥
आचरतां अहिंसा-सत्यादिकांसी । तंव तंव दशा उजळे कैसी ।
अतिप्रीति गुरुभक्तीसी । अहर्निशीं गुरु चिंती ॥६॥
सद्गुरूवीण ब्रह्मज्ञान । सर्वथा नव्हे नव्हे जाण ।
हें उपनिषदर्थें प्रमाण । परम निर्वाण साधिलें ॥७॥
डोळा देखणाचि आहे । त्यासी सूर्य नव्हतां साह्ये ।
सिद्ध पदार्थ देखों न लाहे । स्तब्ध राहे अंधारीं ॥८॥
नाव तारी हे साचार । माजीं बैसले थोर थोर ।
परी तारकेंवीण परपार । समर्थ नर न पावती ॥९॥
पर्जन्यें भूमी मार्दवा आली । बीजें कणिंग असे भरली ।
परी ज्ञातेन पेरणी नाहीं केली । तंव पिकाची बोली पोंचट ॥११०॥
रत्न सांपडलें अवचितें । परी खरें खोटें संषय तेथें ।
रत्नपारखी करी मोलातें । अतियत्न त्यातें मग करिती ॥११॥
तैसें निजस्वरूप आइतें । श्रद्धा-सद्गुरूचेनि हातें ।
खरें करूनियां ज्ञाते । निजसुखातें पावले ॥१२॥
साधावया निजज्ञान । करितां सद्गुरूचें सेवन ।
निवाले संत सज्जन । आनंदघन सद्गुरु ॥१३॥
म्हणसी साधनें केलीं अनेक । तैसें सद्गुरूही साधन एक ।
म्हणतां मुमुक्षु झाला मूर्ख । निजात्मसुख बुडालें ॥१४॥
सद्गुरु केला तो साधन । त्याहूनि परतें साध्य आन ।
म्हणतां आली नागवण । नागवला जाण सर्वस्वें ॥१५॥
जो चित्सुखें सदा संपन्न । चिद्रूपें ज्यासी समाधान ।
तो चिन्मात्राहोनि भिन्न । नव्हे जाण सर्वथा ॥१६॥
लवण सागरीं रिघालें । तेव्हांचि तें समुद्र झालें ।
दीपें वणवया आलिंगिलें । वणवाचि झालें तें तेज ॥१७॥
एवं चिद्रूपाचें ज्यासी ज्ञान । तो चिद्रूपचि सत्य संपूर्ण ।
गुरु ब्रह्म अभिन्न जाण । ये अर्थीं प्रमाण उपनिषदें ॥१८॥
हो कां घृताची पुतळी । नव्हतां घृतपणावेगळी ।
घृतरूपें रूपा आली । तैसी मूर्ती झाली सद्गुरूची ॥१९॥
तो चित्सुखाचा पुतळा । कीं सच्चिदानंदाचा सोहळा ।
प्रत्यक्ष देखावया डोळां । धरी लीलाविग्रहो ॥१२०॥
त्याची होआवया भेटी । पाहिजेति भाग्याचिया कोटी ।
हे बोलणेंवरी दिसे दिठी । तैसी गोठी ते नाहीं ॥२१॥
सद्गुरु जेउती वास पाहे । तेउती सुखाची सृष्टी होये ।
तो म्हणे तेथ लवलाहें । महाबोधु राहे स्वानंदें ॥२२॥
त्या सद्गुरूचे देखिल्या पाये । तहानभूक तत्काळ जाये ।
कल्पना उठोंचि न लाहे । निजसुख आहे गुरुचरणीं ॥२३॥
त्या सद्गुरूचें लक्षण । सांगतां शब्दुं थोंटावे जाण ।
जो सनातन ब्रह्म पूर्ण । ऊणखूण त्या नाहीं ॥२४॥
तर्ही स्फुरली एकी स्फूर्ती । त्यासी सर्वार्थी दिसे शांती ।
शांतीवेगळी उपपत्ती । प्रमाण निश्चिती रिघेना ॥२५॥
शांति तेचि समाधान । शांति तेचि ब्रह्मज्ञान ।
शांती तेचि ब्रह्म पूर्ण । सत्य जाण उद्धवा ॥२६॥
ऐसी सद्गुरूची स्थिती । ऐकोनि शिष्याच्या चित्तीं ।
वाढली अतिप्रीती । गुरुभक्तीलागोनी ॥२७॥
यालागीं गुरुगवेषणा । उसंतु घेवों नेदी अंतःकरणा ।
अष्टौ प्रहर विचक्षणा । गुरुलक्षणा लक्षितु ॥२८॥
कैं तो स्वामी देखेन ऐसा । कैं हा माझा फिटेल फांसा ।
कैं उपरमु होईल मानसा । सद्गुरुपिसा तो झाला ॥२९॥
आयुष्य वेंचतें उठाउठी । अझूनि नव्हे सद्गुरूसी भेटी ।
झाल्या मनुष्यदेहासी तुटी । सर्वस्व शेवटीं बुडेल ॥१३०॥
ऐकतां गुरूचें नांव । मनापुढें घेत धांव ।
ते गोठीसीच देत खेंव । येवढी हांव जयाची ॥३१॥
सद्गुरु प्रत्यक्ष न भेटतां । मनेंचि पूजी गुरुनाथा ।
परमादरें पूजा करितां । प्रेम तत्त्वतां न संटे ॥३२॥
सद्गुरु भेटावयाकारणें । हिंडे तीर्थें तपोवनें ।
गुरु न विसंबे मनें । नित्यविधानें आचरतां ॥३३॥
सद्गुरुप्राप्तीचिया काजा । लहानथोरांची करी पूजा ।
अत्यादरें मानी द्विजा । गुरु मज माझा भेटावा ॥३४॥
अस्वलाचिया परी । गुरुनामाचा जप करी ।
गुरुवांचोनि निरंतरीं । चिंता न करी आनाची ॥३५॥
आसनीं भोजनीं शयनीं । गुरुतें न विसंबे मनीं ।
जागृतीं आणि स्वप्नीं । निदिध्यासनीं गुरु केला ॥३६॥
गुरुस्मरण करितां देख । स्मरणें विसरे तहानभूक ।
विसरला देहगेहसुख । सदा संमुख परमार्था ॥३७॥
ऐसी सद्गुरूची आवडी । ज्याची आस्था चढोवढी ।
त्यासी गुरुरूपें तांतडी । भेटी रोकडी मी देतों ॥३८॥
जंव जंव आस्था अधिक । तंव तंव भेटीची जवळिक ।
साधनांमाजीं हें साधन मुख्य । आस्थाचि एक विशेष ॥३९॥
करितां वरिष्ठसाधनकोडी । बोधाची जोडेना कवडी ।
सद्गुरुभजनाची अर्ध घडी । जोडी कोडी बोधाच्या ॥१४०॥
सद्गुरुभजनीं लागवेगें । मोक्ष येऊनि पायां लागे ।
गुरुभक्त तोही नेघे । चरणरंगें रंगला ॥४१॥
श्रीगुरुचरणाची गोडी । विसरली मोक्षसुखाच्या कोडी ।
गुरुभजनीं जयां अनावडी । ते संसार बांदवडीं पडियेले ॥४२॥
छेदावया संसारबंधन । करावें सद्गुरुसेवन ।
सद्गुरुसेवा तें माझें भजन । गुरु-आम्हां भिन्नभावो नाहीं ॥४३॥
गुरुभक्तांची श्रद्धा गाढी । आणि गुरुभजनाची गोडी ।
ते सांगितली आवडीं । प्रत्यक्ष उघडी करूनि ॥४४॥
सहज प्रसंगें येणें । शिष्यांचींही लक्षणें ।
सांगेन तुजकारणें । कृष्ण म्हणे उद्धवा ॥४५॥
अमान्यमत्सरो दक्षो निर्ममो दृढसौहृदः ।
असत्वरोऽर्थजिज्ञासुः अनसूयुरमोघवाक् ॥ ६ ॥
मान देखोनि सहसा । शिष्य सांकडों लागे कैसा ।
जेवीं गळीं लागला मासा । चरफडी तैसा सन्मानें ॥४६॥
नांवें ऐकोनि बागुलातें । बाळ सांडूं पाहे प्राणातें ।
तेवीं ऐकतांचि सन्मानातें । भयें प्राणांतें सांकडें ॥४७॥
चंडवातें जेवीं केळी । समूळ कांपे चळवळी ।
कां लहरींच्या कल्लोळीं । कांपे जळीं रविबिंब ॥४८॥
सन्मानु तेणें पाडें । दृष्टीं देखोनि नावडे ।
महत्त्वें थोर सांकडें । अंगाकडे येवों नेदी ॥४९॥
आदरें घेतां सन्मान । दृढ होईल देहाभिमान ।
सांडोनि मानाभिमान । हीनदीन होऊनि असे ॥१५०॥
समूळ नामरूप जाये । मज कोणी देखों न लाहे ।
ऐसी दशा जेणें होये । ते ते उपाये करीतसे ॥५१॥
लौकिक देखोनि उद्वेगु । देहगेहांचा उबगु ।
एकलेपणीं अतिचांगु । न धरी संगु द्वैताचा ॥५२॥
मज कोणीं न देखावें । मज कोणीं न वोळखावें ।
मज कोणीं न लाजावें । ऐसें जीवें वांछितु ॥५३॥
मान देखोनियां दिठीं । लपे देहउपेक्षेच्या पोटीं ।
जेवीं चोर लागलिया पाठीं । लपे संकटीं धनवंतु ॥५४॥
मी एकु लौकिकीं आहें । ऐसें कोणा ठावें नोहे ।
ऐशी ऐशी दशा पाहे । मानु न साहे यालागीं ॥५५॥
सांडावया अहंममता । मानु न पाहे सर्वथा ।
लौकिकीं सन्मानु घेतां । दृढ अहंता होईल ॥५६॥
ज्याचें पोटीं दृढ अभिमान । ते सदा वांछिति सन्मान ।
जो सांडूं निघे अभिमान । तो मानापमान न पाहे ॥५७॥
जेणें घेतला सन्मान । त्यासी नेघवे अपमान ।
तेथ सहजें आला देहाभिमान । यालागीं सन्मान नावडे ॥५८॥
सन्मानु घ्यावया तत्त्वतां । ज्ञातेपण मिरवी ज्ञाता ।
ते संधीं वसे ममता । अर्थस्वार्थाचेनि लोभें ॥५९॥
एवं नापेक्षा सन्मान । हें प्रथम शिष्याचें लक्षण ।
आतां 'निर्मत्सरत्व' संपूर्ण । तें सुलक्षण परियेसीं ॥१६०॥
सज्ञानामाजीं वैर । ज्ञातृत्वाचाचि मत्सर ।
तेथें देहाभिमानें केलें घर । अतिदुस्तर जीवासी ॥६१॥
ज्ञानाभिमानाची गोष्टी । वेंचुनी तपाचिया कोटी ।
दुजी करीत होता सृष्टी । अभिमान पोटीं ज्ञानाचा ॥६२॥
ज्ञानाभिमानु दुर्वासासी । व्यर्थ शापिलें अंबरीषासीं ।
म्यां सोशिलें गर्भवासासी । ज्ञानाभिमानासी भिऊनि ॥६३॥
ज्ञानाभिमानु ब्रह्मयासी । नेलें गोपालवत्सांसी ।
मज होणें पडिलें त्या वेषांसी । ज्ञानाभिमानासी भिऊनि ॥६४॥
उद्धवा ज्ञानाभिमान । सर्वां अभिमानांमाजीं कठीण ।
वसिष्ठ विश्वामित्र जाण । ज्ञानाभिमानें भांडती ॥६५॥
एवं ज्ञानाभिमानाभेण । म्यां घेतलें गोवळेपण ।
मज मूर्ख म्हणती याज्ञिक ब्राह्मण । त्यांसी ज्ञानाभिमान कर्माचा ॥६६॥
मुख्य माझीच हे ऐशी दशा । तेथें इतरांचा पाडु कायसा ।
ज्ञानाभिमानाचा दृढ फांसा । नुगवे सहसा ज्ञात्यासी ॥६७॥
ज्ञानाभिमानाची जाती कैशी । उभा न ठाके मूर्खापाशीं ।
वैर लावी सज्ञानासी । समत्सरेंसीं वर्तवी ॥६८॥
एवं निर्मत्सर होणें ज्यासी । तेणें सांडावें ज्ञानाभिमानासी ।
येरवीं तो ज्ञातयासी । समत्सरेंसीं नांदवी ॥६९॥
ऐक मत्सराची सामग्री । देहीं देहाभिमान दृढ करी ।
तोही ज्ञातेपणाचें बळ धरी । लोभ माझारीं अर्थस्वार्थे ॥१७०॥
इतुकी सामग्री जेथें होये । तोचि समत्सर द्वेषु वाहे ।
शुद्ध शिष्य हें न साहे । त्यागोनि जाये मत्सरु ॥७१॥
मत्सराची जाती कैशी । अवश्य वसे ज्ञात्यापाशीं ।
मत्सर थोर पंडितांशीं । यावज्जन्मेंसीं न संडिती ॥७२॥
पंडित भेटती समत्सर । लवणभंजन अतिनम्र ।
बोलती अतिमधुर । समत्सर छळणोक्तीं ॥७३॥
मत्सरें पंडित येती क्रोधा । असदारोपणें करिती निंदा ।
एवढी मत्सराची बाधा । नातळे कदा सच्छिष्यु ॥७४॥
मत्सरु ज्ञात्यातें न सोडी । मा इतर काइसी बापुडीं ।
शिष्य द्वेषाची गोष्टी सोडी । मत्सरु तोडी सर्वस्वें ॥७५॥
मत्सर सांडूनि तत्त्वतां । शिष्यें रहावें सर्वथा ।
निर्मत्सरतेची कथा । ऐक आतां सांगेन ॥७६॥
पुढूनि स्वार्थु नेतां । द्वेष उपजों नेदी चित्ता ।
भूतीं भगवंत भावितां । द्वेषु सर्वथा येवों नेदी ॥७७॥
निंदेचिया वाग्बाणीं । दारुण विंधिल्या दुर्जनीं ।
द्वेषु उपजों नेदी मनीं । हित मानीं निंदेचें ॥७८॥
जेणें जेणें निजनिंदा केली । तो तो मानी हित माउली ।
पापमळांची क्षाळणता झाली । शुद्ध केली माझि वृत्ति ॥७९॥
ऐसऐशिया विवंचना । द्वेषु आळों नेदी मना ।
निर्मत्सरता ते हे जाणा । दुसरी लक्षणा शिष्याची ॥१८०॥
यावरी जे 'दक्षता' । तेही तुज सांगों आतां ।
शिष्याची प्रागल्भ्यता । निजस्वार्थालागोनि ॥८१॥
उगवल्या सावधान-भास्करा । नाशी निद्रेतंद्रेच्या अंधारा ।
होय धारणेचा दिवसु खरा । धृतीच्या दुपारा वर्ततु ॥८२॥
त्या दिवसाचेनि लवलाहें । शमदमादि समुदायें ।
भक्तिपंथें चालताहे । मार्गीं न राहे क्षणभरी ॥८३॥
तेथ उचलतां पाउलीं । निजबोधाची पव्हे ठाकिली ।
जेथ पांथिकांची निवाली । तृषा हरली तृष्णेची ॥८४॥
तेथ निजग्रामींचे भेटले । सोहंसांगाती एकवटले ।
तेथूनि चुकणया मुकले । नीट लागले निजपंथी ॥८५॥
ऐकें बापा विचक्षणा । आळस विलंबु नातळे मना ।
त्या नांव 'दक्षता' जाणा । 'तिसरी' लक्षणा शिष्याची ॥८६॥
जुनाट संग्रहो सवें होता । ते सर्व सांडिली ममता ।
सांडिल्याची क्षिती मागुता । न करी सर्वथा निजबोधें ॥८७॥
देहीं दृढ धरावी अहंता । तेणें देहसंबधीयांची ममता ।
देहाभिमानु नातळे चित्ता । गेली ममता न लगतां ॥८८॥
देह नश्वरत्वें देखिला । विष्ठामूत्रांचा मोदळा ।
यालागीं अहंकारु गेला । 'सोहं' लागला दृढभावो ॥८९॥
दृढ वाढवूनि सोहंता । तेणें सांडविली अहंममता ।
हे 'चौथी' गा अवस्था । जाण तत्त्वतां शिष्याची ॥१९०॥
गुरु माता गुरु पिता । गुरु गणगोत तत्त्वतां ।
गुरु बंधु सुहृदता । निजस्वार्था शिष्याच्या ॥९१॥
गुरुपरिचर्या नित्यकर्म । गुरुसेवा हाचि स्वधर्म ।
गुरु तोचि आत्माराम । सुहृदसंभ्रम सद्गुरूसी ॥९२॥
ऐसें सद्गुरूसी 'सुहृद' पण । असावें शिष्यासीं संपूर्ण ।
हें 'पांचवें' गा लक्षण । सत्य जाण उद्धवा ॥९३॥
चंचळत्वें चळु चित्ता । येवों नेदीच सर्वथा ।
निजीं निजरूपनिश्चळता । साधी सर्वथा सर्वस्वें ॥९४॥
जर्ही चंचळ झालें अंग । चित्त गुरुचरणीं निश्चळ चांग ।
अंगीं वाजतां लगबग । वृत्ति अभंग गुरुचरणीं ॥९५॥
शरीर वर्ततां व्यापारा । ज्याचे हृदयीं नाहीं त्वरा ।
गुरुचरणीं धरिला थारा । हा शिष्यु खरा परमार्थी ॥९६॥
ज्यासी हृदयीं चंचळता । तो शिष्य नव्हे निजस्वार्था ।
ज्याचे अंतरीं 'निश्चळता' । तोचि परमार्था साधकु ॥९७॥
ऐसी साधूनि निश्चळता । ज्यासी निजस्वार्थीं जिज्ञासुता ।
तोचि क्षणार्धे परमार्था । पावे तत्त्वतां गुरुवाक्यें ॥९८॥
जैसा दीपु दीपें लाविला । लावितांचि तत्समान झाला ।
तैसा निश्चळास गुरु भेटला । तो तत्काल झाला तद्रूप ॥९९॥
एवं अंतरीं जें निश्चळपण । तें शिष्याचें श्रेष्ठ लक्षण ।
तो 'सहावा' गा गुण जाण । तेणें निर्दळण षड्विकारां ॥२००॥
षड्विकार देहावरी । शिष्यु देहबुद्धी हातीं न धरी ।
यालागीं मावळिजे विकारीं । गुरुवाक्येंकरीं वर्ततां ॥१॥
ऐसी साध्य करूनि 'निश्चळता' । साधूं रिघे जो परमार्था ।
धरोनियां अर्थजिज्ञासुता । होये भजता गुरुचरणीं ॥२॥
ज्यासी अर्थजिज्ञासा नाहीं । तो भजेना गुरुच्या ठायीं ।
जरी भजेल कहींबहीं । तरी स्वार्थें पाहीं विषयाच्या ॥३॥
सांडोनियां विषयस्वार्था । इत्थंभूत जाणावया अर्था ।
जो भजे परमार्था । 'जिज्ञासता' त्या नांव ॥४॥
ऐशी धरोनि जिज्ञासता । चढती आवडी परमार्था ।
आराणुक नाहीं चित्ता । निजस्वार्थाचेनि लोभें ॥५॥
अतिप्रीती परमार्था । चढती वाढती आस्था ।
हे 'सातवी' लक्षणता । जाण तत्त्वतां शिष्याची ॥६॥
हें सातवें लक्षण । परमार्थाचें अंगण ।
पावलें असे जाण । जिज्ञासुपणाचेनि नेटें ॥७॥
गुरु बहुतांची साउली । शिष्यवर्गांची माउली ।
तेथ असूया जेणें केली । त्याची बुडाली निजप्राप्ती ॥८॥
यालागीं गुरूचा जो जो अंकित । तो तो गुरुत्वेंचि मानित ।
असूया नाठवे मनांत । अतिविनीत सर्वांसी ॥९॥
गुरुबंधु कनिष्ठ दीन । त्याच्या ठायीं उत्तम गुण ।
जाणोनि न मनीं आपण । असदारोपण तेथें करी ॥२१०॥
पुढिलांचा उत्तम गुण । त्यासी मिथ्या लावूनि दूषण ।
लटिकें म्हणे त्याचें ज्ञान । 'असूया' जाण त्या नांव ॥११॥
प्रत्यक्ष भेटल्या वर्णी गुण । नम्र होवोनि वंदी चरण ।
सवेंचि मागें करी छळण । 'असूया' संपूर्ण या नांव ॥१२॥
सच्छिष्यु ये अर्थीं निर्मळ । हो नेदी असूयेचा विटाळ ।
उत्तम-मध्यम-प्राकृतमेळ । वंदी परी छळ करूं नेणे ॥१३॥
गुरूनें शिकविली वस्तुसमता । तेथ निरंतर ठेवूनि चित्ता ।
समभावें वंदी समस्तां । छळूं सर्वथा तो नेणे ॥१४॥
यापरी गा उद्धवा । छळूं नेणे कोणा जीवा ।
हा 'अनसूयु' म्हणावा । गुण आठवा शिष्याचा ॥१५॥
हे अष्टौमहामणिमाळी । अखंड ज्याच्या हृदयकमळीं ।
तो पावे सद्गुरूजवळी । नवी नव्हाळी भेटीची ॥१६॥
यावरी नववें लक्षण । तें जाण नवविधान ।
सत्यधूत संभाषण । वाग्विलापन सांडूनि ॥१७॥
सद्गुरूप्रति जाण । मृदु विनीत करी प्रश्न ।
सत्याचें सत्य तें गुरुवचन । मानी जाण निजभावें ॥१८॥
युक्ति वाढवून उदंड । नाना मतें अकांडतांड ।
साह्य संचरूनि पाखांड । गर्जत तोंड महावादें ॥१९॥
साधका बाधका युक्ती । माजीं संचरूनि छळणोक्ती ।
आपुली मिरवावी युक्ती । हें नाहीं चित्तीं शिष्याचे ॥२२०॥
सद्गुरूपुढें अतिजल्प । करणें तेंचि महापाप ।
जाणूनि सांडी वृथालाप । मिथ्या जल्प बोलेना ॥२१॥
शिष्याचें बोलणें कैसें । वाचा परिपक्क अमृत जैसें ।
बोल घोळले प्रेमरसें । प्रश्न पुसे एकांतीं ॥२२॥
मिथ्यावादाचीं अपक्क फळें । तुरटें तिखटें तोंडाळें ।
सदेठीं झडलीं पूर्वकाळें । बोले प्रांजळें परिपक्क ॥२३॥
बोलों नेणे छळ छद्म । स्पर्शों नेणें परवर्म ।
बोलीं नुपजवीं अधर्म । मनोधर्मक्षोभक ॥२४॥
व्यर्थ न करी आशंका । निंदेलागीं तो मुका ।
झकवूं नेणे लोकां । बाळां मूर्खां पंडितां ॥२५॥
बोलों नेणे अतिकर्कश । करूं नेणे उपहास ।
बोलामाजीं न धरी आस । बोले नैराश्य वैराग्य ॥२६॥
बोलीं बोलूं नेणे आटू । छळणोक्तीं नव्हे शठू ।
बहु बोलतां मानी विटू । मौननिष्ठु होऊनि राहे ॥२७॥
वादविवाद अतिवाद । नावडे कोणाचा संवाद ।
न करी बोलाचा विनोद । लौकिक शब्द न बोले ॥२८॥
वक्रोक्ति नाहीं जाण । बोलीं न बोले विंदाण ।
करूं नेणे प्रतारण । मिथ्या वचन न बोले ॥२९॥
पोटीं कार्य नाहीं करणें । हो हो म्हणवूनि झकविणें ।
हेंही नाहीं तया बोलणें । सदा पठणें हरिनाम ॥२३०॥
पश्चिमद्वारीचें कवाड । सदा वारेनि करी खडखड ।
तैशी न करी बडबड । वृथा तोंड पिटिना ॥३१॥
करितां शब्दब्रह्मसंवादु । युक्तिबाधें विद्वांसा क्रोधु ।
अनिवार देखोनि बाधु । न बोले शब्दु शाब्दिक ॥३२॥
न मिरवी शब्दज्ञान । न दाखवी आत्ममौन ।
न धरी वचनाभिमान । सदा स्मरण गुरूचें ॥३३॥
बोलें नुपजवी उद्वेग । बोलावया न करी उद्योग ।
बोलीं नुठवी महावेग । अनुद्वेग बोलणें ॥३४
सत्य आणि अतिमधुर । आइकतां अल्हादकर ।
सर्वांसी हितत्वें साचार । बोले सनागर हरिकथा ॥३५॥
प्रार्थूनियां सद्गुरूसी । बहु बोलणें नाहीं त्यासी ।
पुसणें एकाक्षरासी । निजसुखासी सेवावया ॥३६॥
एवं शिष्याचीं नव लक्षणें । नवखंड पृथ्वीची आभरणें ।
निजकृपेनें नारायणे । भक्ताकारणें दीधलीं ॥३७॥
हे नवरत्नमाळा गोमटी । जो घाली सद्गुरूच्या कंठीं ।
तो बैसे सायुज्याच्या पाटीं । उठाउठीं तत्काळ ॥३८॥
या नवरत्नांचें पदक ! ज्या शिष्याचे हृदयीं देख ।
तो सद्गुरूचा आवश्यक । विश्वासिक सर्वार्थीं ॥३९॥
या नवरत्नांची अभिनव गांठी । जो सद्गुरूसी आणी भेटी ।
तो स्वराज्याच्या मुकुटीं । झळकत उठी महामणी ॥२४०॥
उद्धवा येथें आशंका धरिसी । 'नांदतां स्त्रीपुत्रधनधान्येंसीं ।
निर्ममता शिष्यासी । कैसेनि त्यासी उपजली' ॥४१॥
जायापत्यगृहक्षेत्र स्वजनद्रविणादिषु ।
उदासीनः समं पश्यन् सर्वेष्वर्थमिवात्मनः ॥ ७ ॥
येविखीं सादर ऐक । शिष्य निरसावया निजदुःख ।
पावावया आत्मसुख । साधी विवेकसाधनें ॥४२॥
विचारितां आत्मसुख । सर्व देहीं समान देख ।
विजातीय स्त्रीपुरुषवेख । सुखविशेख तेथ नाहीं ॥४३॥
पाहें पां स्त्रीपुरुषदेहीं । आत्मा आत्मी हें तंव नाहीं ।
आत्मसुख आपुल्या ठायीं । असें पाहीं स्वतःसिद्ध ॥४४॥
सुखाचिलागीं सर्वथा । झोंबती प्रपंचपदार्थां ।
ज्यासी गुरुवाक्य आलें हातां । अद्वैतता निजसुख ॥४५॥
एकपणीं निजात्मसुख । हातां आलें नित्य निर्दोख ।
आतां द्वैत वांछी तो अतिमूर्ख । थितें सुख नासावया ॥४६॥
प्रपंचामाजीं असतें सुख । तरी कां त्यजिते सनकादिक ।
द्वैत तितुकें केवळ दुःख । परम सुख अद्वैतीं ॥४७॥
हेंचि साधकीं साधूनि ज्ञान । स्त्री पुत्र स्वजन धन ।
त्यांसी झाले उदासीन । अद्वैतीं मन लागलें ॥४८॥
तेथ कोणाचें गृह क्षेत्र । कोण पुसे कलत्र पुत्र ।
धनधान्यसमृद्धि विचित्र । माझें स्वतंत्र देह न म्हणे ॥४९॥
ऐकें उद्धवा यापरी । माझे भक्त संसारी ।
उदास झाले घरदारीं । तत्त्वविचारीं लिगटोनि ॥२५०॥
लिगटोनियां गुरुचरणीं । केली प्रपंचाची झाडणी ।
मग अत्यादरें गुरुभजनीं । निजसुखदानी गुरुरावो ॥५१॥
गुरुसेवेसी अत्यादर । न राहे आठौ प्रहर ।
ठेविलें गुरुचरणीं अंतर । निरंतर निजभावें ॥५२॥
उद्धवा येथ आशंका धरिसी । 'जे देहावेगळें कोणे वस्तूसी ।
देखोनि पावला निजसुखासी । विदेहत्वासी अनुभवि' ॥५३॥
देहीं असोनि विदेहता । प्रपंचीं असोनि अद्वैतता ।
आली शिष्याचिया हातां । तेही कथा परियेसीं ॥५४॥
विलक्षणः स्थूलसूक्ष्माद् देहादात्मेक्षिता स्वदृक् ।
यथाग्निर्दारुणो दाह्याद् दाहकोऽन्यः प्रकाशकः ॥ ८ ॥
स्थूलसूक्ष्मदेहांहून । आत्मा तो सर्वदा भिन्न ।
तेणें वेगळेपणें जाण । करी वर्तन प्रपंचीं ॥५५॥
जीव उभय देहीं वर्ततां । प्राणियांसी देहातीतता ।
स्फुरत असे सर्वथा । तोचि तत्त्वतां नेणती ॥५६॥
म्हणे 'माझा डोळा दुखों लागला' । परी न म्हणे ' मीचि दुखों आला' ।
माझा पावोचि मोडला' । परी ' मी मोडला ' हें न म्हणे ॥५७॥
यापरी देहीं वर्ततां । प्रत्यक्ष सांगे देहातीतता ।
हे आपुली आपणां अवस्था । न कळे भ्रांता देहभ्रमें ॥५८॥
द्रष्टा दृश्य नव्हे सर्वथा । तें जड तो चेतविता ।
एवं आत्म्यासी विलक्षणता । जाण तत्त्वतां या हेतू ॥५९॥
विलक्षणता दों प्रकारेंसीं । एक ते जाण द्रष्टेपणेंसी ।
दुसरी ते स्वप्रकाशेंसी । देहद्वयासी विलक्षण ॥२६०॥
द्रष्टा दृश्याहूनि भिन्न । तरी 'तो म्हणसी झाला मन' ।
तें चार्वाकमत जाण । मनपण त्या नाहीं ॥६१॥
अकरा इंद्रियांमाजीं जाण । मन तेंही एक करण ।
करणत्वें त्या जडपण । आत्मा नव्हे जाण या हेतू ॥६२॥
प्रपंचीं मनाची दक्षता । तें मनपणेंचि नव्हे तत्त्वतां ।
जेवीं प्राणेंवीण नृपनाथा । न दिसे सर्वथा निजभाग्य ॥६३॥
शस्त्राचेनि एकें घायें । छेदिले लोहार्गळसमुदाये ।
तें शस्त्राचें सामर्थ्य नोहे । बळ पाहें शूराचें ॥६४॥
लोहाचा लोहगोळ । अग्निसंगें झाला इंगळ ।
धडधडां निघती ज्वाळ । तें नव्हे बळ लोहाचें ॥६५॥
त्या लोखंडाऐसें जड मन । त्यासी चित्प्रभा प्रकाशून ।
प्रकृतीमाजीं प्रवर्तन । करवी जाण श्रेष्ठत्वें ॥६६॥
पाव्यामाजीं रागज्ञान । केल्या अतिमधुर गायन ।
तो पाव्याचा नव्हे गुण । कळा जाण गात्याची ॥६७॥
तैसा मनाचा जो व्यापार । तो जाण पां परतंत्र ।
नव्हे याचा तो स्वतंत्र । जड विचार मनाचा ॥६८॥
सूर्याचेनि किरणसंगें । सूर्यकांतीं अग्नि निघे ।
तैसें आत्माचेनि प्रकाशयोगें । मन सवेगें वर्तत ॥६९॥
मन जडत्वें जड जाण । आत्मा स्वप्रकाशें प्रकाशघन ।
मन तें आत्म्याआधीन । आत्मा स्वधीन आत्मत्वें ॥२७०॥
प्रत्यक्ष म्हणे 'माझें मन' । परी 'मीचि मन' न म्हणे जाण ।
यालागीं मनाहूनि आत्मा भिन्न । वेगळेपणें साक्षित्वें ॥७१ ॥
देहद्वयाहूनि भिन्न । दृढ साधूनि आत्मज्ञान ।
देहात्मबुद्धीचें छेदन । केलें जाण शिष्याचें ॥७२॥
यालागीं देहात्मवादी । जे सत्य मनिती उपाधी ।
ते मिथ्या केली त्रिशुद्धी । शुद्ध बुद्धि ते नव्हे ॥७३॥
मनावेगळा साधिला पाहा हो । तो तुं म्हणसी पितामहो ।
तो देवांमध्यें श्रेष्ठ देवो । हाही संदेहो न धरावा ॥७४॥
हो का कल्पाचिये आदी । ब्रह्मयासी मौढ्य होतें आधीं ।
करूं न शके सृजनविधी । जड बुद्धि तयाची ॥७५॥
त्यासी करूनि सावधान । म्यांचि प्रकाशिलें निजज्ञान ।
तेव्हां तो झाला ज्ञानसंपन्न । सृष्टिसृजन करावया ॥७६॥
नाभिकमळीं जन्मलें केवळ । ब्रह्मा माझे पोटींचें बाळ ।
माझ्या दोंदावरी खेळे खेळ । आत्मा केवळ तो नव्हे ॥७७॥
जितुका देवांचा समुदावो । तितुका प्रकाश्यचि पाहा हो ।
मी प्रकाशकु अनादि देवो । स्वप्रकाशस्वभावो आत्मा तो मी ॥७८॥
देहद्वय आणि मन । त्यांहूनि आत्मा विलक्षण ।
हिरण्यगर्भाहूनि जाण । विलक्षणपण आत्म्याचें ॥७९॥
हिरण्यगर्भचि परमात्मा । हेंही न घडे गा भक्तोत्तमा ।
मी हिरण्यगर्भाचाही आत्मा । माझी महिमा त्या कैंची ॥२८०॥
एवं हिरण्यगर्भउपासना । ते साधनारूपेंचि सेवना ।
परी केवळ आत्मपणा । न ये जाणा मायिकत्वें ॥८१॥
तेचि विलक्षणता । आणोनियां दृष्टांता ।
साधीतसें तत्त्वतां । भक्तांच्या हाता चढे जेणें ॥८२॥
अग्नि काष्ठामाजीं वसे । परी तो काष्ठचि होऊनि नसे ।
मथिल्या काष्ठीं प्रकट दिसे । जाळी उल्हासें काष्ठातें ॥८३॥
तैसा आत्मा देहीं असे । तो देहोचि होऊनि नसे ।
ब्रह्मज्ञानें जेव्हां प्रकाशे । जाळी अनायासें देहभाव ॥८४॥
असोनि एके ठायीं जाण । दाह्याहूनि दाहक भिन्न ।
तैसें प्रकाश्याहूनि जाण । भिन्नपण स्वप्रकाशा ॥८५॥
अग्निदृष्टांतें निश्चित । आत्मयाचें निजतत्त्व ।
नित्यत्व आणि विभुत्व । असे साधित निजबोधें ॥८६॥
काष्ठाचेनि योगें अग्नीसी । जन्मनिरोधु नामरूपांसी ।
पावे तेवीं आत्मयासी । विकारता तैसी देहयोगें ॥८७॥
निरोधोत्पत्त्यणुबृहन् नानात्वं तत्कृतान् गुणान् ।
अन्तः प्रविष्ट आधत्त एवं देहगुणान् परः ॥ ९ ॥
नाना काष्ठांच्या संयोगीं । काष्ठांचे गुण अग्नीच्या अंगीं ।
आले दिसती प्रत्यक्ष जगीं । अग्नि ते संगीं अलिप्त ॥८८॥
काष्ठमथनें अग्नि प्रकटला । त्या नांव म्हणती 'उपजला' ।
काष्ठाकारीं आकारला । लहान थोर झाला तद्योगें ॥८९॥
अग्नि काष्ठाविकारवशें । त्रिकोण वर्तुळ वक्र आभासे ।
काष्ठाचेनि निःशेष नाशें । 'नाशला' ऐसें मानिती ॥२९०॥
तैसा अज नित्य अव्ययो । त्यासी आकार-विकार जन्म-लयो ।
हा देहादिसंबंधस्वभावो । मिथ्या पहा हो मानिती ॥९१॥
जें साधिलें अग्निदृष्टांतें । तें उद्धवासी न मनेल चित्तें ।
यालागीं निरूपण मागुतें । श्रीअनंतें मांडिलें ॥९२॥
उद्धवा तूं ऐसें म्हणसी । 'मूळीं सिद्धसंयोगु अग्निकाष्ठासी ।
तो काष्ठधर्मु लागला अग्नीसी । हें आम्हांसी मानलें ॥९३॥
आत्मा नित्यसिद्धु अविकारी स्वांगें । जो गगनासी नातळे अंगें ।
त्यासी देहसंगु केवीं लागे । मग तद्योगें विकारी ॥९४॥
आत्म्यासी देहसंगु घडे । हें बोलणेंचि तंव कुडें ।
ऐसें न घडतेंही जरी घडे । तरी तो सांपडे देहबुद्धीं ॥९५॥
जो देहबुद्धीमाजीं आला । तो केवळ देहधारी झाला ।
पुढें केवीं जाय त्यागु केला ।' ऐसा उपजला संदेहो ॥९६॥
कृष्ण म्हणे उद्धवासी । ऐसी शंका झणें धरिसी ।
मन घालोनि मनाचे मानसीं । या अर्थासी परियेसीं ॥९७॥
हें शब्दचातुर्यासाठीं । हाता न ये गा जगजेठी ।
हे माझ्या गुप्ताचीही गुप्त गोठी । तुजसाठीं बोलतों ॥९८॥
योऽसौ गुणैर्विरचितो देहोऽयं पुरुषस्य हि ।
संसारस्तन्निबंधोऽयं पुंसो विद्याच्छिदात्मनः ॥ १० ॥
ऐकें पुरुष जो पुरुषोत्तम । ज्या आधीन मायागुणग्राम ।
ज्यासी 'ईश्वर' ऐसा नामधर्म । शास्त्रानुक्रम बोलती ॥९९॥
त्या ईश्वराची जे माया । ज्या उपजविलें नाना कार्या ।
जीव संसारी करावया । भ्रमु वायां वाढविला ॥३००॥
तेथें चैतन्य जें प्रतिबिंबले । तेंचि 'जीव' पणें वाच्य झालें ।
जेवीं थिल्लरीं चंद्रबिंब बुडालें । दिसे नाथिलें मूर्खासी ॥१॥
त्या थिल्लरासी नातळत । चंद्रमा असे गगनीं अलिप्त ।
तैसा आत्मा अविद्यातीत । अविद्या नातळत प्रतिबिंबाला ॥२॥
'अहमिति' प्रथमाध्यासें । सूक्ष्म लिंगदेह मायावशें ।
नाना अनर्थकारी कैसें । वासनासौरसें उपजलें ॥३॥
जरी लिंगदेह झालें सबळ । विषयभोगा दृढ मूळ ।
तरी भोगु नव्हे स्थूळ । सूक्ष्म भूतगोळा स्थूळावला ॥४॥
स्थूळापासोनि स्थूळ देहो । पांचभौतिक घडला पहा हो ।
एवं उभयदेह अभिप्रावो । झाला निर्वाहो या रीतीं ॥५॥
ऐसा उभय देहीं वर्ततां । दृढ लागली देहात्मता ।
तेणें वाढली अहंममता । मी कोण हें तत्त्वतां विसरला ॥६॥
न कळे निजसुखाची गोडी । पडला विषयांचिये वोढी ।
पापपुण्यांचिया जोडी कोडी । पडिली बेडी सुबुद्धा ॥७॥
देहाध्यासें देहधर्म । सत्य मानी वर्णाश्रम ।
मग आचरों लागे कर्म । फळसंभ्रम वांछूनि ॥८॥
राजा चक्रवर्ती निजमंदिरीं । निजेला सुमनशेजेवरी ।
तो स्वप्नीं होऊनि भिकारी । अंत्यजाघरीं अन्न मागे ॥९॥
तेथ कुटका एकु यावया हाता । नीसाची म्हणे राजा रे तूं तत्त्वतां ।
परी मी राजा हें नाठवे चित्ता । स्वप्नीं भिक्षुकता दृढ झाली ॥३१०॥
तैसी विसरोनि निजात्मता । फळें मागे देवां देवतां ।
मी देवांचा देवो तत्त्वतां । हें त्यासी सर्वथा नाठवे ॥११॥
त्या स्वप्नाचेनि अतिअध्यासें । राजा वोसणावे 'मी भिकारी' ऐसें ।
ऐकोनि सेविकां येत हांसें । राजा स्वप्नवशें जल्पतु ॥१२॥
येथ गाढ मूळ अवस्थाघोरें । सर्वांग गडबडी निदसुरें ।
नागवें उघडें न स्मरे । निद्राभरें घोरत ॥१३॥
त्यासी थापटी पुरोहितु । जागा होतां होय विस्मितु ।
मग नागवेपणा आच्छादितु । सांगों लाजतु भिक्षुकता ॥१४॥
तेवीं अविद्या निद्रा उद्भटा । जल्पे मी देही मी करंटा ।
मी संपन्नु मी ज्ञाता मोठा । देहात्मनिष्ठा बडबडी ॥१५॥
तेणें निदसुरपणाचे लाहें । कर्माकर्मांचे पसरी पाये ।
हिताहित कोण पाहे । देहमोहें मोहितु ॥१६॥
तो गाढमूढ अवस्थेआंतु । होता दीर्घसंकल्पें लोळतु ।
लोभें अतिजल्पें जल्पतु । वोसणतु 'मी माझें' ॥१७॥
तेथें दैवयोगें गडबडितु । अवचटें गुरुचरणीं आदळतु ।
निकटता देखोनि कृपावंतु । थापटितु निजबोधें ॥१८॥
'ब्रह्माहमस्मि' ऐसी वाणी । एक वेळ पडली कानीं ।
अविद्या निद्रा गेली पळोनी । तो तत्क्षणीं जागिन्नला ॥१९॥
जागतांचि होय विस्मित । 'मी देह' म्हणतां लाजत ।
देहकर्म देखे निंदित । कर्मातीत ब्रह्म मी ॥३२०॥
होआवया संसारबंधन । यासी अविद्याचि गा कारण ।
तिसी छेदावया जाण । खड्ग तीक्ष्ण ब्रह्मविद्या ॥२१॥
अविद्या निरसी ब्रह्मज्ञान । ते अवश्य ब्रह्माहोनि भिन्न ।
मोडलें म्हणसी अद्वैतपण । तें नव्हे जाण सिद्धांतीं ॥२२॥
प्रपंचु अज्ञानें लाठा । ज्ञानअज्ञानाच्या सत्त्ववाटा ।
फेडिजे कांटेन कांटा । मग खटपटा निमाल्या ॥२३॥
अविद्या जीवबंधनी । ब्रह्मविद्या बंधच्छेदनी ।
या समूळ तुजलागुनी । सांगितल्या दोनी सविस्तर ॥२४॥
तेचि ब्रह्मविद्या जाणा । कैसेनि प्राप्त होय आपणा ।
ते पूर्वपीठ विवंचना । सावधमना परियेसीं ॥२५॥
तस्माज्जिज्ञासयाऽऽत्मानं आत्मस्थं केवलं परम् ।
सङ्गम्य निरसेदेतद् वस्तुबुद्धिं यथाक्रमम् ॥ ११ ॥
उद्धवा याचिलागीं नित्य । जिज्ञासें बैसवावें चित्त ।
तिसी विवेक उपजवित । सत्यासत्यविभागें ॥२६॥
तेथ असत्य तितकी 'अविद्या' । जिचेनि जीवासी परम बाधा ।
तिच्या समूळ करावया छेदा । 'सद्विद्या' साधावी ॥२७॥
सद्विद्या साधिलिया पाहीं । केवळ वस्तु ते दूरी नाहीं ।
असे आपुल्याचि ठायीं । येचि देहीं कूटस्थ ॥२८॥
कार्यकारणसंघात । यामाजीं वस्तु असे व्याप्त ।
व्यापूनियां अलिप्त । नित्यमुक्त स्वभावें ॥२९॥
करूनि सद्विद्यासाधन । धरूनि आत्मानुसंधान ।
देहद्वयाचें निरसन । साधकें जाण साधावें ॥३३०॥
स्थूल नश्वरत्वे मिथ्या झालें । सूक्ष्म वासनामय कल्पिलें ।
ते कल्पनेसी मिथ्यात्व आलें । ब्रह्म उरलें निर्विकल्प ॥३१॥
जैशा गगनीं नाना मेघपंक्ती । निजबळें त्या वर्षती ।
त्याचि शारदियेचे अंतीं । हरपोनि जाती आकाशीं ॥३२॥
तैसी देहीं देहात्मबुद्धी । दृढ केली होती त्रिशुद्धी ।
तेचि विवेकाचिया प्रबोधीं । नास्तिकसिद्धी पावली ॥३३॥
देह-असद्भावाची पदवी । ब्रह्मविद्येच्या सद्भावीं ।
खद्योततेजाची दिवी । सूर्ये देखावी कैसेनि ॥३४॥
दोर भासला होता विखार । त्याचा करितां निजनिर्धार ।
हारपोनियां सर्पाकार । उरे दोर निजरूपें ॥३५॥
पाहतां विवेकाचेनि निवाडें । दोराचें सर्पत्व जेवीं उडे ।
तेवीं ब्रह्मसद्भावीं रोकडें । देह नातुडे सत्यत्वें ॥३६॥
'नरदेह आश्रयून । ब्रह्मविद्या वाढली जाण ।
तें आपुलें जन्मस्थान । देहनिर्दळण केवीं करी' ॥३७॥
उद्धवा तूं ऐसऐसी । आशंका झणीं धरिसी ।
ते अग्निउत्पत्तिदृष्टांतेंसीं । तुजपाशीं सांगेन ॥३८॥
आचार्योऽरणिराद्यः स्यादन्तेवास्युत्तरारणिः ।
तत्संधानं प्रवचनं विद्यासंधिः सुखावहः ॥ १२ ॥
दों काष्ठांचिया घसणीं । अग्नि काढिला मंथोनि ।
तो काष्ठें काष्ठ जाळूनी । अग्नि अग्निपणीं प्रज्वळला ॥३९॥
तैसी ब्रह्मविद्या जाण । गुरुशिष्यसंवादमंथन ।
त्या मंथनाचें निरूपण । सावधान परियेसीं ॥३४०॥
येथ आचार्य आद्य अरणी । शिष्य तो झाला उत्तरारणी ।
उपदेश तो मंथास्थानीं । संवादमंथानीं मंथावे ॥४१॥
ये मंथनी जरी आळसु केला । तरी ज्ञानाग्नीचा अविर्भाव गेला ।
आपणिया आपण वंचला । थित्या मुकला साधना ॥४२॥
धरितां आळसाची मागी । येव्हडा अनर्थु वाजे अंगीं ।
आठही प्रहर शिणताति योगी । या योगालागीं साधावया ॥४३॥
निजस्वार्थालागीं सावधान । गुरुवचनाचें अनुसंधान ।
अविश्रम करितां मंथन । ब्रह्मज्ञान तैं प्रकटे ॥४४॥
प्रकटलें ब्रह्मज्ञान । उरों नेदी देहाचें भान ।
दृश्य द्रष्टा दर्शन । करी प्राशन तात्काळ ॥४५॥
कार्य कर्म आणि कर्ता । ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता ।
हें उरों नेदी सर्वथा । निजात्मता निजबोधें ॥४६॥
निजबोधें संसार-दुःख । निरसूनि दिधलें निजसुख ।
निजात्मसुखीं निःशेख । मायागुण देख नासिले ॥४७॥
वैशारदी सातिविशुद्धबुद्धिः धुनोति मायां गुणसंप्रसूताम् ।
गुणांश्च सन्दह्य यदात्ममेतत् स्वयं च शाम्यत्यसमिद् यथाग्निः ॥ १३ ॥
नाशावया निजमायागुण । शिष्य विशारद बुद्धिनिपुण ।
दैवी संपदेचें अधिष्ठान । सद्गुणीं संपन्न सर्वदा ॥४८॥
ऐसा मुमुक्षु अधिकारवंतु । त्यासी शाब्दपरनिष्णातु ।
गुरूंनीं माथां ठेविला हातु । निजबोधु प्राप्तु तत्काळें ॥४९॥
निजबोधीं बैसतां दृष्टी । गुणकार्य रिघे गुणांच्या पोटीं ।
तेव्हां गुणुचि गुणातें आटी । तमातें घोंटी मध्यमु ॥३५०॥
तम खाऊन रजोगुण । अत्यंत उन्मत्त झाला जाण ।
त्याचें देखोनि उन्मत्तपण । सत्त्वें सत्त्वगुण खवळला ॥५१॥
जेव्हां खवळला सत्त्वगुण । त्यासी न साहे दुजेपण ।
रजोगुणांचें प्राशन । केलें जाण तत्काळ ॥५२॥
केवळ सत्त्वाचा स्वभावो । तेणें निजसुखाचा अनुभवो ।
क्षणक्षणां नीच नवा पहावो । अतिनवलावो अनुभवीं ॥५३॥
तेणें सुखानुभवें देखा । रजतमाच्या बीजकणिका ।
ज्या सृष्टिसृजनीं उन्मुखा । त्याही निःशेखा जाळिल्या ॥५४॥
तेव्हां गुण प्रसवती माया । शोधित सत्त्वें आणिली लया ।
ते सत्त्ववृत्ति एकलिया । अद्वैततया उरलीसे ॥५५॥
तेव्हां 'ब्रह्माहमस्मि' लक्षण । तेंही हों लागलें क्षीण ।
सोहंहंसाची बोळवण । ते संधी जाण होतसे ॥५६॥
तेथ देहींचें गेलें देहपण । जन्ममरणा आलें मरण ।
विश्वाचें न दिसे भान । आनंदघन कोंदला ॥५७॥
तेणें सुखस्वरूप झाली दृष्टी । आनंदमय झाली सृष्टी ।
परमानंदें चढली पुष्टी । स्वानंदे मिठी घातली ॥५८॥
त्या सुखाची मर्यादा । काइसेनिही नव्हे कदा ।
जेथ मौन पडिलें वेदां । वृत्ति तत्पदा पावली ॥५९॥
द्वैत सर्वथा नाहीं पुढें । यालागीं वृत्तीची वाढी मोडे ।
तेव्हा तेही सुखस्वरूपीं बुडे । पुढें वाढे तें नाहीं ॥३६०॥
जैसा निरिंधन अग्नी । जाय निजतेजीं मिळूनी ।
तैशी वृत्ति अद्वैतपणीं । मिळे मिळणीं सुखरूपीं ॥६१॥
गंगा सागर मीनली । ते समुद्रचि होऊनि ठेली ।
कां लवणजळां भेटी झाली । मिठी पडली जळत्वें ॥६२॥
दीपीं दीपु एकवटला । मिळणीं एकुचि होऊनि ठेला ।
तैसा वृत्तीचा लयो झाला । निर्व्यंग पावला निजसुख ॥६३॥
तेव्हां आत्मा एक अद्वैत । तेंही म्हणणें नाहीं तेथ ।
एवं द्वैताद्वैतातीत । नित्य निश्चित निजात्मा ॥६४॥
तो ज्ञानस्वरूप स्वप्रकाश । अविकारी अविनाश ।
अकर्ता अभोक्ता उदास । निर्विशेष निजरूप ॥६५॥
तो अदेही अगोत्र । अचक्षु अक्षोत्र ।
अमनस्क अमंत्र । सर्व मंत्र-मंत्रार्थ जो ॥६६॥
जो अज आद्य अप्रमेय । अतर्क्य अलक्ष्य अव्यय ।
नामरूपादि अभाव्य । भावना भाव ते शून्य ॥६७॥
जो भोग्य भोग नव्हे भोक्ता । जो कार्य कर्म नव्हे कर्ता ।
कर्ता अकर्ता या वार्ता । जेथ सर्वथा निमाल्या ॥६८॥
जो अविनाशी अभंग । जो शुद्ध बुद्ध असंग ।
देहद्वयाचा संग । ज्यातें अंग स्पर्शेना ॥६९॥
आत्म्यावेगळें तें अनित्य । हा पूर्वनिश्चय होतां सत्य ।
आतां बुडाले नित्यानित्य । सबराभरित निजात्मा ॥३७०॥
नेणपण निमालें सर्वथा । बुडाली जाणपणाची अवस्था ।
गुणगुणीगुणातीतता । हेही तत्त्वतां तेथ नाहीं ॥७१॥
उद्धवा परमात्मा तो तत्त्वतां । हा माझा निश्चयो सर्वथा ।
तोचि उपनिषदर्थे अर्थितां । निजात्मता प्रतिपाद्य ॥७२॥
येथ पावलियाहि वृत्ति । होय संसारनिवृत्ति ।
हाचि वेदांतीं सिद्धांतीं । निश्चयो निश्चतीं केला असे ॥७३॥
येथूनि कार्य-कर्मकर्तव्यता । निःशेष खुंटली सर्वथा ।
निजीं निजरूप निजात्मता । जाण तत्त्वतां पावल्या ॥७४॥
हे अद्वैतश्रुतिसुरवाडें । सद्गुरुकृपा-उजियेडें ।
वृत्ति निजात्मपदा चढे । भाग्य केव्हडें पाहें पां ॥७५॥
मी वंद्य देवादिदेवां । त्या माझाही निजज्ञानठेवा ।
परम कृपेनें उद्धवा । तुज म्यां आघवा दीधला ॥७६॥
तुज होआवया निवृत्ती । हाचि अर्थु नानासंमतीं ।
सांगितला परम प्रीतीं । जाण निश्चितीं उद्धवा ॥७७॥
आतां देहादिक जे असंत । अतिनिंद्यत्वें कुत्सित ।
तेथ आतळों नेदीं चित्त । होई अलिप्त परमार्थीं ॥७८॥
हे तुज झाली अलभ्य प्राप्ती । परी यत्न करावा अतिनिगुतीं ।
येथ मतांतरें छळूं येती । तेही उपपत्ती परियेसीं ॥७९॥
अथैषां कर्मकर्तॄणां भोक्तॄणां सुखदुःखयोः ।
नानात्वमथ नित्यत्वं लोककालागमात्मनाम् ॥ १४ ॥
नाना फळें अभिलाषिते । कर्माचे जे कर्मकर्ते ।
सुखदुःखांचे जे भोक्ते । अनेकत्वें येथें अनंत ॥३८०॥
म्हणती जे मानिती एकात्मता । तरी एकाचेनि सुखें सुख समस्तां ।
कां एकाचेनि पापें पापता । न घडे सर्वथा सकळांसी ॥८१॥
ऐसें कर्मवादियांचें मत । जीव नित्य आणि अनंत ।
मुख्य ईश्वरचि नाहीं म्हणत । कर्तें येथ निजकर्म ॥८२॥
मीपणें जें स्फुरे स्फुरण । ते प्रतिशरीरीं जीव भिन्न ।
त्यांच्या स्वरूपाचें प्रमाण । कर्ता भोक्ता जाण म्हणताति ॥८३॥
ऐकें विवंचना सावचित्त । लोक काळ श्रुति जीवित ।
अनेकत्वें अनित्य । हें वेदांतमत पैं माझें ॥८४॥
उद्धवा कर्मवाद्यांचे ऐसें मत । सत्य मानील तुझें चित्त ।
तरी बुडवील निजस्वार्थ । अंगीं अनर्थ वाजेल ॥८५॥
तोचि अनर्थ म्हणसी कैसा । तरी कर्मवाद्यांचा भावो ऐसा ।
हा पूर्वपक्षाचा ठसा । अभिप्रावो ऐसा परियेसीं ॥८६॥
परमात्मा निर्विकाररूप । एक न मानिती सर्वस्वरूप ।
संन्यासु ऐकतां म्हणती पाप । मतजल्प मतवाद्यां ॥८७॥
त्यागसंन्यास जे करिती । त्यांतें अनधिकारी म्हणती ।
कर्म मुख्यत्वें मानिती । वैराग्य निंदिती निजमतें ॥८८॥
कर्म करोनि भोगिजे सुख । तें कर्म त्यजिती निःशेख ।
निष्कर्मासी कैंचें सुख । परम दुःख तो त्यागु ॥८९॥
वैराग्य न घडावया कारण । चौं प्रकारीं बोलती जाण ।
तेंही सांगेन मी लक्षण । सावधान परियेसीं ॥३९०॥
म्हणती अनित्य असते कांहीं । तरी वैराग्य घडतें ते ठायीं ।
येथ अनित्यचि नाहीं । वैराग्यें कायीं त्यजावें ॥९१॥
वैराग्य होये चौं प्रकारीं । मीमांसक नित्य मानिती चारी ।
निजमताचा गर्व भारी । चार्ही खरीं नित्यत्वें ॥९२॥
कर्मप्रकाशक वेद मूळ । तो आगम नित्य मानी अढळ ।
जीव नित्यचि म्हणे सकळ । भोगकाळ तोही नित्य ॥९३॥
स्वर्गादि लोक भोगस्थान । वेदु बोलिला आपण ।
मिथ्या नव्हे वेदवचन । चार्ही प्रमाण नित्यत्वें ॥९४॥
उद्धवा यापरी पाहीं । म्हणती अनित्य येथ नाही ।
वैराग्यें करावें कायी । मिथ्या पाहीं वैरागी ॥९५॥
हो कां भोग्य जरी नश्वर होतें । अथवा मायिक कांहीं असतें ।
तरी वैराग्य संभवतें । तें तंव येथें असेना ॥९६॥
मन्यसे सर्वभावानां संस्था ह्यौत्पत्तिकी यथा ।
तत्तदाकृतिभेदेन जायते भिद्यते च धीः ॥ १५ ॥
जीवाच्या भोग्यपदार्था । स्त्रक-चंदनादि-वनिता ।
त्यांसी प्रवाहरूपें नित्यता । म्हणती तत्त्वतां स्वमतें ॥९७॥
आत्मा आहे जग नाहीं । हें घडलेंचि नाहीं कांहीं ।
जळेंवीण समुद्र पाहीं । उरला नाहीं सर्वथा ॥९८॥
सृष्टि प्रवाहरूपें नित्य । पितृपुत्रत्वें अखंड वाहत ।
कर्मास्तव यातायात । सृष्टि अनित्य हें न घडे ॥९९॥
नित्यासी ईश्वर कर्ता । हेंही न घडे गा तत्त्वतां ।
नित्याचा कोण नव्हे कर्ता । ईश्वरु सर्वथा येथ नाहीं ॥४००॥
वेदांती स्वरूपभूत । आत्मा ज्ञानस्वरूप म्हणत ।
हेंही न घडे गा येथ । ऐसें स्वमत बोलती ॥१॥
घटपटाकार पाहातां । ज्ञानासी त्रिक्षणावस्था ।
आत्मा ज्ञानस्वरूप म्हणतां । लाज सर्वथा त्यां न ये ॥२॥
एवं वेदांत्याच्या ठायीं । आत्मनिश्चियो दृढ नाहीं ।
'मोक्ष' म्हणती जो कांहीं । तोही पाहीं मिथ्याचि ॥३॥
इंद्रियसुखेंवीण सुख । मोक्ष म्हणती ते अविवेक ।
इंद्रियद्वारा जीवांसी हरिख । भोगितांही मूर्ख न मानिती ॥४॥
देहेंवीण विदेही । सुख भोगिजे कोणें कांहीं ।
अद्वैतवादी जल्पती कांहीं । तें सत्य नाहीं सर्वथा ॥५॥
जीवासी जेणें सुखप्राप्ती । ते इंद्रियेंचि नाहीं म्हणती ।
डोळे फोडूनि देखणे होती । तैसी वदंती वेदांत्यां ॥६॥
येथ ईश्वरुचि नाहीं फुडा । मा तो फळ देईल हा बोल कुडा ।
अद्वैतवादी मूर्ख गाढा । नागवी मूढां वैराग्यें ॥७॥
गांव ठावो ना पदवी । तो मिथ्या ईश्वरु धरोनि जीवीं ।
कर्मफळीं नैराश्य करवी । अथवा सांडवी कर्मातें ॥८॥
नरदेहीं ज्ञान उपजलें । तेणें देहचि नाशिलें ।
फळें वृक्षमूल छेदिलें । कोणीं देखिलें कोठेंही ॥९॥
ज्ञानाचे परिपाकदशें । म्हणती अवघा संसारुचि नाशे ।
सृष्टि प्रवाहरूपें नित्य असे । नित्य नासे कैसेनि ॥४१०॥
मनुष्याचे हृदयींचें ज्ञान । तेणें संसाराचें निर्दळण ।
तरी खद्योततेजें जाळिले जाण । ग्रहगण शशी सूर्य ॥११॥
एवं करूं जातां निवृत्ति । केले कष्ट ते मिथ्या होती ।
इंद्रियेंवीण सुखप्राप्ति । नव्हे निश्चितीं जीवासी ॥१२॥
यालागीं निवृत्ति ते वृथा कष्ट । सर्वांसी प्रवृत्तिच अतिश्रेष्ठ ।
कर्में करोनियां उद्भट । फळें वरिष्ठ भोगावीं ॥१३॥
संसार म्हणती मायिक । ते जाणावे केवळ मूर्ख ।
संसारवेगळें सुख । नाहीं देख जीवासी ॥१४॥
मनुष्याधिकारें सुखप्राप्ति । यालागीं देव मनुष्यत्व वांछिती ।
वेदांती मनुष्यत्व निंदिती । केवीं ते युक्ती मानावी ॥१५॥
वेदें अधिकारु बोलिला । तो वेदुचि इंहीं वेडा केला ।
यांचे लागला जो बोला । तो नागवला सर्वस्वें ॥१६॥
वेदाचें वेदवचन । सर्वार्थीं तें प्रमाण ।
मिथ्या म्हणतो तें वेदवचन । थोर सज्ञान हे झाले ॥१७॥
ऐशी मीमांसकांची वदंती । नानापरींच्या चाळिती युक्ती ।
आपुलें मत स्थापिती । तें मिथ्या निश्चितीं उद्धवा ॥१८॥
लापनिका ऐसें मिथ्या त्यांचें मत । अंगीकरूनि प्रस्तुत ।
प्रपंचअनर्थता दावित । दृढ स्थापित वैराग्य ॥१९॥
एवमप्यङ्ग सर्वेषां देहिनां देहयोगतः ।
कालावयवतः संति भावा जन्मादयोऽसकृत् ॥ १६ ॥
म्हणें आइकें बापा उद्धवा । हा मिथ्या मतवादु आघवा ।
म्हणसी कैसेनि जाणावा । विवेक करावा मतांचा ॥४२०॥
निवृत्ति ते केवळ कष्ट । म्हणती प्रवृत्ति अतिश्रेष्ठ ।
प्रवृत्तीमाजीं परम कष्ट । मरण अरिष्ट अनिवार ॥२१॥
धरोनियां जन्ममूळ । अखंड लागलासे काळ ।
लवनिमिष पळपळ । काळ वेळ साधित ॥२२॥
जैसें संवचोराचें साजणें । तैसें काळाचें जोगवणें ।
वेळ आल्या जीवेंप्राणें । नाहीं राखणें सर्वस्वें ॥२३॥
काळु न म्हणे हाट घाट । न म्हणे अवसी पहांट ।
न म्हणे देश विदेश वाट । नाशी उद्भट निजतेजें ॥२४॥
करितां प्रवृत्तीचे कष्ट । अवचितां मृत्यूचा चपेट ।
अंगीं वाजे जी उद्भट । अहा कटकट ते काळीं ॥२५॥
जीवीं वासनेच्या थोर हांवा । म्हणे गेलों मेलों धांवा पावा ।
कोण निवारी मृत्युप्रभावा । उपावो तेव्हां चालेना ॥२६॥
काळु मारोनि नोसंडी । यातना भोगवी गाढी ।
सवेंचि गर्भवासीं पाडी । जेथ दुःखकोडी अनिवार ॥२७॥
मातेच्या जठरकुहरीं । विष्ठामूत्रांच्या दाथरीं ।
अधोमुख नवमासवरी । उकडी भारी जठाराग्नी ॥२८॥
विष्ठालेपु चहूंकडे । नाकी तोंडीं कृमी किडे ।
गर्भवासींचे कष्ट गाढे । कोणापुढें सांगेल ॥२९॥
कट्वम्ललवणमेळें । गर्भवतीचे पुरती डोहळे ।
त्वचेवीण गर्भांग पोळे । तेणें दुःखें लोळे अतिदुःखी ॥४३०॥
ते गर्भोदरींची व्यथा । नेणती माता आणि पिता ।
तेथ नाहीं कोणी सोडविता । जीवींची व्यथा जीव जाणे ॥३१॥
ज्या ठायाची करूं नये गोठी । प्रकट दावूं नये दिठी ।
ते योनिद्वारें अतिसंकटीं । जन्म शेवटीं जीवासी ॥३२॥
जे नित्य मूत्राची न्हाणी । कीं नविया नरकाची खाणी ।
जे रजस्वलारुधिराची श्रेणी । जन्म तेथोनी पावती ॥३३॥
अपवित्र विटाळशीचें रुधिर । तें गोठोनि झालें जी शरीर ।
निंद्यद्वारें जन्मोनि नर । आम्ही पवित्र म्हणविती ॥३४॥
गर्भावासाहूनि गाढें । दुःख कोण आहे पुढें ।
मतवादी बोले तें कुडें । सुख नातुडे प्रवृत्तीं ॥३५॥
एके जन्में जन्म न सरे । एकें मरणें मरण नोसरे ।
कोटि कोटि जन्मांचे फेरे । काळ योनिद्वारें करवितु ॥३६॥
पुढतीं जन्म पुढतीं मरण । अनिवार लागलें जाण ।
प्रवृत्तीमाजीं सुख कोण । दुःख दारुण भोगवी ॥३७॥
जन्ममरणांमाजिले संधी । आणिकही थोर दुःख बाधी ।
त्या दुःखाची दुःखसिद्धी । ऐक त्रिशुद्धी सांगेन ॥३८॥
धाडीभेणें पळतां थोर । आडवे नागवती चोर ।
तैसें जन्ममरणांचें अंतर । षड्विकार राखती ॥३९॥
षड्विकारांच्या पतिव्रता । षडूर्मी लागल्या जीविता ।
एवं प्रवृत्तीमाजीं परम व्यथा । सुख सर्वथा असेना ॥४४०॥
कर्मवादियांच्या मतां । जीवु स्वतंत्र कर्मकर्ता ।
म्हणती ते मिथ्या वार्ता । परतंत्रता प्रत्यक्ष ॥४१॥
तत्रापि कर्मणां कर्तुरस्वातन्त्र्यं च लक्ष्यते ।
भोक्तुश्च दुःखसुखयोः कोन्वर्थो विवशं भजेत् ॥ १७ ॥
जीवासी असती स्वतंत्रता । तरी तो दुःखभोगु न भोगिता ।
सदा सुखीचि असता । पापें न करिता अळुमाळु ॥४२॥
जीवु बापुडें सदा दीन । कर्में करूनि कर्माधीन ।
कर्मफळदाता तो भिन्न । सुखदुःखें जाण तो भोगवी ॥४३॥
यालागीं ईश्वराची सत्ता । तो कर्मफळाचा दाता ।
जीवु सुखदुःखांचा भोक्ता । स्वतंत्रता त्या नाहीं ॥४४॥
ऐसें लक्षितां लक्षण । जीवु तितका पराधीन ।
पराधीनपणें जाण । भोगी दारुण सुखदुःख ॥४५॥
मजलागीं दुःख होआवें । ऐसें कोणी भावीना जीवें ।
न वांछितां दुःख पावे । येणें न संभवे स्वतंत्रता ॥४६॥
श्रुतिस्मृतींतें विचारितां । जीवासी नाहीं स्वतंत्रता ।
पराधीनपणें वर्ततां । भोगी अप्रार्थितां सुखदुःख ॥४७॥
वादी परिहार करिती । साङ्ग कर्म जे नेणती ।
ते ते जीव दुःखी होती । सुख पावती कर्मज्ञ ॥४८॥
जे सदाचार श्रोत्री । जे याज्ञिक अग्निहोत्री ।
जे उभयलोकव्यापारी । साङ्ग करी कर्मातें ॥४९॥
जे अविकळ अव्यंग । कर्में करूनियां साङ्ग ।
उभय लोकीं सुखभोग । कर्मयोग भोगती ॥४५०॥
कर्मीं ज्याची योग्यता । तो सुखभोगाचा भोक्ता ।
हेंहि न घडे गा सर्वथा । ऐक आतां सांगेन ॥५१॥
न देहिनां सुखं किञ्चिद् विद्यते विदुषामपि ।
तथा च दुःखं मूढानां वृथाहङ्करणं परम् ॥ १८ ॥
कर्माचे जे तत्त्वतां ज्ञाते । तेही दुःखी देखों येथें ।
सुखी देखिजे मूर्खातें । जे कर्मातें नातळती ॥५२॥
चुकोनि यज्ञपुरुषा अच्युतातें । अग्निहोत्रा करिती यागातें ।
तें स्वकर्मचि त्यांचें त्यांतें । विपरीतार्थें फळतसे ॥५३॥
अग्नि तो तंव स्वरूप माझें । श्रुतिमंत्र ते तंव माझीं बीजें ।
आणि होमद्रव्य जें जें । तेंही माझें स्वरूप ॥५४॥
ऐशिया मज सर्वगतातें । नास्तिक्य देवोनि निजचित्तें ।
अनीश्वरवादी करिती यागातें । तोचि त्यांतें बद्धक ॥५५॥
स्त्रुक स्त्रुवा आणि प्रणीतापात्र । मांडूं शिकले कर्मतंत्र ।
मज निजात्मयाचें चुकलें सूत्र । तेणेंचि अपवित्र तो यागु ॥५६॥
सकळ हें सर्वमुखीं । मज अर्पितसे यज्ञपुरुखीं ।
हें न मनिजे याज्ञिकीं । बुद्धी अल्प कीं सकाम ॥५७॥
मज न अर्पितां जें सुकृत । तेंचि जाण दुःख दुरित ।
विषा नांव अमृत म्हणत । तैसें सुकृत सकाम ॥५८॥
मातें न पवतां जो स्वर्ग । तो जाणावा उपसर्ग ।
तेथींचा भोग तो महारोग । मूढ उद्योग याज्ञिकां ॥५९॥
कर्मीं कर्म विगुण होत । तेथ स्मरावा मी अच्युत ।
नामें न्यून तें संपूर्ण होत । हें सामर्थ्य नामाचें ॥४६०॥
तो मी अंगें आपण । याज्ञिकां मागों गेलों अन्न ।
मज नेदितीच ते ब्राह्मण । कर्मठपण तें कर्माचें ॥६१॥
मज यज्ञपुरुषातें सांडून । करिती इंद्रादिकांचे भजन ।
ते इंद्रादिक मजअधीन । कर्मवैगुण्य हें त्यांसी ॥६२॥
जे कर्म न करिती कृष्णार्पण । त्यांचें मळिण प्राक्तन ।
तेणें इहलोकीं दरिद्रता जाण । पडे विघ्न परलोकीं ॥६३॥
चुकवूनियां निजमुख । सर्वांगीं खिरीसाकरेचा देख ।
लेपु देतां न वचे भूक । अधिक दुःख तेणें होय ॥६४॥
तैसें मज चुकवूनि यज्ञपति । जे यागातें आचरती ।
बाळविधवे गर्भप्राप्ती । तैशीं फळें येती त्या यागा ॥६५॥
कर्मउद्देशें द्रव्य मागतां । यज्ञफळ ने द्रव्यदाता ।
याज्ञिक तो राहे रिता । मी कर्ता हा अभिमानु ॥६६॥
जैसा चाटू खिरीआंतु । चाटुवेंचि खिरी वाढिजेतु ।
चाटू खरकटल्या सांडितु । भोक्ते भोगित परमान्न ॥६७॥
सरस ऊंस घालिजे घाणा । रस पिळूनि भरे भाणा ।
रिता चोपटीं करकरी घाणा । ते गती जाणा याज्ञिकां ॥६८॥
तैसे याज्ञिक यज्ञ आचरत । द्रव्यदात्यासी तें फल होत ।
पशुहिंसा याज्ञिकां प्राप्त । दोषी होत अभिमानें ॥६९॥
एवं कर्मकुशळ याज्ञिक । यापरी ते भोगिता दुःख ।
कर्म नेणती जे मूर्ख । ते परम सुख भोगिती ॥४७०॥
नेणती कर्माच्या घडामोडी । परी माझी श्रद्धा पोटीं गाढी ।
तेणें उल्लंघोनि दुःखकोडी । निजात्मगोडी भोगिती ॥७१॥
कर्मीं कर्मादरु नेणत । माझ्या ठायीं श्रद्धायुक्त ।
भाळे भोळे माझे भक्त । सुख अनंत पावले ॥७२॥
काय कर्म केलें गोपाळीं । जे अखंड मजसवें गोकुळीं ।
भोगिली निजसुखनव्हाळी । करोनि होळी कर्मांची ॥७३॥
पाहतां गोपिकांचें कर्म । कर्ममार्गीं निंद्य धर्म ।
पावल्या माझें परम धाम । जीवीं पुरुषोत्तम आवडला ॥७४॥
खग-मृग-गो-सर्पादि समस्त । माझे निजपदीं झाले प्राप्त ।
याज्ञिकां कर्माभिमान बहुत । दुःख भोगित निजकर्में ॥७५॥
केवळ कर्मठ कर्मजड । आम्ही सर्वज्ञ ज्ञाते दृढ ।
हा अभिमान धरिती मूढ । दुःख वाड तयांसी ॥७६॥
दीपीं पतंगा मरण देख । तो उडी घालितां मानी सुख ।
तैसें कर्मठां कर्म केवळ दुःख । मानिती सुख अभिमानें ॥७७॥
अभिमानेंचि सर्वथा । नसती जीवासी म्हणे स्वतंत्रता ।
तेंही न घडे विचारितां । ऐक आतां सांगेन ॥७८॥
यदि प्राप्तिं विघातं च जानन्ति सुखदुःखयोः ।
तेऽप्यद्धा न विदुर्योगं मृत्युर्न प्रभवेद् यथा ॥ १९ ॥
दुःख निरसूनि सुखप्राप्ती । यालागीं कर्मे आचरती ।
कर्मवादी ज्ञाते म्हणविती । तेही नेणती दुःखनाशु ॥७९॥
कर्में करितां नाशु नोहे । ऐसें दुःख कोण आहे ।
पुसशील तरी पाहें । यथान्वयें सांगेन ॥४८०॥
मरणांवरतें दुःख चढे । ऐसें दुःख तंव नाहीं पुढें ।
तें निवारूं नेणती बापुडे । अति बळ गाढें मृत्युचें ॥८१॥
आंतु घालितां हातु पोळे । तेणें उन्हवणेंन घर न जळे ।
तैसा कर्में मृत्यु न टळे । प्रबळबळें अनिवार ॥८२॥
मारिता मृत्यु जेणें मारिजे । तो उपावो कर्मठीं नेणिजे ।
कर्मांमाजी जेणें असिजे । अचुक पाविजे तेणें मृत्यु ॥८३॥
अंतीं येईल मरणदुःख । जंव जीजे तंव भोगिजेल सुख ।
हें बोलेणे बोलती मूर्ख । जितां सुख त्यां कैंचें ॥८४॥
कोऽन्वर्थः सुखयत्येनं कामो वा मृत्युरन्तिके ।
आघातं नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिदः ॥ २० ॥
जितांही सुखाची वार्ता । कर्मठां नाहीं सर्वथा ।
तेही सांगेन मी कथा । ऐक आतां उद्धवा ॥८५॥
विखे रांधिलें मिष्टान्न । तें गोड न म्हणती सज्ञान ।
पुढें देखोनियां मरण । निःशेष तें अन्न सांडिती ॥८६॥
आगी लागिलिये घरीं । क्षण न राहिजे चतुरीं ।
मरण नादळतां उरी । सांडूनि दूरी पळताति ॥८७॥
धाडी आल्या निजद्वारीं । गोड न लगे साखरखिरी ।
तैसा मृत्यु जाणितलिया शरीरीं । विषयाकारीं सुख कैंचें ॥८८॥
दाढीसी लागलिया आगी । तो शृंगारु न मनी मुखालागीं ।
तैसा नीच नवा मृत्यु अंगीं । विषयसंगीं सुख कैंचें ॥८९॥
उठिल्या मरणान्त व्यथा । जन धन अन्न आणि कांता ।
सुख नेदितीच सर्वथा । झालीं वृथा समूळ ॥४९०॥
अंतकाळीं स्त्री धन । झालीं दुःखासीच कारण ।
त्यांसी सांडूनि न निघती प्राण । तळमळी जाण प्राणांतीं ॥९१॥
जैसा सुळीं द्यावया जो नेइजे । त्यासी नाना समारंभु कीजे ।
मुखीं घालिती पंचखाजें । तेणें तो नव्हिजे सुखिया कीं ॥९२॥
तैसें संमुख असतां मरण । विषयसुखें सुखावे कोण ।
विषय त्यागिती सज्ञान । मूर्खासी जाण आसक्ती ॥९३॥
देहदुःखाची अर्धघडी । नाशी विषयसुखाची कोडी ।
विषयालागीं शिणती वेडीं । अविनाश गोडी निर्विषयीं ॥९४॥
एवं या लोकांच्या ठायीं । सुख सर्वथैव नाहीं ।
लोकांतरीं म्हणती कांही । न घडे तेंही उद्धवा ॥९५॥
श्रुतं च दृष्टवद् दुष्टं स्पर्धासूयात्ययव्ययैः ।
बह्वन्तरायकामत्वात् कृषिवच्चापि निष्फलम् ॥ २१ ॥
जैसा देखिला हा लोक । तैसाचि श्रुत स्वर्गादिक ।
अनादि दोषयुक्त देख । सदोष मूर्ख वांछिती ॥९६॥
स्वर्गीं म्हणसी दोष कोण । ऐक तयांचें लक्षण ।
स्पर्धा असूया नाश जाण । तप क्षीण दिविभोगें ॥९७॥
तपसंपत्ति समान पाही । स्पर्धा मांडी त्याच्या ठायीं ।
मज समान भोगु पाही । तैं सुख नाहीं मानसीं ॥९८॥
आपणाहोनि अधिक पदीं । त्यासी दोष आरोपोनि निंदी ।
तेथही ऐसी विषमबुद्धी । सुख त्रिशुद्धी तेथें कैंचें ॥९९॥
यालागीं स्वर्गभोगें जें सुख । सकळां सारिखें नाहीं देख ।
तपानुसारें न्यूनाधिक । भोगिती लोक निजकर्में ॥५००॥
एक उर्वशी भोगूं लागला । एक काळी विद्रूप पावला ।
भोगें तपक्षयो झाला । नाशु आला अनिवार ॥१॥
जंव जंव स्वर्गभोग भोगिती । तंव तंव तपाची क्षीणशक्ती ।
तपक्षयें क्षया जाती । नाशु पावती स्वर्गस्थ ॥२॥
स्वर्गप्राप्तीचिये विधी । कर्में करितां विघ्न बाधी ।
तेणें नव्हे स्वर्गसिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥३॥
जें गर्भींच सटवलें । त्याचें बारसे न वचे केलें ।
तेवीं कर्मींचि विघ्न उद्भवलें । पावणें ठेलें स्वर्गाचें ॥४॥
म्हणसी विघ्न करी कोण । कर्म करितां होय विगुण ।
तें कर्मचि कर्मासि जाण । विघ्न दारुण उपजवी ॥५॥
कर्मचि कर्मासी साधक । कर्मचि कर्मासी बाधक ।
कर्मचि कर्मासी मोचक । हें नेणोनि लोक गुंतले ॥६॥
काम्य कर्मी विघ्न विचित्र । देश काळ मंत्र तंत्र ।
द्रव्य दक्षिणा विधि पात्र । शुद्धि सर्वत्र पाहिजे ॥७॥
जैसे क्षयरोगाचे रोगियासी । अल्प कुपथ्य बाधी त्यासी ।
तैसे जाण काम्य कर्मासी । अल्पदोषी सविघ्न ॥८॥
प्रचंड दुधाचें भांडें । माजीं थेंबु एकु कांजी पडे ।
तेणें दहीं दूध ना तूप जोडे । करी खवडे दुधाचे ॥९॥
तैसें काम्य कर्म जाण । अल्पही होतां विगुण ।
फळ नव्हे परी दारुण । तें कर्मचि विघ्न उपजवी ॥५१०॥
कष्टोनियां बारा मासीं । जैसा कृषीवळु करी कृषी ।
त्याच्या फलाआड विघ्नें कैशीं । केल्या कष्टासी नाशक ॥११॥
भूमि शुद्ध शुद्ध बीज । काळीं पर्जन्य कर्ता निरुज ।
उपकरण सामग्रीसमाज । पहिलें हें वोज पाहिजे ॥१२॥
पेरणी झालियापाठीं । देखणें राखणें कूपकांटी ।
सोंकरावें आवशीं पाहाटीं । आळसु पोटीं सांडूनी ॥१३॥
पीक येतयेतां कणशीं । आभाळें हिंसळा पडे त्यासी ।
कां कान्ही पडे पिकासी । घाली शेतासी निंदणें ॥१४॥
गर्वाचा तांबारा पडे । कां अहंतेचा रोग पडे ।
कीं अधर्माची आळी वाढे । पीक बुडें तेणेंही ॥१५॥
सबळ सोंकरणें न घडी । तरी आशेतृष्णेच्या भोरडी ।
कीजे पिकाची ओरबडी । दाणा बुडीं उरेना ॥१६॥
दंभाची घांटी पडिल्या ठायीं । घांटा दिसे परी दाणा नाहीं ।
कामक्रोधांच्या उंदरीं पाहीं । मूळाच्या ठायीं करांडिलें ॥१७॥
आल्या विकल्पाची धाडी । शेतामाजीं नुरे काडी ।
कुवासना टोळांची पडे उडी । समूळ सशेंडी खुराट ॥१८॥
एवं कृषीवळाचे परी । सकामासी विघ्नें भारी
फळ अंतरलें दूरी । विघ्नसागरीं बुडाले ॥१९॥
स्वर्ग एकु याज्ञिक बहुत । यागीं देव विघ्नें करित ।
मुख्य इंद्रचि विघ्ना प्रवर्तत । स्वर्ग राखत निजभोग ॥५२०॥
एकी वेश्या एकी राती । येथ सकाम बहुत येती ।
ते जैसे कलहो करिती । तैशी गती याज्ञिकां ॥२१॥
कां शुनि जैसी ऋतुस्त्नात । तिसी भोगूं येती श्वान बहुत ।
परस्परें गुरगुरित । तैसा स्वर्ग भोगत सकाम ॥२२॥
तेथ ज्यासी भोग घडे । भोगूं जातां अडकोनि पडे ।
भंडिमा होये जगापुढें । सज्ञान तोंडें थुंकिती ॥२३॥
जिचें भोगूं जाय सुख । अडकल्या ते होय विमुख ।
मैथुनद्वारें गुंतल्या देख । थुंकिती लोक मुखामुखीं ॥२४॥
तैशी याज्ञिकां स्वर्गप्राप्ती । भोगें होय तपच्युति ।
स्वर्गभोगीं गुंतली आसक्ती । विमुख पडती इहलोकीं ॥२५॥
एवं कृषीवळाचिया परी । स्वर्गप्राप्तीसी विघ्नें भारी ।
केले कष्ट वृथा करी । भोगु कैशापरी घडेल ॥२६॥
एक म्हणती कर्मकुशळ । आम्ही कर्म हो नेदूं विकळ ।
अच्छिद्र साधूनि सकळ । स्वर्गसुखफळ भोगूं ॥२७॥
उद्धवा ऐसेंही न घडे । तें मी सांगेन तुज पुढें ।
पंचश्लोकीं फाडोवाडें । विशद निवाडें परियेसीं ॥२८॥
अन्तरायैरविहितो यदि धर्मः स्वनुष्ठितः ।
तेनापि निर्जितं स्थानं यथा गच्छति तच्छृणु ॥ २२ ॥
जेणें अंतराय न पवती । ऐशीं अच्छिद्र कर्में नव्हतीं ।
जरी झालीं दैवगतीं । तरी स्थान प्राप्ती ते नश्वर ॥२९॥
कर्में ज्या स्थानाप्रति जाये । तेथ गेलिया जें जें लाहे ।
तें तें सांगेन मी पाहें । सावध होयें उद्धवा ॥५३०॥
इष्ट्वेह देवता यज्ञैः स्वर्लोकं याति याज्ञिकः ।
भुञ्जीत देववत् तत्र भोगान् दिव्यान् निजार्जितान् ॥ २३ ॥
पावोनि कर्मभूमि उत्तम । वर्णवरिष्ठ ब्राह्मणजन्म ।
ज्योतिष्टोमादिक करिती कर्म । नित्य काम्य अग्निहोत्र ॥३१॥
त्रयीविद्या जाणती सकळ । कर्मकलापीं अतिकुशळ ।
ऐसे सज्ञान मूर्ख केवळ । स्वर्गफळ वांछिती ॥३२॥
जेणें पुण्यें मी न जोडें । तें पुण्य म्हणतां वाचा रडे ।
याज्ञिक विषयासक्त गाढे । स्वर्गभोगाकडे धांविन्नले ॥३३॥
यजूनि इंद्रादि देवासी । जेणें अंतर पडे मजसी ।
त्या पावले स्वर्गलोकासी । दिव्य भोगांसी भोगावया ॥३४॥
बहुतीं चघळिलें जुनें हाड । तें श्वान स्वलाळा करी गोड ।
तैसें याज्ञिकां स्वर्गकोड । स्वपुण्यें गोड करिताति ॥३५
कां स्मशानबळींचें अन्न । कलहें श्वानशेष खाय श्वान ।
तैसाचि स्वर्गभोग जाण । शेष भाजन बहुतांचे ॥३६॥
गांठीचें वेंचून शुद्ध सुकृत । उच्छिष्ट भोग विकत घेत ।
याज्ञिक पवित्र म्हणवित । मोलें सेवित बहुशेष ॥३७॥
केवळ वायसाचें मांस । तेंही श्वानमुखींचे शेष ।
मोलें न मिळेचि बहुवस । तैसी रसकस याज्ञिकां ॥३८॥
स्वर्ग उच्छिष्ट बहुतांचें । त्यासी मोल वेंचे अतिकष्टांचें ।
तेंही न मिळेचि धणीचें । भय पतनाचें अहर्निशीं ॥३९॥
स्वर्गभोग भोगिती देव । तेही म्हणताति आम्ही निर्दैव ।
याज्ञिकांठायीं थोर हांव । दिव्य वैभवभोगार्थ ॥५४०॥
एवं झालिया स्वर्गप्राप्ती । तेथ जे जे भोग भोगती ।
ते मी सांगेन तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥४१॥
स्वर्गीं समान भोगु समस्तां । नाही जाण गा सर्वथा ।
ज्यासी जैसी पुण्यअवस्था । तैशी प्राप्तता तयासी ॥४२॥
स्वपुण्योपचिते शुभ्रे विमान उपगीयते ।
गन्धर्वैर्विहरन् मध्ये देवीनां हृद्यवेषधृक् ॥ २४ ॥
आपुले पुण्याचेनि मोलें । चंद्रप्रभ विमान आलें ।
त्यामाजीं आरूढले । भोगूं लागले दिव्य भोगु ॥४३॥
तेथें दिव्य देहाची प्राप्ती । मनोहर वेषातें धरिती ।
अतिमधुर गंधर्व गाती । स्वेच्छा क्रिडती स्त्रियांसीं ॥४४॥
त्या स्वर्गींच्या स्वर्गांगना । देखतां भुली पडिली मना ।
त्यांचेनि छंदें जाणा । नाना स्थानां क्रीडतु ॥४५॥
स्त्रीभिः कामगयानेन किङ्किनीजालमालिना ।
क्रीडन् न वेदात्मपातं सुराक्रीडेषु निर्वृतः ॥ २५ ॥
त्या स्त्रियांसमवेत आपण । विमानीं करोनि आरोहण ।
स्वेच्छागामी गमन । शोभे विमान तें कैसें ॥४६॥
घंटाघंटिका-जाळमाळा । क्षुद्रघंटिका रत्नमेखळा ।
किंकिणी लाविलिया सकळा । विमानलीळा विचित्र ॥४७
इच्छिल्या ठाया ने विमाना । चैत्रवना कां नंदनवना ।
भोगावया स्वर्गांगना । आसक्त जाणा झालासे ॥४८॥
वनीं सुमनांचे संभार । पराग उधळत सुंदर ।
कोकिळांचे मधुर स्वर । झणत्कार भ्रमरांचे ॥४९॥
मंद सुगंध सुशीतळ । झळकतसे मलयानिळ ।
स्वर्गांगनांसी गदारोळ । कामसुकाळ सकामां ॥५५०॥
आगी कापुरा होतां भेटी । एकवेळे भडका उठी ।
तैसें पुण्य वेंचलें उठाउठी । भोगासाठीं सकामां ॥५१॥
मज पतन होईल येथ । भोग जातील समस्त ।
हेंही नाठवी त्याचें चित्त । कामासक्त झालासे ॥५२॥
दीपासी देतां आलिंगन । पतंगा नाठवे निजमरण
तैसें नाठवे आत्मपतन । भोगी मन विगुंतलें ॥५३॥
तावत् प्रमोदते स्वर्गे यावत् पुण्यं समाप्यते ।
क्षीणपुण्यः पतत्यर्वाग् अनिच्छन् कालचालितः ॥ २६ ॥
जंव असे पुण्यसंपत्ती । तंव स्वर्गभोग भोगिती ।
क्षीण झाल्या पुण्यशक्ती । पतन पावती तत्काळ ॥५४
जंववरी गांठीं असे धन । तंववरी वेश्येचें सौजन्य ।
निःशेष वेंचल्या धन । मुख परतोन पाहेना ॥५५॥
तैशीच स्वर्गीची वस्ती । निजपुण्यें भोग भोगिती ।
पुण्यक्षयें क्षया जाती । पतन पावती अनिच्छा ॥५६॥
कष्ट करूनियां याज्ञिकीं । स्वर्गु साधिला होआवया सुखी ।
ते झालेचि परम दुःखी । पतन अधोमुखीं पावले ॥५७॥
उडालें स्वर्गभोगांचे सुख । आलें गर्भवासाचें दुःख ।
जळो सकामाचें सुख । ठकले याज्ञिक सुखलोभें ॥५८॥
उद्धवा जे म्हणती स्वर्गसुख । ते या रीतीं पावले दुःख ।
स्वर्गसुख मानिती मूर्ख । नव्हे निर्दोख तो मार्गु ॥५९॥
विधियुक्त आचरतां याज्ञिक । पुढती पावले थोर दुःख ।
तरी अविधीनें होईल सुख । झणीं देख म्हणशील ॥५६०॥
येथ कर्ममार्गींची प्रवृत्ती । दों प्रकारें असे वर्तती ।
एकी विधिरूपें आचरती । दुजी स्थिती अविधीनें ॥६१॥
आतां सांगितली तुजप्रती । ते वेदोक्त विधानस्थिती ।
जे विधीनें स्वर्गप्राप्ती । हे प्रवृत्ती उत्कट ॥६२॥
पुण्यक्षयें स्वर्गपतन । तेंही सांगीतलें कथन ।
आतां अविधीं जें आचरण । तेंही लक्षण परियेसीं ॥६३॥
वेदउल्लंघनें कुमती । कुश्चित जनांचे संगती ।
अप्रवृत्तीची प्रवृत्ती । अधर्मस्थिती अवधारीं ॥६४॥
यद् यद् धर्मरतः सङ्गाद् असतां वाजितेन्द्रियः ।
कामात्मा कृपणो लुब्धः स्त्रैणो भूतविहिंसकः ॥ २७ ॥
सहज प्राणी कामासक्त । प्राप्तकामें अतिलुब्ध होत ।
काम न पवतां दीनचित्त । स्वभावो नित्य जीवांचा ॥६५॥
ऐशिया स्वभावनिष्ठासी । जरी संग होय असंत पुरुषेंसीं ।
तरी रति वाढे अधर्मासी । अकर्मासी प्रवर्ते ॥६६॥
चंचलत्वें मर्कट मन । त्यासी असत्संग-मदिरापान ।
कामवृश्चिकें दंशिलें जाण । तेव्हां वर्तन यद्वातद्वा ॥६७॥
पिशाहातें धेंडेवाळी । दीधल्या तो सर्वत्र जाळी ।
तेवीं असत्संगें करी होळी । स्वधर्म समूळीं जाळिती ॥६८॥
बाळकाहातीं दीधलें शस्त्र । खोंचितां न म्हणे आप पर ।
छेदी आपुलेंचि शरीर । हितविचार तें नेणे ॥६९॥
जेवीं जानी अवतरे देव्हारा । तिच्या तोंडा नाहीं वाढावारा ।
कां बहुरूप्याच्या दिगंबरा । नाहीं थारा वैराग्या ॥५७०॥
तैसा असत्संगें खरा । घाली दंभाचा पसारा ।
नाहीं विवेकाचा थारा । कामशास्त्रा प्रवर्ते ॥७१॥
कामशास्त्रें अतिकाम । कामास्तव योजी अधर्म ।
अधर्मास्तव अकर्म । निंद्य धर्म आचरे ॥७२॥
निंद्य धर्माचा संयोग । यासी मुद्दल लुब्धभोग ।
लुब्धभोगामाजीं चांग । अधर्म साङ्ग सविस्तर ॥७३॥
अधर्म वाढतां उभारा । परद्रव्य आणि परदारा ।
याचिलागीं शरीरा । उपायद्वारा कष्टवी ॥७४॥
अंगनेलागीं अति दीन । स्त्रीध्यानें होय स्त्रैण ।
स्त्री साधावया जाण । भूतहनन आरंभी ॥७५॥
पशूनविधिनाऽऽलभ्य प्रेतभूतगणान् यजन् ।
नरकानवशो जन्तुर्गत्वा यात्युल्बणं तमः ॥ २८ ॥
विधि म्हणे तें न करावें । वेदु बोले तें नाइकावें ।
स्मृतिशास्त्र नावडे जीवें । कर्म करावें स्वेच्छा ॥७६॥
जारण मारण उच्चाटन । स्तंभन मोहन वशीकरण ।
असाध्य साधूनि अंजन । करी लागवण स्त्रियांसी ॥७७
लोण राई आणि बिबवे । मधुरसीं कालवी आघवे ।
शाबरी मंत्राचेनि वैभवें । होम करूं धांवे तामस ॥७८॥
कर्म करावया अभिचार । मेष जंबूक वानर ।
सरड बेडूक मत्स्य मगर । गीध घार होमिती ॥७९॥
नग्न भैरव वेताळ । झोटिंग पिशाच कंकाळ ।
मारको मेसको मैराळ । भूतें प्रबळ उपासी ॥५८०॥
काळी चिडी टोंकण घारी । काग बक उलूक मारी
आवंतूनि काळी मांजरी । शाबरमंत्री होमिती ॥८१॥
वाहत्या घाण्याचें तेल चोरी । प्रदोषसंधीं न्हाये शनिवारीं ।
शाकिनी डाकिनी मध्यरात्रीं । होमामाझारीं चेतवी ॥८२॥
मद्याचे घट पूर्ण भरी । मातंगीची पूजा करी ।
रुधिर घाली प्रेतयात्रीं । मोहनीमंत्रीं मंत्रूनी ॥८३॥
घेती हळदीची उटी । सेंदूर लाविती ललाटीं ।
काम साधावया हटीं । अंजन कष्टी साधिती ॥८४॥
होमपात्रें करावया तांतडी । समूळ अश्वत्थातें तोडी ।
फळित पुष्पित ओषधी उपडी । आसनाबुडीं घालावया ॥८५॥
बीज जपावया मंत्राचें । वोलें कातडें प्रेताचें ।
आणवी मृगअस्वलांचें । भय पापाचें मानीना ॥८६॥
खेचर भूचर जळचर । जीव पीडिती अपार ।
घेऊनि ब्राह्मणाचें रुधिर । अभिचार आचरती ॥८७॥
गायीब्राह्मणांसी जाण । पीडा करिती दारुण ।
क्षेत्रवित्तदाराहरण । स्वार्थें प्राण घेताति ॥८८॥
देवालयींचें देवलेश । कां शिवालयींचे शिवशेष
घेतां न करिती आळस । वासना असोस अधर्मीं ॥८९॥
एवं कर्म करितां ऐसें । तेणें अकर्म कर्मवशें ।
अंधतमीं तो प्रवेशे । जेवीं कां अवसे चंद्रमा ॥५९०॥
अकर्म जाण अतुर्बळी । जीवाचें निजज्ञान छळी ।
अतिमूढ करूनि ते काळीं । निरयकल्लोळीं घालित ॥९१॥
ते नरकींची नवल कथा । कोटि वर्षें तळीं जातां
ठाव न लगे गा सर्वथा । केवीं वरुता येईल ॥९२॥
त्यातें 'अंधतम' म्हणती । जें देखतां अंध होय वृत्ती ।
निघतां निर्गमु विसरती । नरकीं वसती मूढत्वें ॥९३॥
जंव होय कर्मभोगान्त । तंव नरक भोगी आकल्पान्त ।
मग स्थावरत्व पावत । वृक्ष होत कां पाषाण ॥९४॥
ऐशी अवस्था गाढमूढ । केवळ जाड्य झालें जड ।
स्वप्नीं सुख नेणती गोड । दुःख दुर्वाड भोगिती ॥९५॥
एवं अधर्मवृत्तीं वर्ततां । सुखलेश न लभे सर्वथा ।
दुःख अनिवार भोगितां । निर्गमता त्यां नाहीं ॥९६॥
कर्माणि दुःखोदर्काणि कुर्वन् देहेन तैः पुनः ।
देहमाभजते तत्र किं सुखं मर्त्यधर्मिणः ॥ २९ ॥
ऐकें बापा उद्धवा । मरणधर्मात्मका जीवा ।
सुख न भेटे त्याच्या भावा । दुःखप्रभवामाजीं वासु ॥९७॥
नरदेहा येवोनि केवळ । क्रूर कर्में करिती प्रबळ ।
ज्यांसी उत्तरोत्तर दुःखफळ । यातना सबळ भोगवी ॥९८॥
मरमरों दुःख भोगी दारुण । उपजोनि कर्में करी हीन
दुःखावर्तीं पडे जाण । आपणिया आपण घातक ॥९९॥
जे संतचरणीं विमुख । त्यांसी स्वप्नींहि नाहीं सुख ।
क्रूर कर्में करी कामुक । चढतें दुःख सकामा ॥६००॥
एवं प्रवृत्तीमाजीं असतां । सकाम कर्में आचरतां
सविधि कर्में करितां । दुःख सर्वथा अनिवार ॥१॥
सविधि काम्यें स्वर्गपतन । अविधि काम्यें नरक दारुण ।
एवं प्रवृतीमाजीं जाण । सुख कोण सकामा ॥२॥
म्हणशी लोकपाळांच्या ठायीं । नित्य सुख असेल पाहीं ।
त्यांसी जन्ममरण नाहीं । अमरत्व आम्हींही साधावें ॥३॥
लोकपाळांचे नित्य लोक । लोकपाळही नित्य देख ।
तेथें असेल नित्य सुख । ऐसें मूर्ख कल्पिती ॥४॥
लोकानां लोकपालानां मद् भयं कल्पजीविनाम् ।
ब्रह्मणोऽपि भयं मत्तो द्विपरार्धपरायुषः ॥ ३० ॥
लोकपाळामाजीं अमरेंद्र । मरुद्गणांचा राजा इंद्र ।
ज्यासी मानिती सूर्यचंद्र । वरुण कुबेर यमादि ॥५॥
ज्या अमरावती सिंहासन । ऐरावताचें आरोहण ।
उच्चैःश्रवा अश्व जाण । पुढें आपण खोलणिये ॥६
ज्यासी उर्वशी भोगपत्नी । रंभामुख्य विलासिनी ।
जेथ तिलोत्तमा नाचणी । चिंतामणी लोळती ॥७॥
अष्टमासिद्धींचीं भांडारें । रत्नजडित धवळारें ।
मर्गजाचे डोल्हारे । सुवर्णसूत्रें लाविले ॥८॥
वैदूर्याचे शाहाडे । कामधेनूंचे वाडे ।
कल्पद्रुमांचे मांदोडे । चहूंकडे शोभती ॥९॥
लोकपाळ आज्ञेचे । सुरसेना सैन्य ज्याचें ।
एवढें ऐश्वर्य जयाचें । राज्य स्वर्गीचें भोगित ॥६१०॥
त्यासी माझी काळशक्ती । ब्रह्मयाचे दिनांतीं ।
चौदा इंद्र क्षया जाती । येरांची गति कायशी ॥१॥
ब्रह्मायु म्हणती समता । जो द्विपरार्ध आयुष्यवंता ।
जंव न पवे माझी काळसत्ता । तंव श्लाघ्यता आयुष्याची ॥१२॥
ज्यासी अग्रपूजेची मान्यता । जो लोकलोकपाळांचा कर्ता ।
त्या ब्रह्मयासी माझी काळसत्ता । ग्रासी सर्वथा सलोकें ॥१३॥
मी काळात्मा दंडधरु । शास्ता नियंता ईश्वरु ।
अंतर्यामी सर्वेश्वरु । अतिदुर्धरु व्यापकु ॥१४॥
माझा काळक्षोभ दारुण । त्यातें आवरूं शके कोण ।
धर्मअर्थकामें जाण । निवारण त्या नव्हे ॥१५॥
प्रळयकर्त्या महाकाळासी । माझी काळसत्ता ग्रासी ।
माझें महाभय सर्वांसी । लोकपाळांसी सुख कैंचें ॥१६॥
लवनिमेष-पळपळें । माझेनि भयें सूर्य चळे ।
माझेनि भयें प्राण खेळे । वायु चळे माझेनि भेणें ॥१७॥
माझे आज्ञेवरी अग्नि जाण । वसवीतसे जठरस्थान ।
मद्भयें नव्हे अधिक न्यून । पचवी अन्न चतुर्विधि ॥१८॥
यथाकाळीं पर्जन्यधारीं । इंद्र वर्षे मद्भयेंकरीं
मृत्यु स्वकाळें प्रळय करी । भय भारी त्या माझें ॥१९॥
माझेनि भयेंकरीं देखा । समुद्र नोलांडी निजरेखा ।
माझिया भयाची थोर शंका । तिंही लोकां कांपवी ॥६२०
तिंही लोकांचा शास्ता । ईश्वर तो मी नियंता ।
येणें कर्मजडाची वार्ता । अनीश्वरता छेदिली ॥२१॥
प्रवृत्तीसी अनर्थता । मागां दाविली तत्त्वतां ।
वैराग्य स्थापिलें सदृढता । निवृत्ति सर्वथा अतिश्रेष्ठ ॥२२॥
आपुल्या ऐश्वर्याच्या आविष्कारें । साधूनि ईश्वरत्व केलें खरें ।
मीमांसकमत-निराकारें । निरूपण पुढारें चालवी ॥२३॥
मीमांसकमतवार्ता । बोलिले जीवासी अनेकता ।
तोचि कर्ता आणि भोक्ता । हेचि सर्वथा निराकारी ॥२४॥
गुणाः सृजन्ति कर्माणि गुणोऽनुसृजते गुणान् ।
जीवस्तु गुणसंयुक्तो भुङ्क्ते कर्मफलान्यसौ ॥ ३१ ॥
कृष्ण म्हणे उद्धवातें । एकादश इंद्रियें समस्तें ।
करिती नानाविध कर्मांतें । आत्मा तो येथें सर्वसाक्षी ॥२५॥
दीपु उजळलिया घरीं । लोक वर्तती व्यापारीं ।
तो नेमी ना निवारी । तैशापरी जीवु येथें ॥२६॥
जीवु प्रेरोनि इंद्रियांतें । म्हणाल करवितसे कर्मांतें ।
जेवीं कुर्हाडी घेऊनि हातें । छेदी वृक्षातें कृषीवळु ॥२७॥
ऐशी इंद्रियांची प्रेरकता । जीवासी न घडे सर्वथा ।
ते न घडायाची ऐक कथा । तुज तत्त्वतं सांगेन ॥२८॥
इंद्रियां कर्मीं प्रेरण । करिते सत्त्वादिक गुण ।
जीवु उभयसाक्षी जाण । कर्मकारण त्या नाहीं ॥२९॥
अंगें नातळतां आपण । चुंबक संनिधिमात्रें कारण ।
अचेतन लोहा करी चळण । तैसा जाण जीव येथें ॥६३०॥
कां उगवल्या दिवाकर । सुष्टदुष्ट लोकव्यापार ।
तो सूर्यासी नातळे कर्मभार । साक्षी साचार कर्मांचा ॥३१॥
तैसी जीवासी कर्तव्यता । सत्य नाहीं गा सर्वथा ।
दिसे जें कांहीं आपाततां । ते आध्यासिकता मिथ्यात्वें ॥३२॥
कवळें अध्यासिला डोळा । तो चंद्रमा देखे पिंवळा ।
तेवीं आत्मा कर्ता भासे स्थूळा । केवळ निश्चळा नेणती ॥३३॥
सवेग चालतां आभाळें । बाळें म्हणती चंद्रमा पळे ।
तेवीं आत्मा कर्ता मानिती स्थूळें । उपाधिमेळें अध्यासु ॥३४॥
देह मी कर्म माझें । हें आत्मेनि स्वप्नीं नेणिजे ।
मृगजळीं बुडाले राजे । सत्य मानिजे तैसें हें ॥३५॥
एवं आत्म्यासी कर्तव्यता । सत्य नाहीं गा सर्वथा ।
त्यासी म्हणताती फळभोक्ता । तेही वार्ता मिथ्यात्वें ॥३६॥
स्वप्नीं जोडिल्या सहस्त्र गायी । जागृतीं त्यांचें दुभतें नाहीं ।
आत्मा भोक्ता तैसा पाहीं । उपाधीच्या ठायीं मिथ्यारूपें ॥३७॥
डबकीं प्रतिबिंबला रवी । तो जै तेथील कर्दम सेवी ।
तैं भोक्ता आत्मा देहगांवी । सत्य मानवीं मानावा ॥३८॥
मृगजळामाजिलेनि मत्स्यें । बिंबला चंद्र गिळिजे आवेशें ।
तैसा आत्मा देहाभिनिवेशें । भोगविशेषें भोगिता ॥३९॥
एवं आत्मा जो भोक्ता । ते सोपाधिक वार्ता ।
उपाधि मिथ्या गा तत्त्वतां । आत्मा भोक्ता कैसेनि ॥६४०॥
आत्मा अकर्ता अभोक्ता । सदृढ साधिलें तत्त्वतां ।
जीवासी बोलिली अनेकता । ते मिथ्या आतां साधितु ॥४१॥
यावत् स्याद् गुणवैषम्यं तावन्नानात्वमात्मनः ।
नानात्वमात्मनो यावत् पारतंत्र्यं तदैव हि ॥ ३२ ॥
सत्व-रज-तमांचा । अंतरीं धुमाडू गुणकर्मांचा ।
तंव जीवासी अनेकत्वाचा । आभासु साचा मानला ॥४२॥
अहंकारादि देहपर्यंत । जंव जीवासी मीपण भासत ।
तंव नानात्व मानी सत्य । तें मिथ्या निश्चित उद्धवा ॥४३॥
जैसें आपुलेंचि मुख । आरिसा करी आपणासन्मुख ।
तैसें अविद्यायोगें मायिक । द्वैत देख दाखवी ॥४४॥
आरिशामाजीं आपुला । जो द्वैतप्रभावो स्वयें देखिला ।
तेणें आपण नाहीं द्विधा झाला । मिथ्या भासला आभासु ॥४५॥
तो आभास झालिया समोर । त्रिगुण गुणांचे विकार ।
एकचि दावी नानाकार । दिसे साचार गुणक्षोभें ॥४६॥
जैसें आपुलेंचि मुख केवळ । शस्त्र आदर्श आणि जळ ।
लांब निश्चळ चंचळ । करी प्रबळ विकारी ॥४७॥
एवं त्रिप्रकार कार्यविशेखें । मुखचि देखिजे निजमुखें ।
तैसें तें नानात्व लटिकें । गुणक्षोभकें भासतु ॥४८॥
सूत्रचि विणिलें पटाकारीं । पटावरी तंतूंच्या हारी ।
दिसती तेवीं चराचरीं । नानाकारीं एकुचि ॥४९॥
साकरेचा केला ऊंसु । परी कठिण आंत बाकसु ।
मधील पिळून घ्यावा रसु । हा त्रिगुण दोषु त्या नाहीं ॥६५०॥
तैसा परमात्मा श्रीहरी । अद्वितीय एकु चराचरीं ।
त्यासी अनेकत्वाची परी । सत्त्वादि करी गुणक्षोभु ॥५१॥
जैसा बहुरूपी आपुल्या ठायीं । नाना सोंगें धरी देहीं ।
तितुकीं रूपें त्यासी नाहीं । एकला पाही अद्वैत ॥५२
तैसा सच्चिदानंद श्रीहरी । आत्मा एक चराचरीं ।
नांदताहे नानाकारीं । द्वैतामाझारीं अद्वैत ॥५३॥
'अद्वैत' साधिलें जीवासी । सत्य मानिलें आम्हांसी ।
परी एक आशंका ऐसी । निजमानसीं वर्तत ॥५४॥
तूंचि म्हणसी 'जीव परतंत्र' । आतां अद्वैतपणें 'स्वतंत्र' ।
बोलसी बोलणें विचित्र । केवीं साचार मानावें ॥५५॥
अद्वैतपण संपादिसी । माझें भय लोकपाळां म्हणसी ।
हें न मने गा आम्हांसी । अद्वैतासी भय कैंचें' ॥५६॥
ऐशिया रीतीं उद्धवा । झाल्या संदेहासी रिघावा ।
तो तूं आतळों नेदीं जीवा । ऐक बरवा निर्धारु ॥५७॥
जीवासी उपाधीसी तादात्म्यता । तंव तंव आभासे नानात्मता ।
नानात्वीं परतंत्रता । ईश्वरसत्ता नियामक ॥५८॥
अमित मीनलिया दळ । सेनापतीवीण विकळ ।
आंबा पिकलिया रसाळ । राखण सबळ त्यापासीं ॥५९॥
तैसी जीवासी जंव अनेकता । तंव सृष्टीसी कर्ता हर्ता नियंता ।
जाण ईश्वरचि सर्वथा । परतंत्रता ते जीवासी ॥६६०॥
अनेकत्वें परतंत्रता । यालागीं ईश्वर नियंता ।
ऐसी देखोनि ईश्वरसत्ता । भय समस्तां जीवांसी ॥६१॥
माझे ईश्वरी सत्तेचे भयें । देखोनि अंतकुही भीताहे ।
इंद्रादिकांचा पाडु काये । भय वाहे विधाता ॥६२॥
माझी अत्यंत प्रळयींची सत्ता । वाजे हरिहरांचे माथां ।
अनेकत्वाचा संहर्ता । मीचि सर्वथा निजकाळु ॥६३॥
यालागीं अनेकत्व जंव आहे । तंववरी दुस्तर काळभये ।
जेव्हां अनेकत्व नाहीं होये । तेव्हां काळू काये नाशील ॥६४॥
एवं अनेकत्वाचे माथां । ईश्वरभयाची काळसत्ता ।
अनेकत्वें परतंत्रता । जाण सर्वथा उद्धवा ॥६५॥
तें अनेकत्व जैं जाये । तैं काळ नाहीं मा कैंचें भये ।
पर नसतां परंतत्र न होये । एकत्वीं आहे स्वानंद ॥६६॥
जेथ द्वैताचा मळु नुठी । ऐक्य देखे सकळ सृष्टीं ।
तेव्हां स्वानंदाचिया कोटी । भोगी उठाउठी निजबोधें ॥६७॥
ज्या सुखाची मर्यादा । देशें काळें न करवे कदा ।
त्या सुखाची सुखसंपदा । भोगिती सदा अद्वैतें ॥६८॥
निजात्मेज्ञानें अलोलिक । दुजेनवीण अद्वैतसुख ।
तें सांडूनि कर्मवादी परम मूर्ख । नाना लोक वांछिती ॥६९॥
मागां कर्मवादी कर्मठ । बोलिले प्रवृत्ति अतिश्रेष्ठ ।
कर्में करूनियां उद्भट । भोग वरिष्ठ भोगावे ॥६७०॥
तेंचि निरसोनि आतां । पुढारीं चालविली कथा ।
उद्धवासी अद्वैतता । दृढ सर्वथा सांगत ॥७१॥
यावदस्यास्वतंत्रत्वं तावदीश्वरतो भयम् ।
य एतत् समुपासीरंस्ते मुह्यन्ति शुचार्पिताः ॥ ३३ ॥
गुणवैषम्य ज्याचे ठायीं । ते नर भोगासक्त पाहीं ।
यागादि कर्में करूनि देहीं । भोगस्थान तिहीं ठाकिलें ॥७२॥
जे जे ठाकूनि गेले लोक । तेथून याज्ञिकां पतनधाक ।
तंव दुःखी देखे लोकनायक । अनित्य लोक देखोनि ॥७३॥
पदच्युती लोकच्युती । भोगकर्मे भोगच्युती ।
केले कष्ट वृथा जाती । दुःखी होती निजपतनें ॥७४॥
घायाळा कीजे तरटमार । तैसें ओतप्रोत दुःख फार
भंवे जन्ममरणव्यवहार । भोगी अघोर गर्भवास ॥७५॥
राहाटमाळेचे करे । पुढती रिता पुढतीं भरे ।
तैसा अविश्रम फिरे । गर्भद्वारें मरणांतीं ॥७६॥
विंचें खादिल्या दुःखितासी । दाढीसी आग लागे त्यासी ।
तेवीं भोगक्षयें पतितासीं । गर्भवासीं पीडा होय ॥७७॥
लोकांची अनित्यता नेणती । यालागीं परमदुःखी होती ।
कष्टांचें फळ दुखःप्राप्ती । संसारावर्ती अडकले ॥७८॥
केवळ लोक भोग अनित्य । हेंही न घडे गा येथ ।
भोगलोक होत सत्य । तरी अनित्य म्हणावे ॥७९॥
जेवीं दोरीं सर्पाभास । तेवीं लोक चतुर्दश ।
केवळ मायामय विलास । सुखलेश तेथ कैंचा ॥६८०॥
केवळ जें कां मायिक । सत्यामाजीं कैंचें भोगसुख ।
कर्मठ ते केवळ मूर्ख । विषय मायिक वांछिती ॥८१॥
भरलें मृगजळाचें तळें । तेणें जैं पिकती साळीकेळें ।
तैं विषयभोगींं सुख फळें । हें न कळे भ्रांतासी ॥८२॥
जग दुमदुमित भरलें दिसे । तें तूं मायिक म्हणसी कैसें ।
हेंचि कळे अनायासें । तुज मी तैसें सांगेन ॥८३॥
काल आत्माऽऽगमो लोकः स्वभावो धर्म एव च ।
इति मां बहुधा प्राहुर्गुणव्यतिकरे सति ॥ ३४ ॥
केवळ मायामय कल्पित । संसार तो अज्ञानजनित ।
एकातें अनेक म्हणत । चित्तें दुश्चित्त होउनी ॥८४॥
कनकबीजसेवनें जैसें । शहाणें माणूस होय पिसें ।
मग त्यासी नसतेंचि आभासे । ससे मासे गो सर्प ॥८५॥
तैसें मायावशें अतिभ्रांता । नसतें अनेकत्व भासे चित्ता ।
नभीं गंधर्वनगर पाहतां । दिसे शोभिता पुरदुर्गु ॥८६॥
कां अंधारीं दोरु दिसे डोळां । म्हणे सर्प दंड कीं सुमनमाळा ।
नाना एकावळी मुक्ताफळां । कोणी अबळा विसरली ॥८७॥
तेवीं निजात्मा मी पुरुषोत्तम । त्या मज नानारूपें नानाकर्म ।
काळु आत्मा आगम । स्वभावधर्म मज म्हणती ॥८८॥
'काळु' म्हणती प्रकृतिक्षोभकु । 'आत्मा' म्हणती प्रकृतिनियामकु ।
'वेद' म्हणती कर्मबोधकु । अदृष्टद्योतकु 'धर्म' म्हणती ॥८९॥
अदृष्ट दृष्ट करूनि भोगविजे । यालागीं 'धर्म तो म्हणिजे ।
आतां 'स्वभावो' जेणें बोलिजे । तेंही सहजें परियेसीं ॥६९०॥
आत्मा भोक्ता हा 'स्वभावो' । जेणें परिणामें देवाधिदेवो ।
इत्यादिका हेतु पहा हो । मजचि 'स्वभावो' म्हणताति ॥९१॥
अदृष्टाचें फळ नाना लोक । 'लोक' म्हणावया हेतु हे देख ।
एवं मज एकांतें अनेक । मिथ्या मूर्ख मानिती ॥९२॥
नानारंगांचिया वृत्ती । चित्र लिहलें यथानिगुती ।
तेंही नानाकारें दिसे भिंतीं । सर्वव्यक्तिद्योतक ॥९३॥
तैसे नानाकार नाना धर्म । नाना नामें नाना कर्म
तें अवघा आत्माराम । सर्वोत्तम सर्वथा ॥९४॥
मजवेगळा रिता कांहीं । अणुभरी ठाव उरला नाहीं ।
मी सर्वात्मा सर्व देहीं । सर्वगत पाहीं सर्वदा ॥९५॥
जैसे सागरामाजीं तरंग । तैसें मजमाजीं दिसे जग ।
जग नव्हे तें मीचि चांग । सुख अव्यंग मजमाजीं ॥९६॥
मी शुद्ध-बुद्ध-मुक्तस्वभाव । त्या मज नानात्वें ठेविती नांव ।
उद्धवा ज्यासी जैसा भाव । तैसा मी देव तयासी ॥९७॥
नास्तिक्य वसे ज्याचे ठायीं । त्यासी मी सर्वथा कोठें नाहीं ।
आस्तिक्यवंतालागीं पाहीं । मी सर्वांठायीं तिष्ठतु ॥९८॥
भावार्थे जो मज जेथें पाहे । त्यासी मी तेव्हांचि तेथें आहें ।
मज पावावया उपाये । बहुत पाहें न लगती ॥९९॥
मी सर्वात्मा सर्वमत एकु । ऐसा जयाचा भाव निष्टंकु ।
तोचि पढियंता मज एकु । ज्ञानतिलकु तो माझा ॥७००
तो आत्मा मी त्याचें देह । मी ध्याता तो माझें ध्येय ।
मी ज्ञाता तो शुद्ध ज्ञेय । ऐसा पढिये तो आम्हां ॥१॥
उद्धवा हे एकात्मताभक्ती । सज्ञान ज्ञातें येणें भजती ।
तयां मज अभेदप्रीती । तुवांही या रीती भजावें ॥२॥
परमात्मा एक नित्य शुद्ध । त्यासी मायामय संसारबंध ।
मिथ्या जाण देहसंबंध । हा 'निजात्मबोध' पैं माझा ॥३॥
हा मिथ्यासंबंध पडे जीवासी । आत्मज्ञानें मुक्ति त्यासी ।
हें मागें बोलिलों तुजपाशीं । तेंचि मतनिरासीं दृढ केलें ॥४॥
धरोनि श्लोक चौदावा । अंतीं श्लोक चौतिसावा ।
मीमांसकमताचा आघवा । निरासु बरवा येणें केला ॥५॥
एवं निरसोनि मतांतर । अद्वैत स्थापिलें दृढतर ।
हेंचि निजज्ञान साचार । चराचरवरिष्ठ ॥६॥
अद्वैतज्ञान शुद्ध चोख । ऐकोनि उद्धवा जाहलें सुख ।
हृदयीं दाटला जी हरिख । पाहे श्रीमुख कृष्णाचें ॥७॥
चालिलें सात्त्विकाचें भरितें । चित्त विसरलें चिंतनातें ।
लोटले जी तेथें । आपआपणियातें विसरला ॥८॥
उद्धवासी नावेक । पडोनि ठेलें जी टक ।
सावध होऊनियां देख । कृष्णसंमुख तो झाला ॥९॥
अद्वैतभजनें जे भजते । ते भक्त कृष्णासी आवडते ।
तें केवीं प्राप्त होय मातें । यालागीं हरितें पुसतु ॥७१०॥
श्रीउद्धव उवाच ।
गुणेषु वर्तमानोऽपि देहजेष्वनपावृतः ।
गुणैर्न बध्यते देही बध्यते वा कथं विभो ॥ ३५ ॥
उद्धव म्हणे कृष्णनाथा । आत्मा देहामाजीं असतां ।
बंधन पावे जी तत्त्वतां । कीं सर्वथा पावेना ॥११॥
गुण असतां मुक्ति घडे । कीं गुण गेलिया मुक्ति जोडे ।
हेंचि सांगावें मज पुढें । अतिनिवाडें निश्चित ॥१२॥
गुण असतां मुक्ति घडे । हें सर्वथा बोलणें कुडें ।
ज्वर असतां आरोग्य न घडे । वृक्ष न वाढे भिरुंडेंसीं ॥१३॥
बाहीं बांधोनि पाषाण । समुद्रामाजीं तरे कोण ।
तैसें देहीं असतां त्रिगुण । मुक्तपण कैसेनि ॥१४॥
गुण जे रजतमादिक । त्यांचें कार्य देह देख ।
गुणासारिखीं आवश्यक । कर्मे अनेक आचरे ॥१५॥
कर्माचें फळ सुखदुःख । भोगणें पडे गा अचुक ।
गुणांसी मुक्ति न घडे देख । हें ज्ञाते लोक म्हणताति ॥१६॥
गुण गेलिया मुक्ती । हेंही न घडे गा श्रीपती ।
येहीविषयीं विनंती । कृपामूर्ती अवधारीं ॥१७॥
गुणांचें कार्य देहेंद्रियें । ते गुण जाऊनि देह राहे ।
भूमीविण वृक्ष होये । हें अबद्ध पाहें बोलणें ॥१८॥
कारण जाऊनि कार्य राहे । हें बोलणें घडे काये ।
गुण जातां देहोचि जाये । मुक्त वर्तताहे कैसेनि ॥१९॥
एवं गुण असतां नसतां । मुक्ति न घडे गा सर्वथा ।
येचिविषयीं कृष्णनाथा । तुज मी तत्त्वतां पुसतु ॥७२०॥
आणिक एक जगन्नाथा । तुज मी विनंती करीन आतां ।
गुण आत्म्यासी एकत्रता । न घडे सर्वथा निश्चित ॥२१॥
भरलें मृगजळाचें तळें । चंद्रमा बिंबेना तेणें जळें ।
तेवीं आत्मा गुणांसी नाकळे । स्वभावें नातळे गुणांतें ॥२२॥
गुण ते अज्ञानाची राती । आत्मा स्वप्रकाश गभस्ती ।
त्यासमोर ते कैंचे येती । मग बाधिती आत्म्यातें ॥२३॥
अंधार सूर्यातें गिळी । काउळा कैलास आतळी ।
बागुल हनुमंतातें सळी । मशक गिळी गजातें ॥२४॥
माशी-पांखें गगन उडे । सगळा मेरु थिल्लरीं बुडे ।
मृगजळीं जैं तारूं पडे । तैं आत्मा सांपडे गुणांत ॥२५॥
जेवीं आकाश नातुडे जाळीं । तेवीं आत्मा नाकळे गुणमेळीं ।
मा सुखदुःखांची नवाळी । गुणकल्लोळीं कां भोगी ॥२६॥
यापरी न घडे गा बद्धता । मा मुक्ताची कायसी कथा ।
कैसेनि बद्धमुक्तव्यवस्था । घडे कृष्णनाथा तें सांग ॥२७॥
येथ बद्धासी काय कारण । आणि मुक्ताची कोण खूण ।
एवं बद्धमुक्तलक्षण । मज संपूर्ण सांगावें ॥२८॥
कथं वर्तेत विहरेत् कैर्वा ज्ञायेत लक्षणैः ।
किं भुञ्जीतोत विसृजेच्छयीतासीत याति वा ॥ ३६ ॥
आतां बद्धमुक्तांची स्थिती । मज सांगावी श्रीपती ।
कोणें लक्षणें जाणिजेती । दोघे कळती कैसेनि ॥२९॥
पावोनियां विदेहावस्था । देहीं कैसेनि वर्तता ।
वश करूनि गुणातीतता । गुणीं क्रीडता कैसेनि ॥७३०॥
पावोनियां मुक्तदशा । देहीं भोग भोगी कैसा ।
त्यासी त्यागाचा कोण ठसा । हृषीकेशा सांगिजे ॥३१॥
त्याचे निद्रेचें कोण लक्षण । कोण बैसका कोण आसन ।
वस्तु जाणोनि संपूर्ण । गमनागमन त्या कैसें ॥३२॥
ऐशीं मुक्तांची लक्षणें । त्याहोनि बद्धांची विलक्षणें ।
कृपा करोनि नारायणें । मजकारणें सांगिजे ॥३३॥
एतदच्युत मे ब्रूहि प्रश्नं प्रश्नविदां वर ।
नित्यबद्धो नित्यमुक्त एक एवेति मे भ्रमः ॥ ३७ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे भगवद्-उद्धवसंवादे दशमोऽध्यायः ॥ १० ॥
या प्रश्नोत्तरांची उत्कंठा । थोर वर्ततसे वैकुंठा ।
प्रश्नवेत्त्यांमाजीं श्रेष्ठा । अतिवरिष्ठा गोविंदा ॥३४॥
अनादि असे गुणसंबंधु । तेणें आत्मा झाला नित्यबद्धु ।
नित्यमुक्त हा शब्दु । असंबद्धु सर्वथा ॥३५॥
जरी आत्म्यासी नित्यमुक्तता । तरी बोलोंचि नये बद्धता ।
एकुचि बद्धमुक्त म्हणतां । भ्रम अच्युता वाटत ॥३६॥
आत्मा एकचि तत्त्वतां । त्यासी बद्धता आणि मुक्तता ।
एकासीच दोनी अवस्था । कृष्णनाथा कैसेनि ॥३७॥
तो धाला तोचि भुकेला । जागता तोचि निजेला ।
जो जिता तोचि मेला । सत्यत्व या बोला कैसेनि ॥३८॥
काळें तेंचि धवळें । देखणें तेंचि आंधळें ।
अर्धें तेंचि सगळें । कुहिर्या केळें केवीं होती ॥३९॥
लोण तेंचि अलवणी । कोरडें तें पाणी ।
अतिशीतळ तो दारुण अग्नि । मुकें पुराणीं बोलिगडें ॥७४०॥
लुगडें नागीवपणें लाजाळु । अन्न भुकेलेपणें भुकाळू ।
मुक्तीसी मुक्तीचा दुकाळू । कापूरा परिमळू मिळेना ॥४१॥
तैसे संत तेचि असंत । अद्वैत तेंचि होय द्वैत ।
तेव्हां हित तेंचि अनाहित । दिसे प्रस्तुत आम्हांसी ॥४२॥
आत्मा नित्यमुक्त-शुद्ध-बुद्ध । ऐसा तुवांचि मज केला बोध ।
तो गुणसंगें म्हणसी बद्ध । भ्रमु अगाध येणें मज ॥४३॥
एकासचि बद्धमुक्तता । कैसेनि घडे कृष्णनाथा ।
कृपाळुवा जी अनंता । हें मज तत्त्वतां सांगावें ॥४४॥
म्हणीसी मुक्तीसी आगंतुकता । तेणें मोक्षासि आली अनित्यता ।
बद्ध आगंतुक म्हणतां । त्यासी सादिता येऊं पाहे ॥४५॥
पूर्वी बद्धचि नव्हता । येथूनि उपजला आतां ।
ऐशी सादिता बोलतां । होइल शास्त्रार्था विरुद्ध ॥४६॥
श्रुतिस्मृतिशास्त्रसिद्ध । अनादि मुक्ती अनादि बद्ध ।
आत्मा एक अवस्था द्विविध । त्याही विरुद्ध परस्परें ॥४७॥
उठिली बद्धता मुक्तीतें छळी । खवळली मुक्ती बद्धता गिळी ।
ऐशी विरुद्धता आत्म्याजवळीं । केवीं वनमाळी राहताति ॥४८॥
जैं सांजवेळे भेटे पाहांट । तै विद्या अविद्या होय एकवट ।
सूर्य अंधाराची बांधे मोट । तैं आत्म्यानिकट अवस्था ॥४९॥
हिंगासी कापुराचा वासु जोडे । तैं अविद्या विद्येमाजीं पडे ।
ससा सिंहावरी जैं चढे । तैं आत्म्यापुढें अवस्था ॥७५०॥
उद्धवा म्हणे कृष्णनाथा । या जैं कळल्या दोनी अवस्था ।
तैंचि मुक्ति आली हाता । मज सर्वथा मानलें ॥५१॥
मग म्हणे श्रीअनंता । विशद सांगाव्या अवस्था ।
म्हणोनि चरणीं ठेविल्या माथा । मोक्षदाता तूं मज ॥५२॥
सखोल उद्धवाचा प्रश्न । ऐकोनि सुखावला नारायण ।
माझा उद्धवु जाहला सज्ञान । हरिखें जगज्जीवन डोलतु ॥५३॥
परमार्थी अवस्था गाढी । देखोनि प्रश्नाची अतिगोडी ।
उद्धवासी ओंवाळावया आवडीं । जीव कुरवंडी करूं पाहे ॥५४॥
नुल्लंघी भक्ताचें उत्तर । फोडिलें गुह्य ज्ञानभांडार ।
भक्तकृपा जी अपार । हरि साचार तुष्टला ॥५५॥
उद्धवाचा प्रश्न गहन । कृपा द्रवला जगज्जीवन ।
एका विनवी जनार्दन । आनंदघन वोळला ॥५६॥
त्या आनंदाचा महापूरु । शिष्यसरितेसी येईल थोरु ।
तेणें चिद्गंगासागरु । शिष्य सत्वरु ठाकील ॥५७॥
टाकोनियां संसारआस्था । जो लागला भक्तिपंथा ।
तोचि अधिकारी भागवता । परमार्था ग्राहकु ॥५८॥
ज्याचे पोटीं संसारचिंता । तो कथा ऐकतांचि दुश्चिता ।
चित्त चिती ज्या ज्या अर्था । तो सर्वथा तेथें असे ॥५९॥
चित्त जंव नाहीं सुचित । तंव न कळे श्रीभागवत ।
गुरुवांचूनि श्रीभागवतार्थ । नव्हे प्राप्त प्राण्यासी ॥७६०॥
जो संसारापासोनि विरक्त । गुरुचरणीं अतिअनुरक्त ।
त्यासी फावला एक परमार्थ । फळे भागवत तयासी ॥६१॥
देखतां कृष्णाचें श्रीमुख । उद्धवा नीच नवें समाधिसुख ।
तरी श्रवणाची श्रद्धा अधिक । आवडी देख अनिवार ॥६२॥
जो श्रुतिप्रतिपाद्य चिद्धन । त्या श्रीकृष्णाचें गुह्य ज्ञान ।
पुढतपुढतीं होआवया श्रवण । करी प्रश्न अतियोग्य ॥६३॥
विद्याअविद्येचा निरासु । श्रीकृष्ण सांगेल परेशु ।
पुढील अध्याय अतिसुरसु । श्रोतां अवकाशु मज द्यावा ॥६४॥
तो कृष्णउद्धवसंवादु । पुढिले कथेचा अतिविनोदु ।
एका जनार्दनीं महाबोधु । परमानंदु प्रकटेल ॥७६५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे श्रीकृष्णोद्धसंवादे परमहंससंहितायां एकाकारटीकायां दशमोऽध्यायः ॥१०॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥३७॥ ओव्या ॥७६५॥